जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-29.

गतजन्मीची अधुरी प्रेमकथा

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची-भाग-29.


तन्वी आणि विरेन दरीत पडल्यावर तेथून अश्विन आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला आणि थेट मुक्कामाची जागा गाठली. पहाटेचे साडेचार वाजले होते. शिंदे सर आणि सगळी मुलं जागी झाली होती.शिंदे सरांनी अश्विन आणि त्याच्या साथीदारांना धारेवर धरलं,
ते म्हणाले,
"मूर्ख, बेअक्कल,नालायक!कुठे गेला होता रात्रभर?"

अश्विन बुचकळ्यात पडला, त्याला वाटलेलं की कोणाला काहीच खबर लागणार नाही. पण शिंदे सरांना समजलं आहे जे समजल्यावर तो सारवासारव करत म्हणाला,
"सर!काही नाही. आम्ही इथेच होतो. आम्हाला आजूबाजूला काहीतरी आल्याचं जाणवलं म्हणून पाहायला गेलो होतो. त्याचं काय आहे सर लीडर म्हणून ते माझं कर्तव्य होतं ना."

शिंदे सर कडाडून म्हणाले,
"मूर्ख!आजूबाजूला काही आलं होतं तर मला सांगणे हे तुझं पहिलं कर्तव्य होतं.त्यामुळे मला मूर्ख बनवण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. खरं खरं सांग तुम्ही कुठे गेला होता? आणि कशासाठी गेला होता? तुमच्यासह आणखी दोघेजण गायब झाले होते. ते कुठे आहेत?"

अश्विन बावरून म्हणाला,
"आणखी दोघे कोण सर? आम्ही एवढेच गेलो होतो."

शिंदे सर म्हणाले,
"तन्वी आणि विरेन कुठे आहेत? तुम्ही सगळे एकाचवेळी गायब झाला आहात. मी पाहिलं तेव्हा तुमच्याबरोबर तेही गायब होते. त्यामुळे मुकाट्यानं सगळं खरं सांगा."

आपण फसणार अशी भीती वाटल्यामुळे अश्विनने शक्कल लढवली तो शिंदे सरांना म्हणाला,
"सर आम्हाला माफ करा.आम्ही घाबरून तुमच्याशी खोटं बोललो."

शिंदे सर रागात म्हणाले,
"अश्विन! जे बोलायचं आहे स्पष्ट आणि खरंखरं सांग."

अश्विन म्हणाला,
"सर मला मान्य आहे की आम्ही रात्री तुम्हाला न सांगता तंबूपासून लांब जंगलात गेलो होतो. पण त्याला कारणही तसंच होतं सर."

शिंदे सर म्हणाले,
"काय कारण होतं लवकर सांग."

अश्विन म्हणाला,
"सर आम्ही सगळे गाण्याची मैफिल संपल्यावर आपल्या तंबूत झोपायला गेलो.
थोड्याच वेळात बाहेर काहीतरी हालचाल जाणवली म्हणून मी तंबूतून बाहेर डोकावून पाहिलं, तर तन्वीच्या तंबूबाहेर कोणीतरी उभा असलेलं मला दिसलं. म्हणून मी त्याच्यावर लक्ष ठेऊन होतो. त्याने कोणालातरी बाहेर बोलावलं आणि एक व्यक्ती बाहेर आली.त्यानंतर ते दोघे थोडया अंतरावर जाऊन काहीतरी बोलू लागले आणि अचानक त्या व्यक्तीने त्या दुसऱ्या व्यक्तीला मिठी मारली. मग ती व्यक्ती ओरडू लागली.तोपर्यंत त्याने बहुतेक तीच तोंड दाबलं आणि तो तिला घेऊन जंगलाच्या दिशेने पळू लागला. म्हणून मी आणि माझे मित्र त्यांचा पाठलाग करत गेलो. तुम्हाला सांगेपर्यंत कदाचित ते खूप दूर जातील म्हणून आम्ही स्वतः त्यांच्या मागे जाणे योग्य समजलं आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ पळालो. पण नंतर ते दोघे कुठेच दिसेनासे झाले म्हणून आम्ही सगळीकडे त्यांना शोधू लागलो. बऱ्याचवेळाने आम्हाला त्यांचा सुगावा लागला आणि आम्ही त्याठिकाणी पोहोचलो तर विरेन तन्वीवर जबरदस्ती करत होता.तन्वी बेशुद्ध होती आणि हा नराधम विरेन तिचे लचके तोडत होता. आम्ही त्याला अटकावं करण्याचा प्रयत्न केला, तर त्याने आमच्यावर खूप जोराचा हल्ला केला. तो कामाग्नीत एवढा वेडा झाला होता की त्याला रोखणाऱ्यावर तो अगदी रानटी जनावरासारखा हल्ला करत होता. तरीही आम्ही त्याला बराचवेळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण त्याने आमच्यावर दगडांचा वर्षाव केला. आम्ही त्यातून वाचण्यासाठी झाडांच्यामागे लपलो.तोपर्यंत त्याने तिला घेऊन दरीच्या दिशेने कुठे पोबारा केला ते आम्हाला समजलं सुद्धा नाही. सर त्याने मारहाण केलेल्या आमच्या अंगावरच्या खुणा बघा.म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्याने किती बेकार मारहाण केली आहे. सर आम्ही तुमचे नियम तोडले पण आमचा हेतू वाईट नव्हता. परिस्थितीच अशी उद्धभवली की आमचा नाईलाज झाला."

अश्विनच बोलणं ऐकून शिंदे सरांना कानावरती विश्वास बसेना.
ते म्हणाले,
"तुम्ही नक्की खरं बोलत आहात ना? विरेन तसा मुलगा असेल असं वाटत नाही."

यावर तन्वीच्या टीममधील मुलं म्हणाली,
"हो सर! विरेन असा मुलगा नाही. तो कधीच असं करू शकत नाही. तन्वीच त्याच्या प्रेमात पडली होती. मग त्याला जबरदस्ती करायची काय गरज होती?उलट विरेन तिला टाळत होता. यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे किंवा हे लोक खोटं बोलत आहेत सर."

विरेन रागाने लालबुंद झाला होता पण तो संयम राखत म्हणाला,
"हे पहा.आम्हाला खोटं बोलून काय मिळणार आहे? जे पाहिलं ते सगळं अगदी खरखुर सरांना सांगितलं आहे.तुमचा विश्वास नसेल तर त्याला मी काही करू शकत नाही. पण जर आम्ही खोटं बोलत असू तर विरेन आणि तन्वी आता इथे का नाहीत? ते दोघे कुठे आहेत?याच उत्तरं कोणाकडे आहे का? असेल तर त्याने समोर येऊन सांगा."

दोन मिनिट झाली तरी कोणीच समोर आलं नाही.
मग शिंदे सर म्हणाले,
"अश्विन तुझं म्हणणं जर खरं असेल तर आपल्याला ताबडतोब वनअधिकारी आणि पोलिसांना कळवावं लागेल."

पोलिसांच नाव ऐकताच अश्विन सटपटला,
\"आपला डाव आपल्यावरच तर उलटणार नाही ना?\" अशी भीती त्याच्या मनात दाटली.

तो म्हणाला,
"पो… पो…. पोलीस! सर पोलीस कशासाठी हवेत? आपण सगळे जाऊया ना त्यांना शोधायला.म्हणजे पोलीस उगाच आपल्याला मनस्ताप देतील म्हणून म्हणालो."

शिंदे सर म्हणाले,
"ही अपहरणाची केस होऊ शकते, त्यामुळे आपल्याला पोलिसांची आणि वनविभागाची मदत घ्यावीच लागेल. आपल्याला लवकरात लवकर हालचाल करावी लागेल. तन्वीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे."

प्रीती शिंदे सरांना कळवळून सांगू लागली,
"सर!तुम्ही नक्की पोलिसांना आणि वनविभागाला कळवा. पण मला खात्री आहे की विरेन असं काही वागणार नाही. त्यामुळे त्याला आतापासूनच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करू नये असं मला वाटतं. कदाचित ते दोघेही कोणत्यातरी संकटात सापडलेले असू शकतात."

शिंदे सर म्हणाले,
"प्रीती!डोन्ट वरी.आपण कोणावरही अन्याय करणार नाही आहोत. पण अश्विन आणि बाकी मुलांनी जे सांगितलं त्यावरून सध्यातरी संशयाची सुई विरेनवरच आहे. आपल्याला यांच्या म्हणण्यानुसारच जावं लागेल कारण हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत."

शिंदे सरांनी वनविभागाला आणि पोलीसदलाला ही वर्दी दिली, काही वेळातच संबंधित अधिकारी आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. शिंदे सरांबरोबरच अश्विन आणि त्याचे सहकारी मित्र यांनी आपल्यापरीने त्यांना माहिती दिली.

वनविभाग आणि पोलीस यांची एक तुकडी अश्विनच्या सांगण्यावरून जंगलात शिरली. त्यानी आपल्या पद्धतीने शोधमोहीम सुरु केली. सोबत शिंदे सर, अश्विनसहित प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून त्याचे सहकारी होते. बाकीच्या मुलांना तंबूमध्येच थांबवलं गेलं आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची एक तुकडी तैनात करण्यात आली. सगळीकडे वातावरण धीरगंभीर बनलं होतं.

प्रत्येकजण विरेन आणि तन्वीच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करत होते.

इकडे जंगलात अश्विन सर्वांना जिथं त्यांची झटापट झाली तिथं घेऊन गेला.

सबइन्स्पेक्टर सूर्यभान भोसले हे पोलिसांच्या विशेष तुकडीचे इन्चार्ज होते.
त्यांनी सगळ्या परिसराची बारकाईने तपासणी सुरु केली.
अश्विनला पुढे बोलावून सगळ्या घटनेचा आढावा त्यांनी घेतला आणि ते म्हणाले,
"एकंदरीत इथे खूप जास्त झटापट झालेली आहे अशी चिन्हे दिसत आहेत.तसेच त्यानंतर अश्विनने सांगितलेल्या ठिकाणाहून जर त्याने पलायन केलेलं असेल तर ते नक्कीच त्याने या दरीच्या झूडपांचा आधार घेतला असणार आहे.

शिंदे सर विचार करत म्हणाले,
"काहीही काय भोसले साहेब. दरीत उडी मारून तो आपला जीव धोक्यात का घालेल?"

यावर सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,
"सर एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली नाही की दरीचा उतार एकदम तीव्र नसून उथळ असल्यामुळे ते घसरत जाऊ शकतात."


शिंदे सर म्हणाले,
"अच्छा!हीपण शक्यता असू शकते."

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,
"आपण पोलीस आणि वनविभागाचे काही जवान आणि कमरेला दोरखंड बांधून या मार्गाने खालच्या दिशेला पाठवू. तिथून पुढे आपल्याला नक्की काय परिस्थिती आहे ते समजेल."

शिंदे सर म्हणाले,
"हो साहेब!ही कल्पना छान आहे."

अश्विन मनातल्या मनात खूप घाबरला होता,
\"चुकून जर यांना आपल्याबद्दल शंका आली तर आपलं काही खरं नाही.\"
असा विचार तो करत होता.

पाचच मिनिटात ते निवडक जवान तयारीसह दरीत उतरायला लागले.
ते हळूहळू खाली उतरत निघाले असताना अश्विनच्या पोटात गोळा आला आणि तो आपल्या सहकारी मित्रांना म्हणाला,
"मित्रांनो!आपला डाव आपल्यावरच उलटणार नाही ना?ते जिवंत असले तर माझं काही खरं नाही."

सम्राट त्याला म्हणाला,
"वेडा आहेस का तू? एवढ्या वरून खाली दरीत पडल्यावर कोणी जगू शकेल का? तू अजिबात टेन्शन घेऊ नको.पोलिसांच्या हाती जास्तीतजास्त त्यांचे मृतदेह लागतील बाकी काही होणार नाही."

एव्हाना ते जवान बरेच अंतर खाली गेले होते.
त्यांच्याकडून कोणती माहिती मिळतेय हे जाणून घेण्यासाठी सबइन्स्पेक्टर भोसले आणि शिंदे सर तिथेच थांबून वाट पाहत होते. इतक्यात एक जवान दोराच्या साहाय्याने वरती आला. त्याला पाहून भोसले साहेब आणि शिंदे सर उत्सुकतेने उठून उभे राहिले.
भोसले साहेब त्या जवानाला म्हणाले,
"काही मागमूस लागला का?"

तो जवान म्हणाला,
"होय साहेब. काही अंतर झाडांझुडपातून पुढे गेल्यावर तिथून पुढे एक ताशीव कडा आहे आणि तिथून खाली साधारणपणे शंभर ते दीडशे फूटांवर वाहतं पाणी आहे."

भोसले साहेब म्हणाले,
"अच्छा!म्हणजे खाली पाणी आहे हे आरोपीला म्हणजेच विरेनला माहिती असावं, म्हणून त्याने तिला घेऊन इथून उडी मारली असावी."

शिंदे सर त्याच्या बोलण्यावर शंका घेत म्हणाले,
"भोसले साहेब मला नाही वाटत की विरेनला यातील काही माहिती असावं. कारण एकतर आम्ही या दिशेला कधी आलो नाही आणि खाली पाणी असावं याचा वरून अंदाज लागत नाही.इथून बघताना फक्त झाडं झूडपं आणि दरीचा भाग आहे असंच वाटतं."

भोसले साहेब म्हणाले,
"तुम्हाला काय म्हणायचं आहे शिंदे सर? म्हणजे काहीच माहित नसताना विरेनने इथून उडी मारली असावी? की ते चुकून पडले असावेत? की कोणी त्यांना ढकलून दिलं असावं?"

शिंदे सर म्हणाले,
"तिन्ही शक्यता असू शकतात.त्यामुळे अद्याप ठाम काही ठरवणं अवघड आहे."

भोसले साहेब म्हणाले,
"ठिक आहे. नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला खाली उतरून जावं लागेल.त्याबद्दल आपल्याला जंगलखात्याशी बोलावं लागेल."

शिंदे सरांनी होकारार्थी मान हलवली.

भोसलेसाहेबांनी वनरक्षक चौधरी यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा करू लागले.

भोसलेसाहेब म्हणाले,
"मिस्टर चौधरी आपल्याला या दरीमध्ये उतरण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे दोरखंडाच्या साहाय्यानेच उतरायला हवं की दुसरा कोणता मार्ग आहे?"

चौधरी म्हणाले,
"दरीत उतरायचं कसं हे आपण नंतर बोलू. तत्पूर्वी तुम्हाला रीतसर परवानगी घेणं आवश्यक आहे. कारण तो जंगलाचा प्राण्यांसाठी राखीव विभाग आहे.तिथे माणसांना जायला प्रवेश निषीद्ध आहे."

भोसलेसाहेब म्हणाले,
"ठिक आहे मी वरिष्ठांशी बोलून परवानगी घेतो. तुम्ही पुढील मार्ग आणि योजना सांगा."

चौधरी म्हणाले,
"आपण सर्वप्रथम आपले जे निवडक जवान आहेत त्यांना दोरखंडाच्या साहाय्याने खाली उतरवू. त्यांच्या हाताशी काही लागतंय का ते आधी पाहू. मग पुढची योजना आखू."

भोसलेसाहेब म्हणाले,
"ठिक आहे.तुम्ही म्हणताय तसंच करू."

त्यांनी त्या जवानांना आणखी खाली उतरून जायला सांगितलं. त्या आदेशानुसार जवान खाली उतरू लागले.
पाणी आणि जवान यांच्यात साधारणपणे फक्त पन्नास फुटाच अंतर उरलं होतं.
इतक्यात एका जवानाला पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसलं.
त्याने तो संदेश टप्याटप्यावर उभा असणाऱ्या जवानांमार्फत वरती दिला आणि एक जवान भोसलेसाहेबांना म्हणाला,
"साहेब!पाण्याशेजारच्या झुडपाला अडकून काहीतरी पाण्यावर तरंगताना दिसलं आहे.बहुतेक डेडबॉडी असावी."

भोसलेसाहेबांच्या बरोबरच शिंदे सरही सटपटून जागेवरून उठून उभे राहिले.

शिंदे सरांच्या पायाखालची जमीनच सरकली.एनसीसीच्या या सगळ्या कॅम्पची जबाबदारी त्यांची असल्यामुळे हे प्रकरण त्यांच्याशी अंगाशी येणारं होतं.
ते देवाकडे प्रार्थना करू लागले,
"हे देवा महादेवा!आता तूच आमचा आधार, तूच आमचा कैवारी. ते तरंगणार काहीतरी वेगळं असूदेत देवा.तन्वी आणि विरेन सुखरूप असूदेत."

इतक्यात भोसले साहेबांनी आदेश दिला,
"आणखी खाली जाऊन पहा ते तरंगणार नक्की काय आहे? लवकरात लवकर तिथे पोहोचा."

शिंदे सर गलितगात्र होऊन डोक्याला हात लावून खाली बसले.


क्रमशः

ते पाण्यावर तरंगणारं काय असेल?
विरेन आणि तन्वी यांचं काही बरवाईट झालं असेल का?
की आणखी काही घडलं असेल?
अश्विनने केलेला कावा विरेनला गुन्हेगार ठरवेल का?

हे सगळं आणखी बरंचकाही जाणून घेण्यासाठी वाचत रहा. \"जिवलगा\"

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)


©® सारंग शहाजीराव चव्हाण
पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)




 

🎭 Series Post

View all