जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-37.

Lovestory

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-37.

{सर्वप्रथम मी वाचकांची माफी मागतो, कारण खूप दिवसांनी हा भाग पोस्ट करत आहे.किरकोळ अपघातात माझ्या हाताला थोडी दुखापत झाल्यामुळे मी लिहू शकत नव्हतो. तरी त्याबद्दल मी दिलगीर आहे.}

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

"हो,ती खूप मोठी गोष्ट आहे.आता आपण सगळे जिथं उभे आहोत त्याकाळी ह्या संपूर्ण प्रदेशावर क्षत्रिय राजा गजराजसिंह हे राज्य करत होते. हे राज्य सिंधुमती नावाने ओळखलं जात होतं.

त्यांच्या राज्यात प्रजा खूप सुख,समाधान आणि एकोप्याने राहत होती.सगळेजण बंधुभाव जपत होते.राजा गजराजसिंह यांच्या एकूण दोन राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुमतीदेवी तर दुसरीचं नाव होत सुकांतादेवी.

दोन्हीही राण्या राजांना प्रिय होत्या.

सुमतीदेवींच्या पोटी चार मुलं होती. त्यापैकी विश्वजीत, सुजित आणि मल्हार हे तिघे राजपुत्र तर सुचित्रा ही राजकुमारी होती.

तसेच सुकांतादेवी यांना पाच मुलं होती. ज्यापैकी युद्धवीर हा एकमेव राजपुत्र तर यामिनी,सौदामिनी,राजनंदिनी,कुमोदिनी या चार राजकन्या होत्या.

सगळे भाऊबंद मिळूनमिसळून आनंदाने एकत्र खेळत बागडत होते.सखे सावत्र अशा कोणत्याही भेदभावाचा त्यांच्यात अजिबात लवलेशही नव्हता.

पण जसं साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या तेजोमय सूर्यालाही कधीनाकधी ग्रहण लागतंच. अगदी तसंच ग्रहण या राजघराण्याला लागलं.

त्या ग्रहणाचं नाव होतं महाबली………..


 

एकेदिवशी महाराज गजराजसिंह आपल्या महालात  विश्राम करत असताना तिकडे राणी सुमतीदेवी येऊ लागल्या.

त्यांना तिकडे येताना पाहून महालाच्या द्वारपालाने आरोळी दिली,

"थोरल्या महाराणीसाहेब येत आहेत हो………"

ही आरोळी ऐकून महाराज थोडे सावरून बसले आणि सुमतीदेवींच्या येण्याची प्रतीक्षा करू लागले.

इतक्यात महाराणी सुमतीदेवी आपल्या दासीसह महालात आल्या.

महालात येताच त्यांनी दासीला हाताने बाहेर जाण्याचा इशारा केला.दासी बाहेर जाऊन आपल्याजागी उभी राहिली.

महाराज स्मितहास्य करत सुमतीदेवीना म्हणाले,

"या राणीसाहेब,तुमचं स्वागत आहे."

सुमतीदेवी लाजून हसल्या आणि म्हणाल्या,

"महाराज,आपल्याचं हक्काच्या घरी कोणी आपलं स्वागत करतं का?"

यावर महाराज म्हणाले,

"अहो घर तुमचंच आहे, आम्हीतर हृदयाच्या घरात तुमचं स्वागत केलं आहे."

सुमतीदेवी लटक्या रागाने म्हणाल्या,

"म्हणजे तुमचं हृदय माझं नाही, असं समजायचं का?"

अचानक असा अनपेक्षित प्रश्न समोर आल्यावर महाराज थोडे गोंधळले पण स्वतःला सावरत ते म्हणाले,

"राणीसाहेब, तुम्हाला माहित आहे की माझं सगळं सामर्थ्य आणि प्रेम यावर प्रजेचा पहिला अधिकार आहे.प्रजा हे माझं आद्यकुटुंब मग त्यांनतर माझं वैयक्तिक आयुष्य आणि परिवार यांचा अधिकार."

सुमतीदेवी म्हणाल्या,

"हो महाराज, आम्ही हे जाणतो.फक्त थोडी मस्करी केली. तुम्ही नेहमीच राज्यकारभारात व्यस्त असता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता, म्हणून तुमची काळजी वाटते."

महाराज म्हणाले,

"राणीसाहेब, लवकरच आम्ही हा सगळा राज्यकारभार मुलांच्या हाती देऊन कर्तव्यातुन मुक्त होणार आहे. राजकुमार विश्वजीत हे राज्य चालवायला समर्थ आहेत.तसेच त्यांचे पराक्रमी भाऊ त्याचं पाठबळ बनून त्यांना एक यशस्वी राजा बनवतील यात शंका नाही."

सुमतीदेवीना खूप आनंद झाला. त्या म्हणाल्या,

"हो महाराज, विश्वजीत एक कुशल राजा बनेल यात शंका नाही.त्याचा शांत संयमी आणि मुत्सदी स्वभाव त्याला नक्कीच यश देईल.शिवाय श्री महादेव आणि आई भद्रकालीदेवी त्याची पाठराखण करेलच."

महाराज म्हणाले,

"परंतु तत्पूर्वी यामिनी आणि सौदामिनी यांचा विवाह करावा अशी माझी मनोकामना आहे आणि त्यासाठी स्वयंवर ठेवण्यात यावं असा माझा विचार सुरु आहे."

सुमतीदेवी म्हणाल्या,

"ही तर खूप चांगली कल्पना आहे. पण सुकांतादेवीना याविषयी काही बोललात की नाही?"

महाराज म्हणाले,

"त्यांना आपलं म्हणणं नक्कीच मान्य असेल. तरीपण याबाबत त्यांचा काय विचार आहे तेही आपण पाहू."

महाराजांनी दासीद्वारे सुकांतादेवीना निरोप धाडून बोलावून घेतले

आणि स्वयंवराची कल्पना त्यांच्या कानावर घातली.

सुकांतादेवीना खूप आनंद झाला आणि त्या म्हणाल्या,

"महाराज, तुम्ही माझ्या मनावरचं ओझं आज हलकं केलं पहा. मुली वयात आल्यापासून मला त्यांच्या विवाहाची चिंता सतावत होती.मी कित्येकदा तुमच्याकडे त्याविषयीं बोलायचं ठरवलं पण ऐनवेळी काहीतरी घडायचं आणि बोलणं राहून जायचं. सर्व राजकुमाऱ्यांमध्ये त्या दोघी जेष्ठ असल्याने त्यांचा विवाह वेळेत होणं गरजेचंच होतं. आता तुम्हीच हा विषय काढला आहात तर तुमच्या इच्छेप्रमाणे सगळं होऊद्या."


 

दोन्ही राण्यांकडून होकार मिळाल्यावर महाराजांनी राजपुरोहितांना बोलावून मुहूर्त काढून घेतला आणि सर्व मंत्रिमंडळाला नियोजनाचा आदेश दिला. स्वयंवराचं फर्मान काढून आजूबाजूच्या सर्व राज्यांमध्ये निमंत्रणाचे खलीते पाठवण्यात आले.

राजधानीत स्वयंवराची तयारी जोरात सुरु झाली.

आणि तो शुभदिवस लवकरच उगवला.

राज्याच्या वेशीवर कमान उभारून प्रत्येक राजपुत्राचं स्वागत करण्यात येत होतं.

राजधानीच्या वेशीवर तर वेगवेगळ्या फुलांची आरास तयार केली होती. त्याच्यावर चार माणसं फुलाच्या टोपल्या घेऊन बसवली होती.येणाऱ्या प्रत्येक राजपुत्रावर त्यांच्याकडून फुलांचा वर्षाव करण्यात येत होता.तुतारी वाजवून प्रत्येक राजपुत्राचं स्वागत करण्यात येत होतं आणि हत्तीकडून मानवंदना देण्यात येत होती.

प्रत्येक घरापुढे सडा शिंपून त्यावर फुलांच्या पाकळ्यानी रांगोळी काढण्यात आली होती.

प्रत्येक घरासमोर बांबूला सिंधुमती राज्याचा राष्ट्रध्वज अडकून त्याची गुढी उभा केली होती.

ढोल नगारे यांची धामधूम होती, तर आतमध्ये सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झालं होतं.

एका भव्य अशा मैदानात हे स्वयंवर पार पडणार होतं. ज्याच्या सभोवती सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी पायऱ्या बांधल्या गेल्या होत्या.महाराज आणि महाराणीसह संपूर्ण राजपरिवारासाठी खास अशी व्यवस्था केलेली होती. तसेच 

प्रत्येक राजपुत्राला बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली होती.

प्रत्येक राजकुमार आपापल्याला नेमून दिलेल्या जागी आसनस्थ झाले.

इतक्यात गारद्याने गारद दिली.

"सिंधुमती नरेशl,प्रजादक्ष,राजनीतीधुरंधर महाराज गजराजसिंह यांचं आगमन होत आहे हो……."

थोड्याच वेळात महाराज आणि संपूर्ण राजपरिवार त्यास्थळी आला.समस्त जनतेनं त्यांना उभं राहून मानवंदना दिली.

महाराजांनी सगळ्या जनतेवरून एक नजर फिरवली आणि हाताने त्यांना बसण्याची सूचना दिली.

सगळी प्रजा आपापल्या जागी बसली.

थोड्याच वेळात राज्याचे प्रधानजी उठले आणि म्हणाले,

"उपस्थित सर्व राजकुमारांच आणि प्रजेचं मी इथं स्वागत करत आहे.आज या ठिकाणी राजकुमारी यामिनी आणि राजकुमारी सौदामिनी यांचा स्वयंवर आयोजित केला आहे. तरी त्यासाठी काही कसोट्या आम्ही ठरवल्या आहेत त्या सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकून घ्याव्या."

सगळीकडे शांतता पसरली होती, प्रत्येकजण नियम आणि अटी जाणून घेण्यासाठी आतुर होते.

प्रधानजी पुढे सांगू लागले.

"आज इथे शस्त्रविद्येची परीक्षा होईलच पण त्याबरोबर बुद्धिमत्तेचीसुद्धा परीक्षा द्यावी लागेल आणि या दोन्ही प्रकारात जे राजकुमार प्रवीण असतील त्यांची वर म्हणून निवड केली जाऊ शकते.एक राजकुमार दोन्हीपैकी एकाच राजकुमारीशी विवाह करू शकतो.कोणाची निवड करायची आणि कोणाची नाही याचा अंतिम निर्णय दोन्ही राजकुमारी स्वतः घेतील."

सगळ्या प्रजेत कुजबुज सुरु झाली.प्रत्येकजण आपापलं मत एकमेकांजवळ मांडत होते.

प्रधानजी पुढे म्हणाले,

"आता सगळ्या राजकुमारांनी इकडे लक्ष द्या,

पहिली कसोटी ऐका.समोरील मैदानात जमिनीवर एक लिंबू ठेवला जाईल. तुम्हाला त्या लिंबवाचे धावत्या घोड्यावरून दांडपट्ट्याने दोन तुकडे करायचे आहेत. प्रत्येक राजकुमाराला दोन संधी मिळतील.यात जे राजकुमार यशस्वी होतील ते पुढील कसोटीसाठी पात्र ठरतील.

आता दुसरी कसोटी ऐका. समोर एक मोठा लाकडी लंबक बांधला जाईल. त्या हलत्या लंबकाला राजकुमारांनी भालाफेक करून लक्ष करायचं आहे.

या दोन्ही कसोटीतून पार पडल्यावर मग बौद्धिक परीक्षा घेण्यात येईल. ती काय असेल हे पात्र राजकुमारांना मागाहून सांगण्यात येईल."

सगळ्या राजकुमारांना स्वयंवरातील आव्हानांची माहिती झाली होती.

क्रमवारीनुसार एकेक राजकुमार येऊन आव्हान स्वीकारून प्रयत्न करत होते.

पण आव्हान ऐकण्यासाठी सोपं वाटतं असलं,तरी प्रत्यक्षात खूप अवघड होतं.

कारण जिथे लिंबू ठेवला होता तिथली जमीन खड्डेमय होती. त्या खड्यात घोड्याचा पाय पडताच प्रयत्न करणाऱ्या राजकुमाराचा अंदाज चुकत होता. एकतर दांडपट्टा लिंबवाच्या तळातून निघून जायचा किंवा लिंबवाच्या वरून जात होता.हे आव्हान पार करणारे राजकुमार अगदी हातावर मोजावेत एवढेच होते.

या फेरीत यश मिळवणारे पुढच्या आव्हानासाठी सज्ज झाले, तर अपयशी ठरलेले आपापल्या जागेवर जाऊन बसले.

पुढील आव्हानही सोपं नव्हतं. जो लाकडी लंबक भेदायचा होता तो कमी अधिक वेगाने हलत होता.

हे आव्हान यशस्वीपणे पेलून काही राजकुमारांनी या दोन फेऱ्या जिंकून पुढील बौद्धिक परीक्षेसाठी पात्रता सिद्ध केली.

आता फक्त सहा राजकुमार उरले होते. त्यापैकी दोघांचीच निवड करायची होती.

प्रधान पुन्हा उठून उभे राहिले आणि म्हणाले,

"सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. शस्त्रविद्येची कसोटी पार करणाऱ्या राजकुमारांना आता एकूण पाच प्रश्न विचारले जातील.जो सगळ्यात आधी आणि जास्तीतजास्त उत्तरं देतील त्यांपैकी दोघांना राजकुमारी वरमाला घालून विवाह करतील."

उपस्थित सगळी प्रजा आणि राजकुमार आपापसात चर्चा करू लागले.

तेवढ्यात प्रधान म्हणाले,

"सगळ्यांनी इकडे लक्ष द्या.

पहिला प्रश्न हा आहे, अशी कोणती गोष्ट आहे, जी जेवढी वाटून टाकू तेवढी वाढतंच जाते?"

सगळेजण तर्कवितर्क वर्तवू लागले.

कोणी म्हणालं,

"धन."

तर कोणी म्हणालं,

"कर्ज."

सगळयांचे अंदाज चुकत होते.

इतक्यात एका राजपुत्राने हात उंचावून उत्तरं देण्याची अनुमती मागितली.

प्रधानांनी हाताने त्यांना उत्तरं सांगण्यासाठी अनुमती दिली.

तो राजपुत्र होता,शेजारील आणि तुल्यबळ असणाऱ्या 'तमीराई' राज्याचा महापराक्रमी राजकुमार 'महाबली.'

महाबली उठून उभा राहिला आणि म्हणाला,

"ज्ञान ही अशी गोष्ट आहे जी वाटल्याने वाढतच जाते."

प्रधान उत्साहाने म्हणाले,

"शाब्बास!अगदी योग्य उत्तर."

उपस्थित सगळेजण महाबलीकडे कौतुकाने पाहू लागले.

सगळ्यांना शांत करत प्रधानजी पुढे म्हणाले,

"आता दुसरा प्रश्न हा आहे.

या जगात असं कोण आहे ज्याचं म्हणणं आपणांस ऐकावंच लागतं?"

उपस्थित सर्वांनी वेगवेगळी उत्तरं दिली पण यावेळीही ती उत्तरं चुकली, फक्त महाबलीने बरोबर उत्तरं दिलं.

"उत्तरं आहे परिस्थिती. तिचं म्हणणं माणसाला ऐकून घ्यावंच लागतं."

प्रधान म्हणाले,

"अद्भुत!अगदी योग्य उत्तर."

उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून महाबलीचं कौतुक केलं.

दोन प्रश्नांची अचूक उत्तरं दिल्यामुळे सगळीकडे महाबलीची चर्चा सुरु झाली.

अशातच प्रधानांनी तिसरा प्रश्न विचारला,

"तिसरा प्रश्न हा आहे,

स्वतःचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे?"

सगळेजण आपापल्या शत्रूचं नाव सांगू लागले. पण कोणालाच उत्तरं देता आलं नाही.

सगळेजण महाबलीकडे आशेने बघत होते.पण महाबलीचं उत्तर देखील चुकलं होतं.

पण पहिली दोन उत्तरं त्याने दिल्यामुळे तो आता बिनधास्त होता. कारण त्याच्यामते तोच विजेता होणार होता. सगळ्या प्रजेलाही महाबली एकतर्फी जिंकणार असं वाटतं असताना अचानक मघापासून शांत बसलेल्या एका राजकुमाराने उत्तरं देण्यासाठी हात वर केला.

तो राजकुमार होता,सगळ्यात मोठे राज्य असणाऱ्या विराटनगरचा राजकुमार इंद्रसेन.

राजकुमार इंद्रसेन महाबलीकडे बघत म्हणाला,

"तसे आमचे बरेच शत्रू आहेत. पण आपला सर्वात मोठा शत्रू आहे आपला राग."

प्रधानांसह सगळ्या प्रजेने टाळ्यांचा कडकडाट केला.

प्रधान म्हणाले,

"शाब्बास!अगदी योग्य उत्तर."

प्रधानांनी पुढील प्रश्न विचारला,

"पुढचा प्रश्न हा आहे,

या जगात सगळ्यात वेगवान गोष्ट कोणती आहे?"

यावर प्रत्येकाने वेगवेगळी उत्तरं दिली.

कोणी म्हणे,

"नजर."

तर कोणी म्हणे,

"तीर."

तर कोणी म्हणे,

"चित्ता."

पण बरोबर उत्तरं कोणालाच आलं नाही. तेव्हा पुन्हा इंद्रसेनने उत्तरं दिलं,

"जगात सगळ्यात वेगवान गोष्ट म्हणजे आपलं मन.ते क्षणात कुठल्याकुठं पोहोचू शकतं."

प्रधानजी आनंदाने टाळ्या वाजवत म्हणाले,

"भल्ले शाब्बास!अगदी योग्य उत्तर."

आता अंतिम प्रश्न बाकी होता. महाबली आणि इंद्रसेन यांचे समान गुण झाले होते. आताच्या प्रश्नाचं उत्तर जो देईल तो विजेता होणार होता आणि त्याला दोन्ही राजकुमारीपैकी आवडेल तिची निवड करण्याचा अधिकार मिळणार होता. 

उपविजेत्याला दुसऱ्या राजकुमारीशी विवाह करावा लागणार होता.तसेच महाबली आणि इंद्रसेन हे पारंपरिक शत्रू होते.

त्यामुळे हे स्वयंवर दोघांसाठीही प्रतिष्ठेचं बनलं होतं. तसेच महाबली आणि इंद्रसेन यांच्यात जोरदार संघर्ष होणं अटळ होतं.

त्यामुळे अंतिम प्रश्नाचं उत्तरं देण्यासाठी दोघेही सज्ज होते.

आता प्रधानांनी अंतिम प्रश्न विचारला.

"देव चराचरात असतो असं आपण मानतो आणि ती गोष्ट सत्यच आहे. पण तरीही एका ठिकाणी देव अजिबात नसतो अशी जागा कोणती आहे?"

सगळेजण 'काय उत्तर असेल?'ह्या विचारात बुडून गेले.


 

काय असेल अंतिम प्रश्नाचं उत्तरं?

हे उत्तरं कोणी देऊ शकेल का?

पुढे जाऊन या स्वयंवरामुळे सिंधुमतीवर कोणतं संकट येईल?

त्यातून सिंधुमती आपला बचाव करू शकेल कि त्यांचा अस्त होईल?

हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा,'जिवलगा.'

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)






 

🎭 Series Post

View all