Login

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-51.

Lovestory of Malhar & Nirjara.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची- भाग-51.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

इकडे आदिवासींनी मल्हारला आपल्या वस्तीवर आणलं आणि वस्तीच्या मधोमध असणाऱ्या एका लाकडी स्तंभाशी त्याला जखडून ठेवलं गेलं.

म्होरक्याने बोलायला सुरवात केली,तसं सगळेजण एकत्र जमले आणि लक्ष देऊन ऐकू लागले.

म्होरक्या म्हणाला,

"महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला यांचा कायमचा बंदोबस्त करायचा हाय.

पाप पुण्याचा विचार आपण करायचा नाय. आपण या गादीचे गुलाम आहोत. त्यामुळे येणारा आदेश मानणं हे आपलं काम हाय.आजवर आपल्याकडून कामात कधीच कसूर झाली नाय, तशी आतापण होता कामा नाय. आज दिवस बुडतानाच हे काम फत्ते झालं पायजे. उद्याचा सूर्य यांनी बघता कामा नाय. चला लागा तयारीला."

बेशुद्ध असणाऱ्या मल्हारला तिथं सोडून सगळेजण आपापल्या कामासाठी निघून गेले. पण एक व्यक्ती त्याच्याकडे निरखून पाहात होती. तिला मल्हारबद्दल आपुलकी वाटतं होती. 'त्याच्यावरील आरोप खोटे असावेत आणि तो निर्दोष असावा,' असं तिचं मन तिला सांगत होतं.

ती व्यक्ती म्हणजे,आदिवासी वस्तीवरची एक अनुभवी म्हातारी 'निल्लवा आजी.'

तिच्या अनुभवी नजरेने मल्हारचा खरेपणा हेरला होता.

ती स्वतःशीच पुटपुटली,

'हे देवा महादेवा, पोर सच्चा दिलाचं आन देवाच्या गुणाचं दिसतंया. तेच्यावर ही ईपरीत येळ का आणलीस? ही राक्षसं तेला हालहाल करूनशान मारतील. कायतर चमत्कार दाखीव देवा.तेला बिगीनं सुदीवं आन.'

असं पुटपुटत ती थरथरत्या पावलांनी चालत आपल्या झोपडीकडे निघाली.

बघता बघता रात्र झाली,सगळे जेवून खाऊन आपापल्या दारात बसले होते. विषाची मात्रा जास्त असल्याने मल्हार अजूनही बेशुद्धच होता.

इतक्यात आसमंतात विजा चमकू लागल्या,जोराचा वारा वाहू लागला आणि एकदम मुसळधार पाऊस कोसळू लागला.

अचानक आलेल्या वळीवाच्या पावसामुळे सगळ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली. प्रत्येकजण आपापल्या साहित्याची झाकाडाळ करून झोपडीच दार बंद करून आतमध्ये बसले.

पण इकडे मल्हार मात्र पावसात भिजत पडला होता. पावसाच्या पाण्यामुळे त्याला थोडीफार शुद्ध येऊ लागली होती.

सगळी आदिवासी वस्ती आता दार बंद करून झोपडीच्या आत सुरक्षित बसली होती. इतक्यात निल्लवा आजी डोक्यावर इरलं  आणि हातात कंदील घेऊन झोपडीच्या बाहेर पडली. बाहेर सोसाट्याचा वारा सुटला होता,कडाडणाऱ्या विजेमुळे उरात धडकी भरत होती, पायाखाली चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं, अशा भयाण वातावरणात निल्लवा आजी हळूहळू दबकत दबकत मल्हारला ज्या स्तंभाला बांधलं होतं तिथं आली. मग तिने कमरेला अडकवलेला विळा उपसला आणि मल्हारला बांधलेला दोरखंड तिने कापायला सुरवात केली. मल्हार हळूहळू शुद्धीवर येत होता. कोणीतरी आपली मदत करत आहे, हे पाहून तोही सुटण्याचा प्रयत्न करू लागला. पण विषाचा अंश अजूनही शरीरात असल्यामुळे तो अजूनही अशक्तच होता.

निल्लवा आजीने थोड्याच वेळात तो दोरखंड कापला आणि मल्हारला मुक्त केलं. त्यानंतर ती त्याला म्हणाली,

"पोरा, भिऊ नगो. म्या तुला माज्या झोपडीत घिऊन जाती. तिथ वाईच दवापाणी देती तुला. मंगशान तुला अंगात ताकद यील."

मल्हार धडपडत निल्लवा आजीच्या पाठोपाठ निघाला. झोपडीत जाताच आजीनं दार बंद केलं आणि चूल पेटवून त्यावर एक औषधी काढा उकळत ठेवला.

इतक्यात मल्हार थंडीने कुडकुडत होता, हे आजीने पाहिलं आणि ती म्हणाली,

"आरं ये पोरा, हिथं चुलीजवळ शेकत बस ये. म्हंजी तुला ऊब मिळलं आन तुझं कपडबी वाळत्याल."

मल्हारला थंडीने कापर भरलं होतं. तो तशाच अवस्थेत उठला आणि चुलीजवळ येऊन बसला.

त्यानं आजीला निरखून पाहिलं आणि म्हणाला,

"आजीबाई, तुम्ही कोण आहात? आणि आम्ही इथे कसे आलो? निर्जरा कुठे आहेत ? आम्हाला तिच्याकडे जायचं आहे. कुठं आहेत त्या? बोलवा त्यांना लवकर."

निल्लवा आजी त्याला समजावत म्हणाली,

"म्या निल्लवा आजी हाय. तुला आमच्या माणसानी धरून हिकडं आणला व्हता बग. आन ही निरजरा मला ठावं नाय बा. तुला एकल्यालाच हिकडं आणला हाय."

मल्हार लगबगीने उठत म्हणाला,

"आम्हाला निघायला हवं. निर्जरावर काहीतरी मोठं संकट आल्याचे आम्हाला संकेत मिळत आहेत."

 असं म्हणून उभं राहण्याचा प्रयत्न करत असताना भोवळ येऊन तो पुन्हा खाली बसला.

निल्लवा आजी त्याला म्हणाली,

"पोरा घाई करू नग. ह्यो काढा पी म्हंजी तुझ्या अंगातलं इख उतरंल आन तुझ्या अंगात पूण्यांदा बळ ईल."

मल्हारला निल्लवा आजीचं ऐकल्याशिवाय गत्यंतर नसल्याने त्याने तिच्या म्हणण्यानुसार तो काढा पिऊन टाकला आणि थोडावेळ तिथंच शांत बसून राहिला. 

थोडावेळ असाच गेल्यानंतर मल्हार उठून उभा राहिला आणि निल्लवा आजीला म्हणाला,

"आजी, आज आम्ही इथे जिवंत उभे आहोत ते फक्त तुमच्यामुळे! तुम्ही आमच्यावर विश्वास ठेऊन आम्हाला मुक्त केलंत. अन्यथा या लोकांनी आम्हाला बेशुद्ध अवस्थेतच मारून टाकलं असतं. तुमचे हे उपकार आम्ही कसे फेडू? हे तुम्ही सांगा!"

निल्लवा आजीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते पाणी पदराने टिपत ती म्हणाली,

"माजा पोरगा बी तुज्यागतच हुता, तेचा कायबी गुना न्हवता. तरिबी ह्या राक्षसानी तेला मारून टाकला. आंधळा न्याव हाय हेंचा. तुज्यात मला माजा पोरगाचं दिसला,म्हणूनशान म्या तुला सोडवायचं धाडस केलं बग पोरा. आता हितन बिगीन निगुन जा. आन एक गोष्ट धेनात घे, तुझा घोडा तुझ्यापाठन हिथंवर आला हुता. तेला या माणसांनी आपल्या घोड्यांच्यात बांधून ठिवलाय बग. तेला सोडीव आन जा तुज्या घराकडं."

मल्हार म्हणाला,

"आजी माझ्यावर आणखी एक उपकार कराल का?"

निल्लवा म्हणाली,

"काय र पोरा?"

मल्हार म्हणाला,

"आमच्या बंधूना इथं आणलं होतं ना? त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? म्हणजे त्यांचं पुढं काय झालं? ते जिवंत आहेत की त्यांचं काही……….."

मल्हारने पुढचं बोलणं टाळलं.

निल्लवा आजीने ते ओळखलं आणि ती म्हणाली,

"पोरा, हिथं आणलेल्या भाहीरच्या माणसाला जिता सोडत न्हाईत. मग तुज्या लोकांस्नी तरी कशी सोडतील? राजाच्या दरबारातन खलिता आला की त्याव डोळं झाकून ही माणसं ईश्वास ठेवत्यात, आन धरून आणलेल्याला मारून टाकट्यात. मागला पुढला ईचार करत न्हायती."

आपल्या बंधुचा घातपात झाल्याचं ऐकताच मल्हारच्या पायाखालची जमीन सरकली. क्षणभर त्याला काहीच सुचेनास झालं. 'या लोकांच्या वागण्याला मूर्खपणा म्हणावा की,त्याला कट्टर राजनिष्ठा म्हणावी',हे त्याला समजेना. पण याक्षणी त्याला महाबली आणि युद्धवीरच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटतं होतं. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. त्याने झुकून निल्लवा आजीचा आशीर्वाद घेतला आणि तो तिला म्हणाला,

"आजी, तूर्तास आम्हाला गेलं पाहिजे, पण तुमच्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी आम्ही नक्की परत येऊ. आता आम्ही निघतो."

निल्लवा आजीने त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाली,

"सांबाळून जा लेकरा."

मल्हार दबक्या पावलांनी घोड्यांच्या पागेत गेला आणि त्रिशूलला बाहेर घेऊन आला. 

 त्याने एकदा सभोवताली पाहून नक्की कोणत्या दिशेला जावं लागेल ते निश्चित केलं आणि तो घोड्यावर स्वार होऊन सिंधुमतीच्या दिशेने निघाला.

----------------------------------------------------------------

इकडे राजकुमार युद्धवीर निर्जराला घेऊन राजवाड्यात आला होता. 'आपण राजे होणार आणि आपलं लग्न निर्जराशी होणार', या नुसत्या कल्पनेनेचं त्याला आभाळ ठेंगणे झाले होते. तो भविष्याची स्वप्नं रंगवण्यात मश्गुल असतानाच महाबली तिथं आला आणि तो युद्धवीरला म्हणाला,

"राजकुमार युद्धवीर, आम्ही तुमच्या मार्गातील काटा ठरणाऱ्या मल्हारचा कायमचा बंदोबस्त करून आलो आहोत.आता तुमच्या राजा बनण्याच्या मार्गांत कोणताच अडसर उरला नाही, शिवाय आमच्या!"

युद्धवीर चपापला आणि म्हणाला,

"आपणांस काय म्हणायचे आहे?आम्ही समजलो नाही."

महाबली असुरी हसत म्हणाला,

"हाहाहाहाहाहाहा मूर्ख माणसा! तुझ्यासारखा मूर्ख आणि स्वार्थी माणूस मी आजवर पाहिला नाही."

महाबलीने सैनिकांना आदेश दिला,

"कैद करा रे याला!"

सैनिकांनी अलबत आदेशाची अंमलबजावणी केली.

युद्धवीरला कैद करताच तो मोठमोठ्याने ओरडू लागला.

 "विश्वासघातकी माणसा! मी तुझ्यावर दुसऱ्यांदा विश्वास ठेऊन मूर्खपणाच केला. पण आता मी तुला जिवंत सोडणार नाही."

युद्धवीर जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला सैनिकांनी घट्ट पकडून ठेवल्यामुळे त्याला सुटता येत नव्हतं.

पण महाबली जवळ येताच युद्धवीर त्याच्या तोंडावर थुंकला आणि म्हणाला,

"गद्दार."

 युद्धवीर तोंडावर थुंकल्यामुळे महाबली प्रचंड संतापला आणि त्याने क्रूरतेची हद्द पार करून युद्धवीरची जीभ कापली. त्याच्या तोंडातून रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या.

युद्धवीर तळमळत खाली पडला. महाबली त्याच्याकडे रागाने बघत म्हणाला,

"अरे विश्वासघातकी तर तू आहेस. आपल्या महाराजांचा, मोठ्या राणीसाहेबांचा, बंधूचा,संपूर्ण कुळाचा आणि सिंधुमतीचा विश्वासघात तू केलास युद्धवीर तू! आम्ही तर परकीय आक्रमक! साम,दाम,दंड,भेद वापरून राज्य आणि राज्यकन्या जिंकणं ही तर आमची परंपरा आहे. तुझ्या मदतीमुळे युवराज विश्वजीत, सुजित आणि मल्हार संपले, आता तूही संपशील. तुझं राज्य मी तुझ्याच मदतीने हस्तगत केलं. तेही कोणत्याही युद्धाशिवाय! आणि आता राजकुमारी निर्जरानाही आम्ही आमच्या राणी बनवू.

त्यांनी सरळ सरळ मान्य केलं तर ठिक! नाहीतर आम्ही त्यांच्या जबरदस्तीने आमची बनवू. मग नाईलाजाने का असेना त्याना आमच्याशीच विवाह करावा लागेल. हाहाहाहाहाहाहाहा."

महाबली मदमस्त हत्तीच्या अविर्भावात निर्जराच्या कक्षाच्या दिशेने निघाला. इतक्यात खाली लोळत पडलेल्या युद्धवीरने विचार केला की, 'निर्जरावर फक्त मल्हारचा अधिकार आहे, माझं मन सांगतंय की मल्हार जिवंत असेल. तो नक्की येईल. पण तोपर्यंत महाबलीला निर्जराकडे जाण्यापासून आपण रोखलं पाहिजे. आपण खूप मोठा गुन्हा केला आहे. त्याचं प्रायश्चित होऊ शकत नाही,पण आपल्या मल्हारच्या निर्जराचं रक्षण करून आपण थोडफार पाप नक्की कमी करू शकतो.'

असं म्हणून तो पूर्ण ताकदीनिशी महाबलीच्या अंगावर झेपावला आणि महाबलीचे पाय पकडून त्याला पुढे जाण्यापासून परावृत करू लागला. युद्धवीर आपल्याला अडसर ठरतोय,हे पाहून महाबलीने तलवारीला हात घातला.  पुढच्या क्षणात त्याने युद्धवीरच्या पोटात तलवार खुपसली आणि म्हणाला,

"तू माझ्या मार्गातला शेवटचा काटा!आता तुझाही खेळ खल्लास! आता सिंधुमती आणि निर्जरा आमची, लवकरच विराटनगरीही आमची होईल. हाहाहाहाहाहाहाहा!"

महाबली आकाशाकडे बघत हात पसरून राक्षसासारखा हसत होता.

त्याने सैनिकांना आदेश दिला.

"याला उचलून जंगलात फेकून द्या. तिथं तडफडत मरूदे. जो आपल्या कुटुंबाचा नाही होऊ शकला, तो आमचा काय होणार? याला मेल्यानंतरही सिंधुमती राज्यात जागा मिळणार नाही अशी व्यवस्था करा. चला निघा."

असा आदेश देऊन तो निर्जराच्या कक्षाकडे गेला. तिथं जाऊन त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला आणि तो तिच्या जवळ जाऊन बसला. निर्जरा अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती. इतक्यात त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला पूर्ण शरीरभर हिडीस नजरेने न्याहाळू लागला.


 

दिवस उजाडण्यापूर्वीच निर्जराच्या आयुष्यात कायमची काळरात्र येणार का?

महाबली नावाचा सर्प दंश करणार का?

मल्हार आणि निर्जराची भेट होईल की ते कायमचे दुरावतील?

महाबली नावाचा क्रूरकर्मा सगळ्यात मोठा शासक बनला तर काय होईल?


 

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की लाईक करा.आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)



 

🎭 Series Post

View all