Login

झाकली मूठ - (प्रेमाची भाग - ६)

ही एक दिर्घकथा आहे.
"चिंगी सापडल का काही?" रेवाने शोधाशोध करत विचारले

"नाही ग, वहिनी. आई गेल्यापासून मी इथे आलेच नव्हते, त्यामुळे सगळीकडे खूप पसारा झालाय." चिंगी आजूबाजूला बघत म्हणाली. खूप वर्षे कोणी राहत नसल्याने झोपडी मोडकळीला आलेली. तेवढ्यात, रेवाच लक्ष एका बाजेखाली गेलं.

"ही इथे कसली पेटी आहे?" रेवाने बाजेच्या खाली असलेल्या जुन्या पेटीकडे बघत विचारलं

"ही आईची पेटी आहे. महत्वाच्या आणि जुन्या वस्तू आई इथे ठेवायची." चिंगी बोलली

तसं रेवाने एक नजर त्या पेटीकडे बघितले आणि दुसऱ्याक्षणी रेवाने पूर्ण ताकद लावून ती लोखंडाची पेटी बाजेखालून ओढली आणि कार्तिकच्या मदतीने बाजेवर ठेवली. पेटी खूप वर्षे खाली राहिल्यामुळे पूर्णपणे गंजलेली होती.

"रेवा, सांभाळून!" रेवा पेटी उघडतेय हे बघताच कार्तिक काळजीने म्हणाला, त्यावर रेवाने होकारार्थी मान हलवली आणि पेटी उघडली. त्याबरोबर एक कुबट वास तिघांच्या नाकात शिरला.

पेटीत खूप कचरा आणि चिखल साचला होता. पाण्यामुळे सगळे कागद भिजून गेलेले. रेवा एकेक करत सगळे कागद बघू लागली, पण त्यात ते तिघे शोधत असलेली वस्तू त्यांना सापडली नाही.

तशी रेवा नाराजीने पेटी बंद करणार तेवढ्यात, पेटीच्या तळाशी तिला कोणाचातरी फोटो दिसला. रेवाने पेटीच्या तळाशी असलेला फोटो बाहेर काढला आणि बघू लागली.

"हे दोघं कोण आहेत?" रेवाने गोंधळून विचारलं

"आबासाहेब आणि माझी आई." चिंगी हळव्या स्वरात म्हणाली. खूप वर्षांनी आईचा फोटो पाहिल्यामुळे चिंगीचे डोळे पाणावले.

तशी रेवा आश्चर्याने फोटो बघू लागली. चिंगी आणि विशालाक्षीचा चेहरा साधारणपणे सारखा होता. फोटो घेऊन तिघेजण तालुक्याच्या फोटो स्टुडिओमध्ये गेले.

****

"रेवा, आपण हा फोटोची फ्रेम बनवून घेतली पण ह्या फोटोच काय करणार आहेस?" गाडीत बसल्यावर कार्तिकने रेवाच्या चेहऱ्यावरचे हावभाव न्याहाळत विचारले

"आहे एक आयडिया डोक्यात. बर, ऐक तू जा आता. आम्ही सुद्धा जातो घरी. तसंही विराज असेलच ना, तिथे आणि तू आलास तर प्रॉब्लेम वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तू नको येऊस. तसचं काही वाटलं, तर मी बोलवेन तुला." रेवा कार्तिकला समजावत म्हणाली

"नक्की?" कार्तिकने खात्रीसाठी विचारले

"नक्की! बर, थँक्यू हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं." रेवाने गाडीतून उतरत कार्तिकचे आभार मानले, त्यावर कार्तिक तिला लूक देऊन निघून जातो.

****

संध्याकाळच्या सुमारास रेवा घरी आली. ते चिंगीला सोबत घेऊनच!

तसे सगळे दोघींकडे पाहतच राहिले. नेहमी परकर पोलक्यामध्ये असणाऱ्या चिंगीने आज चक्क साडी नेसून केसांची एक वेणी घालून त्यात गजरा माळलेला. चिंगीला ह्या रूपात पाहून विलासरावांना क्षणभर विशालाक्षीच आठवली.

"रेवा, हे काय चालवलंय तुम्ही? काल तिच्यासोबत बाहेर फिरायला गेलात आणि आज तिला ह्या घरात घेऊन आलात. आधी हिला घराबाहेर काढा." रत्ना बाई रागाने म्हणाल्या

"चिंगी, कुठेही जाणार नाही. (मोठ्या आवाजातच) आबासाहेब, परवाच तुमचा वाढदिवस झाला, पण आम्ही तुम्हाला काहीचं बर्थडे गिफ्ट दिलं नाही. हे तुमचं बर्थडे गिफ्ट!" रेवाने गिफ्ट रॅपर केलेली एक फोटोफ्रेम त्यांच्यासमोर धरली, विलासरावांनी फोटोफ्रेमवरचा कागद बाजूला सारला. तसा विशालाक्षी आणि त्यांचा एकत्रित फोटो पाहताच त्यांचे डोळे आपोआप विस्फारले.

"आबासाहेब, आवडलं गिफ्ट?" हाताची घडी घालत रेवाने विचारलं

"सूनबाई, हा काय प्रकार आहे?" विलासरावांनी रागातच विचारले, तसा विराजने सुद्धा फोटो बघितला.

"आबासाहेब, ह्या बाई कोण आहेत?" विराजने विलासरावांकडे पाहत विचारले

"मला नाही माहित." विलासराव नजर चोरत म्हणाले

"विराज, मी सांगते. ह्या आबासाहेबांच्या अगदी जवळच्या व्यक्ती आहेत. हो ना, आबासाहेब." रेवा म्हणाली, तसे विलासराव तिच्याकडे रागाने बघू लागले

"जवळच्या व्यक्ती.. म्हणजे? रेवा, तू नेमक काय बोलतेस मला काहीचं कळत नाहीय" विराज गोंधळून म्हणाला, तसे रेवाने पर्समधून डी. एन. ए. रिपोर्ट्स काढून विराजला दिले.

"हे काय आहे?" विराजने प्रश्नार्थक नजरेने विचारले

"डी.एन.ए. टेस्टचे रिपोर्ट्स." रेवा

"डी.एन.ए. रिपोर्ट्स.. कोणाचे आहेत हे रिपोर्ट्स?" विराजने गोंधळून विचारलं, तसा रेवाने दिर्घ श्वास घेतला.

"विराज, मी काय सांगतेय ते नीट ऐक. हे डी.एन.ए. रिपोर्ट्स चिंगी आणि आबासाहेबांचे आहेत. विराज चिंगी आबासाहेबांची मुलगी आहे." रेवा शांतपणे म्हणाली

"सुनबाई, तुमची अक्कल ठिकाण्यावर आहे ना. काय बोलताय तुम्ही!" रत्ना बाई रागाने म्हणाल्या

विराज पूर्ण रिपोर्ट्स वाचतो आणि एक नजर विलासरावांकडे बघतो

"आबासाहेब, हे खर आहे?" विराजने पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले

"विराज, अरे तू त्यांनाच काय विचारतोयस? ही तुला कोणाचेही रिपोर्ट्स आणून दाखवेल आणि तू विश्वास ठेवशील का? (रेवाला उद्देशून) सुनबाई, अहो काय चाललंय तुमचं! सकाळी फुलझाड आणण्यासाठी तुम्ही तालुक्याला गेलेलात ना, मग हे सगळं काय आहे? तुमचा प्रेमविवाह सासूबाईंना मान्य नव्हता, पण आम्ही तुमच्या बाजूने त्यांना समजावलं आणि आज तुम्हीच आमचा संसार मोडायला..," वैशाली ताईंना पुढे बोलवत नाही.

"आबासाहेब, माझ्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर तुम्ही आमच्या प्रेम विवाहाला होकार दिल्यामुळे अजूनच वाढला होता. गावात राहूनही तुमची उच्च विचारसरणी पाहून मी भारावले होते, पण त्यामागे हे कारण असेल असं मला अजिबातच वाटल नव्हतं. आबासाहेब चिंगी तुमची मुलगी आहे, हे सत्य तुम्ही आमच्यापासून का लपवून ठेवलंत?" रेवाने थोडं मोठ्या आवाजातच विचारले

"आवाज खाली!" रत्ना बाई करड्या आवाजात बोलल्या

"सुनबाई, तुम्ही कोणासमोर बोलताय ह्याचं भान ठेवा. ज्या आबासाहेबांना बघून गावातले लोकं आदराने नमस्कार करतात. त्यांच्याच घरात त्यांच्याच समोर उभ राहून तुम्ही त्यांना जाब विचारताय." रत्ना बाई तोऱ्यात बोलल्या

"आजी, इतरवेळी नॉर्मल वागणारी चिंगी मोगऱ्याचा गजरा पाहताच एवढी का बिथरते, हे संभ्रमात टाकणार होतं आणि ह्यामागचं कारण मला शोधून काढायचं होतं. विराजशी बोलल्यावर मला कळलं की, आबासाहेब तिला ह्या घरात घेऊन आले, पण अश्या अनोळखी मुलीला घरी घेऊन येणं हे बाजारातून एखादी वस्तू आणण्याइतपत सोपं नाहीय ना, म्हणून मी ह्या गोष्टींचा तपास लावला, ज्याचा निकाल तुमच्यासमोर आहे." रेवा रत्ना बाईंकडे बघत म्हणाली, तसं त्यांनी नाक मुरडलं.

"आबासाहेब, जर मी खोटं बोलत असेल, तर विराजच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की, तुमचा ह्या बाईशी आणि ह्या मुलीशी काहीचं संबंध नाही." रेवाने विराजला विलासरावांसमोर उभ केलं

"आबासाहेब, रेवा जे काही म्हणतेय ते खर आहे? बोला आबासाहेब" विराजने विलासरावांचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला, दुसऱ्याच क्षणाला विलासरावांनी स्वतःचा हात खाली घेतला.

"हो, सुनबाई सांगतायत ते खर आहे" विलासराव म्हणाले, तसं वैशाली ताईंचा तोल गेला.

तेवढ्यात, रेवाने त्यांना सावरलं. रत्ना बाईंसाठी सुद्धा हा मोठा धक्काच होता.

"साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. विशालाक्षी नाव होतं तिचं! विशालाक्षी लहान असतानाच तिचे आईवडिल तापाच निमित्त होऊन वारले. तेव्हापासून विशालाक्षी गावात तिच्या आजीसोबतच राहायची. विशालाक्षीच्या आजीचा दुग्धालयाचा व्यवसाय होता, पण वयोमानामुळे त्यांना प्रत्येक घरी जाऊन दूध देणं जमत नसल्यामुळे त्यांच्याऐवजी विशालाक्षी संपूर्ण गावात दूध द्यायला जायची. नुकताच विशालाक्षीने तारूण्यात प्रवेश केला होता. अश्याच एके दिवशी विशालाक्षी दूध द्यायला आमच्या घरी आली." विलासराव विशालाक्षीबद्दल सांगताना भूतकाळातल्या आठवणींत रमले.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(नक्की काय झालं असेल विशालाक्षीसोबत? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all