जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-35.

Gosht punrjanmachi......

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-35.

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

एव्हाना दिवस मावळतीला आला होता. दिवसा आपल्या प्रकाशाने समस्त धरती उजळून टाकणारा तो तेजोमय रवी डोंगराआड लपण्याच्या तयारीला लागला होता. आकाशात मुक्तपणे विहार करणारे पक्षी आता आपल्या घरट्याकडे परतत होते.सगळे प्राणी आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणी परतत होते.प्रत्येक सजीव आपल्या घरट्याच्या ओढीने तिकडे परतत होता.रातकिडे मात्र हळूहळू सक्रिय होत होते.त्यांनी हळूहळू आपला आवाज करायला सुरवात केली होती.

अशातच त्रिशूल घोड्यावर स्वार असलेल्या तन्वी आणि अर्धवट शुद्धीत असणाऱ्या विरेनला घेऊन तो अनामिक माणूस चालत होता.

तन्वी त्याला वारंवार प्रश्न करत होती,

"अहो ऐका ना. तुम्ही आम्हाला कुठे घेऊन चालला आहात?आमच्या जीवाचं काही बरंवाईट करण्याचा तुमचा हेतू तर नाही ना?"

ती माणूस हसून म्हणाला,

"तुमी गुमान माझ्यासंग या.येळ आल्यावं म्या तुमाला समदं सांगिल.पर तवापरेंत काय इचारू नगा. फकस्त आपुण माज्या मुक्कामाच्या जाग्यावं लवकर पोचाया पायजे एवढं बगा."

तन्वी आता आतून पुरती घाबरली होती, तिच्या मनात काहीबाही शंका येऊ लागल्या.

ती धीर एकवटून म्हणाली,

"कसली वेळ? आणि कसला मुक्काम? तुमच्या मनात काही काळंबेर तर नाही ना? आम्ही संकटात सापडलो म्हणून तुम्ही आमचा गैरफायदा घेताय का?तुमचा माझ्या अब्रूवर तर डोळा नाही ना?पण एक लक्षात ठेवा, मी आणि विरु जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तुमचा हेतू साध्य होणार नाही.तन्वी जीव घेईल किंवा जीव देईल पण स्वतःच शील कधीच घालवणार नाही."

तन्वीचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकून तो माणूस जाग्यावरच थबकला आणि त्याने तन्वीकडे आपल्या करारी नजरेचा कटाक्ष टाकला. त्याचे ते करारी डोळे बघून तन्वीने नजर चोरली.

तो माणूस म्हणाला,

"आवं काय इपरीत बोलताय तुमी?म्या आन तुमच्या अब्रूवर डोळा ठेवीन. आवं तुमी तर माज्या लेकरासारखं हायसा. आन बा कवा लेकराच्या आब्रूवर डोळा ठिवतो व्हय जी. बा लेकराची आब्रू राकन्यासाठी अस्तुया आनं म्या तेच करतोय. जोवर म्या हाय तोवर तुमच्या केसालाबी कोणी ढक्का लावू शकणार नाय बगा. ह्या देहाला 'जोतिबा' म्हणत्यात. वाट ईसारलेल्या वासरास्नी आणि कोकरास्नी वाट दावणं हेच माज काम हाया.दिस बुडाय लागलाय आन तो सुरव्या (सूर्य)एकदा त्या डोंगराच्या आडला जाऊनशान दडला तर मंग डोळ्यात बॉट घातलं तरीबी काय दिसायचं नाय.तवा आता गप्पगुमान माज्यासंग या आन सकाळ झाल्याव तुमास्नी पायजे तिकडं जावा.म्या नाय आडवा जायचो तुमच्या.आनं ह्या बेसूद पडलेल्या पोराचंबी कायतर दवापाणी बघाया पायजे. नायतर फुकट जीवानिशी जाईल.तवा आता वाईच त्वाण्ड बंद ठीव आन माझ्यासंग या."

तन्वीला त्या माणसाबद्दल आता थोडासा विश्वास वाटू लागला होता.

पण तिच्या मनात काही प्रश्न येत होते,

'या एवढ्या भयाण आणि घनदाट जंगलात हा काय करत असेल? आपल्या मागे आदिवासी लागले असताना बरोबर मोक्याच्याक्षणी हा आपल्या मदतीला कसा काय आला असेल? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आदिवासी अचानक गायब कसेकाय झाले असतील?'

असं विचारचक्र तिच्या मनात सुरु होतं.

एव्हाना अंधार दाटून आला होता.चालता चालता तो माणूस म्हणजेच जोतिबा एकाठिकाणी थांबला आणि म्हणाला,

"आंग आशी आलो बगा एकदासं.छला खाली उतरा आता.म्या या पोराला खांद्याव उचलूनशान घेतु.तुमी माज्या मागणं बिगीबिगी या."

तन्वीला त्या साधूंची सूचना आठवली आणि ती म्हणाली,

"नाही नाही. काही झालं तरी आम्ही त्रिशूलवरून खाली उतरणार नाही. जोपर्यंत आम्ही यावर आहोत तोपर्यंत सुरक्षित आहोत."

यावर जोतिबा हसत हसतच म्हणाले,

"अगं पोरी, म्या सांगतोय न्हवं. उतरा खाली, तुमाला काय नाय हुनार. म्या हाय की हिथं. मंग कसलं भ्या हाय तुमास्नी?

तन्वी म्हणाली,

"आम्ही या जंगलात आल्यापासून आमच्यावर संकटावर संकट येत आहेत. पण एका साधूंनी आम्हाला हा घोडा दिला आहे.ज्यावर स्वार असल्यावर आम्हाला कोणी धक्का पोहोचवू शकत नाही आणि म्हणून आम्ही यावरून खाली उतरणार नाही. आम्हाला पुढे जाऊ द्या. आमचं आम्ही जाऊ."

यावर जोतिबा म्हणाला,

"रामानंद नाव हाय त्या साधूंच.तुमी त्याच आश्रमातन इथंपरेंत आलायसा.तेनीच तुमाला त्रिशूल घोडा दिलाय आनं राजवाड्यात जाण्यासाठन बी सांगितलया. मला सारं ठावं हाय जी. त्रिशूलवर म्हादेवाचा आशीर्वाद हाय, पर परतेक गोस्टीला कायतर बंदन आस्तय. तवा माज्यासारक्याला मदतीसाठन यावं लागतंय."

तन्वी आ'वासून बघतच राहिली.

ती काहीच बोलेना म्हणल्यावर जोतिबा तिला म्हणाला,

"आता लयसा इचार करू नगा, उतरा आनं चला बिगीबिगी."

तन्वीने इकडंतिकडं पाहिलं तर मुक्कामाचं कोणतंच ठिकाण तिला दिसत नव्हतं. म्हणून तिनं जोतिबाला विचारलं,

"जोतिबाबा कुठं घेऊन आलाय? इथं तर मुक्काम करण्यासारखी कोणतीच जागा दिसत नाही."

जोतिबा हसत हसत म्हणाला,

"ठार येडी हायस बग पोरी. आग असं बिगीबिगी कुणालाबी मुक्कामाची जागा घावली तर मंग ते आमचं सगळं लुटून नाय का न्हेणार? म्हंजी तसी काय धनदौलत नाय माज्याकडं. पर पोटाला खाण्यासाठन म्हणूनशान थोडं काय बाय जुळवून आणून ठिवलंय.पर या जंगलात कुणाला सोननान पैसाअडका नगो अस्तुया. पर पोटाला खायाच काय घावलं तर ते लुटूनशान नेत्यात बगा."

जोतिबानं सांगितल्यावर तिथली परिस्थिती तन्वीच्या लक्षात आली.

ती म्हणाली,

"अच्छा!असं आहे तर. मग कुठाय तुमचा मुक्काम जोतिबाबा?"


 

जोतिबा विरेनला आपल्या खांद्यावर घेऊन म्हणाले,

"हितच हाय, तू ये माज्या मागं मागं."

तन्वी म्हणाली,

"पण त्रिशूलचं काय? त्याला कुठे ठेवायचं?"

जोतिबा म्हणाले,

"पोरी तू तेची काळजी नग करू.त्यो थांबलं हितच.म्हादेवाचा हात हाय तेचा पाठीव तेला काय हुतंय?"

तन्वीने एकदा त्याचा पाठीवर थाप मारली आणि ती त्याला उद्देशून म्हणाली,

"त्रिशूल, काळजी घे. आम्ही इथंच आहोत.उद्या सकाळी भेटू."

जोतिबा विरेनला घेऊन पुढे चालू लागला आणि त्याच्या पाठोपाठ तन्वी चालू लागली.

दोन मिनिट चालल्यानंतर पाण्याचा आवाज येऊ लागला.

तन्वी जोतिबाला म्हणाली,

"जोतिबाबा, इथंतर पाण्याचा आवाज येतोय. पण तुमचा मुक्काम काही दिसेना."

जोतिबा म्हणाला,

"आगं पोरी ह्यो एक बारका धबधबा हाय, ह्याच्यातन पुढं गेल्यावर आतं मुक्कामाच ठिकाण हाय. ते भाईरन अजिबात दिसत नाय.माज्या मागन ये."

तन्वी जोतिबापाठोपाठ पाण्यातून पलीकडं गेली आणि चकितच झाली.

धबधब्यामागे एक गुहा होती. त्याच्या कोपऱ्यात एक मशाल पेटत होती. गुहेची रचना अगदी घरासारखी होती.

जोतिबानं आतं गेल्यावर विरेनला जमिनीवर झोपवला आणि आतमध्ये आवाज दिला,

"अय कारभारने, आगं वाईच भाईर ये.बग कोण आलया."

तन्वी उत्सुकतेने कोण बाहेर येतंय ते पाहू लागली.

आतून एक हिरव्या साडीचा काष्ठा नेसलेली बाई बाहेर आली. तिचे हात पिठाने माखले होते.तिचं राहणीमान एकदम साधं पण 

तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज दिसत होत, कपाळावरील भला मोठा कुंकवाचा टिळा लक्ष वेधून घेत होता.

तन्वीला ती आपल्या ओळखीची वाटत होती.

जोतिबा म्हणाला,

"ही माजी बायकू पारुबाई."

तशी पारुबाई म्हणाली,

"येळ केलासा यायला. कवाची वाट बघतीया म्या. भाकरीबी आताच थापून झाल्या हायती. ह्या पोराच्या नाकाला कांदा फोडून लावा म्हंजी त्यो बिगीन सुदीत यील. मंग आपण सगळी मिळूनशान चार घास खाऊन घेऊया."

तन्वी आश्चर्याने म्हणाली,

"तुम्हाला कसं माहित विरेन बेशुद्ध आहे आणि आम्ही येण्याच्या आधीच तुम्ही आमच्यासाठीपण जेवण कसं काय बनवून ठेवलं?"

पारुबाई म्हणाली,

"आमाला सगळं म्हाईत हाय. तू लई इचार करू नग."

आणि ती आतमध्ये जाऊन कांदा घेऊन आली.

जोतिबाने तो कांदा फोडून विरेनच्या नाकाला लावला.

दोन मिनिटांनी विरेनने डोळे उघडले पण तो आजूबाजूला सगळं बघून गोंधळून गेला आणि म्हणाला,

"तन्वी,आपण कुठे आलो आहोत? हे दोघेजण कोण आहेत?"

तन्वीने घडलेल्या सगळ्या घटना विरेनला सांगितल्या.

त्यावर विरेन म्हणाला,

"तन्वी तुझ्या धाडसाला माझा सलाम. माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझ्या जीवाची पर्वा केली नाहीस."

तन्वी म्हणाली,

"सलाम करण्याची गरज नाही विरु. हा जीव सुद्धा तुझीच अमानत आहे. तू माझा जीव वाचवलास म्हणून मी आज जिवंत आहे, हे तू लक्षात घे. असे एक काय तर हजारो जीव तुझ्यावर ओवाळून टाकेन."


 

त्यांचं हे प्रेम पाहून जोतिबा म्हणाला,

"भले शाब्बास!असीच माया लावा एकमेकाला. तर तुमाला यास ईल बगा."

विरेन जोतिबाला म्हणाला,

"जोतिबाबा तुम्ही त्या आदिवासीपासून आमचा जीव वाचवला त्याबद्दल आणि आम्हाला इथं आसरा दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे."

यावर जोतिबा म्हणाला,

"छ्या!त्यात कसलं आल्यात आबारबिबार? आवं माज कामचं हाय ते. तवा तुमी हे आबाराचं याड डोस्क्यातन आदूगार काडून टाका."

इतक्यात पारुबाई म्हणाली,

"आवं, जेवान तयार झालया. तवा आदी खाऊन घेऊया. मंग रात हायाच की बोलाया."

जोतिबा म्हणाला,

"व्हय, आता खाऊन घेऊया. मंग बोलूया सीस्तात."

तन्वी आणि विरेनला कडाडून भूक लागली असल्याने त्यांनी नकार नाही दिला.

पारुबाईने सर्वांना जेवायला वाढून घेतलं आणि म्हणाली,

"तुमा लोकांसारखं हे जेवान नाय पर जे हाय तेवढं करून घातलया.वाईच ग्वाड मानून घ्या जी."

तन्वी म्हणाली,

"जेवण हे जेवण असतंय. ज्याने आपलं पोट भरेल ते पंचपक्वानापेक्षा कमी नसतं. या अशा ठिकाणी आम्हाला हे खायला मिळतंय हे आमचं भाग्य म्हणायचं. अहो हजारो रुपये खर्च केले तरी या ठिकाणी आम्हाला असं जेवण नसतं मिळालं."

विरेन म्हणाला,

"तन्वी तुझं खरं आहे.आपण खूप नशीबवान आहोत."

थोड्याच वेळात सर्वांचं जेवून झालं.

मग जोतिबाने राजवाड्याचा विषय काढला.

तो म्हणाला,

"लेकरांनो,इतपरेंत आमी तुमची मदत केली, पर आता हितन म्होर तुमाला सवता जायाला लागणार हाया. हितन म्होरचा परवास तुमासाठन कटीण आसल.तवा जपूनशान आसा. आनं म्या तुमास्नी एक नकाशा देतु.त्यो तुमाला उपेगी पडलं."

विरेनने तो नकाशा आपल्याकडं घेऊन ठेवला आणि बोलत बोलत सगळे झोपी गेले.

दिवसभराच्या दगदगीमुळे विरेन आणि तन्वीला गाढ झोप लागली.

सकाळी जेव्हा दोघांना जाग आली तेव्हा समोर जे चित्र होतं ते धक्कादायक होतं. तन्वी आणि विरेन दोघेही हैराण होऊन एकमेकांकडे बघत होते. दोघेही जाग्यावर उठून उभे राहिले.दोघांच्याही मनात एकच प्रश्न होता,

'की हे कसं शक्य आहे? रात्री जे होतं ते स्वप्न होतं की,आता जे समोर दिसतंय ते स्वप्न आहे?"

तिथे आता ना जोतिबा होता, ना पारुबाई होती आणि ना कोणतं मुक्कामाचं ठिकाण होतं.

दोघेही एका मोठ्या वृक्षाखाली उभे होते. विरेनने आपल्या खिशात हात घालून पाहिलं तर जोतिबाने दिलेला नकाशा त्याला सापडला.

विरेन तन्वीला म्हणाला,

"तन्वी हा काय प्रकार आहे?नकाशा आहे तर मग जोतिबाबा आणि पारुबाई कुठे गेले? आणि ते मुक्कामाचं ठिकाण? तो धबधबाही कुठे दिसत नाही."

तन्वीसुद्धा त्याचं विचारात गुंग झाली होती.

जोतिबा आणि पारुबाईचं असं अचानक गायब होण्यामागे काय कारण असावं?

जोतिबाने दिलेल्या नकाशावरून त्यांना राजवाडा सापडेल का?

तन्वी आणि विरेन यांच्या मागे येणारं शोधपथक कुठपर्यंत पोहोचलं असेल? की ते माघारी गेले असतील.

 हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.'जिवलगा.'

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा. त्यासाठी आपलं स्वागतच आहे. सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)



 

🎭 Series Post

View all