जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-24.

गतजन्मीची प्रेमकहाणी.

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-24


 

जसजसा घंटानाद त्यांच्या कानावर येऊ लागला तसतसा सर्वांच्या अंगात जोश संचारला.

पण तन्वी आणि विरेन यांच्या मनात एक भीती अशी होती कि,'आपल्या आधी कोणती दुसरी टीम तर पोहोचली नसेल?घंटानाद कोण करत असेल?'

विरेन सर्वांना उद्देशून म्हणाला,

"फ्रेंड्स आपल्याला लवकर पुढे जायला हवं. आपण मंदिराच्या खूप जवळ आहोत. चला लवकरात लवकर हा बोगदा पार करून पुढे जाऊ."

एक एक करत सगळेजण बोगद्यामध्ये शिरले. आत कमरेएवढं पाणी होतं.

विरेन सर्वांना म्हणाला,

"सर्व मुलींनी इथेच थांबा. मी आणि काही मुलं पुढे जाऊन पाण्याचा अंदाज घेतो.आम्ही सांगितल्याशिवाय कोणीही पाण्यात उतरू नका."

विरेन आणि काहीजण त्या पाण्यातून मार्ग काढत पुढे गेले, जाताना त्यांना अधेमध्ये खोल खड्डे असल्याचं समजलं. त्यामुळे त्यांनी एका बाजूच्या भिंतीचा आधार घेत पुढे जायचं ठरवलं.त्या दगडी भिंतीमध्ये खाचा पाडलेल्या होत्या. म्हणजेच इथून पुढे जाण्यासाठी त्याचा आधार मिळावा म्हणून त्या केलेल्या असाव्यात.त्यांनी सोबत आणलेली रस्सी एकमेकांना जोडून ती बोगद्याच्या पलीकडच्या बाजूला बांधली आणि चाचपणी करून विरेनसह बाकीची मुलं परत आली.

रस्सीचं दुसरं टोक अलीकडच्या बाजूला बांधून विरेन म्हणाला,

"या रस्सीच्या साहाय्याने आपल्याला पुढे जायचं आहे.माझ्यासह एकदोघेजण सगळ्यात पुढे असू, आमच्या पाठीमागे सगळ्या मुली असतील आणि सगळ्यात मागे बाकीची मुलं असतील. तसेच कोणी मागे राहणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे."

एकमेकांना आधार देत सर्वांनी तो बोगदा पार केला.

बोगद्यातून बाहेर पडल्यावर समोर जे दृश्य दिसत होतं ते विलोभनीय होतं. सृष्टीचं ते मनमोहक दृश्य डोळ्यात मावत नव्हतं. समोर खोल दरी होती जी हिरव्यागार गर्द झाडीने आणि धुक्याने एकदम स्वर्गीय भासत होती. ढग खाली उतरल्यामुळे आपण स्वर्गात आहोत असाच भास होतं होता. सगळेजण ते अलौकिक सृष्टीसौंदर्य डोळ्यात भरून घेत होते. जिथवर नजर जात होती तिथवर निसर्गाचं अद्भुत रूप मनाला भुरळ घालत होतं. सगळेजण ते पाहण्यात इतके गुंग झाले होते कि आपण इथं कशासाठी आलो आहोत याचा सर्वांनाच विसर पडला. सगळेजण आपला मोबाईल बाहेर काढून फोटो आणि व्हिडीओ करू लागले.

अशातच विरेन तन्वीला म्हणाला,

"तन्वी!बघतेस ना किती सुंदर नजारा आहे? स्वर्ग म्हणतात तो हाच आहे का गं? बघ ना डोळ्यांचं पारणं फिटलं इथं येऊन."

तन्वी विरेनला म्हणाली,

"हो विरेन!किती रोमँटिक वातावरण आहे इथं. समोर पसरलेला अथांग निसर्ग, सळसळणारा वारा,अंगावर उडणारे पाण्याचे तुषार आणि यात आपण दोघे. वाह क्या सीन है."

विरेन म्हणाला,

"तन्वी!पुन्हा सुरु होऊ नको. काय उठसुठ रोमान्स. आपण इथे रोमान्स करायला आलो नाही. आपलं ध्येय वेगळं आहे."

तन्वी रागाने म्हणाली,

"तुला रोमान्सची ऍलर्जी आहे का रे? नेहमी असा कसा अनरोमँटिक राहतोस रे तू? एवढी सुंदर मुलगी तुझ्या मागेपुढे पिंगा घालत असते याच तुला काहीच वाटत नाही का?"

विरेन तिला चिडवण्यासाठी म्हणाला,

"रोमान्सची ऍलर्जी वगैरे काही नाही गं.पण माझ्यामागे पुढे कोणी सुंदर मुलगी मलातर आजवर दिसली नाही बुवा."

तन्वीने त्याच्या दंडावर एक जोरात बुक्की हाणली आणि म्हणाली,

"तुझे डोळे तपासून घे. बहुतेक जवळचा नंबर लागला आहे तुला."

ते दोघेही खळखळून हसू लागले.

इतक्यात तो घंटानाद पुन्हा ऐकू येऊ लागला. यावेळी त्याचा आवाज मोठयाने ऐकू येत होता.

विरेन मागे असणाऱ्या सर्वाना म्हणाला,

"फ्रेंड्स मंदिर इथंच कुठेतरी आहे. नीट लक्ष देऊन तो घंटानाद ऐका. तो नक्की कुठून येतोय तिथेच आपल्याला जायचं आहे."

सगळे शांतपणे तो आवाज ऐकू लागले.

विरेन आपले डोळे झाकून एकाग्रपणे त्या आवाजाचा वेध घेऊ लागला आणि त्याने तो वेध घेतलाच.

त्याने लक्षपूर्वक बोगद्याच्या वर निरीक्षण केलं तर त्याला वरती एक प्रवेशद्वारासारखं काहीतरी दिसू लागलं.

तो सगळ्यांना म्हणाला,

"फ्रेंड्स मंदिर सापडलं. वरती पहा. आवाज तिथूनच येतो आहे आणि तिथे कमानीसारखं काहीतरी दिसत आहे."

ती कमान सुमारे पंचवीस ते तीस फूट उंचीवर होती.

आता पुन्हा हा प्रश्न उद्धभवला कि एवढ्या वर जायचं तरी कसं?

तन्वी म्हणाली,

"मंदिर तर सापडलं, पण आता तिथंवर जायचं कसं? नक्की तिथंवर जायला मार्ग कुठे आहे?"

प्रत्येकजण आपापला अंदाज व्यक्त करू लागले.

त्यातील कोणी एकजण म्हणालं कि,

"आपण दहीहंडीसाठी बनवतो तसा मानवी मनोरा बनवू.त्यावरून एकजण वरती जाईल आणि मग रस्सीद्वारे आपण एकेकाला वर खेचून घेऊ."

 बऱ्याचजनांना हा पर्याय योग्य वाटला आणि त्यादृष्टीने सर्वांनी मनोरा बनवायला सुरवात केली.बाकी मुलांनी एक दोन थर बनवले तरी विरेनचं तिकडं लक्ष नव्हतं.

तो बहुदा काहीतरी वेगळा विचार करत होता.तो आपल्या बारीक नजरेने लक्षपूर्वक सगळा परिसर न्याहाळू लागला. मंदिरात पोहोचण्यासाठी आजूबाजूला काहीतरी व्यवस्था नक्कीच असणार,अशी त्याला खात्री होती. आणि अचानक त्याच्या डोळ्यापुढे वेगवेगळे प्रसंग फेर धरू लागले. वेगवेगळ्या अस्पष्ट आकृत्या समोर नाचू लागल्या.त्या शिवमंदिरातील शिवलिंग त्याला दिसू लागलं. त्याची पूजा करताना एक जोडपं धुसर दिसू लागलं आणि त्याचं डोकं गरगरू लागलं. डोळे गरगरा फिरू लागले. सगळी पृथ्वी उलटीपालथी होतं आहे असं त्याला वाटू लागलं.

तो डोकं पकडून मटकन खाली बसला.त्याची ही अवस्था बघून कोणालाच काही सुचेना. जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता.तन्वीला तर रडू कोसळलं होतं.

ती त्याला आपल्या कुशीत घेऊन म्हणाली,

"विरेन!ए विरेन!काय होतंय तुला? असं का करत आहेस तू? बोल ना काय होतय तुला? ए राजा!विरु!अरे काय होतय सांग ना?कसला त्रास होतोय? प्लीज बोल ना काहीतरी."

तरी तो काहीच बोलत नाही हे पाहून ती रडू लागली.

इतक्यात प्रीती पुढे आली आणि तन्वीला धीर देत म्हणाली,

"तन्वी घाबरू नको. त्याला थोडंसं साखरपाणी पाजूया. मला वाटत त्याने मार्गातील झूडपं तोडल्यामुळे तो थकला असावा. डोन्ट वरी तू शांत हो."

इतक्यात कोणीतरी साखरपाणी घेऊन आलं.

प्रीती त्याला ते पाणी पाजू लागली. थोड्या वेळाने त्याने हळूहळू डोळे उघडले आणि तो इकडेतिकडे पाहू लागला.

प्रीती म्हणाली,

"विरेन! आता बर वाटतंय का रे?"

तो प्रीतीच्या तोंडाकडे बघत राहिला.

मग तन्वी म्हणाली,

"विरेन! तू अस काय करत होतास? तुझं डोकं दुखतंय का? अशक्तपणा जाणवतोय का?"

विरेन काहीच बोलत नव्हता. फक्त आजूबाजूला नजर फिरवत होता.

थोड्याच वेळात तो तिथून उठला आणि वाटेत आडवे उभे असणाऱ्यांना ढकलत एका दिशेला निघाला.

सर्वांना वाटलं कि विरेनला भूतबाधा वगैरे काहीतरी झालं आहे. जंगलातल्या भूताने त्याला झपाटलं आहे.

सगळेजण तर्कवितर्क लावू लागले.

इतक्यात विरेन दरीच्या कड्याला लागूनच असलेल्या एका झुडपात शिरला

आणि आपल्या जवळच्या कोयत्याने सपासप ते झुडुप तोडून त्यातून पुढे जाऊ लागला.

ते झुडुप काटेरी होतं तरीही विरेन त्या झुडपात शिरला हे पाहून सर्वांना खात्री झाली कि विरेनला जंगली भुताने झपाटलं आहे.

तन्वीसुद्धा विचारात पडली होती.

विरेन त्या झुडपातून पलीकडे गेला, म्हणून तन्वी दबकत त्याच्या पाठीमागे गेली. तर विरेन एका मोठ्या गोलाकार दगडाकडे पहात काहीतरी विचार करत होता.

बाकीचे सगळेसुद्धा तन्वीच्या पाठोपाठ तिकडे पोहोचले.

त्यांना पाहून विरेन त्या मोठ्या गोलाकार दगडाला हात लावला आणि म्हणाला,

"फ्रेंड्स!कदाचित हा दगड इथून बाजूला हलवला तर याच्या मागून मंदिरात जायला एक वाट आहे."

हे ऐकून सगळे विचारात पडले.

तेव्हा तन्वी विरेनला म्हणाली,

"विरेन! तू हे कस काय सांगू शकतोस कि याच्या पाठीमागून वाट आहे."

विरेन म्हणाला,

"काय बरोबर काय चूक हे मला माहित नाही, पण मघाशी मला तसा भास झाला. वेगवेगळ्या आकृत्या आणि प्रसंग अंधुकपणे डोळ्यासमोर दिसत होते. त्यात मला हे मंदीर आणि तिथे पोहोचण्याचा मार्गही दिसला. म्हणून मला वाटत आपण हा दगड हलवून पाहूया."

सगळेजण आपापसात कुजबुज करू लागले.

तन्वीने थोडा विचार केला आणि ती म्हणाली,

"ठिक आहे. आपण एक प्रयत्न करूया.सर्व मुलांनी पुढे या आणि विरेनला दगड हलवण्यात मदत करा."

सगळी मुलं पुढे आली आणि तो दगड हलवण्याचा प्रयत्न करू लागली. दगड जागेवरून हलत होता पण आपली जागा सोडायला तयार नव्हता.इकडे यांचे प्रयत्न चालू होते तोपर्यंत अश्विनची टीम तो दगडी बोगदा पार करून पुढे आली होती.

तन्वीला कोणीतरी आल्याची चाहूल लागली म्हणून तिने थोडं मागे येऊन पाहिलं तर अश्विन, सम्राट आणि त्यांची टीम तिथवर पोहोचली होती. कदाचित ते यांच्या टीमवर लक्ष ठेऊनच होते आणि यांनी बनवलेल्या वाटेने विनासायास ते मंदिराच्या दिशेने आले होते.

अश्विनच्या टीमलाही शिवमंदिर कुठे आहे हे समजलं होतं. त्यांचीपण मंदिरापर्यंत पोहोचण्याची योजना सुरु झाली.

अश्विनला एक सोपी कल्पना सुचली आणि त्यांनी शेजारीच असणाऱ्या एका झाडाला रस्सी बांधली. त्यानंतर ते झाडं तोडायला सुरवात केली. ते झाडं मंदिराच्या दिशेला पडून त्यावरून वरती जाण्याची त्यांची योजना होती.

त्यांची योजना लक्षात आल्यावर तन्वीच्या टीममधील काहीजण म्हणाले कि आपल्याला ही कल्पना आधी का सुचली नाही?हा दगड हलवणं सोडा. आपण तसेच एखादं झाडं तोडून ते भिंतीला उभं करून वरती जाऊ."

तन्वी त्यांना नियम समजावत म्हणाली,

"आपल्याला सरांनी काय सांगितलंय माहित आहे ना? कि वनसंपदेला धक्का पोहोचवायचा नाही. एवढं मोठं झाडं तोडून आपल्याला तो नियम तोडायचा नाही. तेव्हा विरेन म्हणतो तस करू. कदाचित त्याला झालेला भास हा दैवी साक्षात्कार असू शकतो."

हे ऐकताच सगळी मुलं पुन्हा तो दगड हलवण्याचा प्रयत्न करू लागले.

तन्वी आणि बाकी मुली त्यांना प्रोत्साहन देत होत्या. पण तो दगड काही जागा सोडत नव्हता.

पण इकडे अश्विनच्या टीमने जवळपास ते झाडं सगळं तोडत आणलं होतं. केव्हाही ते झाड पडेल आणि अश्विनसह सगळी टीम त्याच्या आधारे वरती जातील अशी परिस्थिती होती.

नक्की कोण बाजी मारेल?

विरेनचे प्रयत्न जिंकणार कि अश्विन नियम तोडूनही जिंकणार?

त्याला दगडामागून खरंच एखादा मार्ग असेल का?

तो दगड बाजूला करण्यासाठी काय करावं लागेल?

अशा असंख्य प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आणि रहस्यमयी थरार अनुभवण्यासाठी वाचत रहा."जिवलगा"

क्रमशः

©®सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर. 9975288835.


 

🎭 Series Post

View all