जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-40.

Malhar fall in love with nirjara.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-40.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

सुकांतादेवी आता विचारात पडल्या होत्या. त्यांच्या मनात आता शंका आणि भीतीने घर केलं होतं.

ही गोष्ट धूर्त कपटी महाबलीने ओळखली होती आणि त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकले याच्या आनंदात तो मनातल्या मनात प्रचंड खूष झाला होता.

महाबली आणि यामिनीने सुकांतादेवींच्या मनात वाईट भरवल्यामुळे त्यांना आता सगळीकडे चुकीचंच घडताना दिसू लागलं. आपल्याला नेहमी डावललं जातं असं वाटू लागलं.मनात नेहमी शंका कुशंका येऊ लागल्या. त्यांच्या मस्तकात लागलेल्या सावत्रपणाच्या आगीत तेल ओतण्याचं काम ते दोघे करतच होते.

सुकांतादेवीना आपली बाजूने पटल्याची खात्री झाल्यावर महाबलीने यामिनीकरवी पुढचा फासा फेकला.

एकेदिवशी यामिनी सुकांतादेवीना म्हणाली,

"आईसाहेब, तुम्ही महाराजांना बंधू युद्धवीर बद्दल काही बोलला आहात कि नाही?"

सुकांतादेवी म्हणाल्या,

"कशाबाबत बोलत आहात तुम्ही यामिनी?"

यावर यामिनी हैराण झाली आणि कपाळावर आठ्ठया आणत म्हणाली,

"आईसाहेब, तुम्ही असं काय करताय? राजकुमार युद्धवीर यांना अर्धे राज्य द्यावे, ही मागणी तुम्ही महाराजांकडे करायला हवी.युवराज विश्वजीत यांना राजा घोषित करण्याआधीच हे करावं लागेल. एकदा वेळ निघून गेली तर मग आपल्या हाती काहीच उरणार नाही. तेव्हा त्वरा करा आणि महाराजांकडे आपली मनोकामना बोलून दाखवा."

सुरवातीला नाही,हो करणाऱ्या सुकांतादेवी शेवटी यामिनीच्या बोलण्याला बळी पडल्या आणि त्यांनी 'महाराजांना लवकरच याबाबत भेटू'अशी ग्वाही यामिनीला दिली.

आपण टाकलेला आणखी एक फासा बरोबर पडला म्हणून यामिनी मनोमन खूष झाली.

पण आता पुढचा आणि महत्वाचा फासा टाकणं गरजेचं होतं, तो म्हणजे राजकुमार युद्धवीर याच्या मनात सत्तेविषयी लालसा निर्माण करणं.

हे काम लवकर आणि अत्यंत हुशारीने पार पाडणं गरजेचं होतं. कारण राजकुमार युद्धवीर आपल्या बाजूला आलेत तर आपलं काम झाल्यात जमा होतं,याची जाणीव महाबलीला होती.

म्हणून त्याने ही जबाबदारी स्वतःकडे घेतली.

एकेदिवशी सगळे राजकुमार आणि राजकुमारी राजवाड्याशेजारील वनात भटकंती करत होते. तेव्हा तिथे महाबली हजर झाला आणि त्याने पाहिलं कि राजकुमारांच्याबरोबर सेवेसाठी असणारे सेवक युवराज विश्वजीत यांच्या दिमतीसाठी मागेपूढे तैनात होते. पण इतर राजकुमारांकडे त्यांच विशेष ध्यान नव्हतं. हीच संधी साधून महाबलीने राजकुमार युद्धवीर यांना आपल्याकडे बोलावून घेतले.

आणि त्याने पुढचा फासा फेकला.

राजकुमार युद्धवीर महाबलीजवळ आला आणि म्हणाला,

"आपण मला बोलावलत राजकुमार महाबली? काही विशेष कारण?"

महाबली म्हणाला,

"हो, विशेष गोष्ट लक्षात आली म्हणून आम्हाला राहवलं नाही."

युद्धवीर म्हणाला,

"कोणती विशेष गोष्ट."

महाबली म्हणाला,

"तिकडे पहा राजकुमार युद्धवीर.युवराज विश्वजीत यांच्या मागेपुढे सेवकांची रांग लागली आहे.पण तुमच्यासाठी कोण आहे? तुम्ही एकटेदुकटे फिरता."

युद्धवीर प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाला,

"तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे राजकुमार महाबली?"

यावर महाबलीने खोटे अश्रू वाहवून राजकुमार युद्धवीरला आपण रचलेली खोटी कथा सांगितली आणि महाराणी सुकांतादेवी यांच्याशी झालेली चर्चाही सांगितली.तसेच याबाबत कोठेही चर्चा न करण्याविषयीं विनंती केली.

राजकुमार युद्धवीरला पहिल्यांदा महाबलीचं बोलणं पटलं नव्हतं, पण म्हणतात ना स्वार्थ सगळ्यांना बदलून टाकतो. अगदी तसंच झालं. सत्ता आणि सिंहासनाच्या हव्यासापोटी राजकुमार युद्धवीर महाबलीच्या म्हणण्यानुसार वागू लागला.

याआधी युवराज विश्वजीतशी प्रेमाने आणि आदराने वागणारा राजकुमार युद्धवीर आता त्यांचा द्वेष करू लागला.त्याच्याशी स्पर्धा करू लागला.पूर्वी कधीतरी सेवक हजर नसला तर तो स्वतः युवराज विश्वजीतची सेवा करायचा.पण हल्ली तो त्याच्याशी नीट बोलत पण नव्हता. त्याच्या वागण्यातील बदल सर्वांनाच खटकत होता.

पण थोड्या दिवसांनी तो पूर्ववत होईल अशी आशा बाळगून सर्वांनी तिकडे दुर्लक्ष केलं.

एकीकडे राजकुमार महाबली आपले कुटील डावपेच टाकण्यात व्यस्त होता तर दुसरीकडे युवराज इंद्रसेन हे सिंधुमती राज्याबरोबर अत्यंत सलोखा आणि जिव्हाळा जपत होते.

असेच एकदा त्यांनी सर्व राजकुमारांना विराटनगराकडून पाहुणचारासाठी निमंत्रण दिलं होतं.

त्यांच्या निमंत्रणाचा मान राखून सर्व राजकुमार तिकडे गेले होते.

तिथे पाहुणचार स्वीकारण्यासाठी गेलेल्या राजकुमार मल्हार म्हणजे या जन्मीच्या विरेनची भेट युवराज इंद्रसेन यांची बहीण राजकुमारी निर्जरादेवीशी म्हणजेच या जन्मीच्या तन्वीशी झाली.

दोघेही पाहताक्षणी एकमेकांच्या प्रेमात पडली,

राजकुमारी निर्जरादेवी दिसायला अंत्यत सुंदर आणि आकर्षक होती.

गोरा वर्ण, चाफेकळी नाक,कोरीव भुवया, मृगनयनी डोळे,गोबऱ्या गालावर मादक दिसणारी खळी, गुलाबाच्या पाकळीसम नाजूक गुलाबी ओठ,लांबसडक काळेभोर केस,कमनीय बांधा आणि साखरपेरणी करणारा गोड मधाळ आवाज.तिला पाहून कोणीही तिच्या प्रेमात न पडेल तर आश्चर्य.

तसाच राजकुमार मल्हारही काही कमी देखणा नव्हता.

सुमारे सहा फूट उंच,गव्हाळ रंग, भरदार शरीरयष्टी, पिळदार मजबूत बाहू, तव्यासारखी रुंद भरीव छाती,ओठांवर रूळणाऱ्या पिळदार मिशा, कुरळे केस,बदामी डोळे,करारी नजर,डौलदार चाल.प्रत्येक तरुणीला भुरळ पडेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं.

एकेदिवशी पहाटे राजकुमार मल्हार राजवाड्याशेजारील बागेत व्यायाम करत असतानाच,तिथेच असणाऱ्या कालिमातेच्या मंदिरात निर्जरा दर्शनाला गेली होती.एकीकडे तो तेजस्वी रवी डोंगराआडून वर डोकावून पाहत आपल्या सोनेरी किरणांनी समस्त धरा उजळून टाकण्याच्या तयारीत होता, रानपाखरं आपल्या घरट्यामधून किलबिलाट करत होती.कास्तकार कुणबी आपली बैलजोडी घेऊन शिवाराकडे जाण्याच्या गडबडीत होता.त्याच्या बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज वातावरणात प्रसन्नता आणत होता.गाईम्हैशीच दूध विकण्यासाठी बाजाराकडे येणाऱ्या गवळणी गीत गात बिगीबिगी चालत होत्या.लोहाराने आपला भात्या तापवून त्यावर वेगवेगळी औजार तो भाजून काढत होता, सुतार आपल्या कौशल्याने बनवलेली लाकडी खेळणी विकण्यासाठी बांबूच्या बुट्टीत घालून बाजाराकडे निघाला होता.मंदीरातला पुजारी देवीला अभिषेक घालण्यात गुंग होता.एकंदरीत सगळं वातावरण प्रसन्न आणि प्रफुल्लित होतं.

अशातच बागेमध्ये देवीसाठी फुले तोडत असताना निर्जराची नजर राजकुमार मल्हारवर पडली आणि ती भान हरपून त्याच्याकडे बघतच राहिली. जणू एखाद्या शिल्पकाराने घडवलेल्या एखाद्या मूर्तीसारखी आखीवरेखीव त्याची तब्येत होती.सूर्याच्या सोनेरी किरणामुळे घाम आलेल्या मल्हारचा देह सोन्याचा मुलामा दिल्यासारखा तेजस्वी दिसत होता.

राजकुमारी त्याच्याकडे टक लावून पाहत होती तो मात्र आपल्या व्यायामात दंग होता.

इतक्यात मंदिरात जोरात घंटानाद झाला आणि राजकुमारी एकदम दचकली. त्यामुळे तिच्या हातातील फुलांची थाळी खाली पडली आणि त्याच्या आवाजामुळे राजकुमार मल्हारचं लक्ष राजकुमारी निर्जराकडे गेलं.

त्याने लगबगीने घाम पुसून आपला सदरा अंगावर चढवला आणि तो निर्जराच्या जवळ गेला.

त्याला पाहून  निर्जरा लाजून चुर्रर्र झाली आणि आपल्याच पदराशी बोटांनी खेळू लागली.

मल्हार तिला म्हणाला,

"आज एवढ्या लवकर तुम्ही इथे काय करत आहात?तुम्हांस आम्हांला पाहायचं होतं तर आम्ही स्वतः तुमच्याकडे आलो असतो.आपण का कष्ट घेतले?"

आणि तो हसू लागला.

मल्हारच्या अशा बोलण्यामुळे निर्जरा थोडी चिडली होती,पण तरीही संयम राखत ती म्हणाली,

"आम्ही तुम्हांस पाहायला नाही आलो आहोत, देवीच्या पूजेसाठी स्वतःच्या हाताने फुले वेचून घेण्यासाठी आलो होतो. तेव्हा तुम्ही येथे दिसला. तुम्ही येथे असाल याची आम्हांस अजिबात कल्पना नव्हती.तसेच आम्हांस तुम्हाला बघायची काही हौस नाही बरं का."

मल्हार तिला प्रतिप्रश्न करत म्हणाला,

"अच्छा! मग आमच्याकडे एकटक कोण पहात होतं,राजकुमारी निर्जरादेवी?"

यावर निर्जरा म्हणाली,

"सहजच समोर कोणी दिसलं तर डोळे मिटून घ्यावे का आम्ही?"

मल्हार तिला छेडण्याच्या हेतूने म्हणाला,

"अच्छा!सहज सहज गेले चार पाच दिवस तुम्ही सारख्याच आम्हाला पहात आहात. हा योगायोग म्हणावा कि आणखी काही?"

निर्जरादेवी लाजून चुर्रर्र झाली आणि म्हणाली,

"आमच्याकडे तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही."

मल्हार तिची हनुवटी हाताने वर करत म्हणाला,

"तुम्ही आम्हांस शब्दांनी उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही,तुमचे उत्तर तुमच्या डोळ्यामध्ये लपलं आहे.जरा डोळ्यातलं उत्तर वाचू तरी द्या आम्हाला."

असं म्हणत त्याने तिला नजरेला नजर देण्यास भाग पाडले,

तिनेही हळुवारपणे नजर वर करत त्याच्या डोळ्यात डोळे घातले.

क्षणात दोघांच्याही मनाला एक विशिष्ट लहर धडकून गेली. दर्याची लाट जशी किनाऱ्याला धडकून परत जावी आणि पुन्हा त्या लाटेनेही किनाऱ्याकडेचं झेप घ्यावी तशीच अवस्था दोघांच्याही मनाची झाली होती.दोघेही एकमेकांत एवढे गुंग झाले कि आजूबाजूच्या परिस्थितीच भान त्यांना उरलं नव्हतं.

इतक्यात पुन्हा मंदिरात घंटानाद झाला आणि दोघेही भानावर आले.

तशी निर्जराने आपली नजर चोरली आणि ती तिथून निघून जाऊ लागली, पण इतक्यात राजकुमार मल्हार तिला म्हणाला,

"राजकुमारी थोडं थांबा. आज आम्ही परत सिंधुमतीसाठी रवाना होतं आहोत. पुन्हा आपली कधी भेट होईल आम्हांस माहित नाही. पण मला आपणांस काही महत्वाचं सांगायचं होतं."

मल्हार आपल्याला सोडून परत सिंधुमतीला जाणार आहे हे समजताच ती दुःखी झाली आणि उदासपणे म्हणाली,

"हो बोला राजकुमार, काय सांगायचं आहे?"

मल्हार म्हणाला,

"राजकुमारी, आम्हास तुम्ही मनापासून आवडता. जेव्हापासून आम्ही तुम्हाला भेटलो आहोत तेव्हापासून आमचं मन तुमच्यात गुंतलं आहे. जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी सगळीकडे तुमचाच भास होतं आहे. आम्हास आपणाशी प्रेम झाले आहे राजकुमारी निर्जरा.आम्हांस उर्वरित आयुष्याचा प्रवास तुमच्याबरोबर करण्यास आवडेल.आम्ही रीतसर आपल्याशी विवाह करू इच्छितो.आपलंही आमच्यावर प्रेम असेल तर आम्हांस सांगावं."

यावर राजकुमारी निर्जरादेवी म्हणाली,

"आम्ही तुमच्या येण्याची वाट पाहू राजकुमार मल्हार.पण विरहाचा काळ कमीतकमी असावा.आम्हांस जास्तकाळ वाट पाहायला लावू नका."

असं म्हणून ती लाजून मंदिराकडे धावत सुटली.

राजकुमार मल्हार मनोमन खूप खूष झाला होता. एकटाच गालातल्या गालात हसत हळूहळू राजवाड्याच्या दिशेने निघाला.

इकडे बाकीचे राजकुमार सिंधुमतीला परत जाण्यासाठी आवाराआवर करण्यात व्यस्त होते.

या चार पाच दिवसातील विराटनगरमधील पाहुणचारामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद होता.

पण इकडे सिंधूमतीवर महाबली नावाच्या अजगराने विळखा घट्ट केला होता, याची कोणाला पुसटशीही कल्पना नव्हती.


 

राजकुमारांच्या पश्चात महाबलीने कोणतं कारस्थान केलं असेल?

राजकुमार  महाबळीच्या जाळ्यात सापडतील का?

या षडयंत्रात सिंधूमती साम्राज्याचा अस्त होईल का?

मल्हार आणि निर्जराच्या नुकत्याच फुलू पाहणाऱ्या प्रेमाकहाणीचं काय होईल?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा, "जिवलगा"


 

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)





 

🎭 Series Post

View all