जिवलगा- गोष्ट पुनर्जन्माची. भाग-50
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)
महाबली युद्धवीरला पटवून देत म्हणाला,
"तेव्हा परिस्थिती आपल्या हातात होती,पण आता निर्जरा आणि मल्हार आपल्या तावडीतून निसटले आहेत. ते ज्या घोड्यावरून पळाले आहेत त्या त्रिशूल घोड्याला गाठणं आपल्याला शक्य नाही आणि जर का निर्जराने सिंधुमती राज्य ओलांडून विराटनगरीत प्रवेश केला, तर आपल्या सगळ्या मनसुब्यावर पाणी पडणार आहे. त्यामुळे आता आपल्याला तुमच्या तुफानची मदत घ्यावी लागेल. त्याने आपल्याला साथ दिली तर आपण त्यांना पकडू शकतो. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने तुम्हाला संधी देण्याची वेळ आली आहे. आमच्यासाठी सिंधुमती आणि निर्जरापेक्षा विराटनगरीवर विजय मिळवणं जास्त महत्वाचं आहे. आता विचार करण्यात जास्त वेळ दवडू नका."
युद्धवीर प्रश्नार्थक भावमुद्रेने म्हणाला,
"यात आपल्याला तुफान काय मदत करू शकेल? आम्हाला समजलं नाही."
महाबलीने त्यांच्याजवळ जाऊन त्याच्या कानात आपली योजना सांगितली आणि ते ऐकल्यानंतर युद्धवीर आणि महाबली असुरी आनंदाने हसू लागले.
महाबलीने सांगितल्याप्रमाणे युद्धवीरने तुफानच्या सहाय्याने पुढील महत्वाचा फासा टाकला.
ते दोघेही आपापल्या घोड्यावर स्वार होऊन, निर्जरा आणि मल्हारचा पाठलाग करू लागले.
एव्हाना निर्जरा आणि मल्हार यांनी खूप मोठा पल्ला गाठला होता. त्यांना गाठणं महाबली आणि युद्धवीर यांच्यासाठी एक अशक्यप्राय आव्हान होतं,
पण तरीही ते दोघे निश्चिन्त होते. मल्हार आणि निर्जरा हे आपल्या तावडीत नक्कीच सापडतील याची त्यांना पूर्ण खात्री होती.
इकडे निर्जरा मल्हारला घेऊन वाऱ्याच्या वेगाने विराटनगरीच्या दिशेने चालली होती. त्रिशूल जसजसा पुढे जात होता, तसतसा धुळीचा लोट हवेमध्ये पसरत होता. बरेच अंतर कापल्यावर एक ओढा पाहून निर्जराने घोडा थांबवला आणि आपला कोणी पाठलाग करत आहेत का? याचा ती अंदाज घेऊ लागली.
आपल्या मागे दूरदूरपर्यंत कोणी नसल्याची खात्री झाल्यानंतर ती घोड्यावरून खाली उतरली आणि मग तिने मल्हारलाही खाली उतरवलं.
त्याला पाण्याची खूप गरज असल्यामुळेच तिने त्रिशूलला थांबवला होता.
ती मल्हारला आधार देत ओढ्याच्या पात्रात घेऊन गेली आणि तिने त्याला आपल्या ओंजळीने पाणी पाजले. नंतर आपणही थोडंसं पाणी पिऊन ती त्याला घेऊन वर आली. त्रिशूललाही थोडी विश्रांती आवश्यक आहे,असं वाटल्यामुळे त्यांनी थोडावेळ तिथच थांबायचं ठरवलं.
मल्हारच्या डोक्यातून येणारं रक्त आता थांबलं होतं आणि पाणी प्याल्यामुळे त्याला थोडी तरतरी आली होती. पण अंगात म्हणावी तितकी ताकद अजूनही आली नव्हती.
त्याला पाहून निर्जरा म्हणाली,
"राजकुमार मल्हार! आमच्यामुळे तुमची ही अशी अवस्था झाली आहे. याला सर्वस्वी आम्ही जबाबदार आहोत. शक्य असेल तर आम्हाला माफी द्या."
असं म्हणून तिने त्याच्यासमोर हात जोडले. ते पाहून मल्हारने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि तो म्हणाला,
"राजकुमारी निर्जरा! तुम्ही स्वतःला दोषी अजिबात मानू नका. मुळात तुमचा यामध्ये काहीही दोष नाही. तुम्ही आमच्या प्रेमाखातर सिंधुमतीमध्ये आला होता. तुम्हाला धोक्याने इथे बोलावलं आहे, याची तुम्हाला कल्पनाही नव्हती. मग अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सोडून कसं जाऊ शकत होतो? आमचं प्रेम आहे तुमच्यावर! त्या प्रेमासाठी आम्ही काहीही करू शकतो. तुम्हीच तर म्हणाला आहात की,'जगू तर सोबत आणि मरुही सोबत.' मग आता हे तुमचं आमचं कशाबद्दल? आणखी एक लक्षात घ्या की, ही सगळी परिस्थिती त्या क्रूर, कपटी महाबलीमुळे आणि आमच्या स्वार्थी मूर्ख बंधू युद्धवीर यांच्यामुळे उद्भवली आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला दोषी समजणं बंद करा."
मल्हारच्या डोळ्यात तिच्या विषयी असणार प्रेम पाहून निर्जराच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून मल्हारला गलबलून आलं. त्याने अलगद तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं. त्याच्या एकटक पाहण्याने निर्जरा लाजली. लाजून तिने पापणी खाली झुकवली. मल्हारने अलगद तिची हनुवटी वर उचलली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. लाजून तिने मल्हारला घट्ट मिठी मारली.
मल्हारने अलगद तिच्या नाजूक ओठांवर आपले ओठ टेकवले. तिची काया मोहरली. तिची मिठी अजूनच घट्ट झाली.
असं सगळं वातावरण अगदी गुलाबी झालं असतानाच अचानक त्रिशूल पुढील पाय हवेत उंचावून खिंकाळू लागला.
त्यामुळे निर्जरा आणि मल्हार दोघेही भानावर आले.
आजूबाजूला काहीतरी संकट आल्याची चाहूल त्रिशूलला लागली होती. त्यामुळे तो त्या दोघांना सावध करत होता. काही कळायच्या आतच वीस पंचवीस काळ्याकुट्ट आणि अंगावर चित्रविचित्र रेघोट्या रेखाटलेल्या आदिवासींनी त्यांना चोहोबाजूनी वेढलं होतं. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मल्हार आणि निर्जरा यांनी आपल्या तलवारीला हात घातला. पण डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर त्यांच्या तलवारीवर बाणांचा वर्षाव झाला आणि त्यांच्या तलवारी हातातून खाली पडल्या.
नक्की काय चाललंय? हे मल्हार आणि निर्जराच्या ध्यानात येत नव्हतं. 'ह्या आदिवासीनी आपल्याला वेढा का दिला आहे?' असा प्रश्न दोघांच्याही मनात निर्माण झाला होता.
इतक्यात त्यांनी दोरखंड टाकून त्या दोघांना जेरबंद केलं. मल्हारला भयंकर राग आला होता. तो रागाने लालबुंद होऊन म्हणाला,
"आम्हाला सोडा. का पकडून ठेवलंय आम्हाला? तुम्हाला माहित नाही का आम्ही कोण आहोत? आम्ही राजकुमार मल्हार आहोत. सोडा आम्हाला नाहीतर एकेकाला गय करणार नाही."
त्यांच्यातील म्होरक्या पूढे येत म्हणाला,
"यांना झाडाला बांधून घाला, तोपर्यंत महाराज येतीलच. मग यांचा निवाडा करण्यात येईल."
मल्हार प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला,
"महाराज? कोण महाराज?"
तो म्होरक्या म्हणाला,
"महाराज युद्धवीर. तुमचे सावत्र बंधू. त्यांनीच आम्हाला तुफान कबुतराकडून संदेश पाठवला होता. म्हणून तुमच्यासारखा नीच माणूस आमच्या तावडीत सापडला. नाहीतर तुम्ही तर होणाऱ्या राणीसाहेबांना घेऊन पळून जाण्यात यशस्वी झालाच होता. शिवाय आपल्या राज्याची गुप्त माहिती चोरून बाहेरच्या शत्रूना दिल्या असती. आमचं नशीब थोर म्हणून आम्ही तुम्हाला पकडू शकलो. आमच्या पदरातसुद्धा थोडं पुण्य पडलं. सिंधुमतीच्या कामी आलो. जगण्याचं सार्थक झालं."
हे सगळं ऐकून मल्हार अवाक झाला आणि म्हणाला,
"आपण समजता तसं अजिबात काही नाही. सत्यपरिस्थिती वेगळीच आहे. या राज्याचे शत्रू आम्ही नसून खरे शत्रू तर युद्धवीरच आहेत. महाबलीनी त्यांना संमोहित करून आपल्या बाजूला घेतलं आहे. महाराज गजराजसिंहानासुद्धा त्यांनी कैद केलं आहे. तुम्ही आम्हाला चुकीचं समजत आहात. कृपया आम्ही आपणास विनंती करतो की, आम्हाला जावू द्यावे."
म्होरक्या म्हणाला,
"खोटं! साफ खोटं बोलताय. आमच्यासाठी आमच्या राज्याचा खलिता म्हणजे राजआदेश! आम्ही तोच शिरसावंद्य मानत आलो आहोत आणि मानत राहू."
त्यांने बाकीच्यांना आदेश दिला,
"बांधा रे यांना. महाराज येतच असतील. कर्तव्यात कसूर नको."
ते सगळेजण मल्हारला बांधण्याचा प्रयत्न करू लागले, पण मल्हार चवताळला असल्याने त्याच्यापुढे कोणाचा निभाव लागत नव्हता. ही गोष्ट म्होरक्याच्या लक्षात आली आणि त्याने एकजणाला इशारा केला. काही क्षणात मल्हारच्या बरोबर मानेत काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि तो शुद्ध हरपून खाली पडला. निर्जरा त्याच्याकडे धावत आली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्यात तिच्याही मानेत काहीतरी घुसलं आणि तिही बेशुद्ध झाली.
म्होरक्याने इशारा केल्यावर एकजणाने छोट्या काट्यासारख्या आकाराचे विषारी बाण मारून त्या दोघांना बेशुद्ध केलं होतं.
थोड्याच वेळात तिथं महाबली आणि युद्धवीर आले.
त्यांनी मल्हार आणि निर्जराला पकडलेलं पाहून त्या म्होरक्याला आणि त्याच्या लोकांना शाबासकी दिली.
महाबली युद्धवीरला म्हणाला,
"युद्धवीर तुम्ही निर्जरांना घेऊन सिंधुमतीला परत जा.आम्ही आल्यावर तुमचा राज्याभिषेक आणि निर्जराशी विवाह शाही थाटात साजरा करू. आम्ही मल्हारचा हिशोब चुकता करून लगेच येतो."
महाबलीने आपला शब्द पाळल्याचा युद्धवीरला खूप आंनद झाला.
त्याने मागचा पुढचा विचार न करता बेशुद्ध निर्जराला आपल्या घोड्यावर घातलं आणि तो सिंधुमतीच्या दिशेने निघाला.
युद्धवीर तिथून गेल्यावर महाबली म्हणाला,
"यांना तुमच्या वस्तीवर घेऊन जा आणि यांच्या बंधुराजांचं जे केलं, तेच यांच्याबरोबरही करा. महाराज तुमच्यावर खूप खूष आहेत. लवकरच तुम्हाला दरबारात बोलावून तुमचा आदरसत्कार करण्यात येईल. फक्त कर्तव्यात कुचराई नको. चला निघा."
महाबलीने त्यांना आदेश देताच ते आदिवासी मल्हारला एका लांब बांबूला अडकून खांद्यावरून आपल्या घनदाट अरण्यात असणाऱ्या वस्तीवर घेऊन गेले.
आदिवासींना वस्तीवर पाठवून महाबली सिंधुमतीकडे परत निघाला.
तो मनोमन विचार करू लागला,
'मल्हारचा अडसर कायमचा दूर झाल्यात जमा आहे,आता फक्त युद्धवीरचा काटा काढला की आमचं स्वप्नं साकार झालंच म्हणून समजायचं. आम्हाला जे हवं ते आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळवतोच. ह्या महाबलीच्या मार्गात जो येईल त्याचा कायमचा नायनाट केल्याशिवाय हा महाबली स्वस्थ बसत नाही.लवकरच आम्ही चक्रवर्ती सम्राट बनणार आहोत.'
इकडे आदिवासींनी मल्हारला आपल्या वस्तीवर आणलं आणि वस्तीच्या मधोमध असणाऱ्या एका लाकडी स्तंभाशी त्याला जखडून ठेवलं गेलं.
म्होरक्याने बोलायला सुरवात केली,तसं सगळेजण एकत्र जमले आणि लक्ष देऊन ऐकू लागले.
म्होरक्या म्हणाला,
"महाराजांच्या आदेशानुसार आपल्याला यांचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे.
पाप पुण्याचा विचार करायचा नाही. आपण या गादीचे गुलाम आहोत. त्यामुळे येणारा आदेश मानणं हे आपलं काम आहे. आजवर आपल्याकडून कामात कधीच कसूर झाली नाही, तशी आतापण होता कामा नये. आज दिवस बुडतानाच हे काम फत्ते झालं पाहिजे. उद्याचा सूर्य यांनी बघता कामा नये. चला लागा तयारीला."
सगळेजण आपापली जबाबदारी पार पाडण्यासाठी निघून गेले.
येणारा काळ निर्जरासाठी आणि मल्हारसाठी भयानक असेल का?
काय होईल पुढे?
इथेच मल्हारचा शेवट होईल का?
निर्जराचं पुढे काय होणार? तिच्याबरोबर काही दुर्दैवी घटना तर घडणार नसेल?
युवराज विश्वजीत आणि सुजित यांचा घातपात झाला असेल का?
महाबलीचा मनसुभा पूर्ण होणार का?
पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"
क्रमशः
©® सारंग शहाजीराव चव्हाण
पुनाळ.कोल्हापूर.9975288835.
(माझी कथा आवडली तर नक्की लाईक करा.आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)
(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा