जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-36.

Ramanand tells the history of viren & tanvi's past life.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-36.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)

जोतिबा आणि पारुबाईच्या अचानक गायब होण्याने विरेन आणि तन्वी विचारात पडले होते. ज्यांच्याबरोबर पूर्ण रात्र मुक्काम केला ते लोक सकाळ होताच गायब होणं त्यांच्या कल्पनेपलीकडील होतं.

विरेन तन्वीला म्हणाला,

"तन्वी हा नक्की काय प्रकार असावा?आपण ज्यांच्याबरोबर एकत्र बसून जेवलो,गप्पा मारल्या ज्यांनी आपल्याला मदत व्हावी नकाशा दिला ती दोघं अचानक कुठे गेली असावीत?"

तन्वीसुद्धा विचारात पडली होती.

ती म्हणाली,

"अरे ती दोघंपण गायब आहेत आणि ती जागाही अस्तित्वात नाही."

विरेन म्हणाला,

"तन्वी, त्यांनी आपल्याला दुसरीकडे आणून सोडलं नसेल ना? कदाचित आपणांस त्यांचा ठावठिकाणा माहित होऊ नये म्हणून त्यांनी असं केलं असेल तर?"

तन्वी त्याला म्हणाली,

"अरे विरु,आपल्याला त्यांनी दुसरीकडे आणून सोडलं असतं तर आपल्याला समजलं नसतं का? आपण फक्त झोपेत होतो, बेशुद्ध नव्हतो."


 

विरेन डोक्याला हात लावत म्हणाला,

"हो तन्वी, तू म्हणते तेही बरोबर आहे. पण जे घडलं ते काहीतरी चमत्कारिक आहे हे नक्की."

तन्वी चिंताग्रस्त होऊन म्हणाली,

"विरु, ते दोघे कोणी भूतपिश्शाच तर नसतील ना?"

विरेन तिचं म्हणणं खोडून काढत म्हणाला,

"छे, असं काही नसेल. तसं असतं तर त्यांनी आपल्याला त्रास नसता का दिला? उलट त्यांनी आपल्याला आसरा दिला, जेवायला घातलं. ते नक्कीच देवाचा अवतार असतील. म्हणून ते आपल्या मदतीला धावून आले."

तन्वी विचार करत म्हणाली,

"हो रे. तू म्हणतोस तसंच असेल."

अशी थोडी चर्चा झाल्यानंतर विरेन तन्वीला म्हणाला,

"तन्वी, आता वेळ दवडायला नको. हा नकाशा बघू आणि पुढील प्रवासाला सुरवात करू."

तन्वी होकारार्थी मान डोलावून म्हणाली,

"हो,तो नकाशा उघडून पाहूया."


 

विरेनने तो नकाशा उघडला आणि ते दोघेही तो पाहू लागले.

त्यात जंगलातील प्रमुख वाटा, नदी नाले आणि एक भव्य असा राजवाडा दिसत होता.

विरेन आणि तन्वी आपण कुठे आहोत आणि कोणत्या दिशेला जायला हवं त्याचा अंदाज बांधत होते.

विरेन म्हणाला,

"तन्वी, हे बघ. हा राजवाडा इथे आहे.नकाशावर दाखवलेल्या दिशांनुसार राजवाडा उत्तर दिशेला आहे आणि राजवाड्याची डावी बाजू म्हणजेच पूर्वदिशा असणार आहे.

जी आपण राजवाड्याकडे जाताना आपली उजवी बाजू असेल आणि आता सूर्य आपल्या उजव्या बाजूनेच उगवला आहे. म्हणजे हीच पूर्वदिशा आहे. म्हणून आपण या रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला राजवाड्यापर्यंत पोहोचता येईल."

तन्वीने नकाशा बारकाईने पाहिला आणि ती म्हणाली,

"विरु तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. पण या वाटेने गेल्यावर वाटेत ओढा किंवा नदी असल्याचं यात दाखवलं आहे. म्हणजे नक्कीच या दोन्हीपैकी काहीतरी असणार आहे. मग आपण ते कसं पार करायचं?"

विरेन तिला म्हणाला,

"हे बघ तन्वी,इथून पुढे वाट आहे म्हणाल्यावर मध्ये ओढा किंवा नदी जे काही असेल त्यातून पुढे जाण्यासाठी नक्कीच काहीतरी योजना असेलच.जे काही असेल ते तिथे गेल्यावर पाहता येईल. आपण आता निघायला हवं असं मला वाटतं."

तन्वीकडून होकार मिळाल्यावर विरेनने त्रिशूलला शिटी मारली.

शिटी मारताच त्रिशूल धावत येऊन समोर उभा राहिला.विरेनने तो नकाशा खिशात ठेवला आणि तन्वीला त्रिशूल घोड्यावर बसवलं.

आपल्या पाठीवर बांधलेली मशाल ठीक आहे का याची खात्री करून तोही घोड्यावर स्वार झाला.

नकाशावर दाखवलेल्या दिशेनुसार त्यांनी त्रिशूलचा मुजरा वळवला आणि ते राजवाड्याच्या दिशेने निघाले.

घोड्यावर बसल्याबसल्या दोघे कालच्याच प्रकाराची चर्चा करत होते.


 

इकडे विरेन आणि तन्वीच्या शोधात आलेलं पथक आता आश्रमाच्या आवारात पोहोचलं होतं. रात्री त्याचं नदीकाठी त्यांनी मुक्काम केला होता.पूर्ण दिवस त्यांनी तन्वी आणि विरेनची शोधमोहीम राबवली पण त्यांच्या हाती निराशाच लागली.

आज सकाळी थोडावेळ शोधमोहीम राबवून त्यांनी परत माघारी फिरायचं ठरवलं होतं.

वनरक्षक चौधरी  शिंदे आणि भोसलेना म्हणाले,

"माफ करा,पण समोर पहा किती खोल दरी आहे आणि त्या दरीत हे पाणी कोसळत आहे.त्यामुळे ते यातून पुढे गेले असतील तर त्यांचं जिवंत असणं अशक्य आहे. त्यामुळे आपण तिथून माघारी फिरणंचं योग्य आहे."

त्यांच्या बोलण्यातून पॉसिटीव्ह विचार करून शिंदे सर म्हणाले,

"पण जर का त्या दरीत पडण्याआधीच ते बाहेर पडले असतील तर कदाचित ते जिवंत असतीलही आणि मी माझ्या विध्यार्थ्यांना असं संकटात सोडून जाऊ शकत नाही."


 

त्यांचे अंदाज व्यक्त करणं सुरूचं होत इतक्यात तो आश्रम एकजणाच्या दृष्टीस पडला.

तो ओरडूनच म्हणाला,

"साहेब, ते पहा. तिथे घरासारखं काहीतरी दिसतंय."

शिंदे सर म्हणाले,

"चला, तिथे काही माहिती मिळते का ते पाहू."


 

सगळेजण उत्सुकतेने त्या आश्रमाकडे निघाले.

आश्रमाच्या आवारात ते पोहोचताच रामानंद ऋषीं यांना ते आल्याची चाहूल लागली आणि ते गालात स्मितहास्य करू लागले.

ते लोक आश्रमाच्या दारात येऊन उभे राहिले आणि ते आतमध्ये आवाज देणार इतक्यात रामानंद ऋषीं म्हणाले,

"या, आत या. मी तुमचीच वाट पाहत आहे."

सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.

इतक्यात सबइन्स्पेक्टर भोसले पुढे झाले आणि आश्रमात वाकून पाहत म्हणाले,

"कोण आहे आतमध्ये? बाहेर या."

आतून आवाज आला,

"तुम्ही सगळेजण आतमध्ये या. घाबरू नका."

सगळेजण दबकत दबकतच आतमध्ये गेले.

समोर पाहतात तो एक साधू म्हणजेच रामानंद ऋषीं ध्यानस्थ बसले होते.

सगळेजण त्यांच्या प्रसन्न तेजस्वी मुद्रेकडे बघतच राहिले.

त्यांची ध्यानसाधना भंग कोणी करायची?आणि ती करावी की नको? अशा मनस्थितीत सगळे उभे होते.

इतक्यात कुजबुज सुरु झाली,

"ध्यानभंग करायला नको, सगळ्यांना रागाने भस्म बिस्म केलं तर काय करायचं?"

वगैरे चर्चा सुरु होती.

ही कुजबुज ऐकून रामानंद म्हणाले,

"शांत रहा.तुमच्या सगळ्या प्रश्नांची इथं उत्तरं मिळतील. ती उत्तरं देण्यासाठीच मी इथे बसलो आहे.तसेच मी कोणी रागीट कोपीष्ठ ऋषीं नसून एक साधा शांत संन्यासी आहे. तुम्ही इथंवर का आलाय आणि कोणाच्या शोधात आलाय हेपण मला माहित आहे."

असं म्हणून स्मितहास्य करत त्यांनी डोळे उघडले आणि आश्चर्यचकित झालेल्या त्या चेहऱ्यांवरून ते आपली नजर फिरवू लागले.


 

ते पुढे म्हणाले,

"तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, की हा असा का बोलत आहे?पण तुमच्या प्रश्नाचं उत्तरं माझ्याकडे आहे.

सबइन्स्पेक्टर भोसले म्हणाले,

"आम्ही इथं का आलोय ते तुम्हाला कसंकाय माहित असू शकतं? तुम्ही स्वतःला अंतरज्ञानी समजता का? काहीही आपलं. हे पहा हे असे ठरलेले डायलॉग मारत माणसांना लुबाडायला कितीतरी भोंदूबाबा आणि फकीर गावोगावी फिरत असतात.त्यामुळे ह्या असल्या डायलॉगना आम्ही बळी पडायचो नाही आणि आमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीपण नाहीये."

यावर रामानंद ऋषीं जोराजोरात हसू लागले आणि म्हणाले,

"विरेन आणि तन्वीच्या शोधात इथपर्यंत आलात तुम्ही. बरोबर आहे ना? की हेपण चूक आहे?"

विरेन आणि तन्वीबद्दल ऐकून सगळेच अचंबित झाले.

शिंदे सर पुढे सरसावत म्हणाले,

"तुम्ही विरेन आणि तन्वीला कसंकाय ओळखता?ते इथं आले होते का?आता कुठे आहेत ते? कृपया आम्हाला लवकर सांगा.आम्ही खूप चिंताग्रस्त आहोत."

यावर रामानंद म्हणाले,

"ते दोघे त्यांना जिकडं जायला हवं तिकडं गेले आहेत. त्यांच कार्य पूर्ण झाल्यावर ते आपसूकच तुमच्याकडे परत येतील. तुम्ही आता इथून माघारी जा.ते तुमच्या हाताला आता लागणार नाहीत."

शिंदे सर म्हणाले,

"कसलं कार्य आणि नक्की कुठे गेलेत ते? आम्हाला कोड्यात टाकू नका. लवकर स्पष्ट काय ते सांगा."

रामानंद म्हणाले,

"गेल्याजन्मी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती घ्यायला आणि या जन्मात त्याचा हिशोब चुकता करण्याला."


 

इतक्यात भोसलेनी रि्व्हॉल्व्हर बाहेर काढलं आणि रामानंदाच्या कानपटीवर लावलं.

ते पाहून सगळेच हादरले.

भोसले रामानंदाना म्हणाले,

"ये गोसाव्या,आता गप्पगुमान खरं बोलतोस की घालू सहाच्या सहा डोक्यात?

मागचा जन्म पुनर्जन्म फक्त गोष्टीत असतो,खरोखर नसतो.एवढं न समजण्याइतपत आम्ही मूर्ख नाही आहोत."

शिंदे सर पुढे सरसावत म्हणाले,

"अहो भोसले साहेब माझं ऐकून घ्या.ते म्हणत आहेत ते कदाचित बरोबर असावं असं मला वाटतं. त्यामुळे कृपया तुम्ही रि्व्हॉल्व्हर खाली करा."


 

भोसले नाराजीच्या सुरात म्हणाले,

"अहो शिंदे सर, हे तुम्ही बोलत आहात? तुम्ही तर प्राध्यापक आहात आणि या अशा गोष्टींवर कसा काय विश्वास ठेऊ शकता?"


 

शिंदे सर म्हणाले,

"अहो मी इथल्या एका गुहेत विरेन आणि तन्वीसारख्याच दिसणाऱ्या दोघांचे त्या काळातील पेंटिंग्स पाहिलेत.मी त्यांचे फोटोही मोबाईलमध्ये घेतलेत.थांबा मी तुम्हाला मोबाईलमधील फोटो दाखवतो."

शिंदे सरांनी मोबाईल मधील फोटो त्यांना दाखवल्यावर सगळे अचंबित झालेत.

मग भोसले साहेब रामानंदाची माफी मागत म्हणाले,

"हे ऋषींवर मला माफ करा. माझ्या हातून घोर अपराध झाला."


 

त्यावर रामानंद म्हणाले,

"ठीक आहे. माझ्या मनात कोणाविषयीं राग नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टींची उत्तरं देण आणि इथून मागे धाडणं हे माझं कर्तव्य आहे."

शिंदे सर म्हणाले,

"हे ऋषींवर, आम्हाला विरेन आणि तन्वीच्या गतजन्मविषयीं माहित करून घ्यायचं आहे. तुम्ही आम्हाला सांगाल का? ते ऐकून आम्ही परत माघारी जाऊ."

रामानंद म्हणाले,

"हो,ती खूप मोठी गोष्ट आहे.आता आपण सगळे जिथं उभे आहोत त्याकाळी ह्या संपूर्ण प्रदेशावर क्षत्रिय राजा गजराजसिंह हे राज्य करत होते. हे राज्य सिंधुमती नावाने ओळखलं जात होतं.

त्यांच्या राज्यात प्रजा खूप सुख,समाधान आणि एकोप्याने राहत होती.सगळेजण बंधुभाव जपत होते.राजा गजराजसिंह यांच्या एकूण दोन राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुमतीदेवी तर दुसरीचं नाव होत सुकांतादेवी.

दोन्हीही राण्या राजांना प्रिय होत्या.

सुमतीदेवींच्या पोटी चार मुलं होती. त्यापैकी विश्वजीत, सुजित आणि मल्हार हे तिघे राजपुत्र तर सुचित्रा ही राजकुमारी होती.

तसेच सुकांतादेवी यांना पाच मुलं होती. ज्यापैकी युद्धवीर हा एकमेव राजपुत्र तर यामिनी,सौदामिनी,राजनंदिनी,कुमोदिनी या चार राजकन्या होत्या.

सगळे भाऊबंद मिळूनमिसळून आनंदाने एकत्र खेळत बागडत होते.सखे सावत्र अशा कोणत्याही भेदभावाचा त्यांच्यात अजिबात लवलेशही नव्हता.

पण जसं साऱ्या जगाला प्रकाश देणाऱ्या तेजोमय सूर्यालाही कधीनाकधी ग्रहण लागतंच. अगदी तसंच ग्रहण या राजघराण्याला लागलं.

त्या ग्रहणाचं नाव होतं महाबली………..


 

काय असेल गतजन्मीची कथा?

विरेन आणि तन्वी गतजन्मात कोण असतील?

त्यांच्याबरोबर नक्की काय घडलं असेल?

हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा. जिवलगा.

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)





 

🎭 Series Post

View all