जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-43.

Who will win the contest?

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची.भाग-43.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

सगळ्या प्रजेमध्ये उद्याच्या स्पर्धेची दवंडी देण्यात आली आणि सगळ्या प्रजेला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

सगळेजण उद्याच्या स्पर्धेबद्दल चर्चा करत होते.

युद्धवीर तर प्रचंड उत्सुक होता.

पण मल्हारच्या मनात एक शंका होती कि,

'त्याला या स्पर्धेत का सहभागी केलं गेलं नाही? फक्त महाबली आणि त्याच्यामध्ये होणार द्वंद्व कोणत्या प्रकारचं असेल? या सगळ्यामागे महाबलीचा कोणता मोठा डाव तर नसावा?'

याची उत्तरं येणारा काळचं देणारं होता.

युवराज विश्वजीत, सुजित आणि मल्हार यांना कैदखान्यात नेऊन ठेवण्यात आले.

राजकुमार मल्हार आपल्या बंधूना म्हणाला,

"आपल्याच राज्यातील,आपल्याच कैदखान्यात,आपल्यालाच कैद करून ठेवलं आहे. ही गोष्ट आम्हांस चैन पडू देत नाही."

यावर राजकुमार सुजित म्हणाला,

"बंधू आम्हांलासुद्धा ही गोष्ट खूप त्रास देत आहे पण आपला नाईलाज आहे."

युवराज विश्वजीत म्हणाले,

"बंधुनो उद्या सकाळी होणारी स्पर्धा जिंकून आपण पुन्हा सगळं हस्तगत करू. आपली बाजू सत्याची आहे आणि अंतिम विजय आपलाच असेल.पण वाईट या गोष्टीचं वाटतं कि आपण ज्यांना आपली माणसं मानत होतो. त्याचं लोकांनी आपल्याला दगा दिला."

राजकुमार मल्हार म्हणाला,

"जेष्ठ बंधू,राजकुमार महाबली किमान परके होते. पण आपले बंधू युद्धवीर तर आपल्या रक्ताच्या नात्यातले होते. त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला. आम्हांस तर असे वाटतं आहे कि विराटनगरला आपलं जाणं यामागेही युद्धवीर यांचा काहीतरी कावा असू शकतो. त्यांनीच मुद्दाम आपल्याला सिंधुमतीपासुन दूर केलं आणि पाठीमागे कपटी महाबलीनी आपला डाव साधला."

युवराज विश्वजीत म्हणाले,

"बंधू मल्हार, आम्हांस नाही वाटत कि राजकुमार इंद्रसेन असं काही कुटील राजकारण करतील. ते मनाने साफ आहेत. शिवाय ते महाबली आणि तमीराईचे कट्टर शत्रू आहेत. ते त्यांची साथ कधीच देणार नाहीत."

राजकुमार सुजित म्हणाला,

"आम्हालाही जेष्ठ बंधुचं म्हणणं पटत आहे. राजकुमार इंद्रसेन असं कृत्य करणार नाहीत. पण कुठेतरी काहीतरी गडबड नक्कीच आहे. आपण नेमके इकडे आल्यावरच आपल्या पश्चात महाबलीनी आक्रमण करून राज्याला वेढा दिला आणि महाराजांना वेठीस धरले."

यावर राजकुमार मल्हार म्हणाला,

"बंधू आम्हांस वेगळी शंका येत आहे. आम्हांस असं वाटतं कि आपल्याला विराटनगरला बोलावणं पूर्वनियोजितच असावं. पण ते इंद्रसेन यांना माहित नसावं. म्हणजे भगिनी सौदामिनी यांचा यामागे हात असू शकतो. त्यांनी इंद्रसेन यांना आपल्याला निमंत्रण देण्याचं सुचवलं असावं."

युवराज विश्वजीत म्हणाले,

"अगदी योग्य मुद्दा उपस्थित केलात बंधू मल्हार. हे असंच असावं याची आम्हांस खात्री आहे."


 

मल्हार दात ओठ खातं म्हणाला,

"बंधुनो उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपणांस विजय मिळवावाच लागणार आहे. आपण दोघे सिंहासनासाठीच्या स्पर्धेत विजयपताका नक्की फडकवाल याची आम्हांस पूर्ण खात्री आहे. आता राहिला प्रश्न महाबली बरोबरच्या द्वंद्व युद्धाचा, तर त्यात आम्ही त्यास धूळ चारू हे आमचं आपणांस वचन आहे."

हे ऐकताच सगळ्यांनी आपला एकेक हात पुढे करत एकमेकांचे हातावर हात ठेऊन एकीचे बळ दाखवले.

थोड्याच वेळात दोघे सैनिक जेवण घेऊन आले.एरव्ही पंचपक्वान खाणाऱ्या आणि चांदीच्या पात्रात जेवणाऱ्या राजकुमारांना आज एकदम साधं आणि साध्या पात्रात जेवायला वाढलं होतं.

सगळेजण सुरवातीला काहीसे नाराज झालेत पण युवराज विश्वजीत त्यांना म्हणाले,

"बंधुनो, अन्नावर नाराज होऊ नका. अन्न हे परब्रह्म आहे. शिवाय आज आपल्याला राजेशाही थाट सोडून एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. आपली गोरगरीब जनता जे खाते ते अन्न खाऊन त्याचा दर्जा आणि सुधारणा आपल्याला कळणार आहेत. तेव्हा ही एक संधी समजा आणि जेवायला सुरु करा."

सर्वांनी जेवून घेतलं आणि ते झोपण्याची तयारी करू लागले. आज त्यांच्याकडे झोपण्यासाठी मऊमऊ बिछाना नव्हता. तर पातळशी शतरंजी होती.

पण हा देखील एक नवा अनुभव म्हणून सगळ्यांनी धरणीला अंग टाकले. इतका दूरचा प्रवास केल्यामुळे त्यांना पडल्यापडल्या झोप लागली.बघता बघता रात्र सरली आणि अरुणोदय झाला. सगळी धरती सूर्यकिरणांनी उजळून गेली.

बघता बघता स्पर्धेची वेळ जवळ आली.

हळूहळू सगळी प्रजा स्पर्धा जिथून सुरु होणार तिथे एकत्र जमली. स्पर्धेविषयी सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता होती.स्पर्धा कोण जिंकणार आणि पुढचा राजा कोण असणार? याबाबत सगळेजण तर्क वितर्क लावण्यात व्यस्त होते.

राजकुमार महाबली राजकुटुंबाची बसण्याची जी जागा होती तिथे येऊन उभा राहिला आणि गोंधळ करणाऱ्या सगळ्या प्रजेला म्हणाला,

"शांत व्हा. सर्वांनी शांत व्हा."

त्याच्या आवाहनाकडे कोणीच लक्ष देत नाही, हे पाहून तो प्रचंड संतापला आणि त्याने सैनिकांना आदेश दिला,

"सैनिकांनो, जोपर्यंत सगळे शांत बसत नाहीत तोपर्यंत समोर दिसतील त्यांना चाबकाने फोडून काढा."

हा आदेश सिरसावंदय मानून सगळे सैनिक बेमालुमपणे समोर दिसेल त्याला चाबकाचे फटके देऊ लागले. थोडयाचं वेळात सगळीकडे स्मशानशांतता पसरली.

मग महाबली बोलू लागला,

"समस्त प्रजाजनहो, आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालात त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो.प्रसंगी आम्हांस आपल्याशी कठोर वर्तन करावं लागलं.पण आम्ही शिस्तप्रिय आहोत. त्यामुळे आम्हांस बेशिस्त वर्तन आवडतं नाही. तुम्हास आमच्यामुळे त्रास सहन करावा लागला म्हणून त्याबद्दल्यात आम्ही प्रत्येक व्यक्तीस एक सुवर्णंमुद्रा भेट म्हणून देणार आहोत.आता आनंद व्यक्त करा. पण आम्ही आपणांस काही सांगत असू तेव्हा तुम्ही शांतता राखायलाच हवी. नाहीतर यापेक्षाही भयानक शिक्षा तुम्हांस आम्ही देऊ. आमच्या म्हणण्याप्रमाणे वागाल तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. अशा अनेक सुवर्णंमुद्रा आम्ही तुम्हांस वेळोवेळी देऊ. हा महाबली उदार आहे,दयाळू आहे,कणवाळू आहे."

सगळी प्रजा आनंदून गेली आणि महाबलीच्या दातृत्वावर खूष झाली. पण महाबली त्यांना ते दान उदार मनाने देत नव्हता. त्यामागेसुद्धा त्याचा कुटील डाव होता.

आणि स्पर्धेसाठी सगळे स्पर्धक मैदानात दाखल झाले. ज्यात युवराज विश्वजीत, राजकुमार सुजित आणि राजकुमार युद्धवीर यांचा समावेश होता.

प्रत्येकाने आपल्या इष्ट देविदेवताना नमन केलं आणि ते आपापल्या घोड्यावर स्वार झाले.

त्यांनी आपआपल्या घोड्याची लगाम हाती घेतली आणि ते इशारतीची वाट पाहू लागले. आणि इशारत झाली, सलामी झडली, सर्वांनी घोड्यांची लगाम घट्ट पकडून टाच मारली,त्यासरशी मागच्या दोन पायावर उभा राहत घोडयांनी जणू आपल्यातील जोश आणि सामर्थ्याच प्रदर्शन केलं. त्यांनी वेग पकडला आणि पायाखालची माती विखरून त्यांच्या धुळीचे लोट हवेत पसरले. जणू वाराच वाऱ्याशी स्पर्धा करत आहे असं भासू लागलं. बघता बघता तिघेजण त्या मैदानाच्या कमानीतून बाहेर पडले आणि बघता बघता नजरेच्या टप्प्याबाहेर निघून गेले. आता इथून पुढचा त्यांचा प्रवास कोणालाच बघता येणार नव्हता. सगळ्या प्रजेत आता कोण सगळ्यात आधी त्रिशूल घेऊन कोण परत येणार? याची चर्चा रंगली होती.

इकडे राजकुमार मल्हार काळजीत पडला होता,त्याला आज काहीतरी विचित्र घटना घडणार असं वाटतं होतं.तर राजकुमार महाबली आज प्रचंड खूष दिसत होता.

त्याच्या मनात जणू आनंदाच्या उखळ्या फुटत होत्या.त्याचा मनसुबा पूर्ण होणार होता.

तिकडे ते तिघे वाऱ्याच्या वेगाने शिवमंदिराकडे घोडदौड करत होते.  सुरवातीला मोकळा आणि मोठा असणारा रस्ता हळूहळू अरुंद आणि अडचणीचा होतं गेला.त्याचबरोबर घनदाट जंगलातून पुढे जायचं असल्याने वाटेत आडव्या येणाऱ्या फ़ांद्या लक्षपूर्वक चुकवत पुढे जायला लागत होतं.

युद्धवीर अतिआत्मविश्वासात बेदारकापणे वेगाने पुढे चालला होता. इतक्यात एक फांदी अचानक त्याच्या मार्गात आडवी आली आणि त्याच्या छातीवर जोराचा प्रहार होऊन तो घोड्यावरून खाली कोसळला आणि वेदनेने कळवळू लागला.

तोपर्यंत पाठीमागून सावधपणे येणारे युवराज विश्वजीत आणि सुजित त्याच्याजवळ येऊन पोहोचले. तिथे युद्धवीरला खाली पडलेलं पाहून युवराज विश्वजीत घोड्यावरून खाली उतरू लागले. इतक्यात सुजित म्हणाला,

"बंधू विश्वजीत तुम्ही हे काय करत आहात? तुम्ही त्यांच्या मदतीला खाली उतरू नका. ते आपले प्रतिस्पर्धी आहेत. चला आपण पुढे जाऊ. आपल्यासाठी जिंकण गरजेचं आहे."

यावर युवराज विश्वजीत म्हणाले,

"बंधू सुजित, सर्वप्रथम ते आपले बंधू आहेत आणि मग आपले प्रतिस्पर्धी.आपल्या बंधूना असं अडचणीत टाकून जाणं हा बंधुभाव नव्हे. त्यांना मदत करणे हे आपलं परमकर्तव्य आहे.त्यांना इथं जखमी अवस्थेत टाकून आपण जिंकूनही काय जिंकणार? सत्ता,सिंहासन? नात्यापुढं त्याचं मोल ते काय बंधू?अशी लाख सिंहासन हरलो तरी काही वाटणार नाही, पण आपल्या मातापित्यांचे संस्कार हरता कामा नयेत.आपण त्यांची मदत केलीच पाहिजे."

दोघेही आपापल्या घोड्यावरून खाली उतरले.

सुजित युवराज विश्वजीतना म्हणाला,

"ठीक आहे बंधू. पण यांना मी बघतो,तुम्ही शिवमंदिरात जाऊन ते त्रिशूल घ्या आणि परतीच्या प्रवासाला लागा. म्हणजे इकडे यांना मदत करून आपले संस्कारही जिंकतील आणि स्पर्धा जिंकून तिकडे आपण सिंहासनही जिंकू."

युवराज विश्वजीत म्हणाले,

"आपण खूप छान सुवर्णंमध्य साधला आहे बंधू सुजित.आम्हांस तुमच्या बुद्धिमत्तेचा अभिमान वाटतो. तुम्ही यांना मदत करा आम्ही पुढे जातो."

सुजित त्यांना मिठी मारत म्हणाला,

"काळजी घ्या बंधू. आम्ही आणि आपले सिंहासन आपली वाट पाहत आहोत. लवकर परत या."

असे म्हणत दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

युवराज विश्वजीत पुढे निघून गेलेत हे पाहून युद्धवीर चवताळून उठला आणि त्याची विचारपूस करणाऱ्या सुजितला बाजूला ढकलत तो घोड्यावर बसण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याला दुखापत झाल्यामुळे ते त्याला सहजपणे जमत नव्हतं. ते पाहून सुजित पुन्हा त्यांच्या मदतीला आला असता त्याने त्याला पुन्हा बाजूला ढकलून दिलं आणि म्हणाला,

"अरे हट, आम्हांस कोणाच्या आधाराची गरज नाही. आम्ही समर्थ आहोत. शक्तिशाली आहोत.आम्हांस तुमच्या जेष्ठ बंधुप्रमाणे तुमच्यासारख्या कुबड्या घेऊन चालण्याची गरज नाही.या स्पर्धेत आम्हीच जिंकू. तेही स्वतःच्या हिंमतीवर."

असं म्हणून तो पूर्ण ताकतीनिशी घोड्यावर स्वार झाला आणि पुढे निघून गेला.

त्यानंतर सुजित घोड्यावर बसणार इतक्यात त्यांच्या मानेमध्ये काहीतरी घुसलं आणि काय झालं ते कळण्याच्या आत तो क्षणात बेशुद्ध पडला.

तोपर्यंत इकडे सिंधुमती राज्याच्या हद्दीतून आत जातारा एक शाही रथ सैनिकांनी अडवला होता. त्यांना त्यांची ओळख विचारली तर त्यांच्याकडून उत्तरं आलं,

"आम्ही विराटनगरच्या राजकुमारी, निर्जरादेवी आहोत.आम्हांस सिंधुमतीनरेश महाराज गजराजसिंह यांनी निमंत्रण दिलं आहे. त्यांना कळवा आम्ही आलो आहोत. मग ते आम्हांस प्रवेश देण्याचे आपणांस आदेश देतील."

त्यातील एक सैनिक धावतच आतमध्ये गेला आणि त्याने महाबलीच्या कानावर ही वार्ता घातली. तसा त्याचा आंनद गगनात मावेनासा झाला आणि त्याने आपल्या गळ्यातील हार त्या सैनिकाला बक्षीस दिला. त्यांनतर त्याने त्या सैनिकांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो सैनिक धावत निर्जराच्या रथाकडे गेला.


 

युवराज विश्वजीत आणि राजकुमार युद्धवीर यापैकी कोण आणेल ते विजयी त्रिशूल?

राजकुमार सुजितला बेशुद्ध कोणी केलं असावं? त्याच्याबरोबर पुढे काय होईल?

राजकुमारी निर्जरा अचानक सिंधुमतीला कशी काय पोहोचली? यामागे काही षडयंत्र तर नसावं?


 

पुढे नक्की काय घडेल हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)








 

🎭 Series Post

View all