जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-32.

अधुरी एक कहाणी.....

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-32

(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे,तसेच ही कथा मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे, तरी अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा अजिबात हेतू नाही.)


 

विरेन आणि तन्वी त्या दगडाजवळ गेल्यावर तो दगड घोड्याच्या आकारासारखा दिसू लागला आणि विरेनने त्याला स्पर्श करताच त्याला त्यातून एक विशिष्ट लहर जाणवली. इतक्यात घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज येऊ लागला आणि विरेन नकळत म्हणाला,

"त्रिशूल."

ते पाहून साधू आनंदून गेले आणि म्हणाले,

"हो!त्रिशूल. तुमचा त्रिशूल.ज्याने शत्रूला तुमच्या आसपासदेखील फिरकू दिलं नाही, तो त्रिशूल.ज्याच्यामुळे तुम्ही अजिंक्य योद्धा होता तो त्रिशूल.तुमच्या दोघांच्या मृत्यूनंतर ज्यानं इथं जिवंत समाधी घेतली तो त्रिशूल."

विरेनच्या डोळ्यात टचकन पाणी आलं.

आता सगळा इतिहास त्याच्या डोळ्यासमोरून झपझप करत जात होता. तो आता मनाने आणि मेंदूने संपूर्णपणे त्या काळात जाऊन पोहोचला होता.

पण तन्वीसाठी हे सगळं विचित्र होतं. नक्की काय होतय हे तिला समजत नव्हतं.

ती त्या साधूंना म्हणाली,

"ऋषीवर!हे काय होतं आहे? विरेन असा कुठल्या विचारात हरवला आहे? आणि हा त्रिशूल कोण आहे?

मला काहीच कळेना झालं आहे.माझ्या मनाला बरेच प्रश्न सतावत आहेत. मला त्याची उत्तरं द्या नाहीतर मला वेड लागेल."

तिची अशी अवस्था पाहून साधूंनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि काहीतरी मंत्र उच्चारल्यावर ती शांत झाली.

त्यानंतर ते साधू तिला म्हणाले,

"बाळ तू घाबरू नको. त्याला काही झालेलं नाही. फक्त त्याला गतजन्मीच्या गोष्टी आठवत आहेत आणि तो त्या काळात जाऊन पोहोचला आहे. थोड्याच वेळात तो परत या जन्मात दाखल होईल."

तन्वी प्रश्नार्थक चेहऱ्याने साधूंना म्हणाली,

"ऋषीवर!पुनर्जन्म वगैरे खरंच असतं का? की फक्त दंतकथा असतात?"

साधू हसत म्हणाले,

"बाळ!एखाद्या जन्मी आपली काही चूक नसताना अकाली मृत्यू झाला किंवा काहीतरी अन्याय होऊन मृत्यू झाला असेल तर अशी लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्यासाठी किंवा अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घेऊ शकतात."


 

तन्वी कपाळावर आठ्या आणत म्हणाली,

"पण विरेन आणि पुनर्जन्माचा काय संबंध?त्याची अशी कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे?"

साधू हसत हसत म्हणाले,

"फक्त त्याचाच नाही तर तुझाही संबंध आहे. तुमचं इथं येणं विधिलिखित आहे. तुमच्याबरोबर जे जे काही घडलं आहे किंवा घडणार आहे ते सगळंच विधिलिखित आहे. तुलाही लवकरच सगळं आठवेल."

तन्वी स्वतःच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,

"मला काहीच कळेनासं झालं आहे. हे नक्की चाललंय तरी काय? सगळा गोंधळ आहे. मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मला मिळत नाहीत,तोपर्यंत माझ्या मनातला गोंधळ कमी होणार नाही. मला काहीतरी क्लुप्ती सांगा म्हणजे मला पुढील दिशा समजेल."

साधू हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले,

"तुलाही सगळं आठवेल. त्यासाठी विशेष असं काही करावं लागणार नाही. विरेन या जन्मी दाखल झाल्यावर तुम्हा दोघांना एका जुन्या वास्तूत जावं लागेल. जिथे गेल्यावर तुला सगळंकाही आठवेल. तेव्हा तुमचा शत्रू कोण होता?आणि आता कोण आहे?हे कळेल.फक्त विरेनवर विश्वास ठेव आणि त्याची साथ सोडू नको. एवढंच सांगेन."

तन्वीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि साधूंसह ती विरेन पुन्हा या जन्मात दाखल होण्याची वाट पाहू लागली.

थोड्याच वेळात आभाळ दाटून आलं आणि जोराचा अवकाळी पाऊस आला.

पावसापासून रक्षण व्हावे म्हणून तन्वीसह साधू आश्रमाच्या ओसरीवर जाऊन उभे राहिले.

तन्वी म्हणाली,

"ऋषीवर! विरुला आत आणावं लागेल. तो पावसात भिजत आहे.तो आजारी पडू शकतो."

साधू स्मितहास्य करत म्हणाले,

"काळजी करू नको बाळ. हा पाऊस त्याच्यासाठीच आला आहे. यात भिजल्यानंतर तो याजन्मी परतेल.साक्षात वरुणराजा त्याला जलाभिषेक घालून पुढील मोहिमेसाठी सज्ज करत आहे. इथून पुढची वाट बिकट आहे. पण तुमच्यासोबत साक्षात महादेवांचं वरदान असणारा त्रिशूल असणार आहे."

पावसात भिजून चिंब झाल्यावर विरेनने डोळे उघडले आणि तो त्या दगडावरून हात फिरवत म्हणाला,

"त्रिशूल!आणखी किती उपकार करशील रे माझ्यावर?कधी आणि कसे फेडू तुझे उपकार?"

तन्वी धावतच विरेनकडे गेली आणि त्याला पाठीमागून मिठी मारली.

विरेनने तिच्याकडे वळून पाहिलं आणि तिला घट्ट मिठी मारली.

थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. पण दोघांच्याही डोळ्यातून अश्रूनी वाट मोकळी केली होती.

विरेन तिला म्हणाला,

"तन्वी!हा बघ आपला त्रिशूल.आपल्या विरहात यानेही स्वतःच बलिदान दिलं. आयुष्यभर आपल्यासाठी जीवाची बाजी लावली आणि शेवटी आपल्यासाठीच जीव दिला."

तन्वीला काहीच संदर्भ लागतं नव्हता. पण साधूंनी सांगितल्याप्रमाणे तिचा विरेनवर विश्वास होता. म्हणून ती त्याचं सगळं बोलण समजून घेत होती.

मघापासून दूर उभे असणारे साधू त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले,

"महादेव तुमच्या जोडीचं रक्षण करो. यावेळी तुम्हाला कोणीच वेगळं करू शकणार नाही. पण तुम्हाला वेगळं करण्यासाठी तुमचा शत्रू नक्की तुमच्यावर चाल करून येईल. पण तुम्ही त्रिशूलपासून दूर जाऊ नका. त्याच्या सोबत रहा. म्हणजे महादेवाचा तुमच्यावर कायम वरदहस्त राहिलं."

विरेन चमकून म्हणाला,

"त्रिशूल? तो आता कसा हयात असू शकतो. त्याने तर इथेच समाधी घेतली आहे."

यावर उत्तर देत साधू म्हणाले,

"स्वतः त्रिशूल शरीराने तुमच्याबरोबर नसेल, पण त्याचा आत्मा अद्याप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तो तुम्हाला यश देऊनचं मुक्त होईल. त्रिशूलच्या वंशातील काही घोड्यांचं आम्ही जतन केलं आहे. त्यातील एक घोडा मी तुमच्यासाठी निवडला आहे. त्याचंही त्रिशूल असंच नामकरण केलं आहे. त्रिशूल त्याच्या रूपात तुमच्यासोबत असेल."


 

त्रिशूलचं समर्पण बघून विरेन भावुक झाला आणि म्हणाला,

"ऋषीवर! मी खरंच भाग्यवान आहे की तुमच्यासारखे लोक मला भेटले आणि तुमच्यामुळे मला माझा त्रिशूल पून्हा भेटणार आहे. तुमचे आभार कसे मानावे हेच मला समजेना झालंय."

यावर साधू म्हणाले,

"असं बोलून मला लाजवू नका. मी माझं कर्तव्य करत आहे. तेव्हा ज्या नराधमांनी आपल्या राज्यात खून,चोऱ्यामाऱ्या, दरोडे टाकले,लुटालूट केली,बायकांची अब्रू लुटली.तेच नराधम याजन्मीही तुम्हाला नक्की भेटतील. गतजन्मी त्यांनी तुम्हाला दगाफटका करून संपवलं होतं.पण यावेळी त्याचा हिशोब तुमच्यामार्फत पूर्ण होणार आहे. या जंगलातच ते तुम्हाला भेटतील.

या सगळ्या कारस्थानामागे कोण आहे,हे तुम्हाला त्या राजवाड्यात गेल्यावरच कळेल.तिथे गेलात की राजवाड्याच्या तळघरात असणाऱ्या देवी भद्रकालीच्या पायावर दोघांनीही एकदम माथा टेकलात तर तुम्हाला दोघांनाही सगळ्या गोष्टी स्पष्ट आठवतील आणि पुढील सगळी दिशा तुम्हाला देवी भद्रकालीच्या आशिर्वादामुळे सापडेल."


 

विरेन आणि तन्वी यांनी साधूंच बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं.

विरेन त्यांना म्हणाला,

"ऋषींवर!मी तुमचे आभार मानून तुम्हाला परकं करणार नाही. पण तुम्ही आम्हाला जे काही मार्गदर्शन केलंत याची परतफेड आम्ही नक्की करू."

साधू फक्त गालात हसले आणि त्यांच्या जवळ येत म्हणाले,

"त्या राजवाड्यात जाईपर्यंत तुमच्या वाटेत अनंत अडचणी येतील. पण एक गोष्ट लक्षात असुद्या की वाटेत कसलीही अडचण आली किंवा घोड्यावरून खाली उतरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तरी तुम्ही जास्तीतजास्त करून घोड्यावरून उतरणं टाळायला हवं."

तन्वी आणि विरेन दोघेही आता विचारात पडले.

तन्वी म्हणाली,

"ऋषींवर! आपणांस नक्की काय म्हणायचं आहे? घोड्यावरून खाली उतरल्यावर काय होणार आहे? कृपया आम्हाला याबद्दल काहीतरी मार्गदर्शन करा."

साधू पुन्हा गालात हसत म्हणाले,

"असं कोणतंच कोडं नाही की ज्याचं उत्तरं मिळत नाही.त्यामुळे तुमच्यापुढे असणारं संकट आणि त्यावरील उपाय मी तुम्हाला नक्की सांगेन."

विरेन म्हणाला,

"संकट!कोणतं संकट?"

साधू म्हणाले,

"जसंजसं तुम्ही राजवाड्याच्या जवळजवळ जाल,तसंतसं तिकडे जाण्यापासून राजवाड्याच्या वेशीवर तैनात असणारी शापित शक्ती तुमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न करेल. पण तुम्ही घोड्यावरून खाली उतरला नाहीत तर तुम्हाला काहीच भयं नाही.कारण त्रिशूलवर महादेवाचा वरदहस्त आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर स्वार असाल तोपर्यंत ती शक्ती काहीच करू शकणार नाही.पण तुमचा अगदीच नाईलाज झाला आणि घोड्यावरून उतरावं लागलं तर त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्याजवळ मंत्रानी सिद्ध केलेली एक मशाल आहे. जी काहीकाळ तुम्हाला मदत करू शकते. अगदी मुसळधार पाऊस जरी पडू लागला किंवा सोसाट्याचा वारा जरी आला तरी ती मशाल विझणार नाही. पण ती काहीवेळासाठीच तुमचं रक्षण करू शकेल. एकदा का ती मशाल विझली तर मग कोणीही तिला पुन्हा पेटवू शकणार नाही.म्हणून तिचा जपून आणि योग्यप्रकारे वापर करा."

साधूंनी ती मशाल विरेनकडे सोपवली.

विरेनने गुढग्यात वाकत ती मशाल स्वीकारली आणि आपल्या कपाळाला लावून तिला नमन केलं.

साधूंनी त्रिशूलला आवाज दिला आणि क्षणात वाऱ्याच्या वेगाने त्रिशूल तिथे हजर झाला.

आल्याआल्या त्याने दोन्ही पायावर उभा राहत आपल्या धन्याला म्हणजेचं विरेनला मानवंदना दिली.

ते पाहून विरेन त्याच्याकडे सरसावत त्याला कुरवाळत म्हणाला,

"त्रिशूल!माझा त्रिशूल."

 दोघांच्याही डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या, जणू कित्येक युगानंतर दोन जिवलग मित्र एकमेकांना भेटले होते.

वातावरण खूपच भावुक झालं होतं.

तेवढ्यात साधू म्हणाले,

"आता वेळ दवडू नका.ही मशाल नीट पाठीवर बांधा आणि त्रिशूलवर स्वार होऊन राजवाड्याच्या दिशेने कूच करा. पाठीमागून तुमच्या मागावर येणाऱ्या लोकांना मी अडवतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लवकर निघा, घाई करा. देवाधिदेव महादेव आणि आई भद्रकाली तुमच्या पाठीशी आहेत.यशवंत भवं,विजयीभवं!"

विरेन आणि तन्वीने एकमेकांकडं पाहिलं आणि डोळ्यांनी एकमेकांबद्दलचा विश्वास जाहीर केला.

विरेन त्रिशूलवर स्वार होतच त्रिशूलने आनंदाने पुढील दोन पाय हवेत उचलून एक जोरात खिंकाळी दिली आणि तो तयार झाला.

विरेनने एकाहाताचा आधार देऊन तिला आपल्यासमोर घोड्यावर बसवली आणि साधूंचा निरोप घेत त्रिशूलला टाच दिली.

त्रिशूल वाऱ्याच्या वेगाने जंगलात शिरला.

क्रमश:

विरेन आणि तन्वी त्या राजवाड्यात व्यवस्थित पोहोचतील का?

वाटेत त्यांना कोणकोणत्या संकटाना सामोरं जावं लागेल?

पोलीस आणि जंगलखातं त्यांच्या संकटात भर तर टाकणार नाहीत ना?

त्या अनामिक शक्तीचा सामना करत विरेन आणि तन्वी तळघरात असणाऱ्या देवी भद्रकालीच्या गाभाऱ्यात पोहोचतील का?

वरील प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी वाचत रहा,'जिवलगा.'


 

©® सारंग शहाजीराव चव्हाण

पुनाळ.कोल्हापूर.9975288835.


 

(माझी कथा आवडली तर नक्की आपला बहुमोल अभिप्राय कमेंट करा आणि माझ्या इतर कथा वाचण्यासाठी मला फॉल्लो करा, तसेच काही सूचना असतील तर हक्काने सांगा.त्यासाठी आपलं स्वागतच आहे. इथून पुढे वेळेवर भाग पोस्ट होतील.सर्व वाचकवर्गाचे मनःपूर्वक आभार.)

(सदर कथा सबस्क्रिप्शनमध्ये नसून शेवटपर्यंत वाचण्यासाठी पूर्णपणे मोफत आहे.)




 

🎭 Series Post

View all