Login

झाकली मूठ - प्रेमाची (भाग - ७)

ही एक दिर्घकथा आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी...

"माय, ए.. माय, दूध घेऊन आलेय. पातेल आण." बाहेरून आवाज आला, तसे आतल्या खोलीत अभ्यास करत बसलेले विलासराव चिडतच बाहेर आले आणि 'कोण आलंय?' हे विचारणार तेवढ्यात, त्यांची नजर समोर उभ्या असलेल्या विशालाक्षीवर पडली. साडी नेसलेली, वेणीत गजरा माळलेली विशालाक्षी पहिल्याच नजरेत विलासरावांना आवडली. विलासराव एकटक आपल्याकडेच पाहतायत, हे पाहून विशालाक्षीही बावरली. तिने जोरात दाराची कडी वाजवली. त्यासरशी विलासराव भानावर आले.

"काय हवंय तुम्हाला?" भानावर येतं विलासरावांनी विचारले

"दूध द्यायला आले होते (हातातली दुधाची किटली दाखवत) माय न्हाई का घरात?" विशालाक्षीने घरात नजर फिरवत विचारलं

"आई, बाजारात गेलीय. मी पातेल घेऊन येतो." विलासराव स्वयंपाक घरात गेले आणि काहीचं वेळात हातातून एक भलमोठ पातेल घेऊन आले. ते बघताच विशालाक्षी तोंडावर हात ठेवून हसू लागली.

"हसायला काय झालं?" विलासरावांनी काहीस चिडत विचारलं.

"दुधाच पातेल एवढं मोठं नसतं." विशालाक्षी हसू आवरत म्हणाली

"पण स्वयंपाक घरात तर हेचं भांड आहे." विलास राव

"चुलीशेजारी एक जर्मनच पातेल असेल, ते घेऊन या." विशालाक्षी म्हणाली

तसे विलासराव पुन्हा स्वयंपाक घरात गेले आणि चुलीशेजारी बघू लागले. तसं त्यांना तिथे भिंतीच्या आधारे टेकून ठेवलेलं एक जर्मनच पातेल दिसलं.

"आमच्या स्वयंपाक घरात कुठली भांडी कुठे ठेवली, हे ह्यांना कसं माहिती? मनातच विचार करत, 'आई म्हणते ते बरोबर आहे. प्रत्येक बाईला स्वयंपाक घरात भांडी कुठे ठेवली हे, बरोबर माहिती असतं." विलासराव स्वतःशीच म्हणत पातेल घेऊन बाहेर आले, तसं विशालाक्षी किटलीच झाकण उघडून एका ग्लासाच्या आकाराच्या डावाने पातेल्यात दूध ओतू लागली. दूध घेताना विलासराव विशालाक्षीकडेच बघत होते. विशालाक्षी सुद्धा नजर चोरून त्यांच्याकडेच बघत होती आणि एकमेकांशी नजरानजर होताच विशालाक्षी लाजून नजर चोरत होती.

****

असेच दिवस जात होते. विशालाक्षी दूध द्यायला यायच्या वेळेला विलासराव दररोज काही ना काही कारण काढून रत्ना बाईंना कधी भाजी आणायला, तर कधी दुसऱ्या कामासाठी बाहेर पाठवून देतं असतं अन् विशालाक्षीकडून स्वतः दूध घेतं असतं. त्यावेळी त्यांचा नजरेनेच मूक संवाद होई, पण दररोज रत्ना बाईंना असं बाहेर पाठवण शक्य नसल्यामुळे ते विशालाक्षीला बाहेरचं भेटू लागले.

*****

अश्यातच एके दिवशी विशालाक्षी दूध द्यायला आली असताना बाहेर बारीक पाऊस पडत होता आणि परत जायला निघणार तेवढ्यात, अचानक जोरात पाऊस सुरू झाला. एवढा की पुढच्या काही क्षणांतच बाहेर ऊभी असलेली विशालाक्षी पूर्णपणे भिजली होती. पावसांत भिजल्यामुळे तिला थंडी सुद्धा वाजत होती. तिला ताप येईल, म्हणून विलासरावांनी तिला घरात बोलवलं आणि दार लावून घेतलं.

तिचं अंग पुसण्यासाठी टॉवेल आणायला खोलीकडे वळणार तेवढ्यात, आकाशात वीज कडाडली आणि दुसऱ्याचक्षणी वाड्यातले दिवे गेले. अंधाराला घाबरून विशालाक्षी विलासरावांना बिलगली. तिच्या अचानक मिठी मारण्याने क्षणभर विलासराव स्तब्धच झाले. नंतर भानावर येतं त्यांनी तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. थंडीने थरथरत असलेल्या विशालाक्षीला विलासरावांच्या त्या मिठीत उबदार वाटतं होतं. काहीक्षण दोघेही एकमेकांच्या मिठीतच होते.

काहीवेळाने, वाड्यातले दिवे आले. तसे दोघेही भानावर आले. विशालाक्षी बावरून त्यांच्यापासून लांब झाली, पण तिचं भिजलेलं अंग पाहून विलासराव तिच्याकडे आकर्षित झाले अन् त्याच दिवशी ते दोघं तनाने एक झाले. भानावर येताच विलासरावांना रत्ना बाईंची भिती वाटली, पण तेव्हा आईच्या भितीपुढे त्यांचं विशालाक्षीवरचं प्रेम वरचढ ठरलं."

विलासराव आणि विशालाक्षीच एकमेकांवरच प्रेम आता खुलेआमपणे दिसतं होतं. दोघंही काही ना काही कारण काढून भेटायचे. कधीही घरकाम न करणारे विलासराव रत्ना बाईंना घरकामात मदत करू लागले होते, ह्याचं रत्ना बाईंना आश्चर्य वाटायचं.

****

एके दिवशी विशालाक्षीने एका मुलाकडून घाईघाईने विलासरावांना निरोप पाठवला आणि त्यांच्या भेटीच्या जागी भेटायला बोलावलं. विलासराव तिथे पोहोचले.

"विशू, काय झालं? तू आम्हाला एवढ्या घाईघाईत ईथे भेटायला का बोलावलंस?" विलासरावांनी लगबगीने विचारलं, तशी बाकड्यावर बसलेली विशालाक्षी त्यांच्याजवळ आली आणि तिने त्यांचा हात स्वत:च्या ओटी पोटावर ठेवला आणि लाजतच हसू लागली

"विशालाक्षी, काय झालंय मला सांगशील का? आणि तू लाजतेयस का?" विलासरावांनी काहीसं गोंधळून विचारलं.

"मी.. मी.. आई होणार आहे आणि तुम्ही बाबा. मला दिवस गेलेत." विशालाक्षी आनंदाने म्हणाली

तसं विलासरावांनी एक नजर विशालाक्षीच्या पोटाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत काही क्षण आनंद दिसला, पण दुसऱ्याच क्षणी रत्ना बाईंचा चेहरा डोळ्यांसमोर येऊन त्यांना वास्तवाची जाणीव झाली. तसा विशालाक्षीच्या पोटावर असलेला हात त्यांनी काढला आणि तिच्यासमोर पाठ करून उभे राहिले.

"काय झालं साहेब? तुम्हाला आनंद नाही झाला का?" विशालाक्षीने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं

"मला सांग, तुला कसं कळलं? तू तपासणी केलीयस?" विलासरावांनी खात्री करण्यासाठी विचारलं

"काल रात्रीपासूनच मला उलट्या होतं होत्या आणि आज सकाळी गरगरल्यासारखं झालं, तशी मला शंका आली म्हणून मी शेजारच्या पोराला घेऊन दवाखान्यात आले आणि तपासणी केल्यावर ही बातमी कळली. बातमी कळल्या कळल्या त्या पोराकडून तुम्हाला निरोप पाठवला, कारण मला सगळ्यात आधी ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती." विशालाक्षी विलासरावांचा हात हातात घेत आनंदाने म्हणाली

"विशालाक्षी, तुला हे बाळ पाडाव लागेल." विलासराव असं म्हणताच विशालाक्षीने त्यांचा हातात घेतलेला हात क्षणांतच झटकला.

"साहेब, हे काय बोलताय तुम्ही? आई होणार हे कळल्यापासून मला आनंदाने काही सुचेनास झालंय आणि तुम्ही बोलताय हे बाळ पाड. असं कस बोलू शकता तुम्ही?" विशालाक्षी पाणावलेल्या डोळ्यांनी काहीशी चिडत म्हणाली, तिला विलासरावांच्या बोलण्याने धक्का बसला होता

"विशालाक्षी, आपल्याला बाळ होणार आहे ह्याचा तुला जेवढा आनंद झालाय तेवढाच आनंद मलाही झालाय, पण तू एक गोष्ट लक्षात घे. आपल अजून लग्न झालं नाहीय आणि त्यात हे बाळ..," विलासराव पुढे काही बोलणार तेवढ्यात,

"मग चला आपण आता लगेच लग्न करूयात." विशालाक्षी डोळे पुसत विलासरावांचा हात पकडत म्हणाली

"आई, आपल लग्न मान्य करणार नाही." विलासराव दुसरीकडे बघत विशालाक्षीचा हात सोडवत म्हणाले, तस विशालाक्षीने विलासरावांच्या डोळ्यांत पाहिले. त्यांची नजर काही वेगळचं सांगत होती.

"साहेब, ह्याचा अर्थ तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही ना. ठिक आहे, मी एकटी कुमारिका माता म्हणून ह्या बाळाला वाढवेन." विशालाक्षीने स्वतःचा निर्णय सांगितला

"विशालाक्षी, अग वेडी आहेस का तू? हे काही शहर नाहीय. गावात प्रत्येक गोष्टीचा हाहाकार माजतो. अग काही महिन्यांनी तुझं पोट दिसू लागल्यावर लोकं नको नको ते प्रश्न विचारून तुला हैराण करतील, त्यांच्या वाईट नजरा तू कशी झेलशील?" विलासराव तिला समाजाची भिती घालून बाळ पाडण्यास प्रवृत्त करत होते.

"माझ्या बाळासाठी मी कोणाशीही लढायला तयार आहे, पण आता माझा निर्णय पक्का झालाय मी ह्या बाळाला जन्म देणारच!" विशालाक्षी स्वत:च्या निर्णयावर ठाम होती

"ठिक आहे, तुला माझं ऐकायचं नसेल तर तुला हवं ते कर." विलासराव रागाने म्हणाले आणि तिथून निघत होते, पण त्यांच्या मनात कसलीतरी भिती होती. ते तिथून जाणार तेवढ्यात,

"काळजी करू नका. ह्या बाळाचा बाप कोण आहे, हे कोणाला कळणार नाही" विशालाक्षीने जणू त्यांच्या मनातली भिती ओळखली होती

तसं विलासरावांनी करुण नजरेने तिच्याकडे पाहिले आणि तिथून निघून गेले. ईच्छा असूनही ते काही करू शकत नव्हते.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(विशालाक्षीचा मातृत्वाचा प्रवास कसा असेल? तिला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागेल? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all