रेवा चिंगीला घेऊन घरी पोहोचली. रात्र झाली असल्याने सगळेजण तिची वाट होते. मीराने लगेच चिंगीला आपल्याजवळ घेतलं. रेवाला आलेलं पाहून विराज पुढे आला.
"रेवा, चिंगीला घेऊन कुठे गेलेलीस तू? आम्ही सगळे कधीपासून वाट पाहतोय तुझी. फोन सुद्धा स्विच ऑफ लागतोय तुझा." विराजने काळजीच्या सुरात विचारले
"विराज राव, असं मुळूमुळू बोलून कस चाललं! काय हो, सकाळी गाव फिरण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलात. सोबत त्या पोरीला घेऊन गेलात. आता घरची वाट दिसली का तुम्हाला?" रत्ना बाईंनी रागातच विचारलं
"वहिनी साहेब, तुम्ही चिंगीला घेऊन कुठं गायब झालता? मी किती शोधलं तुम्हांला" मीरा तक्रारीच्या सुरात म्हणाली
"वहिनी, मी गायब झाले नव्हते. तुम्ही पाण्याची बॉटल आणण्यासाठी मेडिकलमध्ये गेल्यावर चिंगीला फुगेवाला दिसला, तशी ती फुग्यासाठी हट्ट करू लागली आणि रिक्षामधून उतरून धावत फुगेवाल्याच्या मागे गेली. मीही रिक्षावाल्याला पैसे देऊन तिच्यामागे गेले. फुगा घेऊन तिच्यासोबत आले, तेव्हा मेडिकलमध्ये तुम्ही नव्हतात. मी आजूबाजूला तुमच्याबद्दल चौकशी केली, पण कोणीच तुम्हाला पाहिलं नसल्याचं सांगितलं. तेवढ्यात, चिंगीला कापूसवाला दिसला मग ते घ्यायला गेलो आणि घरी यायला उशीर होणार आहे, हे कळवायला मोबाईल हातात घेतला तेव्हा तो स्विच ऑफ झाल्याचं लक्षात आल. त्यामुळे कळवता आल नाही. सॉरी!" रेवा शेवटचं विराजकडे बघत म्हणाली
"सूनबाई, विराज रावांचा तुम्हाला दुखावण्याचा उद्देश नव्हता. गावात तुम्ही नवीन आहात, म्हणून तुमच्या काळजीपोटी बोलले ते." वैशाली ताई शांतपणे म्हणाल्या
"काही त्रास नाही दिला ना तिने तुम्हाला?" विलासरावांनी एक नजर चिंगीकडे बघत रेवाला विचारलं
"नाही, उलट आज तिच्यामुळेच मला खूप गोष्टींचा उलगडा झाला." रेवा सूचक नजरेने विलासरावांकडे बघत हसत म्हणाली
"गप्पा पुरे! जेवायला घ्या. (एक नजर महादुकडे बघत) त्या पोरीला इथून घेऊन जा." रत्ना बाई म्हणाल्या, तसा महादू आणि मीरा चिंगीला घेऊन गेले. चिंगीने जाताना एक नजर रेवाकडे पाहिले. रेवाने डोळ्यांनीच तिला दिलासा दिला.
****
दुसऱ्या दिवशी सकाळी विलासराव अंघोळीवरून आले आणि आवरू लागले. वैशाली ताई त्यांना चहा द्यायला जाणार तेवढ्यात, रेवाने त्यांना अडवल.
"आई, मी देते चहा." रेवा त्यांच्या हातातला कप घेऊन विलासरावांच्या खोलीत गेली.
"आबासाहेब, चहा.." आरश्यासमोर केस विंचरत असलेल्या विलासरावांकडे बघत रेवाने चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवला, तसं विलासरावांनी आरश्यातूनच हसत तिच्याकडे पाहिलं
"आज तुम्ही आलात चहा घेऊन" विलासराव
"हो, आई कामात आहेत ना." रेवा
विलासरावांनी चहाचा कप उचलून ओठांना लावला.
रेवा आजूबाजूला बघत असतानाच तिचं लक्ष बेडवर ठेवलेल्या ओल्या टॉवेलकडे गेलं. ज्या टॉवेलने नुकतेच विलासरावांनी केस पुसले होते. बारकाईने बघताच, त्यावर चिकटलेले काही केस तिला दिसले, तशी ती मनोमन खूष झाली. 'पण हे केस मिळवायचे कसे?' तिने एक नजर विलासरावांकडे बघितले. ते कामाची फाईल बघण्यात व्यस्त होते.
"आबासाहेब, बेडवरचा टॉवेल धुवायला नेऊ का?" रेवाने विचारले, तसं विलासरावांनी तिच्याकडे न बघताच हातानेच, 'घेऊन जा' असा इशारा केला. तसं रेवाने टॉवेल अलगद उचलून आपल्याजवळ घेतला आणि खोलीबाहेर येऊन एक नजर इकडेतिकडे बघत लेगिजमधली डबी काढली आणि त्यात टॉवेलवरचा केस ठेवला. 'येस्स! मिशन सक्सेसफुल', रेवा मनातच आनंदी झाली.
काहीवेळाने, विराज आणि विलासराव कामानिमित्त बाहेर गेले.
तशी रेवा स्वयंपाक घरात गेली. तिथे वैशाली ताई पालेभाजी निवडत बसल्या होत्या.
"आई, मी जरा बाहेर जाऊ का?" रेवा
"बाहेर कुठे?" वैशाली ताईंनी काम चालू ठेवत विचारलं
"तालुक्याला" रेवाने असं म्हणताच..,
"तालुक्याला ते आणि कशाला?" स्वयंपाक घरात येतं असलेल्या रत्ना बाईंनी विचारलं
"मुंबईला नेण्यासाठी काही फुलझाडं हवीयेत मला. तेचं आणण्यासाठी तालुक्याला जायचं होतं. मी पटकन जाऊन पटकन येईन." रेवा अगदी सहज म्हणाली
"तुम्हाला काय तो तुमच्या शहराचा आठवडे बाजार वाटला! पटकन जाऊन पटकन यायला. इथे तालुक्याला जायचं म्हंटल्यावर अर्धा दिवस मोडतो. त्यात आज विराज राव सुद्धा घरात नाहीयेत आणि तुम्हाला इथली फारशी काही माहिती सुद्धा नाहीय. त्यापेक्षा एक काम करा. विराज राव घरी असताना तुम्ही दोघे जा." रत्ना बाई सांगून मोकळ्या झाल्या
"आजी, विराजला बरोबर नेलं तर तो लगेच कंटाळतो आणि घरी यायची घाई करू लागतो आणि तुम्हीच म्हणता ना, प्रत्येक गोष्ट निरखून घेतली पाहिजे." रेवा रत्ना बाईंना आपली बाजू समजावत म्हणाली आणि आशेने वैशाली ताईंकडे बघू लागली
"आई, जाऊद्या तिला. तसंही काल ती गाव फिरलीय. त्यामुळे तिला थोडी माहिती मिळालीच असेल आणि काही लागलंच तर विराजला फोन करेलच ना ती. घरी लवकर ये." वैशाली ताई एक नजर रत्ना बाईंकडे इशारा करून रेवाला म्हणाल्या त्यावर रेवाने होकारार्थी मान हलवली
"सासूनेच परवानगी दिल्यावर आम्ही तरी काय बोलणार! आता जा, पण दिवे लागणीच्या आधी घरी या." रत्ना बाईंनी आदेश सोडला.
"थँक्यू आजी." रेवाने रत्ना बाईंना चक्क मिठी मारली आणि धावतच स्वतःच्या रूममध्ये निघून गेली
"काय हा फाजिलपणा म्हणायचा." रत्ना बाई चिडतच म्हणाल्या, त्यावर नकारार्थी मान हलवत रत्ना बाईंच्या नकळत वैशाली ताई गालात हसल्या.
****
रेवाने तयार होऊन घराबाहेर पडली आणि कोपऱ्यावर जाऊन रिक्षा पकडली आणि एस.टी. स्टँड गाठले, पण रिक्षातून उतरतेवेळी तिने पर्समध्ये असलेल्या स्कार्फने चेहरा झाकून घेतला, जेणेकरून तिला कोणी ओळखू नये.
तालुक्यावरून एस.टी. पकडून कार्तिकने सांगितलेल्या क्लिनिकमध्ये रेवा पोहोचली. तिथे कार्तिक आधीच येऊन थांबला होता. रेवाने आणलेले सँपल कार्तिककडे दिले. कार्तिकने ते सँपल डॉक्टरांकडे दिले, तसं त्यांनी काहीवेळ थांबायला सांगितलं. चिंगीच ब्लड त्यांनी आधीच घेतलं होतं.
दिड तासानंतर डॉक्टरांनी त्यांना केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांच्या हातात रिपोर्ट्स दिले.
"दोघांचे डी.एन.ए. एकमेकांशी मॅच होतायत." डॉक्टर म्हणाले
तसा कार्तिक आणि म्हणताच रेवाचा चेहरा आनंदाने खुलला, पण दुसऱ्याच क्षणाला विराज आणि वैशाली ताईंचा विचार मनात येताच तिच्या डोळ्यांत दुःखाची झालर पसरली.
"ग्रेट!" रेवा हातातल्या रिपोर्ट्सकडे बघत म्हणाली
"रेवा, ह्या डी.एन.ए. टेस्टच्या रिपोर्ट्सवर कोणी विश्वास ठेवेल का? रत्ना बाई तर ह्या रिपोर्ट्सना खोटं ठरवतील आणि मुळात विलासराव मान्य करतील का?" कार्तिकने शंका व्यक्त केली
"बरोबर बोलतोयस तू कार्तिक! पण माझ्याकडे एक अशी आयडिया आहे, ज्यामुळे आबासाहेब स्वत:हून कबूल करतील की, चिंगी त्यांची मुलगी आहे." रेवा काहीसा विचार करत म्हणाली
"अशी कसली आयडिया आहे तुझ्याकडे?" कार्तिकने शंकेच्या नजरेने विचारलं
"चल, वाटेत सांगते." रेवा त्याच्याकडे पाहून सूचक हसली.
क्रमशः
✍️नम्रता जांभवडेकर
(रेवा कार्तिकला घेऊन कुठे गेली असेल? आणि तिच्या डोक्यात काय आयडिया असेल? वाचूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा