Dec 05, 2021
प्रेम

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-44.

Read Later
जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-44.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-44.

 

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

 

सिंधुमती राज्याच्या हद्दीतून आत जाणारा एक शाही रथ सैनिकांनी अडवला होता. त्यांना त्यांची ओळख विचारली तर त्यांच्याकडून उत्तरं आलं,

"आम्ही विराटनगरच्या राजकुमारी, निर्जरादेवी आहोत.आम्हांस सिंधुमतीनरेश महाराज गजराजसिंह यांनी निमंत्रण दिलं आहे. त्यांना कळवा आम्ही आलो आहोत. मग ते आम्हांस प्रवेश देण्याचे आपणांस आदेश देतील."

 

त्यातील एक सैनिक धावतच आतमध्ये गेला आणि त्याने महाबलीच्या कानावर ही वार्ता घातली. तसा त्याचा आंनद गगनात मावेनासा झाला आणि त्याने आपल्या गळ्यातील हार त्या सैनिकाला बक्षीस दिला. त्यांनतर त्याने त्या सैनिकांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो सैनिक धावत निर्जराच्या रथाकडे गेला आणि राजकुमारी निर्जराला म्हणाला,

"महाराजांनी आपल्या विश्रामाची व्यवस्था खास महालात करण्यास सांगितलं आहे.मी आपणांस तिकडे घेऊन जातो."

 

त्या सैनिकावर विश्वास ठेवून राजकुमारी निर्जराने आपल्याबरोबर आलेल्या सैनिकांना परत विराटनगरला परतण्यास सांगितलं आणि आपल्या सोबत असणाऱ्या दोन दासीना घेऊन त्या सिंधुमतीच्या त्या सैनिकापाठोपाठ खास महालाकडे निघाली.

तिला किंवा तिच्या सैनिकांना इथे सुरु असणाऱ्या प्रकाराचा मागमुसही लागला नाही.सैनिक माघारी परतले आणि इकडे राजकुमारी निर्जरा खास महालात जाऊन पोहोचली.तिला इथल्या परिस्थितीबद्दल अजिबात कळू नये म्हणून तिच्या महालाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला.

 

इकडे मल्हारला निर्जरा सिंधुमतीला आल्याची काडीमात्र माहिती नव्हती. किंवा ती इकडे येईल अशी शक्यताही त्याला वाटतं नव्हती.

 

तो आपल्या बंधूच्या काळजीने चिंताग्रस्त झाला होता.आज काहीतरी विपरीत घडण्याचे संकेत त्याला मिळत होते. त्यामुळे त्याचं मन इथे कशातच लागत नव्हतं.

तो तिथल्या तिथेच इकडून तिकडे फेऱ्या मारत होता.सगळ्यांना राजकुमार परत येण्याची उत्सुकता लागून राहिली होती. एव्हाना उन्हाचा तडाखा सुरु झाला होता,तरीही आपला पुढचा राजा कोण असणार? हे जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता होती. शिवाय महाबली त्यांना घरी जातेवेळी प्रत्येकास एक एक सुवर्णं मुद्रा देणार असल्याने त्या लालसेपोटीही बरेचजण थांबले होते.

 

इकडे युवराज विश्वजीत शिवमंदिराच्या पायथ्याशी पोहोचले होते.तिथून ते भुयारी मार्गाजवळ गेले आणि तेथील दगड हलवण्याचा प्रयत्न करू लागले.

परकीय आक्रमणात हे शिवमंदिर उध्वस्त केलं जाऊ नये म्हणून त्याला समोरून कोणताच मार्ग ठेवला नव्हता.जमिनीपासून सुमारे पंचवीस तीस फूट उंचीवर असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग बनवण्यात आला होता. त्याच्या तोंडाशी एक मोठा दगड ठेवला होता. तो दगड वजनाने खूप मोठा असल्याने सहजासहजी हलवला येत नव्हता. तरीही युवराज विश्वजीत यांच्या अंगी असणाऱ्या प्रचंड बळामुळे त्यांच्यासाठी ते अशक्य नव्हतं.बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांनी तो दगड हलवला आणि ते भुयारातून आत जाऊ लागले. इतक्यात पाठीमागून येणारा युद्धवीर तिथे येऊन पोहोचला. राजकुमार विश्वजीतनी खुल्या केलेल्या भुयारी मार्गातून तोही आतमध्ये शिरला.

 

दोघेही वायुगतीने आतमध्ये धावू लागले.धावता धावता युवराज विश्वजीत पाण्याने भिजलेल्या पायरीवरून पाय घसरून खाली कोसळले आणि पायरीवरून गडगडत खाली येऊन पडले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या युद्धवीरने ते पाहिलं पण त्याला त्यांना मदत करावीशी वाटली नाही.युवराज विश्वजीतकडे दुर्लक्ष करून त्यांच्या अंगावरून उडी मारून तो पुढे धावू लागला.आपला बंधूने आपल्याला हात देऊन उठवलं सुद्धा नाही हे पाहून युवराज विश्वजीत यांना वाईट वाटलं आणि त्याचा प्रचंड रागही आला. माणसाच्या मनात स्वार्थ आणि लालसा निर्माण झाली तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो,हे युद्धवीरकडे पाहून त्यांच्या लक्षात आलं.

ते त्वेषाने उठले आणि पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्याकडे धावू लागले. त्यांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली होती. आपली सर्व शक्ती पणाला लावून जखमांकडे दुर्लक्ष करून त्यांनी युद्धवीरला लिलया मागे टाकले आणि गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी आपल्या पायातील पादत्राणे बाहेर काढली आणि उंबरठ्याला नमस्कार करून आतमध्ये जाऊ लागले.आतमध्ये पाणी भरलेलं असल्यामुळे त्यांना सावधपणे पाऊलं टाकावी लागत होती. पाठोपाठ युद्धवीरही आपली पादत्राणे बाहेर काढून आतमध्ये आला. पण तोपर्यंत युवराज विश्वजीत त्रिशूलाजवळ पोहोचले होते आणि ते डोळे बंद करून शिवलिंगाला नमन करत होते. या संधीचा फायदा घेत युद्धवीर तिकडे झेपवणार इतक्यात त्यांनी ते त्रिशूल उपसलं आणि आपल्या हातामध्ये घेतलं. ते पाहून युद्धवीर चवताळला आणि तो युवराज विश्वजीतना म्हणाला,

"त्रिशूल तर तुम्ही आधी मिळवलत,पण इथून बाहेर नाही घेऊन जाऊ शकत. मी तुम्हाला जाऊ देणार नाही.सिंहासन आमचं आहे कारण आम्ही सर्वशक्तिमान आहोत. तुमच्यापेक्षा सरस आहोत, सक्षम आहोत.त्यामुळे विजय आमचाच आहे.हाहाहाहाहाहाहा."

तो राक्षसासारखा हसू लागला.

 

युवराज विश्वजीत म्हणाले,

"आज आम्हाला हे त्रिशूल घेऊन जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आतापर्यंत आम्ही तुम्हांस प्रतिस्पर्धी न मानता केवळ आपले बंधू म्हणून आपल्याशी प्रेमाने वागत होतो.याचा अर्थ हा नाही कि आम्ही दुबळे आहोत.आम्ही आजवर नाती जपण्यावर भर देतो आलो आहोत.पण आता आम्हाला समजले आहे कि तुमच्या मनात आमच्याबद्दल साधी सहानुभूतीपण शिल्लक नाही राहिली.बंधुभाव तर दूरची गोष्ट आहे.आम्हाला प्रश्न पडला आहे कि समोर आमचे लाडके बंधू असणारे,एकेकाळी आमच्यावर जीवापाड प्रेम असणारे, विश्वास असणारे राजकुमार युद्धवीर आहेत कि त्यांच्या रूपात कोणी बहुरूपी आमच्या समोर उभा ठाकला आहे?पण नक्कीच आता समोर आहेत ते आमचे बंधू नाहीत.आता समोर आहेत फक्त प्रतिस्पर्धी, स्वार्थाने, लालसेने बरबटलेले एक राजकुमार, एक सावत्र बंधू. त्यामुळे आता आम्ही दयामाया दाखवू अशा भ्रमात राहू नका.आम्हीही सज्ज आहोत. गाफिल राहू नका आणि आम्हांस दुबळे तर अजिबात समजू नका."

 

युद्धवीर म्हणाला,

"बस्स, पुरे झालं तुमचं प्रवचन. हे ऐकण्यात आम्हांस अजिबात रुची नाही. ते त्रिशूल आमच्या हवाली करा आणि इथून गुपचूप निघून जा. आम्ही तुम्हांस जीवदान देऊ,नाहीतर आम्ही मृत्यूचा तांडव करायलाही मागे हटणार नाही.तुम्हांला कल्पना नाही कि आम्ही काय करू शकतो. सिंहासनासाठी आणि आमच्या हक्कासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यामुळे ते त्रिशूल आमच्याकडे द्या."

 

असं म्हणत तो पुढे पुढे येऊ लागला. पण सावध असणाऱ्या विश्वजीतनी त्याचा कावा ओळखला आणि त्यांनी त्रिशूल घट्ट मुठीत पकडून लढाईचा पवित्रा घेतला.

 

युद्धवीर पुढे येण्याचा प्रयत्न करेल तसं विश्वजीत त्रिशूल गरगरा फिरवू लागले. त्यामुळे तो पुन्हा दोन पाऊलं मागे सरकत होता. बराचवेळ असाच प्रकार सुरु होता. पण इतक्यात युद्धवीरने एक युक्ती केली. त्याने खाली असलेलं पाणी ओंजळीने विश्वजीतच्या अंगावर आणि चेहऱ्यावर उडवायला सुरवात केली. त्यामुळे त्यांचं लक्ष थोडं विचलित झालं आणि हीच संधी साधून युद्धवीरने पुढे जाऊन त्रिशूल पकडलं आणि म्हणाला,

"त्रिशूल मुकाट्यानं माझ्या हवाली करा. नाहीतर याचे परिणाम खूप वाईट असतील."

 

दोघात बराचवेळ झटापट सुरु होती. त्यामुळे दोघेही पूर्णपणे भिजले होते.

झटापटीमुळे युद्धवीरची दमछाक झाली होती तरीही त्याने त्रिशूलचा हट्ट सोडला नव्हता. पण त्याची त्रिशूलवरची पकड सैल झाली होती. याचा फायदा घेत विश्वजीतनी एक जोराचा हिसडा देऊन त्याच्यापासून त्रिशूल सोडवून घेतलं आणि त्याला बाजूला ढकलून ते गाभाऱ्यातून बाहेर पडले. त्यांनतर 

ते जिन्यातून खाली उतरून जाणार इतक्यात मागे असणाऱ्या भुयारात कोणीतरी लपत असल्याचं त्यांना दिसलं. त्यांनी थोडं इकडे तिकडे पाहिलं तर त्यांना कोणीच सापडलं नाही, म्हणून ते मागे वळून जिन्यावरून उतरू लागले. इतक्यात त्यांच्याही मानेत काहीतरी घुसलं आणि ते बेशुद्ध होऊन जिन्यातून खाली गडगडत आले.

 

इतक्यात पाठीमागून धावतच आलेल्या युद्धवीरने त्यांच्या हातातलं त्रिशूल काढून घेतलं आणि तो भुयारी मार्गातून बाहेर पडला.

त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद दिसत होता. त्रिशूल मिळाल्यामुळे तो इतका उतावीळ झाला होता कि,त्याला कधी एकदा सिंधुमतीमध्ये पोहोचतो असं झालं होतं.

सिंधुमतीचा सम्राट म्हणून सिंहासनावर बसण्याचे त्याला वेध लागले होते.

त्यामुळे तो एकटाच राक्षसासारखा हसत ओरडत येत होता. बघता बघता तो जंगलातून बाहेर पडला. इथून पुढील मार्ग मोठा आणि प्रशस्त होता, त्यामुळे त्याने बिजलीच्या वेगाने घोडा फेकायला सुरवात केली. जणू एखादं तुफानच पुढे वाटेत जे येईल ते हवेत उडवत आपला मार्ग काढत जात होतं.

 

बघता बघता तो सिंधूमतीच्या हद्दीत दाखल झाला. त्याला त्रिशूल घेऊन येताना पाहून सगळी प्रजा जल्लोष करू लागली.

महाबली तर आनंदाच्या भरात नाचू लागला आणि मल्हारकडे बघत मिशांवर ताव मारू लागला.

ते दृश्य पाहून मल्हार खूपच काळजीत पडला. सिंधुमतीचं सिंहासन त्यांच्या हातून गेल्याच्या दुःखापेक्षा, सत्याची बाजू पराभूत झाल्यामुळे त्याला मोठा धक्का बसला.

त्याच्यासमोर येऊन महाबली आणि युद्धवीर जल्लोष करू लागले. पण त्याचं तिकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष आपल्या बंधुच्या वाटेकडे लागलं होतं.

ते पाठीमागून येत आहेत क का? हे तो पाहू लागला.पण बराचवेळ झाला तरी पाठीमागून कोणाच्या येण्याचा मागमूस त्याला लागत नव्हता.

 

मल्हारने आपल्या मनाशी एक निर्धार पक्का केला.

महाबली आणि युद्धवीर जल्लोष करण्यात गुंग झाले असताना त्यांना गुंगारा देऊन मल्हार प्रजेच्या गर्दीचा फायदा घेत मैदानाच्या तटबंदीजवळ पोहोचला. त्याने पाहिलं कि महाबलीचं त्याच्याकडे अजूनही लक्ष नव्हतं. संधीचा फायदा घेत त्याने तटबंदीवरून उडी टाकली आणि तो घोड्यांच्या पागेत दाखल झाला. तिथून त्याने आपला लाडका त्रिशूल घोडा मुक्त केला आणि त्यावर स्वार होऊन तो आपल्या बंधुच्या शोधात शिवमंदिराच्या दिशेने निघाला.त्रिशूल घोडा बिजलीच्या गतीने धावू लागला.

मल्हारला वाटतं होतं कि तो महाबलीला चकवा देऊन तिथून निसटला आहे. पण महाबलीनेच त्याला जाणीवपूर्वक पळून जाण्याची संधी दिली होती.

 

मल्हारला तिथून निसटून जाऊ देण्यामागे महाबलीचा काय हेतू असेल?

युवराज विश्वजीत आणि राजकुमार सुजित यांच्याबरोबर काय घडलं असेल?

राजकुमारी निर्जराला खास महालात कडक बंदोबस्तात ठेवण्यामागे महाबलीचा कोणता कावा असेल?

राजकुमार युद्धवीर पुढचा राजा असेल कि कोणी दुसराच राजा होईल?

 

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

 

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

 

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.) 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sarang Chavan

Business

स्वतःच्या शोधात मी.