जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-54.
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)
युवराज इंद्रसेन काही निवडक सैन्यासह छुपी शस्त्र घेऊन महाबलीकडे शरण जाण्यासाठी निघाला, तर मल्हार काही निवडक साथीदार घेऊन निर्जराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी निघाला. काही निवडक सैन्य नदीवर घातलेला बांध फोडून पाणी सोडण्यासाठी निघाले.
बाकी सेनेसह सेनापती इंद्रसेनच्या इशारतीची वाट पाहत सिंधुमतीच्या हद्दीच्या अलीकडे येऊन थांबले.
मल्हार आणि इंद्रसेनसह सगळ्यांना हेच वाटतं होते कि,
'महाबली त्यांच्या काव्यात फसला आहे आणि तो आपण शरण येतोय म्हणून गाफिल असणार आहे.'
पण महाबली हा धूर्त आणि पाताळयंत्री माणूस होता. त्याच्या डोक्यात भलताच विचार सुरु होता.
त्याने आपल्या हत्तीदलाच्या सहाय्याने एक भलामोठा विशालकाय आकाराचा गोलाकार दगड उंच टेकडीवर नेऊन ठेवला होता. तो दगड तिथंवर नेऊन ठेवण्यामागे महाबलीचं काय प्रयोजन होतं हे खुद्द त्यालाच माहित होतं.
इंद्रसेन आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या निवडक सैन्यानी सिंधुमतीच्या हद्दीत प्रवेश केल्याकेल्या ती वार्ता महाबलीपर्यंत जाऊन पोहोचली होती. इंद्रसेन शरण येत आहे ह्या गोष्टीमुळे तो प्रचंड खूष झाला होता. त्याच आनंदात तो निर्जरा ज्या महालात नजरकैदेत होती तिथे गेला आणि आसुरी आनंद चेहऱ्यावर दाखवत तिला म्हणाला,
"राजकुमारी निर्जरादेवी! तुम्ही लवकरच या महाबलीच्या महाराणी होणार आहात. तुमचे बंधु युवराज इंद्रसेन आम्हाला शरण येत आहेत. त्यामुळे संपूर्ण विराटनगरी आता आमच्या अधिपत्त्याखाली येणार आहे. मग आता तुमच्यावरही आमचाच अधिकार असेल. त्यामुळे आता आमच्याशी विवाह करण्याची तयारी ठेवा. तुम्हाला आमच्या वधूच्या रूपात पाहायला आम्ही आतुर आहोत."
यावर निर्जरा रागाने कडाडून म्हणाली,
"खबरदार महाबली! आमच्याशी विवाह किंवा बाकी कोणत्या गोष्टींचा विचारही करू नका. आमचं मन आम्हाला सांगतय की मल्हार जिवंत आहेत आणि लवकरच ते तुझा काळ बनून येतील. आम्हाला वधू बनायचंच झालं तर मल्हारच्या बनू, अन्यथा मरण पत्करु पण शरण येणार नाही."
महाबली फुत्कारत म्हणाला,
"बस्स! पुरे झाला मल्हारचा मोठेपणा. एकेकाला जमिनीत गाढून टाकीन. सोडणार नाही आम्ही कोणालाच. मल्हार असो की इंद्रसेन असो. शेवटी आमच्या पायाशीच लोळण घ्यावी लागेल त्यांना. आम्ही आपणांस शेवटची संधी देत आहोत. आम्हाला शरण या अथवा मरणाला तयार रहा."
असं म्हणून तो शेला हवेत उडवून हाताशी गुंडाळत निघून गेला.
इकडे निर्जरा काळजीत पडली होती. मल्हारशिवाय ती कोणाचाच विचारही करू शकत नव्हती. मल्हारशिवाय कोणाशी विवाह करण्याची वेळ आलीच तर स्वतःचा जीव देण्याचीही तिची तयारी होती.
इकडे इंद्रसेन राजवाड्याच्या दरवाजापाशी येऊन पोहोचला. सैनिकांनी त्याची आणि त्याच्या सोबत आलेल्या सैनिकांची झडती घेतली असता त्यांना त्यांच्याकडे कोणतंच शस्त्र सापडलं नाही.
ते सगळे निशस्त्र असल्याची खात्री होताच त्यांनी त्यांना दरवाजातून आत सोडलं.
आत गेल्यावर दरबाराच्या दिशेने जाताना इंद्रसेन निर्जराचा काही ठावठिकाणा लागतोय का ते पाहत होता.
इतक्यात ते राजदरबारात पोहोचले. तिथं सगळेजण माना झुकवून उभे होते. एकदम स्मशान शांतता होती. त्यातून फक्त इंद्रसेन आणि त्याच्या सैनिकांच्या पाऊलांचाच आवाज येत होता. त्यामुळे महाबली रागाने तिकडे पाहू लागला. इतक्यात एक द्वारपाल धावत आला आणि तो इंद्रसेनला म्हणाला,
"आपली पादत्राणं बाहेर काढून ठेवा आणि मग आत जा. महाराजांना दरबारात पादत्राण चालत नाहीत."
इंद्रसेन सैनिकांसह बाहेर जाऊन नाईलाजाने अनवाणी चालत आत आलेत.
आत आल्याआल्या एक सैनिक त्यांना म्हणाला,
"महाराजांना वाकून नमस्कार करावा."
इंद्रसेनने हाताच्या मुठी वळल्या,पण पुन्हा भानावर येत महाबलीला नमस्कार केला.
महाबली मोठयाने हसत हसत म्हणाला,
"हाहाहाहाहाहाहाहा यावे, विराटनगरचे युवराज इंद्रसेन यावे. या महाबलीच्या महान साम्राज्यात तुमचं स्वागत आहे."
इंद्रसेन चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाला,
"महाराज महाबली आता आम्ही कसले युवराज? आता आम्ही आपलेच सेवक! तुम्हाला शरण आलो आहोत आम्ही. तुमच्यासारख्या पराक्रमी योध्यापुढे आम्ही म्हणजे कस्पटासमान. आमचा तुमच्यापुढे निभाव लागणं अशक्य आहे. आम्ही आतून पुरते घाबरून गेलो आहोत. तुम्ही आम्हाला अभय द्या."
महाबली त्यांना म्हणाला,
"तुम्ही आम्हाला शरण आला आहात. ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. कारण तुम्ही एकटेच आला आहात. आमच्या गुप्तहेराच्या म्हणण्यानुसार मल्हार तुमच्या आश्रयाला होता. मग आता मल्हार कुठे आहे? की तुम्ही दोघे मिळून आमच्या विरोधात काही योजना बनवली आहे?"
यावर इंद्रसेन आपली बाजू सावरत म्हणाला,
"महाराज, मल्हार आमच्याकडे आले होते ही गोष्ट खरी आहे. पण आम्ही त्यांना विराटनगरी सोडून जाण्यास सांगितलं. कारण त्यांना तुमच्या विरोधात लढाई करण्यासाठी आमच सैन्य हवं होतं.
पण आम्ही त्यांना असमर्थता दाखवल्यावर ते तिथून कुठे निघून गेले ते आम्हाला माहित नाही."
महाबली इंद्रसेनकडे बारीक डोळे करून निरखून पाहत म्हणाला,
"अच्छा! असं आहे तर! तरीही आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तुम्ही स्वतः आमचा विवाह निर्जराशी करून दिला तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. जोपर्यंत आमचा विवाह निर्जराशी होत नाही तोपर्यंत तुम्हाला कैदेत ठेवण्यात येत आहे. निर्जरा जर आमच्याशी विवाहाला तयार झाल्या नाहीत, तर शरण देण्याऐवजी मरण देण्यात येईल. हे ध्यानात ठेवा."
इंद्रसेनला आपली योजना फसताना दिसू लागली, म्हणून हात जोडून तो महाबलीला म्हणाला,
"आम्हाला जरूर कैद करा, पण आमच्या प्रजेला पिण्यासाठी थोडंसं तरी का असेना पाणी नदीपात्रातून खाली सोडा. आमची प्रजा पाण्यावाचून तळमत आहे. कृपा करा आमच्यावर."
महाबली कुत्सितपणे हसत म्हणाला,
"अशक्य! जोपर्यंत निर्जरा आमच्याशी विवाहाला तयार होत नाहीत तोपर्यंत आम्ही पाण्याचा एक थेंबसुद्धा सोडणार नाही. तुमच्या भगिनींना जर प्रजेची काळजी असेल तर त्यांना लवकर विवाहासाठी तयार करा. त्यांना एकदा भेटण्याची आम्ही आपणांस संधी देत आहोत. पण त्यानंतरही जर त्यांनी असमर्थता दर्शवली तर आम्ही तुम्हाला आजीवन बंदी बनवून तळघरात डांबून ठेवू, तसेच तुमची सगळी प्रजा 'पाणी पाणी' करून गतप्राण होईल,याची याद राखा."
महाबलीने आपल्याला निर्जराला भेटण्याची आयती संधी दिली हे पाहून इंद्रसेन मनोमन खूप खूष झाला. पण ते चेहऱ्यावर न दाखवता तो म्हणाला,
"महाराज महाबली, राजकुमारी निर्जरा यांचं प्रजेवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी त्या नक्की या विवाहास मान्यता देतील. आम्ही स्वतः त्यांना विवाहासाठी तयार करू."
महाबलीने आपल्या सैनिकांना सांगून इंद्रसेनला निर्जराच्या कक्षात पाठवले. इंद्रसेन कक्षात गेल्यावर त्याने पाहिलं तर निर्जरा शून्यात नजर लावून बसली होती. कोणीतरी आपल्या जवळ येऊन उभं आहे याचपण तिला भान उरलं नव्हतं. विराटनगरसारख्या विशाल आणि वैभवशाली राज्याची राजकुमारी इथे महाबलीसारख्या राक्षसाच्या कैदेत राहून पंख छाटलेल्या पक्षासारखी भासत होती. तिची अशी अवस्था पाहून इंद्रसेनच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाणी पुसून तो निर्जराला म्हणाला,
"निर्जरा! इकडे पहा कोण आलं आहे! तुमचे बंधूराज आले आहेत तुम्हाला सोडवायला."
निर्जरा क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली. हे सत्य आहे की आभास आहे हे तिला समजत नव्हते.
समोर खरोखरच इंद्रसेन उभा आहे हे समजल्यावर ती लगबगीने उठली आणि त्याला येऊन बिलगली.
तिच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. उसासे टाकत ती म्हणाली,
"बंधू, आम्हाला खात्री होती तुम्ही याल आणि महाबली नावाच्या राक्षसापासुन आमची सुटका कराल. तुम्ही तर आलात, पण मल्हार कुठे आहेत? ते सुखरूप आहेत ना?"
बाहेरचा सैनिक त्यांचं संभाषण ऐकत आहे हे लक्षात येताच इंद्रसेन तिला शांत करत म्हणाला,
"निर्जरा, मल्हार आमच्याकडे आले होते. पण आम्ही त्यांना मदत करण्यास नकार दिला, त्यामुळे ते निघून गेले. तसेंच आम्ही महाबलीपासुन तुम्हाला मुक्त करण्याला आलेलो नाही. त्यामुळे आम्हाला माफ करा."
निर्जरा प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाली,
"आपण काय बोलत आहात आम्हाला काहीच कळेना. तुम्ही इथे महाबलीला धूळ चारून आलात ना?"
इंद्रसेन मान खाली घालून उत्तरला,
"नाही निर्जरा. आम्हाला क्षमा करा. आम्ही महाबलीना शरण आलो आहोत. प्रजा पाण्यावाचून तळमळून गतप्राण होतं आहे. त्यांना आपण पाण्याची पूर्तता नाही केली तर आपण राजे म्हणून कसं तोंड दाखवणार? म्हणून शरण येण्याखेरीज आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. आणखी एक गोष्ट म्हणजे महाबलीना तुमच्याशी विवाह करायचा आहे आणि तुम्ही त्यांना मंजूरी दिली तरच ते आपल्याला पाणी देणार आहेत. 'अन्यथा पाण्याचा एकही थेंब नदीत सोडणार नाही.' असं त्यांनी बजावलं आहे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आपल्या प्रजेसाठी हा विवाह करून एका राजकुमारीचं कर्तव्य पार पाडा. अशी मी तुमच्याकडे भीक मागत आहे."
निर्जरा हैराण होऊन इंद्रसेनकडे पाहू लागली आणि म्हणाली,
"बंधू हे तुम्ही बोलताय? आजवर आपल्या इतिहासात कोणी कधीच कोणापुढे शरणागती पत्करली नाही आणि तुम्ही आम्हांस विवाहास तयार हो म्हणून सांगत आहात!"
सैनिकाच थोडंसं लक्ष भटकल्यावर इंद्रसेनने निर्जराच्या कानात काहीतरी सांगितलं आणि मग तो मुद्दाम मोठ्याने म्हणाला,
"हे पहा निर्जरा. तुमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग बाकी नाही राहिला. बिनदिक्कतपणे महाबलींशी विवाहास तयार व्हा. अन्यथा आम्ही विसरून जाऊ की निर्जरा नामक कोणी आमच्या भगिनी या पृथ्वीतलावर जिवंत आहेत."
हे ऐकून निर्जरा गंभीर मुद्रेने म्हणाली,
"ठिक आहे बंधू. जर आमच्या विवाह करण्यामुळे सगळ्यांचं हीत असेल तर आम्ही या विवाहास तयार आहोत. पण आमच्या काही अटी आहेत."
इंद्रसेन म्हणाला,
"कोणत्या अटी?"
निर्जरा म्हणाली,
"आम्ही ठरवू त्या मुहूर्तावर विवाह संपन्न व्हायला हवा आणि विवाहापूर्वी विराटनगरीमध्ये पिण्यासाठी पाणी पोहोचायला हवं."
इंद्रसेन चेहऱ्यावर खोटं हसू आणून म्हणाला,
"अच्छा,इतकंच! पहिली अट मान्य झाली म्हणून समजा. दुसऱ्या अटीसाठी आम्ही महाराज महाबलींशी बोलून घेतो."
निर्जराच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटलं. आपल्याला काय करायचं आहे,ते तिला माहित होतं.
इंद्रसेनसुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यापासून चुकणारा नव्हता. त्याने ताबडतोब जाऊन ही वार्ता आणि अटी महाबलीच्या कानावर घातल्या. निर्जराने संमती दिली हे समजल्याबरोबरच महाबलीला प्रचंड आनंद झाला. त्याने आनंदाच्या भरात दोन्ही अटी मान्य केल्या. ताबडतोब विराटनगरला पिण्यासाठी थोडेफार पाणी सोडण्यात आले.
इंद्रसेनने संधी साधून आपल्या कबुतरामार्फत पुढील योजनेचा संदेश मल्हारपर्यंत पोहोचवला. त्याप्रमाणे सगळे आपल्याला नेमून दिलेली कामगिरी पार पाडण्यासाठी सज्ज झाले.
ठरल्याप्रमाणे निर्जरा लग्नासाठी तयार झाली. हा विवाह दोन शाही घराण्यांचा असला तरी त्यात कसलाच शाही थाट नव्हता. कारण महाबलीकडे तेवढा संयम नव्हता, त्यामुळे त्याने कसलीच तयारी करण्याची तसदी घेतली नव्हती. लवकरात लवकर निर्विघ्नपणे हा विवाहसोहळा पार पडावा हीच त्याची मनीषा होती.
आणि बघता बघता विवाहाची वेळ जवळ आली. निर्जराला तयार करून मंडपात आणल गेलं. महाबली तर गुढग्याला बाशिंग बांधूनच तयार झाला होता. भटजीनी वर आणि वधूला समोर येण्यासाठी आवाज दिला. काही क्षणात लग्न लागणार होतं त्यामुळे निर्जरा आतून पुरती घाबरली होती. 'आपली योजना आपल्याच अंगलट येते की काय?' या विचाराने तिच्या काळजात धस्स झालं.
इतक्यात भटजी म्हणाले,
"वराने वधूच्या गळ्यात पुष्पहार घालावा."
उतावळा महाबली हातात हार घेऊन निर्जराच्या पुढ्यात उभा राहिला आणि तो हार तिच्या गळ्यात घालण्यासाठी त्याने आपले हात तिच्या डोक्याच्या दिशेने नेले.
निर्जराने गच्च डोळे मिटून घेतले. 'आता सगळं संपलं,आपल्यापुढे मृत्यू स्वीकार केल्यावाचून दुसरा पर्याय नाही.'असा विचार करून ती महाबलीच्या कमरेची कट्यार घेऊन स्वतःच्या पोटात खुपसण्याच्या तयारीतच होती. इतक्यात बिजलीच्या वेगाने एक भाला आला आणि महाबलीच्या हातातील हार तोडून पुढे निघून गेला.
आणि अचानक सगळीकडून एकाच वेळी सैनिकांनी आक्रमण केल्यामुळे अवघा हलकल्लोळ माजला आणि निर्जराच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली.
या समोरासमोरच्या अंतिम लढाईत कोणाचा विजय होईल?
महाबली आणि मल्हार यांच्यात होणारा पहिलाच आणि अंतिम रणसंग्राम कोण जिंकणार?
पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"
क्रमशः
©® सारंग शहाजीराव चव्हाण
पुनाळ.कोल्हापूर.9975288835.
(वाचक मित्रहो, पुनर्जन्माची स्टोरी अंतिम टप्यात आलेली आहे. मल्हार आणि निर्जरा ही पात्र लवकरच आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहेत. पण सध्याच्या जन्मात तेच विरेन आणि तन्वीच्या रूपाने आपल्यासमोर असतीलच. आशा आहे इथून पुढील स्टोरीसुद्धा आपणास नक्कीच आवडेल. स्टोरी वाचून आपला बहुमोल अभिप्राय नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा. तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. आपलाच लेखक मित्र- सारंग चव्हाण.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा