जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-52.
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)
महाबली आकाशाकडे बघत हात पसरून राक्षसासारखा हसत होता.
त्याने सैनिकांना आदेश दिला.
"याला उचलून जंगलात फेकून द्या. तिथं तडफडत मरूदे. जो आपल्या कुटुंबाचा नाही होऊ शकला, तो आमचा काय होणार? याला मेल्यानंतरही सिंधुमती राज्यात जागा मिळणार नाही अशी व्यवस्था करा. चला निघा."
असा आदेश देऊन तो निर्जराच्या कक्षाकडे गेला. तिथं जाऊन त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला आणि तो तिच्या जवळ जाऊन बसला. निर्जरा अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती. इतक्यात त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला पूर्ण शरीरभर हिडीस नजरेने न्याहाळू लागला.
तिचं ते अनुपम सौंदर्य डोळे भरून पाहताना त्याची नजर एखाद्या मदमस्त हत्तीसारखी भासत होती. तिच्या कुरळ्या रेशमी केसांमधून हात फिरवत तो त्या केसांचा सुवासिक सुगंध घेऊ लागला. त्या सुगंधाने त्याचं तनमन रोमांचित झालं आणि त्याच्या भावना उत्कट झाल्या. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने निर्जरावर झडप घातली. निर्जराला तिच्या शरीरावर त्याचा पडलेला भार जाणवला आणि ती तो भार दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती क्षीण झाली असल्यामुळे तिला ते शक्य होत नव्हतं. ती अजूनही त्या विषाच्या गुंगीतच होती. पण तिला महाबली आपल्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट कळत होती.
ती गुंगीतच ओरडण्याचा प्रयत्न करत होती. पण घशातून आवाजच फुटत नसल्याने तिचा तो केविलवाणा प्रयत्न फसत होता.
महाबली कामातूर होऊन पिसाटल्यासारखा भासू लागला, त्याने हैवानासारखे तिचे कपडे टराटरा फाडून टाकले. तिच्या उघड्या शरीराकडे बघून तो लाळ गाळत तिच्या एकदम जवळ जाऊ लागला. तसा त्याचा तो उग्र वास सहन न झाल्याने निर्जरा जीवाच्या आकांताने त्याच्यापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करू लागली.
ते पाहून महाबली सैतानासारखा विक्षिप्तपणे बडबडू लागला,
"हाहाहाहाहाहाहा! शेवटी जेव हवं होतं ते या महाबलीने मिळवलंच. विराटनगरची लाजलज्जा,अब्रू माझ्यासमोर नग्न होऊन पडली आहे. ती आता आमची आहे, फक्त आमची. आम्हीच तिचे स्वामी, आम्हीच तिचे सर्वेसर्वा. हाहाहाहाहाहाहा! या कळीला आता आम्ही कुस्करून तिच्यातील परागकणांचा आस्वाद चाखणार आहोत. कोण अडवणार आम्हाला? कोणाच्यात इतकं सामर्थ्य? सगळ्यांना संपवून टाकलं. आमच्याशिवाय आता उरलंय तरी कोण? हाहाहाहाहाहा,हिचं शीलहरण केल्यावर हिला वेठीस धरून आम्ही विराटनगरीवरही तमीराईचं निशाण फडकवू आणि आपल्या अपमानाचा बदला घेऊ."
असं म्हणून तो तिच्याजवळ जाऊ लागला, इतक्यात अचानक त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि तो तिच्यापासून झटक्यात दूर झाला.
तो मनातल्या मनात म्हणाला,
'महाबली, हे काय करताय तुम्ही? स्वतःच्या अपमानाचा बदला असा घेणार? शुरांचे शूर आपण आणि मेलेल्याची शिकार करणार? नाही!नाही! हे आपणास शोभत नाही महाबली. निर्जरा बेशुद्ध आणि असहाय्य असल्यावर तुम्ही त्यांना मिळवणार? नाही हे आपल्या तत्वात बसत नाही. आणि निर्जरा तर आपल्यासाठी विराटनगरच्या सत्तेची किल्ली आहेत. ह्या किल्लीचा योग्य वापर करायला हवा. आधी प्रेमाने सांगून बघू आणि जर ऐकलं नाही तरच त्यांना जबरदस्तीने मिळवू. पण तूर्तास हा मोह टाळणेच इष्ट."
महाबलीने बाहेर उभ्या असणाऱ्या दासीना आवाज दिला,
"कोण आहे रे तिकडे?"
दासी दरवाजा उघडून आतमध्ये आल्या आणि मान झुकवून उभ्या राहिल्या.
महाबली त्यांना म्हणाला,
"निर्जरादेवींची काळजी घ्या. त्यांना काय हवं नको ते पहा. त्यांना नवीन वस्त्रे आणून द्या आणि त्यांना अजिबात एकटं सोडू नका. यात कसूर होता कामा नये. समजलं?"
दासी म्हणाल्या,
"जी महाराज!"
दोन्ही दासी निर्जराच्या सेवेला लागल्या.
महाबलीने जाताजाता पून्हा एकदा निर्जराकडे वळून पाहिलं आणि तो गालात हसून आपल्या महालात आराम करण्यासाठी गेला.
पण तो जाऊन बिछान्यावर पडतो न पडतो तोपर्यंत गुप्तहेर बातमी घेऊन आला.
"महाराज, महाबली यांचा विजय असो."
महाबलीने हात वर करून त्याचा जयजयकार स्वीकार केला आणि तो म्हणाला,
"काय वार्ता घेऊन आलात गुप्तहेर?"
गुप्तहेर घाबरत घाबरत म्हणाला,
"महाराज, खूप वाईट वार्ता आहे."
महाबली उठून बसला आणि म्हणाला,
"काय वार्ता आहे? लवकर बोला."
गुप्तहेर नजर चोरत म्हणाला,
"महाराज, मल्हार जिवंत आहेत आणि ते विराटनगरच्या इंद्रसेन यांच्याशी युती करून लवकरच काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. कदाचित ते आपल्या प्रचंड फौजसह आपल्यावर आक्रमण करू शकतात."
ही बातमी ऐकून महाबली प्रचंड संतापला. त्याचे डोळे मोठे आणि लालभडक झाले. त्याने हाताच्या मुठी वळल्या आणि तो गुप्तहेराच्या दिशेने चालून आला.
गुप्तहेर भीतीने थरथर कापू लागला आणि म्हणाला,
"महाराज माफी महाराज! आम्हाला मारू नका. दया करा."
तसा महाबली अचानक विक्षिप्तपणे मोठ्याने हसू लागला.
"हाहाहाहाहाहाहा हीहीहीहीहीहाहाहाहाहाहाहा."
गुप्तहेराला काहीच कळेना. तो आ'वासून बघतच राहिला.
महाबली आपलं हसू अचानक थांबवून म्हणाला,
"विराटनगर आमच्यावर स्वारी करणार काय? आता त्यांना दाखवण्याची वेळ आली आहे, कि महाबलीची योजना त्यांच्यापेक्षा कितीतरीपटीने मोठी आहे."
गुप्तहेर म्हणाला,
"महाराज, आम्ही समजलो नाही. आपली योजना नक्की आहे तरी काय?"
महाबली हसत म्हणाला,
"विराटनगरला जाणारी एकमेव नदी या सिंधुमतीमधून जाते, त्या नदीचं पाणी अडवून ठेवण्याचं आपलं काम अंतिम टप्यात आलं आहे. आजच जास्त मजूर कामाला लावून विराटनगरचं सगळं पाणी अडवू. जे काही थोडं पाणी सद्या सोडलं आहे, त्यात जनावर मारून टाकली आहेत. ती कुजल्यामुळे ते पिण्यास योग्य राहणार नाही. पाण्याविना कसं जगणार विराटनगर? पाणी पाणी करून मरू लागतील. तेव्हा हेच विराटनगर आणि इंद्रसेन आम्हाला शरण येतील. शिवाय त्यांचा जीव म्हणजेच निर्जरा आमच्या मुठीत कैद आहेत. त्यांना मुठीतून मिठीत घेतलेलं इंद्रसेनना अजिबात चालणार नाही. त्यामुळे आमच्यावर चाल करून येण्याचा मूर्खपणा ते करणार नाहीत.
आमच्याकडून एक खलिता त्याना पोहोच करा. त्या खलित्यामध्ये आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी नमूद करून त्यांना इशारा द्या आणि आम्हाला शरण येण्यास सांगा. अन्यथा पाण्याविना प्रजा आणि अब्रूविना निर्जरा यांचा हकनाक बळी जाईल. चला त्वरित आदेशाची अंमलबजावणी करा."
गुप्तहेर त्याला वाकून नमस्कार करून आपल्या कामगिरीवर निघून गेला.
***************************************************
तत्पूर्वी इकडे मल्हार एकटाच महाबलीच्या तावडीतून निर्जरा आणि सिंधुमतीची सुटका करण्यासाठी निघाला असतानाच वाटेत त्यांना विराटनगरच्या गुप्तहेरांनी रोखलं. ते त्याला विनवण्या करून विराटनगरीमध्ये घेऊन गेले.
तिथं जाताच मल्हार आणि इंद्रसेन महाबलीच्या विरोधात आपली मोहीम आखू लागले. बलाढ्य आणि कपटी महाबलीला नामोहरम करण्यासाठी त्यांना मजबूत योजनेची आवश्यकता होती. त्यामुळे ते त्याची आखणी करत होते. पण महाबली त्यांच्या कल्पनेपेक्षाही धूर्त होता. त्याने विराटनगरला जाणाऱ्या नदीचे पाणी दगडमातीची मोठी भिंत घालून अडवले होते आणि नदी दुसरीकडे वळवली होती. शिवाय जे काही थोडंसं पाणी झिरपून जात होतं त्यामध्ये जंगली जनावर मारून टाकली होती. त्यामुळे ती जनावर कुजल्यामुळे ते पाणीही दुर्गंधीयुक्त झालं होतं.
भर उन्हाळा असल्यामुळे काही दिवसातच विराटनगरमधील पाणीसाठा संपला आणि प्रजा 'पाणी पाणी' करू लागली. पाण्याविना कितीतरी वृद्ध लोकांनी तसेच जनावरांनी आपला प्राण सोडला. काहींनी दुर्गधीयुक्त पाणी पिल्यामुळे जीव गमावला.
मल्हार आणि इंद्रसेन यांनी त्याच्यावर आक्रमण करण्याआधीच महाबलीने त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आक्रमण केलं होतं.
या आक्रमणावर त्यांच्याकडे तूर्तास तरी प्रत्युत्तर नव्हतं.
इतक्यात एक राजदूत महाबलीने पाठवलेला इशाऱ्याचा खलिता घेऊन इंद्रसेनजवळ आला.
तो खलिता वाचून इंद्रसेन 'इकडे आड, तिकडे विहीर.' अशा पेचात सापडला होता.
एकीकडे निर्जरा महाबलीच्या ताब्यात होती, तिला सुखरूप सोडवण्यासाठी युद्ध करणं गरजेचं होतं. तर दुसरीकडे पाण्याविना मरणाऱ्या प्रजेसाठी महाबलीला शरण जाण्यावाचुन पर्याय नव्हता.
'निर्जरा कि प्रजा?' दोन्हीपैकी एक काहीतरी निवडावं लागणार होतं.
हा पेच मल्हार आणि इंद्रसेन कसा सोडवतील?
त्यांचा निर्णय काय असेल?
पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"
क्रमशः
©® सारंग शहाजीराव चव्हाण
पुनाळ.कोल्हापूर.9975288835.
(नमस्कार वाचक मित्रहो, काही अपरिहार्य कारणामुळे कथेचा हा भाग खूप वेळाने पोस्ट करत आहे. त्याबद्दल मी आपली माफी मागत आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीनाकाही प्रॉब्लेम्स असतातच, पण त्यावर मात करून पुढे चालावं लागतं. भलेही काहीकाळ थांबावं लागलं तरी चालतं, पण पून्हा उठून चालत राहणं गरजेचं असतं. आजवर तुम्ही माझ्या बाळबोध लिखाणावर भरभरून प्रेम केलंत, तसंच इथून पुढेही कराल ही अपेक्षा आहे. आजचा भाग थोडा लहान आहे. पण पून्हा नव्याने सुरवात म्हणून मान्य करून घ्यावा ही विनंती. कथा आवडल्यास पेजवर लाईक आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा