Login

झाकली मूठ - प्रेमाची (भाग - ४)

ही एक दिर्घकथा आहे.
"तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, थांबा! मी आलेच." असं म्हणत मीरा चिंगीला घेऊन आतमध्ये गेली, तर रेवा तिची वाट पाहत बाहेरचं थांबली.

काहीवेळाने, मीरा चिंगीला घेऊन बाहेर आली. साधासा पण स्वच्छ परकर पोलका, केसांच्या दोन वेण्या, कपाळावर टिकली ह्या पेहरावात खूप छान दिसत होती चिंगी!

"चला, निघूया." मीरा

"थांबा, मी रिक्षा बोलवते. चिंगीला एवढं चालवत कस न्यायचं." रेवाने काही अंतरावर चालत जाऊन एक रिक्षा आणली आणि तिघीही त्यात बसून गेल्या.

काही अंतर पुढे गेल्यावर मीराला कसं घालवाव, हे रेवाला कळत नव्हतं. तेवढ्यात, समोरचं तिला एक मेडिकल दिसलं आणि तिच्या डोक्यात एक कल्पना आली. अचानक रेवाने ठसका लागण्याच नाटक केलं,

"वहिनी, पाणी आहे का तुमच्याकडे?" रेवा

"नाही हो." मीरा

"मीरा वहिनी, माझा ठसका थांबतच नाहीय हो. तुम्ही प्लिज समोरच्या मेडिकलमधून पाणी बॉटल घेऊन याल का? हे घ्या पैसे." रेवाने पर्समधून पैसे काढत तिला दिले, तशी मीरा एक नजर चिंगीकडे बघू लागली.

"मी आहे तिच्यासोबत." रेवा त्यांची नजर समजून म्हणाली

तशी मीरा रिक्षातून उतरून पाणी बॉटल घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेली.

"बाप्पा! प्लिज, मला मार्ग दाखव. चिंगीच्या बाबतीत नेमक काय घडलंय आणि तिचा आबासाहेबांशी काय संबंध आहे, हे मला शोधून काढायचय." रेवाने मनोमन प्रार्थना केली.

तेवढ्यात, मेडिकल आणि रिक्षाच्या मधोमध एक भलामोठा पाणी बॉटलचा ट्रक येऊन ऊभा राहिला, ज्यामुळे मेडिकलमधून रिक्षा अजिबातच दिसतं नव्हती. त्याचवेळी रेवाला कार्तिकचा मॅसेज आला.

तसे रेवाने रिक्षावाल्याला पैसे दिले आणि चिंगीला घेऊन रिक्षामधून उतरली, तसा रिक्षावाला निघून गेला. आणि रिक्षावाल्याच्या जागी एक फोर व्हिलर येऊन थांबली, ज्यात कार्तिक बसला होता. रेवाने पटकन दार उघडून चिंगीला आधी आत बसवले आणि मग स्वतः बसली, तशी गाडी निघून गेली.

मीरा मेडिकलमधून पाणी बॉटल घेऊन रिक्षा थांबलेली त्या जागी आली. रेवा आणि चिंगी न दिसल्यामुळे मीरा रडकुंडीला येतं तिथल्याच पायरीवर डोक्याला हात लावून बसली.

******

"ह्या खेळण्याकडे एकटक बघत रहा." डॉक्टर मिश्रा आराम खुर्चीवर बसून इकडेतिकडे बघत असणाऱ्या चिंगीला म्हणाले, तशी चिंगी त्या पेंडूलुमच्या फिरत्या पेंडेटकडे बघू लागली. एकटक त्या पेंडूलुमकडे बघत राहिल्याने हळूहळू तिची दृष्टी मंदावली आणि एकाएकी तिची शुद्ध हरपली.

कार्तिक आणि रेवा चिंगीला एका सायकेट्रीस्टकडे घेऊन आले होते.

"कार्तिक, अरे ही तर बेशुद्ध पडली. आता आपल्याला कस कळणार, हिच्यासोबत नेमक काय घडलय?" बाहेरच्या वेटींग रूममध्ये बसून समोरच्या टीव्ही स्क्रीनवरून आतलं दृश्य बघणाऱ्या रेवाने पॅनिक होत विचारले

"रेवा, कुलडाऊन! ती बेशुद्ध पडली नाहीय. ती हळूहळू एका अवस्थेत जातेय." कार्तिक बोलला

"अवस्था.. कुठली अवस्था? कार्तिक, तू काय बोलतोयस? मला काहीचं कळत नाहीय आणि आपण हिला सायकेट्रिस्टकडे का घेऊन आलोय?" रेवाने गोंधळून विचारले.

"कारण तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तर तुला ईथेच सापडतील." कार्तिक टीव्हीच्या स्क्रीनमधून दिसणाऱ्या त्या मुलीकडे बघत म्हणाला, तशी रेवा सुद्धा स्क्रीन बघू लागली.

"तुझं नाव काय?" डॉ. मिश्राने एकदम शांतपणे विचारले

"चिं.. गी.. चिंगी..." ती मुलगी हळूवारपणे बोलली

"तू राहतेस कुठे? गावाचं नाव काय?" डॉ. मिश्राने पुन्हा शांतपणे विचारले

"खाम..गाव खामगाव गौळवाडी" चिंगी बोलली

"तुझा आणि विलास रावांचा काय संबंध? तुमचं नात काय?" डॉ. मिश्रानी विचारले

विलासरावांच नावं ऐकताच चिंगी पुन्हा वॉयलंट झाली, तसे डॉ. मिश्राने तिला शांत केलं.

"मारलं.. त्यांनी माझ्या आईला मारलं.. खून केला त्यांनी.." अस म्हणत अचानक ती रडू लागली.

डॉ. मिश्राने तिला शांत केलं, तर बाहेर ऊभे असणाऱ्या रेवा आणि कार्तिकला मात्र धक्का बसला.

"तुझ्या आईला का मारलं त्यांनी? तुझ्या आईचा आणि त्यांचा काय संबंध होता?" डॉ. मिश्रा

"प्रेयसी होती ती त्यांची." चिंगी बोलली आणि हा रेवासाठी दुसरा धक्का होता.

"तुझ्या आईचं नाव काय आणि त्या दोघांची भेट कशी झाली?" डॉ. मिश्रा

"माझ्या आईचं नाव विशालाक्षी. त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण आबासाहेबांनी माझ्या आईची जात वेगळी असल्यामुळे तिच्याशी लग्न केलं नाही. त्यांच्या प्रेमाचं प्रतिक माझ्या रूपाने आईच्या पोटात वाढतंय, हे कळताच आबासाहेब घाबरले. त्यांनी आईला मूल पाडण्याचा सल्ला दिला, पण आईने तो नाकारला आणि काही महिन्यांनी माझा जन्म झाला. माझ्या जन्मानंतर आई मला घेऊन त्यांच्या घरी सुद्धा गेलेली, तेव्हा त्यांच्या घरी कोणीतरी पाहुणे आलेले म्हणून रत्ना आजींनी आईला तिथून हाकललं. कुमारी माता झाल्यामुळे सगळ्या गावाने आईला दोष देऊन आम्हाला गावाबाहेर काढलं. मग आम्ही गावाबाहेरच एक झोपडी बांधून राहू लागलो."

"हळूहळू मी मोठी होत होते. आई मला त्यांचा फोटो दाखवून त्यांच्याबद्दल सगळं सांगायची पण, आबासाहेब आम्हाला कधीचं भेटायला आले नाहीत. एके दिवशी आबासाहेब आमच्या घरी आले होते. त्यांना पाहून आई खूप चिडली. आबासाहेबांनी आईला खूप समजवल, पण आई ऐकायला तयार नव्हती. शेवटी आई वाड्यात जायला निघाली, ते पाहून आबासाहेबांनी रागात आईला मागच्या भिंतीवर ढकलल आणि पुढच्याक्षणी आई खाली कोसळली पुन्हा कधीही न उठण्यासाठीच! आईच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्यावर आबासाहेब घाबरले. ते दृश्य दाराच्या फटीतून माझ्या नजरेस पडताच मी सैरभैर झाले आणि वाट दिसेल तिथे धावत सुटले."

"नदीवर जाऊन पाण्याचे थबके जोरजोरात चेहऱ्यावर मारून हे स्वप्न आहे की, सत्य कळायला मला काहीक्षण गेले. मी आईच्या आठवणीने ओक्साबोक्शी रडत होते. तेवढ्यात, माझ्या खांद्यावर हात जाणवला. मी मागे वळून पाहिलं, तर आबासाहेब होते. ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तिथून काही दिवसांनी माझी सोय महादू दादांकडे करण्यात आली. मला कळतच नव्हतं माझ्या आईवर निस्सीम प्रेम करणारे आबासाहेब खरे की, जिच्यावर प्रेम केलं तिलाच रागाच्या भरात जिवानिशी मारणारे आबासाहेब खरे!" एवढं बोलून चिंगी थांबली.

चिंगीच बोलणं ऐकून बाहेर ऊभे असलेले कार्तिक आणि रेवासुद्धा सुन्न झाले. रेवाला तर काय बोलावं, हेही सुचत नव्हतं. आतापर्यंत तिने आबासाहेबांची एकच बाजू पाहिली होती. आज तिच्यासमोर आबासाहेबांची दुसरी बाजू आलेली.

"रेवा, तू ठिक आहेस ना?" कार्तिकने विचारताच रेवाने स्वतःला सावरत होकारार्थी मान हलवली.

"रेवा, विराज आणि घरातल्यांना कसं सांगायचं?" कार्तिक

"कार्तिक, विराजच जेवढं माझ्यावर प्रेम आहे त्याहीपेक्षा जास्त त्याचा आबासाहेबांवर जीव आहे. विराजला सगळ सांगण्याआधी आपल्याकडे ठोस पुरावे पाहिजे अन् त्यासाठी आपल्याला चिंगीची मदत लागेल." रेवा विचार करत म्हणते

"तुम्हाला मदत करायला मी तयार आहे." चिंगीने पुढे येऊन रेवाला मिठी मारली.

"चिंगी.." रेवाने एक नजर कार्तिककडे बघितलं

"थँक्यू! तुमच्यामुळे मी आज पूर्ण बरी झाले. रेवा वहिनी माझ्या आईला न्याय मिळवून द्या." चिंगी रेवासमोर हात जोडून म्हणाली.

"तू काळजी करू नकोस. विशालाक्षी काकूंना न्याय मिळवून द्यायची जबाबदारी माझी!" रेवा विश्वासरूपी आवाजात म्हणाली

कार्तिक ह्याविषयी डॉ. मिश्रांशी बोलला. तेव्हा त्यांनी डी.एन.ए. टेस्ट विषयी सुचवलं.

"रेवा, चिंगीच डी.एन.ए. मिळेल पण आबासाहेबांचा डी.एन.ए. तो कसा मिळवायचा?" कार्तिकने विचारल, तशी चिंगी सुद्धा विचारात पडली.

"सापडेल काहीतरी मार्ग, पण मी आबासाहेबांचा डी.एन.ए. मिळवेनच!" रेवा आत्मविश्वासाने म्हणाली.

"चिंगी, एक गोष्ट लक्षांत ठेव. जोपर्यंत आपल्या हातात डी.एन.ए. टेस्टचे रिपोर्ट्स येतं नाहीत. तोपर्यंत, तू आधी जसं वागत होतीस तसचं वागायचं." रेवा म्हणाली, त्यावर चिंगीने होकारार्थी मान हलवली.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(रेवा आबासाहेबांचा डी.एन.ए. मिळवू शकेल का? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all