Login

झाकली मूठ - प्रेमाची (भाग - २)

ही एक दिर्घकथा आहे.
अंगात परकर पोलक, विस्कटलेल्या केसांच्या दोन वेण्या आणि मळलेला चेहरा.

"महाद्या, हिला कोणी आणलं ईथे?" रत्ना बाईंनी काहीश्या चिडक्या स्वरात महाद्याला विचारलं.

"आईसाहेब, मीरा तिला इथे घेऊन आली" महादू काहीसा भितच बोलला.

"माफ करा, आबासाहेब! आमच्यामुळे तुमच्या वाढदिवसात मिठाचा खडा पडला. दिवसभर घरात एकटी राहून पोर कंटाळते, म्हणून इथे घेऊन आले" मीराने पुढे येत विलासरावांसमोर हात जोडले.

"हरकत नाही. आईसाहेब, असूदे. वाढदिवसाच्या दिवशी वाद नको. मालकीण..," विलासराव वैशाली ताईंना आवाज देणार तेवढ्यात, वैशाली ताईंनी पुढे येऊन महादूच्या हातात एक पिशवी दिली.

"घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार योग्य पद्धतीने झाला पाहिजे, अशी रीतच आहे ह्या घरची अन् तुमच्या वाढदिवसाला आलेल्या पाहुण्यांना असं खाली हातानं कसं पाठवायच!" वैशाली ताई एक नजर विलासरावांकडे बघत म्हणाल्या, तसे विलासराव कौतुकाने वैशाली ताईंकडे बघू लागले.

महादू आणि मीरा त्या मुलीला दरवाजापर्यंत घेऊन जात असतानाच, त्या मुलीची नजर वैशाली ताईंनी केसांत माळलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याकडे गेली, तशी ती मुलगी आणखी बिथरली.

"खुनी आहेत हे, माझ्या आईला मारलं ह्यांनी." ती मुलगी विलासरावांवर धावत येऊ लागली. तसे महादू आणि मीराने मिळून तिला अडवले आणि घरी घेऊन गेले.

तिला असं बिथरलेलं बघून रेवा आधी घाबरली, पण तिच्या डोळ्यातली करूणा बघून रेवाला त्या मुलीची दया आली.

"आबासाहेब, कोण होती ती मुलगी?" एवढा वेळ शांतपणे सगळं पाहत असलेल्या रेवाने पुढे येऊन विचारलं

"रेवा.." विराजने डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा सल्ला दिला. तिने एक नजर विलासरावांकडे बघितलं, त्यांच्या नजरेत भीती स्पष्ट दिसत होती.

****

रात्रीच्या जेवणानंतर रेवा खिडकीत ऊभी राहून विचार करत होती. तेवढ्यात, विराजने मागून येऊन मिठीत घेताच रेवा दचकली.

"अग एवढं दचकायला काय झालं? मीच आहे." विराज तिच्या खांद्यावर हनुवटी टेकवत म्हणाला

"असं अचानकपणे कोण येतं मागून? घाबरले ना मी." रेवाने त्याच्या हातावर चापट मारली

"माणूस तेव्हाच घाबरत, जेव्हा तो कुठल्यातरी विचारात असतो." विराज

"मग मी कुठला विचार करतेय, हेही तुला माहिती असेल." रेवाने असं म्हणताच विराजची तिच्यावरची पकड सैल झाली

"रेवा, आज प्रवासाने खूप दमायला झालंय. आपण उद्या बोलूया." विराज बोलणं टाळण्यासाठी म्हणाला

"धिस इज नॉट फेअर विराज! मगाशी मी आबासाहेबांना विचारणार होते, तेव्हा पण तू मला अडवलस. आताही मला सांगण्याच टाळतोयस, असं का?" रेवा

"कारण त्यात सांगण्यासारख काही नाहीय" विराज काहीसा चिडला

"एक मुलगी आबासाहेब तुला केक भरवणार त्याचवेळी मध्ये येते आणि काहीतरी बडबडू लागते. त्यावर रत्ना आजी चिडतात आणि तू म्हणतोस ह्यात सांगण्यासारखं काहीचं नाहीय. ह्याचा अर्थ हाच होतो की, तुझ्या घरातल्यांनी मला अजून सून म्हणून स्वीकारलचं नाहीय." रेवाने पाणावलेल्या डोळ्यांनी विचारले

"इनफ रेवा! तुला कळतय, तू काय बोलतेयस. जर माझ्या घरच्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलं नसतं, तर आता तू ह्या घरात तरी असतीस का? माझ्यावरच्या प्रेमाखातर आबासाहेबांनी आपला प्रेमविवाह स्वीकारला. आईने आपण घरी आल्या आल्या तुझं औक्षण केलं. का? तर तू त्यांची सून आहेस म्हणूनच ना आणि तू म्हणतेस की, त्यांनी तुला ह्या घरातलं मानलच नाहीय." विराज रागात म्हणाला

"मग ह्या सुनेला सगळ्या गोष्टी माहिती असाव्यात, असं नाही का वाटतं तुला?" रेवाने विचारले

"मग ऐक, माझ्या जन्माआधीची गोष्ट आहे ही. लग्नानंतर आबासाहेब कामानिमित्त तालुक्याला गेलेले, तेव्हा नदीच्या किनाऱ्यावर ही मुलगी सापडली त्यांना. तिचं नाव काय? ती कुठे राहते? काहीचं माहिती नव्हतं, पण त्या मुलीकडे बघून आबासाहेबांना तिची दया आली आणि ते तिला घरी घेऊन आले. तेव्हाच त्यांना आईला दिवस गेल्याचं समजलं, तेव्हा तिचा पायगुण समजून आबासाहेबांनी तिला ह्याचं घरात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिचं नाव चिंगी ठेवलं. दिवस सरत होते. आईला मोगऱ्याचा गजरा खूप आवडायचा. एके दिवशी आबासाहेबांनी आईसाठी गजरा आणलेला. गजरा पाहताच चिंगी हायपर झाली आणि तिने गजऱ्याचा पार चुरगळा केला, हे पाहून आई घाबरली.

आबासाहेबांनी तिला डॉक्टरकडे दाखवलं, तेव्हा 'तिच्या बालमनावर कोणत्यातरी गोष्टीचा जब्बर धक्का बसल्याच' निदान त्यांनी केलं. तसं आबासाहेबांनी तिच्या राहण्याची सोय महादू दादा आणि मीरा वहिनींकडे केली. मूलबाळ नसल्यामुळे त्यांनीही तिला पोटच्या मुलीसारखं सांभाळलं. रादर अजूनही सांभाळतात. जरी महादू दादा तिला सांभाळत असलेतरी आबासाहेब दरमहिन्याला महादू दादांना घर खर्चासाठी काही रक्कम देतात आणि चिंगी दरवर्षी आबासाहेबांच्या वाढदिवसाला येते. आज तू पहिल्यांदा पाहिलंस, त्यामुळे तुला वेगळं वाटलं असेल." विराज सहजरित्या म्हणाला

"नदीकिनारी सापडलेल्या मुलीसाठी एवढं कोण करत? माणुसकी म्हणून आबासाहेब त्या मुलीला एखाद्या अनाथआश्रमात सुद्धा ठेवू शकले असते, पण तसं न करता त्यांनी तिच्या राहण्याची सोय गावातल्याच एका नोकराच्या घरी केली आणि दरमहा ठराविक रक्कम सुद्धा देतात. हे सगळं फक्त माणुसकी म्हणून आहे की, ह्यामागे वेगळचं काही कारण आहे." विराजने सांगितलेल्या गोष्टींचा रेवा मनातल्या मनात विचार करू लागली

"ओय्य! कुठे हरवलीस? (तिच्यासमोर चुटकी वाजवत) तू सुद्धा त्या कार्तिकसारखी डिटेक्टीव्हगिरी सुरू केलीस की काय?" विराजने काहीसे हसत विचारले

"तसं नाही रे. मी सगळ्या गोष्टींचा विचार करत होते. आबासाहेब केवढे मोठ्या मनाचे आहेत ना, नदीकिनारी सापडलेल्या मुलीला असं डायरेक्ट घरी कोण घेऊन येतं? खरचं मानलं पाहिजे त्यांना." रेवा

"येस्स! ह्याबाबतीत मला सुद्धा आबासाहेबांचा खूप अभिमान वाटतो. बर, चल झोपूया." विराज बेडवर पडत म्हणाला

रेवा सुद्धा बेडवर पडून आज घडलेल्या गोष्टींचा विचार करू लागली. चिंगी समोर आल्यावर आबासाहेबांची घाबरलेली नजर तिने बघितली होती.

****

सकाळी कसल्याश्या धुराने रेवाला जागं आली. तिने किचनमध्ये येऊन पाहिले, तर समोर वैशाली ताई फुंकणीने चूल फुंकत होत्या.

"गुड मॉर्निंग आई!" रेवा त्यांच्या बाजूला बसली.

तसं त्यांनी इशाऱ्याने तिला तिथून जायला सांगितलं, पण रेवाला त्यांचे इशारे कळले नसल्याने ती गोंधळलेल्या चेहऱ्याने त्यांच्याकडे बघत राहिली. चूल चांगली पेटल्यावर त्यांनी फुंकणी बाजूला ठेवून रेवाकडे बघितलं.

"तुम्हाला धुराची सवय नसल ना. ठसका लागल म्हणून म्हटलं बाहेर जा. मी येते, एवढा चहा झाल्यावर." वैशाली ताई चुलीवर ठेवलेल्या पातेल्याकडे बघत म्हणाल्या

"आई, आपल्याकडे गॅस शेगडी आहे ना. मग तरीही तुम्ही चहा चुलीवर का बनवता?" रेवा

"तुमच्या सासऱ्यांना अंघोळीच पाणी आणि सकाळचा चहा ह्या दोन गोष्टी चुलीवरच्याच लागतात." रत्ना बाई किचनमध्ये येतं पाटावर बसत म्हणाल्या

तेवढ्यात, बाहेरून झोपळ्याचा आवाज आला. तश्या वैशाली ताई चुलीवरच्या पातेल्यातला वाफाळता चहा कपात ओतून कप बाहेर घेऊन गेल्या. त्यांच्याचमागून रेवासुद्धा किचनबाहेर येऊन गाईला चारा घालू लागली.

"अहाहा! सकाळी सकाळी तुमच्या हातचा आल्याचा चहा घेतला की, सकाळ झाल्यासारखं वाटतं." विलासराव चहाचा घोट घेत म्हणाले, तश्या वैशाली ताई गालात हसल्या

"बर, आम्ही काय म्हणतो! सूनबाईंना आणि विराज रावांना देवळांत घेऊन जा. सहसा त्यांचं येणं होत नाही इथे. आता आलेत, तर देवीच दर्शन होईल." विलासराव म्हणाले

तसं वैशाली ताईंनी एक नजर रेवाकडे पाहिलं. तिने होकारार्थी मान हलवली.

क्रमशः

✍️नम्रता जांभवडेकर

(विलास रावांचा आणि त्या मुलीचा एकमेकांशी काय संबंध असेल? वाचूया पुढील भागात)

🎭 Series Post

View all