Login

झाकली मूठ - प्रेमाची (भाग - १०) अंतिम

ही एक दिर्घकथा आहे.
"मी उद्याच तिला तालुक्याच्या डॉक्टरकडे घेऊन जातो." विलासरावांनी दोघींच्या मनाच समाधान केलं.

दुसऱ्याच दिवशी विलासराव चिंगीला घेऊन घराबाहेर पडले आणि जाताना महादूला पण सोबत नेलं. महादूला चिंगी कोणाची मुलगी आहे, हे कळू न देता तिचा सांभाळ करण्यासाठी सांगितलं आणि दरमहा ठराविक रक्कम देऊ केली. 

****

वर्तमानकाळ...

"रागाच्या भरात मी तिला भिंतीवर ढकललं, पण त्या भिंतीला मागे टोकदार खिळा आहे हे खरंच मला माहिती नव्हतं." विलासराव रडतच बोलले.

रत्नाबाई रागाने आपल्या लेकाकडे बघत होत्या, तर वैशाली ताई सगळं ऐकून सुन्न झालेल्या. विराज आणि रेवा मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत होते, तर चिंगी आईच्या आठवणीने हळवी झालेली.

"आईचं तुमच्यावर खूप प्रेम होतं आबासाहेब. म्हणूनच तुमच्या प्रेमाची निशाणी तिने स्वतःच्या उदरात वाढवली आणि तुम्ही झिडकारल्यानंतरही एक दिवस तुम्ही नक्की याल, ही आशा मनात ठेवून तुमच्यावर प्रेम करत राहिली." चिंगी हळव्या मनाने म्हणाली.

"चिंगी, मला माफ कर. मी गुन्हेगार आहे तुझा." विलासराव चिंगीसमोर हात जोडत म्हणाले.

"रेवा, आबासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी चिंगी आपल्यासमोर आली. त्यारात्री तू मला खोदून सगळं विचारत होतीस, तेव्हाच माझ्या लक्षात आलेलं. तुला काहीतरी खटकलय, पण ह्या सगळ्याचा शोध तू एकटीने..," विराज पुढे बोलणार तेवढ्यात,

"नाही.. विराज, मी एकटीने नाही. माझ्यासोबत आपला मित्र कार्तिकसुद्धा होता. त्याच्याशिवाय हे सगळं शक्यच झाल नसतं. मी कार्तिकला चिंगीबद्दल सांगितल्यावर त्याने सुचवल्याप्रमाणे आम्ही कार्तिकच्या ओळखीच्या एका सायकेस्ट्रिक्टकडे चिंगीला घेऊन गेलो आणि तिथे आम्हांला विशालाक्षी काकूंबद्दल कळलं, पण चिंगी आबासाहेबांची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हांला पुरावे लागणार होते; कारण आम्हाला खात्री होती. त्या पुराव्यांशिवाय कोणीच आमच्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून आम्ही पुरावे गोळा केले. सॉरी विराज! पण हे सगळं मी तुझ्यापासून लपवून ठेवलं." रेवाने दिलगिरी व्यक्त केली.

"अच्छा! म्हणजे एवढे दिवस तुम्ही आमच्याशी खोटं बोलून बाहेर जात होतात. आजही तालुक्याला फुलझाडं आणायला जाताय, हे खोटंच सांगितलं तुम्ही. घ्या, अजून घाला सुनेला पाठीशी." रत्नाबाई रागाने एक नजर वैशाली ताईंकडे बघत म्हणाल्या.

"आजी, कधी कधी खर जाणून घेण्यासाठी थोड खोटं तर बोलावंच लागत ना." रेवा

"रेवा, आता आबासाहेबांना शिक्षा..," विराजला पुढचं बोलवलं नाही.

"विराज, जरी आबासाहेबांनी विशालाक्षी काकूंना चुकून ढकलल असलतरी त्यांच्या हातून गुन्हा घडलाय. त्यामुळे त्यांना शिक्षा होणारच! हो, पण ती शिक्षा कमी करण्याचे प्रयत्न आपण नक्की करू शकतो." रेवा

"ए.. तू कोण? आमच्या मुलाला शिक्षा करणारी! आमच्या मुलाला जेलमध्ये कोण टाकतंय, हेच बघतो आम्ही." रत्नाबाई रागात बोलल्या.

"आई, रेवा बरोबर बोलतेय. माझ्या हातून अनावधनाने का होईना गुन्हा घडलाय आणि त्याची शिक्षा मला मिळालीच पाहिजे." विलासराव म्हणाले.

इतक्यात, "आबासाहेब, आमच्याकडे तुमच्याविरूद्ध अरेस्ट वॉरंट आहे." इन्स्पेक्टर वाड्यात येऊन विलासरावांसमोर फाईल धरत म्हणाले.

"मला माझा गुन्हा मान्य आहे इन्स्पेक्टर. चला!" विलासराव इन्स्पेक्टर साहेबांबरोबर जाऊ लागले.

"विलासा.. ए.. विलासा.. तुम्ही कुठे घेऊन चाललात आमच्या विलासरावांना" रत्नाबाई रडतच त्यांच्यामागे जाऊ लागल्या, तसा विलासरावांनी विराजला इशारा केला.

"आजी.." विराजने रत्नाबाईंना सावरलं.

"हे सगळं ना, तुमच्या बायकोमुळे झालंय." रत्नाबाई रेवाला दोष देऊ लागल्या.

"विशालाक्षी इतकाच मी तुमचाही गुन्हेगार आहे. जमलं तर माफ करा मला." विलासराव वैशाली ताईंसमोर हात जोडत म्हणताच, वैशाली ताईंनी रडतच दुसरीकडे नजर फिरवली.

"इन्स्पेक्टर साहेब! जरी ह्यांनी माझ्या आईला मारलं असलंतरी ह्यांनीच आज एवढी वर्षे माझं पालनपोषण केलंय. त्यामुळे ह्यांची लवकर सुटका होईल अशी व्यवस्था करा." चिंगी एक नजर विलासरावांकडे बघत, इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाली, त्यावर इन्स्पेक्टर होकारार्थी मान हलवून विलासरावांना घेऊन गेले.

चिंगीच्या बाबतीतल विलासरावांच सत्य कळल्यामुळे आणि पोलिस विलासरावांना घेऊन गेल्यामुळे वैशालीताई सैरभैर झालेल्या. विराज त्यांना आत घेऊन गेला. रत्नाबाईंच्या मनात रेवाविषयी अडी बसली होती. त्या रागाने रेवाकडे बघत निघून गेल्या.

"वहिनी थँक्यू! आज तुमच्यामुळे माझ्या आईला न्याय मिळाला." चिंगीने रेवाला मिठी मारत तिचे आभार मानले.

****

दुसऱ्या दिवशी सकाळी वैशालीताई नेहमीप्रमाणे अंघोळ आवरून सडा रांगोळी घालण्यासाठी अंगणात आल्या. तिथे आधीच चिंगी रांगोळी काढत होती, ते पाहून वैशालीताई आल्यापावली आतमध्ये निघून गेल्या. हे दृश्य स्वयंपाक घरातल्या खिडकीतून रेवाने पाहिलं.

काहीवेळाने, सगळे नाश्त्यासाठी जमले. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. रेवाने सगळ्यांना नाश्ता वाढला.

"आई, कालपासून तू काहीच खाल्लं नाहीयेस. थोडसं खाऊन घे." विराज म्हणाला.

तसं वैशाली ताईंचं लक्ष समोर विलासरावांच्या रिकाम्या खुर्चीकडे गेलं आणि त्यांचे डोळे पाणावले.

रेवाने नाश्त्यासाठी चिंगीला हाक मारली, तशी पाहुण्यांच्या खोलीतून चिंगी बाहेर आली.

"भूक लागली असेल ना. ये, नाश्ता कर." रेवाने चिंगीला खुर्चीत बसवलं.

चिंगी वैशाली ताईंच्या बाजूच्या खुर्चीवर बसताच वैशालीताई खुर्चीतून उठल्या आणि आत गेल्या, तसं विराज आणि रेवाने एकमेकांकडे पाहिलं.

"आई, खूप दुखावली गेलीय. कसं समजवायच तिला?" विराज.

"आईला समजावण्यापेक्षा तुझ्या बायकोला समजावं. रस्त्यावरच्या लोकांना (चिंगीला उद्देशून) घरात आणून ठेवलंय आणि घरातला कर्ता पुरूष तिथं जेलात हाय." रत्नाबाई रागाने रेवाकडे बघत पाणावलेले डोळे पदराने पुसत म्हणाल्या आणि निघून गेल्या, तसा चिंगीनेसुद्धा नाश्त्याच्या प्लेटला नमस्कार केला आणि तिच्या खोलीत निघून गेली.

****

रेवा आणि विराज नाश्त्याची प्लेट घेऊन वैशाली ताईंच्या खोलीत गेले. वैशालीताई बेडवर बसून पाणावलेल्या डोळ्यांनी विलासरावांच्या सदऱ्यावरून मायेने हात फिरवत होत्या, ते पाहून रेवाला वाईट वाटलं.

"आई, चल नाश्ता कर." विराज नाश्त्याची प्लेट वैशाली ताईंसमोर धरत म्हणाला.

"भूक नाहीय मला." वैशालीताई डोळे पुसत म्हणाल्या.

"आई, असं काय करतेस? कालपासून तू काहीचं खाल्ल नाहीयेस. अश्याने तब्येत बिघडेल तुझी." विराज त्यांना समजावत म्हणाला.

"विराज, काल रात्रीपासून मी काही खाल्लं नाहीय म्हणून तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलास पण तिथे तुझे आबासाहेब सुद्धा काल रात्रीपासून उपाशी आहेत. त्यांनाही भूक लागली असेल. त्यांना गोळ्यासुद्धा घ्यायच्या असतात. ते तिथे जेलमध्ये उपाशी असताना माझ्या घशाखाली घास कसा उतरेल?" वैशालीताई एक नजर रेवाकडे बघत पाणावलेल्या डोळ्यांनी विराजला विचारतात, तसं विराजने एक नजर रेवाकडे बघितलं.

"आई, रेवाने आपल्याला नाश्ता देण्याआधी महादू दादांसोबत आबासाहेबांचा नाश्ता आणि गोळ्या पाठवल्या आहेत आणि हो, महादू दादांचा निरोपसुद्धा आला की, आबासाहेबांनी नाश्ता केला. तसं रेवाने सांगितलंच होतं त्यांना." विराज म्हणाला.

तश्या वैशालीताई भारावलेल्या नजरेने रेवाकडे बघू लागल्या. तेवढ्यात, विराजचा फोन वाजला. तसा तो फोनवर बोलत बाहेर निघून गेला.

"रेवा, मला तुझं काही कळतच नाहीय. काल तू घरातल्यांसमोर ह्यांचा भूतकाळ सांगितलास आणि आज ह्यांच्यासाठी नाश्तासुद्धा पाठवलास. तुला नेमक काय सिद्ध करायचय?" वैशालीताई.

"आई, मला काहीचं सिद्ध करायचं नाहीय. काल मी एक स्त्री म्हणून चिंगीच्या पाठीशी खंबीरपणे ऊभी राहून विशालाक्षी काकूंना न्याय मिळवून दिला आणि आज आबासाहेबांना नाश्ता पाठवून सुनेचं कर्तव्य पार पाडलं." रेवा म्हणाली, तश्या वैशालीताई दुसरीकडे बघू लागल्या.

"आई, मला माहितीये. काल झालेल्या प्रकारानंतर तुम्हाला माझा खूप राग आलाय. जो येणं अगदीच साहजिक आहे, पण आई चिंगीलासुद्धा तिच्या हक्काचं घर आणि माणसे मिळावीत. असं तुम्हाला नाही वाटतं का? चिंगी ह्या घराण्याची कायदेशीर वारस आहे म्हटल्यावर ती ह्या घरावर आणि संपत्तीवर हक्क सांगू शकली असती, पण तिने तसं केलं नाही कारण तिला ही संपत्ती नकोय. तिला आपल्या माणसांच प्रेम आणि सहवास हवाय जो तिने कधीच अनुभवला नाही. आई तुमचा चिंगीवर राग नाहीय, हेही मला माहितीये पण ती तुमच्या नवऱ्याच्या प्रेयसीची मुलगी आहे ही गोष्ट तुमच्या मनाला जास्त खातेय ना." रेवा असं म्हणताच वैशालीताई तिच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या.

"पण तुम्ही काळजी करू नका. चिंगी फार दिवस नजरेसमोर नाही राहणार तुमच्या. लवकरच ती हे घर आणि गाव सोडून जाणार आहे." रेवा म्हणाली आणि निघून गेली, वैशालीताई मात्र तिच्या बोलण्याचा विचार करू लागल्या.

****

दुपारच्या जेवणावेळी चिंगी बॅग घेऊन बाहेर आली.

"वहिनी, जाते मी." चिंगी रेवाकडे बघून बोलली.

"रेवा, जेवणाच्यावेळी कोणी बाहेर जात नाही." वैशालीताई.

"वैशाली, तुम्ही का थांबवताय तिला. जाऊदे कुठे जातेय ती. आपला काय संबंध तिच्याशी?" रत्नाबाई.

"आई, तुमचा संबंध आहे तिच्याशी. ती नात आहे तुमची." वैशालीताई.

"आम्हाला एकच नातू आहे विराज. बाकी कोणाशी आमचा काही संबंध नाही." रत्नाबाई.

"आई, असं म्हणून संबंध जोडता किंवा तोडता येत नाही आणि तुम्ही कितीही नाकारलं, तरी तिचं तुमच्याशी असलेलं नातं कोणीच बदलू शकत नाही." वैशालीताई.

"चिंगी, खरतर माझा तुझ्यावर राग नव्हता. मला स्वतःचाच राग आलेला. ज्या माणसावर निस्वार्थपणे प्रेम केलं. त्याने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली, हे मला सहन झालं नाही पण ह्या सगळ्यात तुझा काहीच दोष नाहीय. हेही पटलंय मला. मी काल तुझ्याशी जे काही वागले, त्यासाठी मला माफ कर." वैशालीताई म्हणाल्या.

"मलाही माफ कर चिंगी. बाप असतानासुद्धा बिनबापाचं आयुष्य जगावं लागल तुला." विलासराव  घरात येत म्हणाले.

"विलासा.. तू आलास.." रत्नाबाई आनंदाने खुर्चीतून उठल्या आणि विलासरावांजवळ गेल्या. वैशाली ताईंचा चेहरा आनंदाने उजळला.

"विराजराव, तुम्ही आमचे नातू शोभता. विलासरावांना घरी आणून तुम्ही आमच्या आनंदाचं कारण बनले आहात.. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत.." रत्नाबाई म्हणाल्या

"आजी, तुझ्या आनंदाचं कारण चिंगी आहे. तिला थँक्यू म्हण." विराज

"म्हंजी?" रत्नाबाई

"आजी, मगाशीच मला पोलिस स्टेशनमधून फोन आलेला इन्स्पेक्टर साहेबांचा. त्यांनी मला वकिलांना सोबत घेऊन पोलिस स्टेशनला बोलवलं होतं. वकिलांना तिथे घेऊन जाताच मला कळलं की, चिंगीने आबासाहेबांवरची केस मागे घेतलीय." विराज म्हणाला, तश्या वैशालीताई आणि रत्नाबाई चिंगीकडे आश्चर्याने बघू लागल्या.

"काकू, मला कधीच पैश्यांची हाव नव्हती आणि नाहीय. मला फक्त माझं हक्काचं घर आणि माझी माणसे हवी होती. बेवारस हा जो डाग माझ्यावर लागलेला ना, तो पुसायचा होता मला. जो पुसला गेला आणि हे सगळं शक्य झालं ते रेवा वहिनींमुळे." चिंगी हसत रेवाकडे बघत म्हणाली.

"तुझ्यावरचा डाग तेव्हाच पुसला जाईल, जेव्हा तुला सन्मानाने ह्या घरात प्रवेश मिळेल." रत्नाबाई म्हणाल्या, तसे सगळे त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.

"अरे असे पाहताय काय? चला, आता तयारीला लागा. माझ्या नातीचा गृहप्रवेश आणि नामकरण सोहळा करायचाय." चिंगीकडे पाहत रत्नाबाई आनंदाने म्हणाल्या.

****

आठवड्याभराने पाटील वाडा फुलांच्या माळांनी सजला होता. रेवाने चिंगीला छानपैकी तयार केलं. चिंगीने छानशी साडी नेसली होती. दोघीही बाहेर आल्या. सगळेजण तिचीच वाट पाहत होते. बाहेर येताच चिंगी सगळ्यांच्या पाया पडली आणि झोपाळ्यावर बसली. सगळ्यांनी तिचं औक्षण केलं आणि पाठीमागचा पडदा बाजूला सारला. तसं "वीणा" हे नाव सगळ्यांना दिसलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.

"विशालाक्षी सतत गुणगुणत असायची. वीणा हे नाव आवडायचं तिला." विलासराव.

"चिंगी.. सॉरी वीणा, तुझ्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे." रेवाने तिचे डोळे बंद केले आणि एका भिंतीसमोर उभं केलं. डोळे उघडताच तिला समोर विशालाक्षीची मोठी फोटोफ्रेम दिसली. ती पाहून वीणाचे डोळे पाणावले.

"चला, एक फॅमिली फोटो काढूया." असं म्हणत विराजने फॅमिली फोटो काढला.

वीणाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून रेवाला समाधान मिळालं. अथक प्रयत्न करून तिने वीणाला न्याय मिळवून दिला.