विलासराव घरी आले होते खरे! पण त्यांच्या मनाला शांती नव्हती. सतत विशालाक्षीची काळजी वाटतं होती, पण रत्ना बाईंचा विचार मनात येताच ते त्यांच्या मनाला आवर घालायचे.
****
हळूहळू दिवस सरत होते. विशालाक्षीच पोट दिसू लागल्याने ती गरोदर असल्याची चर्चा गावात होऊ लागली, तसं विलासरावांनी तिला भेटणं सुद्धा कमी केलं.
****
एके दिवशी रत्ना बाई धान्य निवडत असताना त्यांची मैत्रिण त्यांना भेटायला वाड्यावर आली. तेव्हा विलासराव तिथल्याच बाजेवर बसून हिशोबाच काम करत होते
"रत्ने, तुला बातमी कळली का ग?" रत्ना बाईंची मैत्रिण
"कसली बातमी ग?" रत्ना बाईंनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं
"अग तुला आपली दूधवाली तुळसाआक्का माहितीये ना, गौळवाडीतली तिची नात विशालाक्षी पोटुशी हाय म्हणे!" रत्ना बाईंच्या मैत्रिणीने माहिती पुरवली.
"काय सांगतेस काय! पण तिचं तर अजून लगीन बी झालं न्हाई ना" रत्ना बाईंनी आश्चर्य व्यक्त केलं
"मग मी काय खोटं सांगेन व्हय. अख्ख्या गावात चर्चा सुरू हाय अन् तुला माहिती नाही. लग्नाआधीच पोटूशी राहिली ती." रत्ना बाईंची मैत्रिण
"पण तिच्या पोटात असलेल्या बाळाचा बाप हाय तरी कोन?" रत्ना बाईंनी विचारलं, तशी विलासरावांची चलबिचल वाढली. त्यांच्या हाताला घाम फुटला. रत्ना बाईंची मैत्रिण काय उत्तर देतेय, हे ऐकण्यासाठी त्यांचे कान आतुरले.
"ते काय ठाव न्हाई. म्हंजी गावातल्या बायका खोदून खोदून ईचारतात तिला, पण ती तोंडातून शबुत काढल तर ना, पण ह्या पोरीपायी किती ग त्या तुळसा आक्काला तरास. कुठं शेन खाल्ल काय माहिती!" रत्ना बाईंची मैत्रिण रागाने बोलली, तसे विलासराव एकदम चिडले
"तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकश्या. तिच्या बाळाचा बाप कोणीही असेल ती बघून घेईल आणि ती आलीय का तुमच्याकडे मदत मागायला? नाही ना. ती तिच्या हिंमतीवर जगतेय ना, मग तुम्हाला कसली अडचण आहे आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहिती नसेल, तर त्याच्या आयुष्यात नाक खुपसू नये." विलासराव रत्ना बाईंच्या मैत्रिणीला ताडताड बोलले आणि रागानेच स्वतःच्या खोलीत निघून गेले.
रत्ना बाई आणि त्यांची मैत्रिण त्यांच्याकडे पाहतच राहिल्या.
"रत्ने, अग विलास रावांस्नी काय झालं? अन् मी त्या विशालाक्षी बद्दल बोलत होते, तर विलासराव का एवढे चिडले?" रत्ना बाईंची मैत्रिणीने शंका बोलून दाखवली
"काय माहिती! हल्ली खूप चिडचिडे झालेत ते. शुल्लक गोष्टीवरून चिडतात. सगळ्या गोष्टी जागच्याजागी हव्या असतात, पण स्वतःच पसारा घालून ठेवतात. आता काय लहान राहिलेत का ते!" रत्ना बाईंनी काळजी व्यक्त केली
"बरोबर रत्ने! लहान नाही राहिलेत ते, उलट ह्याचा अर्थ पोरगा आता वयात आलाय. पोराचा चिडचिडेपणा सांभाळून त्याला समजून घेणारी सून शोध आणि लेकाचे हात लवकर पिवळे कर." रत्ना बाईंची मैत्रिण सल्ला देऊन निघून गेली, तश्या रत्ना बाई विचार करू लागल्या.
****
काही दिवसांनी रत्ना बाईंनी विलास रावांसाठी स्थळ बघायला सुरूवात केली, पण विलासराव मात्र काही ना काही कारण काढून आलेल्या स्थळाला नकार द्यायचे आणि कारण विचारल्यावर चिडायचे. मग मात्र रत्ना बाईंनी त्यांच्या नकळत वैशालीच स्थळ आणल आणि पाहण्याचा कार्यक्रम सुद्धा ठरवला.
त्यातच विशालाक्षीला बाळंतपणासाठी तालुक्याच्या हॉस्पिटलला भरती केल्याची बातमी विलासरावांच्या कानावर आली.
तसे ते तालुक्याला जायला घराबाहेर पडणार तेवढ्यात, दारासमोर गाडी ऊभी राहीली आणि त्यांच्या स्वागताला रत्ना बाई गेल्या. 'कोण आल?' हे पाहायला विलासराव सुद्धा पुढे गेले. त्याचक्षणी वीस वर्षांची नाजूक आणि देखणी विशालाक्षी त्यांच्या नजरेस पडली. ती साडी सावरत गाडीतून उतरत होती. विलासराव काहीक्षण तिला पाहतच राहिले. विलासरावांना असं तिच्याकडे एकटक बघताना पाहून रत्ना बाई गालातच हसल्या. घरी पाहुणे आले असल्याने आणि मुळात वैशालीच सौंदर्य पाहून विलासरावांनी तालुक्याला जायचं टाळलं.
"या.. या.. बसा. पत्ता शोधताना काही त्रास झाला नाही ना?" रत्ना बाईंनी डोक्यावरचा पदर नीट करत विचारलं
"अहो, नाही.. नाही.. खामगावमध्ये रत्ना बाई पाटलांच नावच एवढं मोठं आहे की, पत्ता विचारला तरी कोणीही घरी आणून सोडेल." वैशालीचे वडिल अदबीने बोलले
तेवढ्यात, नोकराने त्यांच्यासमोर चहा पाणी आणि नाष्ट्याचे पदार्थ आणून ठेवले. रत्ना बाईंनी वैशाली आणि तिच्या वडिलांना खाण्यासाठी आग्रह केला. रत्ना बाईंच्या आग्रहाखातर दोघांनी थोड खाल्ल.
काहीवेळाने, नाश्ता झाल्यावर रत्ना बाई बोलू लागल्या.
"आता आम्ही मुद्द्यालाच हात घालतो. हे आमचे एकुलते एक चिरंजीव. विलासराव दिघे पाटील. ह्यांच्यासाठी आम्ही तुमच्या मुलीला वैशालीला लग्नाची मागणी घालतोय. तुम्हांला आमचा प्रस्ताव मान्य आहे का?" रत्ना बाईंनी अस एकदम विचारल्यावर विलासराव आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागले.
"रत्ना ताई, आता तुम्ही आम्हांस्नी लाजवताय. तुम्ही तुमच्या मुलासाठी माझ्या मुलीला मागणी घालणं, हिचं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे अन् विलासरावांस्नी बि ओळखतो की आम्ही! ह्यांच्यासारखा गुणी मुलगा शोधूनही सापडणार नाही. आमचा होकार आहे ह्या लग्नाला." वैशालीचे वडील एक नजर विलास रावांकडे बघत म्हणाले आणि नकळत विलास रावांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
रत्ना बाईंनी वैशालीला पाटावर बसवून एका खणा नारळाने तिची ओटी भरली, तसा वैशालीने त्यांना वाकून नमस्कार केला. दोघांना बाजूबाजूला बसवण्यात आल आणि दोघांनी एकमेकांना मिठाई भरवली. वयात आलेले, दिसायला देखणे आणि रूबाबदार असलेले विलासराव वैशालीला फोटो पाहताक्षणी आवडले होते, पण तिने त्यांना प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं. आता सुद्धा पाहायची खूप ईच्छा होती पण वडील आणि होणाऱ्या सासूबाई समोर असल्याने तिने ती ईच्छा मनातच दाबली. विलासराव मात्र आल्यापासून तिच्याकडेच बघत होते.
ते चौघे बोलत असतानाच नुकतीच बाळंतीण झालेली विशालाक्षी बाळाला घेऊन तिथे आली.
"साहेब.." विशालाक्षीने प्रेमाने विलास रावांना हाक मारली
तसं विलास रावांच लक्ष समोर उभ्या असलेल्या विशालाक्षीकडे गेलं. तिला तिथे पाहताच विलास रावांना घाम फुटला.
"ए, तू काय करतेयस इथे?" रत्ना बाईंनी काहीस चिडत विचारलं
"मी साहेबांना..," विशालाक्षी पुढे काही बोलणार तेवढ्यात,
"ए.. तुझ्या तोंडून आमच्या विलास रावांच नाव घ्यायचं नाही हा. आधी कोणासोबत तरी शेन खाल्ल, वरून त्याचं बाळ स्वत:च्या पोटात वाढवलं आणि आता त्या बाळाला घेऊन आमच्या घरात का आलीयेस तू?" रत्ना बाईंनी रागाने विचारलं, तशी विशालाक्षी आशेने विलास रावांकडे बघू लागली, पण विलासराव मात्र काही न बोलता शांत बसले होते. त्यांच्या बाजूला स्वतःच्याच वयाची अनोळखी मुलगी बसलेली पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
"आई, त्यांना बहुतेक मदत हवी असेल आम्ही बघतो." विलासराव बैठकीतून उठून विशालाक्षीच्या समोर येऊन उभे राहिले
तश्या रत्ना बाई तिथून वैशालीजवळ जाऊन उभ्या राहिल्या.
विलास रावांनी एक नजर विशालाक्षीच्या कुशीत असलेल्या मुलीला पाहिलं. क्षणभरासाठी त्यांच्यातला बाप जागा झाला आणि आनंदाने त्यांचे डोळे पाणावले. ते बाळ सुद्धा विलास रावांकडे टुकुर टूकुर डोळ्यांनी पाहत होतं जणू तिने आपल्या बापाला ओळखलेल! ते पाहून विशालाक्षीच्या मनात नवी आशा उमलली.
"विशालाक्षी, आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. तू आता बाळाला घेऊन इथून निघून जा. पाहुणे गेल्यावर आम्ही स्वतः तुला भेटायला येतो." विलासरावांनी बाळाकडे बघतच विशालाक्षीला आश्वासन दिलं, तशी विशालाक्षी तिथून निघून गेली तर विलास रावांनी सुटकेचा निःश्वास सोडला आणि परत बैठकीत येऊन बसले.
त्या बैठकीतच त्यांचा साखरपुडा झाला आणि मंडळी निघून गेली. पुढच्याच महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात दोघांचं लग्न सुद्धा झालं.
क्रमशः
✍️नम्रता जांभवडेकर
(विलासरावांच्या लग्नाची बातमी कळल्यावर विशालाक्षीची काय प्रतिक्रिया असेल? वाचूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा