समोर खामगाव नावाची पाटी दिसताच विराजचा चेहरा आनंदाने खुलला.
"अरे व्वा! आज कोणीतरी खुपचं खुशीत दिसतंय." बाजूच्या सीटवर बसलेली रेवा गाडी चालवतच शिटी वाजवणाऱ्या विराजकडे बघत म्हणाली.
"हो, मग! स्वतःच्या घरी जाण्याचा आनंद आहे तो. घरी गेल्यावर मी मुक्तपणे फिरू शकेन" विराज म्हणाला.
"अच्छा, म्हणजे ईतके दिवस तुरूंगात होतास का तू?" रेवाने त्याच्याकडे बघत भुवई उंचावत विचारलं.
"तसं नाही ग; पण गावी येण्याचा आनंद वेगळाच असतो. गावाचं नाव काढलं की, माझ्या नजरेसमोर आपला भलामोठा वाडा, आई-आबासाहेब, आजी आणि गोठ्यातल्या दुभत्या गायी येतात. आज एवढ्या महिन्यांनी गावी जातोय ना, त्यामुळे मी खूप एक्साईट झालोय." विराज असं म्हणताच रेवा हसू लागली.
"आता ह्यात हसण्यासारख काय आहे?" विराजने नाराजीने विचारले
"मग काय! तू किती एक्सप्लेनेशन देतोयस. मी समजू शकते तुझी एक्साईटमेंट. आता काय बाबा घरी गेल्यावर कोणाचे तरी खूप लाड होणार आईकडून." रेवा विराजला चिडवत होती.
"ते तर होणारच! तुला माहितीये, आपण गावी येतोय हे कळल्यापासून किती खूष झालीय ती आणि इथे जरी माझे लाड होत असलेतरी, मुंबईच्या घरी तुझे लाड मी करतोच की!" विराजने रेवाला जवळ ओढत डोळा मारत म्हटले, तसे रेवाने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं.
****
"ए.. महाद्या, फुलांच्या माळा इथ टाकून तिथं कोपऱ्यात काय करतोयस? (चिडक्या स्वरात) बिगी बिगी आवरायला घ्या. विराज राव अन् सुनबाई येतीलच इतक्यात." रत्ना बाई मोठ्यानेच महादुला ओरडल्या. तेवढ्यात, गाडीचा हॉर्न ऐकू आला.
"वैशाली, लवकर या. विराज राव आणि सुनबाई आल्यात." रत्ना बाई खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतं म्हणाल्या.
विराजने गाडी कोपऱ्यात ऊभी केली आणि दोघेही गाडीतून खाली उतरले. समोरच 'विलासराव दिघे पाटील' ही पाटी होती. सासरी यायचं असल्याने रेवाने कुर्ती आणि अँकल लेंथ लेगिंज घातली होती. गावात फोर व्हिलर आल्याने गावातली लहान पोरं उत्साहाने गाडीच्या मागून धावत आली होती. रत्ना बाईंच्या इशाऱ्यावरून महादूने सगळ्या पोरांना बाहेर खेळायला पाठवले अन् विराजच्या बॅग आत नेऊन ठेवल्या.
वैशाली ताई आरतीचे ताट घेऊन आल्या.
वैशाली ताई आरतीचे ताट घेऊन आल्या.
"आई, आता हे कशाला? मी पहिल्यांदा येतोय का घरी?" विराज
"लग्नानंतर पहिल्यांदाच येताय ना." वैशाली ताईनी दोघांवरून भाकर तुकडा ओवाळला अन् पायावर पाणी घालून दोघांचं औक्षण केलं. तशी रेवाने थाळीतल्या दिव्यावरून दोन्ही हात फिरवून आरती घेतली, वैशाली ताई तिच्याकडे बघत गालात हसत होत्या.
दोघांनीही आत येऊन वैशाली ताई आणि रत्ना बाईंचा आशिर्वाद घेतला. विराज तिथेच ठेवलेल्या खाटेवर बसला, तर रेवाने अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ जाऊन नमस्कार केला. जातीतली नसली तरी पोरगी संस्कारी आहे, ह्या गोष्टीचं वैशाली ताईंना मनोमन समाधान वाटलं.
"आज वाढदिवस आहे आबा साहेबांचा,पण स्पेशल ट्रिटमेंट मात्र मला मिळतेय." विराज.
"मग लाडके आहात तुम्ही त्यांचे" रत्ना बाई म्हणाल्या.
"हो, मग! आहेतच ते आमचे लाडके आणि एकुलते एक चिरंजीव!" मागून भारदस्त आवाज आला, तस सगळ्यांनी वळून पाहिलं.
"साठाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आबासाहेब!" विराज आणि रेवा दोघे विलासरावांच्या पाया पडले.
"धन्यवाद! आता खरा वाढदिवस असल्यासारखा वाटतोय." विलासराव विराजला मिठी मारत म्हणाले.
"मग सुनबाई, कसं वाटलं आपलं घर?" विलासरावांनी रेवाकडे बघत विचारलं.
"खूप छान, आबासाहेब. असं वाटतच नाहीय की, मी इथे पहिल्यांदा आलेय. घरात आल्यापासून आपुलकीचा स्पर्श जाणवतोय." रेवा आजूबाजूला बघत म्हणाली.
"हम्म्म, ह्याचं सगळं श्रेय तुमच्या सासूबाईंना जातं बरं! हा वाडा त्यांनीच एवढा नीटनेटका ठेवलाय. सगळ्या वस्तू कशा एकदम जागच्या जागी आणि प्रत्येक गोष्टीत स्वत: जातीने लक्ष घालतात त्या." विलासराव वैशाली ताईंच कौतुक करत म्हणाले.
"आता आपल घर म्हटल्यावर लक्ष द्यायला नको का! आणि पुरे झालं माझं कौतुक. दोघं प्रवासाने थकून आलेत, भूक लागली असेल. विराज राव, सुनबाई चला, स्वयंपाक तयार आहे. सगळेजण जेवायला बसा." वैशाली ताई दोघांना आत घेऊन गेल्या.
आज जेवणाचा सगळा बेत विराजच्या आवडीचा होता. अगदी पुरणपोळी पासून ते खरवसापर्यंत! दुपारच्या जेवणानंतर विलासराव कामासाठी ग्रामपंचायतीत निघून गेले, तर विराज विलासरावांना सरप्राईज देण्याच्या तयारीला लागला. महादू होताच मदतीला!रेवा मात्र वैशाली ताईंना स्वयंपाक घरात मदत करत होती.
****
संध्याकाळी विलासराव घरी आले, तेव्हा संपूर्ण वाड्यात अंधार होता.
"वैशाली, अव कुठं आहात तुम्ही? घरात एवढा अंधार का केलाय?" विलासरावांनी त्यांना हाक मारली, पण त्यांचा काहीचं प्रतिसाद आला नाही.
"घरातले सगळे गेले कुठे?" मनातच विचार करत विलासराव मोबाईलमधल्या टॉर्चच्या साहाय्याने लाईटच्या बटणांजवळ आले आणि लाईट लावले.
"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आबासाहेब" सगळे एकसुरात म्हणाले.
"हे समदं काय हाय?" विलासरावांनी संपूर्ण घराला न्याहाळत विचारलं. फुलांनी सजवलेल घर सुशोभित दिसतं होतं.
"सरप्राईज! (त्यांच्याजवळ जात) आबासाहेब, आता पटकन जाऊन चेंज करून या. अजून खूप सरप्राईजेस बाकी आहेत." विराजने विलासरावांना म्हणत महाद्याला इशारा केला, तसा महादू विलासरावांना घेऊन त्यांच्या खोलीत गेला. काहीवेळाने, विलासराव तयार होऊन खाली आले. तसे सगळे त्यांच्याकडे बघतच राहिले.
गुलाबी रंगाचा सदरा लेंगा, त्यावर पांढऱ्या रंगाच ब्लेझर, गळ्यात सोन्याची जाड चैन, डोक्याला बांधलेला सोनेरी काठाचा गुलाबी फेटा आणि चेहऱ्याला शोभून दिसणारी पिळदार मिशी! आज विलासराव एवढे देखणे आणि रूबाबदार दिसतं होते की, त्यांच्यावरून कोणाची नजरच हटत नव्हती.
विलासराव येऊन सोफ्यावर बसवले. वैशाली ताई आणि रत्ना बाईनी त्यांचं औक्षण केलं. तोपर्यंत रेवाने पितळेची परात आणली, ज्यात साठ कणकेचे दिवे केलेले होते. वैशाली ताई, रत्ना बाई आणि रेवाने मिळून त्या दिव्यांनी विलासरावांना ओवाळलं.
"आबासाहेब, आता कापा केक." असं म्हणत विराजने तीन लेयर्सचा व्हॅनिला फ्लेवर केक त्यांच्यासमोर ठेवला. विलासराव केक कापणार तेवढ्यात, रेवा म्हणाली," आबासाहेब, केक कापण्याआधी तुमच्या मनातली एखादी ईच्छा सांगा, पूर्ण होईल."
तसे विलासरावांनी डोळे मिटून काही क्षण प्रार्थना केली आणि पुन्हा डोळे उघडले.
"आबासाहेब, काय इच्छा मागितली?" विराजने विचारलं.
"आबासाहेब, इच्छा अशी कोणाला सांगायची नसते." रेवाने विराजला दटावलं.
"आबासाहेब, तुम्ही काय मागितलं हे आम्हाला नाही माहिती; पण आमची एकच इच्छा आहे. तुम्हाला निरोगी आणि दिर्घायुष्य लाभावं. तुम्ही आमच्यासाठी देवमाणूस आहात. अनेक जणांना अडचणींतून सोडवत त्यांचे तुम्ही प्राण वाचवले आहेत." गावातला ज्येष्ठ माणूस म्हणाला, तसे सगळ्या गावकऱ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला.
"बास! पुरे झालं माझं कौतुक." विलासरावांनी केक कापला. तसे सगळे एकसुरात "हॅप्पी बर्थडे टू यू" गाण गाऊ लागले. विलासराव केकचा पहिला घास विराजला भरवणार तेवढ्यात,
"हॅप्पी.. बर्थडे.. हॅप्पी.. बर्थडे.." म्हणत एक मुलगी मध्ये आली आणि तिच्या तोंडाला सगळा केक लागला. त्या मुलीला पाहून विलासरावांचे डोळे आपोआप विस्फारले. विराज शांत होता, रेवा मात्र गोंधळलेल्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती.
क्रमशः
✍️नम्रता जांभवडेकर
(कोण असेल ती मुलगी? वाचूया पुढील भागात)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा