जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-53

निर्जरा/मल्हारची प्रेमकथा

जिवलगा. गोष्ट पुनर्जन्माची. भाग- 53

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

भर उन्हाळा असल्यामुळे काही दिवसातच विराटनगरमधील पाणीसाठा संपला आणि प्रजा 'पाणी पाणी' करू लागली. पाण्याविना कितीतरी वृद्ध लोकांनी तसेच जनावरांनी आपला प्राण सोडला. काहींनी दुर्गधीयुक्त पाणी पिल्यामुळे जीव गमावला.

मल्हार आणि इंद्रसेन यांनी त्याच्यावर आक्रमण करण्याआधीच महाबलीने त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आक्रमण केलं होतं.

या आक्रमणावर त्यांच्याकडे तूर्तास तरी प्रत्युत्तर नव्हतं.

इतक्यात एक राजदूत महाबलीने पाठवलेला इशाऱ्याचा खलिता घेऊन इंद्रसेनजवळ आला.

तो खलिता वाचून इंद्रसेन 'इकडे आड, तिकडे विहीर.' अशा पेचात सापडला होता.

एकीकडे निर्जरा महाबलीच्या ताब्यात होती, तिला सुखरूप सोडवण्यासाठी युद्ध करणं गरजेचं होतं. तर दुसरीकडे पाण्याविना मरणाऱ्या प्रजेसाठी महाबलीला शरण जाण्यावाचुन पर्याय नव्हता.

'निर्जरा कि प्रजा?' दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावं लागणार होतं.

इंद्रसेन यांनी ताबडतोब मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि 'आलेल्या संकटावर कशी मात करावी?' यावर चर्चा करण्यात आली.

प्रत्येकाने आपापलं मत मांडलं.

शेवटी इंद्रसेन म्हणाला,

"सर्व मंत्रिमंडळाने आपापलं मत मांडलं आहे, तरीपण अंतिम निर्णय आमच्यावर सोपवला आहे. पण एक राजा म्हणून आम्ही हा निर्णय प्रजेवर सोपवत आहोत. प्रजेपेक्षा राजा मोठा नसतो. म्हणून त्यांनीच यातून आम्हाला मार्ग दाखवावा. प्रजेचा कौल आम्हांस मान्य असेल."

असं म्हणून त्याने आपसात ठरवून आपला निर्णय देण्याचं जनतेला आवाहन केलं.

**********************************************************

इकडे महाबलीच्या डोक्यात काहीतरी वेगळीच योजना आकार घेत होती. त्याने ताबडतोब आपल्या सगळ्या महत्वाच्या आणि विश्वासू माणसांना एकत्र बोलावलं होतं आणि तो त्यांना काही सूचना देत होता.

महाबली सिंहासनावर आरूढ होऊन म्हणाला,

"उपस्थित सर्व विश्वासू लोकांचं महाबलींच्या दरबारात स्वागत आहे. आता आम्ही थेट मुद्द्याला हात घालत आहोत. आपण सगळेजण जाणताच आहात कि, सिंधुमतीवर आता आमचा अधिकार आहे. त्याचबरोबर विराटनगरीसुद्धा आमच्या अधीपत्त्याखाली यावी हे तर आमचं बालवयात असल्यापासूनचं स्वप्न आहे. हे स्वप्नं साकार होण्याच्या आम्ही अगदी काठावर आहोत. तरीही आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाहीये. म्हणून आम्ही इथली सगळी संपत्ती, सोने नाणे, मुद्रा,हस्तींदंत, वाघाची कातडी तसेच चंदन लाकूड सगळंकाही तमिराईला सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या निर्णय घेतला आहे. हे सगळं तमिराईपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही आपल्या सर्वांना देत आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाला प्रत्येकी एका तुकडीचं नेतृत्व करायचं आहे. त्या तुकडीकडे वाहून नेण्यासाठी जी सामुग्री दिली असेल, तिची संपूर्ण जबाबदारी त्या तुकडीच्या प्रमुखाची म्हणजे तुमची असेल. आजच्या आज आणि आताच्या आता कामाला लागा. इंद्रसेन आणि मल्हार यांच्यापासून सावध राहावं लागेल. त्यांनी कोणतीही अडचण आणण्याआधी हा सगळा खजाना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायला हवा. चला लागा तयारीला. ताबडतोब निघा."

महाबलीने आदेश दिल्यानुसार सगळ्यांनी त्याची त्वरित अंमलबजावणी केली. हत्ती, गाढवं ,बैलगाडी तसेंच घोडागाडीमध्ये सगळी मौल्यवान संपत्ती लादून तमिराईच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

ही सगळी संपत्ती तमिराईला घेऊन जाण्यामागे महाबलीचा एक खूप मोठा हेतू होता. आजवर त्याने सिंधुमतीमधील हजारो हत्ती मारून त्यांचे हस्तींदंत काढून घेतले होते. तसेच कितीतरी वाघ मारून त्यांची कातडी काढून घेतली होती, तसेच सिंधुमतीच्या घनदाट अरण्यातील चंदनाची बेसुमार कत्तल करून शेकडो टन चंदन जमवलं होतं. त्याचबरोबर सगळ्या सिंधुमतीमधील सोनेनाणे बळकावले होते. ही सगळी संपत्ती तमिराईमधील एका विशिष्ट सुरक्षित जागी पोहचवून त्याला पुढील योजनेवर अंमल करायचा होता.

एक अशी योजना जी गरज पडल्यास शेवटचं शस्त्र म्हणून तो वापरणार होता. त्याच्या मनातलं प्रयोजन त्याच्याशिवाय कोणालाच कळत नव्हतं. त्याच्या मनातला कावा त्यालाच ठाऊक!

**********************************************************

इकडे इंद्रसेनने सगळ्या जनतेला केलेल्या आवाहनानुसार जनतेकडून एका वयस्कर व्यक्तीने आपलं हे मत मांडलं होतं कि,

'आमचा जीव गेला तरी बेहत्तर पण आपली अब्रू ओलीस ठेऊन त्याद्वारे कोणी आपणांस वेठीस धरत असेल तर आपण त्याच्यापुढे गुडघे अजिबात टेकायचे नाहीत. असंही आपल्यासमोर मरणच आहे, शरण जाऊन मरण्यापेक्षा आपण त्यांच्याशी युद्ध करून मरू."

प्रजेची राज्यनिष्ठा पाहून इंद्रसेनला गहिवरून आलं. थोडावेळ सर्वत्र भावपूर्ण वातावरण बनलं होतं. पण त्यातून स्वतःला सावरून इंद्रसेन म्हणाला,

"सगळ्या प्रजेची राज्याप्रती असणारी निष्ठा आणि प्रेम पाहून आम्ही धन्य झालो आहोत. तुमच्यातील ह्या लढाऊ वृत्तीमुळेच आपलं राज्य आजही अजिंक्य आहे. पण वेळ आणि परिस्थिती एकसारखी नसते. महाबलीसारख्या क्रूर आणि कपटी आक्रमकावर विजय प्राप्त करणं कठीण आहे, पण अशक्य नाही. राजकुमार मल्हारच्या रूपाने आपल्याकडे एक पराक्रमी योद्धा आहेत. त्यांना समोरासमोरील लढाईत आजवर कोणीच पराभूत करू शकलेलं नाही. पण महाबलीने कधीच समोरून आक्रमण केलेलं नाही. पाठीमागून वार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. म्हणून मी आपणांस कोणालाही गाफिल ठेवू इच्छित नाही,आपल्याला खूप मोठी तयारी करावी लागेल. तसेच आपला हल्ला एकदम तीव्र आणि तिखट असायला हवा. तरच आपला निभाव लागू शकेल."


 

इंद्रसेनच बोलून झाल्यावर मल्हार उठून उभा राहिला आणि उपस्थित सैन्याला उद्देशून म्हणाला,

"समस्त विराटनगरीच्या लढाऊ बाण्याला आणि जिद्दीला माझा सादर प्रणाम! ही लढाई खूप मोठी आहे. यात आपल्याला शक्तीसह युक्तीचा वापर तर करायला हवाच, पण त्याशिवाय आपल्याला वायुगतीने ही लढाई लढावी लागेल. कारण जेवढा जास्तवेळ लागेल तेवढी इथली जनता पाण्यावाचून तडफडणार आहे. एका तुकडीने शक्य तितक्या लवकर आपल्या नदीवर घातलेला बांध थोडा रिकामा करून आवश्यक तितकं पाणी नदीपात्रात सोडावं लागेल. इथेही आपल्याला सगळा बांध फुटणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर एक तुकडी राजकुमारी निर्जरादेवीना मुक्त करण्यासाठी जाईल. याचं नेतृत्व आम्ही स्वतः करू. बाकीचे सैन्य समोरासमोरील लढाई लढेल. महाबली नक्कीच राजकुमारी निर्जरांना ढाल करून आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. म्हणून 'आपण त्याला शरण येणार आहोत,' अशा आशयाचा खलिता पाठवून त्याला गाफिल करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याला आपल्या ताकतीवर आणि बुद्धीवर प्रचंड गर्व आहे, त्यामुळे त्याच्या याच गर्वाला आपण हवा देऊन आपलं ध्येय साध्य करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समोर येईल त्या शत्रूला कंठस्नान घालूनच पुढे जायचं आहे. कोणालाही दयामाया दाखवू नका. कारण ते सिंहासनाच्या म्हणजेच महाबलीच्या आदेशाला बांधील आहेत. जीवात जीव आहे तोपर्यंत ते आपल्यावर चालूनच येतील. त्यामुळे कोणतीही दयामाया नको. ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे, ही लढाई 'आर या पार' अशी आहे, यालढाई नंतर दोन्हीपैकी एकच पक्ष जिवंत राहिलं. आणि तो जिवंत राहणारा पक्ष आपला असावा. यासाठी प्रयत्न करायचे आहेत. 'मरा किंवा मारा' हाच पर्याय असणार आहे. आपली योजना आम्ही पून्हा एकदा सांगत आहोत, नीट लक्षपूर्वक सर्वांनी ऐकावी. ठरल्याप्रमाणे सुरवातीला काही सैनिक घेऊन इंद्रसेन स्वतः शरण जाण्यासाठी महाबलीकडे जातील, तोपर्यंत आम्ही म्हणजेच मल्हार एका तुकडीसह निर्जराला सोडवण्याचा प्रयत्न करतील,एक तुकडी नदीवरचा बांध योग्य प्रमाणात फोडून नदीमध्ये पाणी सोडतील, तर इंद्रसेन यांनी इशारत केल्यावर बाकीचे सैनिक घेऊन सेनापती स्वतः समोरासमोरील लढाईसाठी आक्रमण करतील.

आपापल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडाल तर विजय आपलाच आहे. चला विजयी भव! जय महाकाल,जय भद्रकाली."

इंद्रसेन आणि त्यांच्या सैनिकांनीही मल्हारच्या मताशी सहमती दाखवली.

त्यानंतर लगेच पुढील कार्यवाहीसाठी सगळे सज्ज झाले. सर्वप्रथम शरणागतीचा खोटा खलिता तयार करून राजदूतामार्फत जलदगतीने सिंधुमतीला पाठवण्यात आला.

***********************************************************

सदर राजदूत खलिता घेऊन महाबलीजवळ पोहोचला आणि त्याने तो खलिता महाबलीच्या समोर धरला.

पण गर्विष्ठ महाबलीने तो आपल्या हातात न घेता त्यालाच सर्वांसमोर वाचायला सांगितला.

राजदूत खलिता वाचू लागला,

"आम्ही विराटनगरचे युवराज इंद्रसेन! परमप्रतापी,बुद्धिमान आणि  महाशक्तिशाली महाराज महाबली यांना सादर प्रणाम करत आहोत. आम्ही आपल्याला शरण येण्यासाठी तयार आहोत. आपल्या विशाल बाहुबलापुढे आमचा निभाव लागणं अवघड असल्यामुळे आम्ही पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे. आम्हाला अभय देण्यात यावे. तसेच आमच्या जनतेला जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून आपण त्वरित अल्पशा पाण्याची तजवीज करावी, ही आपणांस विनंती करत आहोत. आपण आम्हाला शरण देण्यासाठी तयार असाल तर आमच्या राजदूताकडून आपला निर्णय कळवावा."

खलित्यामधील मजकूर ऐकून महाबलीच्या चेहऱ्यावर अहंकारी भाव दिसू लागले होते. तो मनातून सुखावून गेला होता. असं वरकर्मी तरी वाटतं होतं. इतक्यात तो जोरजोरात हसू लागला. राजदूताला वाटलं कि,'महाबली' आपल्या जाळ्यात बरोबर सापडला आहे.'

पण इतक्यात तो हसायचा थांबला आणि राजदूताकडे नजर रोखून बघू लागला.

त्याची ती करारी आणि भेदक नजर पाहून राजदूत आतून पुरता घाबरला. ही बिकट वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला,

"महाराज महाबली, आपला जो काही निर्णय असेल तो शीघ्र आमच्याकडे द्यावा ही विनंती. म्हणजे त्याप्रमाणे आम्ही युवराजांना वार्ता पोहोचवतो. प्रजा पाण्यावाचून जीव सोडत आहे महाराज, दया दाखवावी."

महाबलीने आपल्या लेखनिकाकडून एक खलिता तयार करून घेतला आणि त्या राजदूताच्या हातामध्ये दिला. राजदूताने वाऱ्याच्या वेगाने तो खलिता इंद्रसेनकडे पोहोचवला.

खलिता मिळताक्षणी सगळेजण आपापल्या नेमून दिलेल्या मोहिमेसाठी निघाले.

युवराज इंद्रसेन काही निवडक सैन्यासह छुपी शस्त्र घेऊन महाबलीकडे शरण जाण्यासाठी निघाला, तर मल्हार काही निवडक साथीदार घेऊन निर्जराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी निघाला. काही निवडक सैन्य नदीवर घातलेला बांध फोडून पाणी सोडण्यासाठी निघाले.

बाकी सेनेसह सेनापती इंद्रसेनच्या इशारतीची वाट पाहत सिंधुमतीच्या हद्दीच्या अलीकडे येऊन थांबले.

मल्हार आणि इंद्रसेनसह सगळ्यांना हेच वाटतं होते कि,

'महाबली त्यांच्या काव्यात फसला आहे आणि तो आपण शरण येतोय म्हणून गाफिल असणार आहे.'

पण महाबली हा धूर्त आणि पाताळयंत्री माणूस होता. त्याच्या डोक्यात भलताच विचार सुरु होता.

त्याने आपल्या हत्तीदलाच्या सहाय्याने एक भलामोठा विशालकाय आकाराचा गोलाकार दगड उंच टेकडीवर नेऊन ठेवला होता. तो दगड तिथंवर नेऊन ठेवण्यामागे महाबलीच काय प्रयोजन होतं हे खुद्द त्यालाच माहित होतं.


 

नक्की काय प्रयोजन असेल तो दगड तिथं ठेवण्यामागे?

या समोरासमोरच्या अंतिम लढाईत कोणाचा विजय होईल?

महाबली आणि मल्हार यांच्यात होणारा पहिलाच आणि अंतिम रणसंग्राम कोण जिंकणार?

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.

 (वाचक मित्रहो, पुनर्जन्माची स्टोरी अंतिम टप्यात आलेली आहे. मल्हार आणि निर्जरा ही पात्र लवकरच आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहेत. पण सध्याच्या जन्मात तेच विरेन आणि तन्वीच्या रूपाने आपल्यासमोर असतीलच. आशा आहे इथून पुढील स्टोरीसुद्धा आपणास नक्कीच आवडेल.  स्टोरी वाचून आपला बहुमोल अभिप्राय नक्की कळवा. लाईक करा आणि शेअर करा. तसेच माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा. आपलाच लेखक मित्र- सारंग चव्हाण.)

                                             

🎭 Series Post

View all