जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग- 18

गोष्ट पुनर्जन्माची

जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग-18

कथेचा आजवरचा सारांश-

-आजवर आपण पाहिलत, तन्वीची कॉलेजमध्ये दमदार डॅशिंग एंट्री, त्यानंतर तिची एका विचित्र घटनेतून अश्विनशी ओळख आणि पुढे मैत्री, कॉलेजमधील टवाळखोर गुंड सम्राटशी तन्वीचा वाद, एकेदिवशी तन्वीच्या सॅकमध्ये सापडलेली धक्कादायक वस्तू, त्यानंतर ती वस्तू ठेवणारा सापडलेला गुन्हेगार,अश्विन आणि सम्राटमध्ये बाचाबाची आणि शर्यत जिंकण्याची पैज, पण अचानक अनपेक्षितपणे शर्यत जिंकणारा विरेन, त्याची फॅन बनलेली तन्वी, दोघांत वाढणारी जवळीक, स्नेहसंमेलनादिवशी विरेनचा अपघात, त्यांनतर तन्वीचा पपेट शो, त्यात मिळणारा विशेष पुरस्कार. रिकव्हर होऊन पुन्हा कॉलेज जॉईन केलेला विरेन आणि आता पुढे……….

स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यामुळे प्राध्यापकवृंद तसेच सहभागी विद्यार्थी यांना खूप आनंद झाला होता. संमेलनात पहिल्यांदाच पपेट शो सारखा वेगळा प्रकार सादर केल्याबद्दल तन्वीचं सर्वत्र कौतुक होत होतं.

इकडे विरेनही दुखापतीतून हळूहळू रिकव्हर होत होता.तन्वी त्याला अधूनमधून भेटायला जातं होती आणि कॉलेजमधील सगळ्या घडामोडी त्याला सांगत होती.

असेच दिवस भुर्रर्रकन उडून गेले. विरेन आता रेग्युलर कॉलेजला येऊ लागला. तन्वीने इच्छा व्यक्त केल्याप्रमाणे विरेन कॉलेजला आल्यावर संमेलनातील विशेष पुरस्कार त्याच्या हातात देण्यात आला.या सरप्राईझ मुळे तो पुरता भारावून गेला.विरेन आणि तन्वीच्या वाढत्या जवळीकतेमुळे अश्विनच्या मस्तकात दिवसेंदिवस ठिणगी पडत होती.

अशातच जंगल कॅम्पसाठी नोटीस निघाली.सर्व खेळाडू विद्यार्थ्यांसाठी हा जंगल कॅम्प म्हणजे एक अभ्यास दौरा होता. आपल्यातील शारीरिक क्षमता आणि कस वाढवणारा हा दौरा होता.

त्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही जाहीर करण्यात आली होती.

यात प्रामुख्याने, अश्विन, सम्राट, तन्वी आणि विरेन यांचाही समावेश होता.

जंगल कॅम्पची नोटीस वाचून तन्वी विरेनला म्हणाली,

"विरेन!आपण या जंगल कॅम्प अभ्यास दौऱ्यात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवू.मी खूप एक्सायटेड आहे."

विरेन म्हणाला,

"सॉरी तन्वी. पण मला नाही वाटतं की मी या कॅम्पमध्ये सहभाग घेऊ शकेन."

तन्वी कपाळावर आठ्या आणत म्हणाली,

"अरे!तुला काय प्रॉब्लेम आहे.तू येतोयस, बाकी मला काही माहित नाही."

विरेन म्हणाला,

"अगं तन्वी. मी अजून पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे मला हा कॅम्प खूपच अवघड जाईल. मी सपाट रस्त्यावर चालू शकतो, पण झाडाझुडपातून आणि डोंगरदऱ्यातून धावण्याइतपत मी अजून फीट नाहीये. कदाचित हा कॅम्प अजून एक दोन महिने लेट असता तर कदाचित मी येऊ शकलो असतो."

तन्वी नाराजीच्या सुरात म्हणाली,

"ओह शीट!काय यार विरेन? तू यायला हवं. तु दमलास तर मी तुला उचलून घेऊन जाईन.पण तू हवा यार माझ्यासोबत."

विरेनला हसू आवरेना.

तो जोरात हसत हसत म्हणाला,

"हाहाहाहाहाहाहा आई शप्पथ.हाहाहाहाहाहाहाहा तन्वी हाहाहाहाहाहाहा."

तन्वी डोळे मोठे करतं म्हणाली,

"अय!हसायला काय झालं? मी काय इथं हास्यविनोद करतं आहे का?"

विरेन मोठया मुश्किलीने हसू आवरत म्हणाला,

"अगं एवढा एवढासा तुझा जीव आणि कॉन्फिडन्स तरी किती मोठा पहा."

तन्वी दातओठ खात म्हणाली,

"अय हिरो!काय केलं मी? एवढा माझा कॉन्फिडन्स काढण्यासारखं!"

विरेन म्हणाला,

"अगं तुझा पावशेर जीव आणि म्हणे तू दमलास तर मी तुला उचलून घेईन. हाहाहाहाहा."

तन्वी म्हणाली,

"अय पैलवान, तू असशील मोठा बॉडीबिल्डर पण मीपण जिम केलीये हे माहिती असुदे."

विरेन तिला चिडवत म्हणाला,

"तू आणि जिम केलीस?स्वप्नात केलीस का?"

तन्वी चिडत म्हणाली,

"तुला ना एक असा पंच देईन ना. गोल गोल फिरतं राहशील, मग समजेल तुला."

विरेन म्हणाला,

"दे पाहू तरी तुझा पंच कसा आहे?"

तन्वी म्हणाली,

"थांब तुला दाखवतेच. ढाई किलो का पंच."

असं म्हणून तन्वी दोन पाऊलं मागे सरली आणि हाताची मूठ वळून विरेनच्या दिशेने येऊ लागली.

इतक्यात विरेनने तिचा हात आपल्या हाताने पकडला आणि तिला गरकन फिरवून घट्ट मिठीत पकडली आणि म्हणाला,

"ओ तन्वी मॅडम कुठाय तुमचा पंच?"

विरेनच्या मजबूत पिळदार बाहुंची मिठी एवढी घट्ट होती की तन्वीला जागचं हलताही येईना. जाळ्यात सापडलेल्या मासोळीसारखी ती तळमळू लागली आणि मिठी जास्तच घट्ट होतं गेली. दोघांमधून हवेलाही जायला जागा राहिली नव्हती. दोघांचेही गरम श्वास एकमेकांना भिडत होते.दोघांनाही एकमेकांच्या छातीचे वाढेलेले ठोके जाणवत होते.अनपेक्षितपणे मारलेली ती मिठी तन्वीला सुखावून गेली आणि तिने आपले डोळे मिटून घेतले. इतक्यात विरेन भानावर आला आणि त्याने एकदमच मिठी सैल केली तरी तन्वी डोळे मिटून उभी होती. विरेन एकदम तिच्यापासून बाजूला झाला आणि तन्वीचा तोल गेला.

ती खाली पडणार इतक्यात विरेनने तिचा हात हातामध्ये पकडत तिला सावरलं.

तन्वी अजूनही त्या स्वप्नवत मिठीतच रमलेली होती.

विरेन तिला हाक देऊ लागला,

"तन्वी!अगं ये तन्वी!डोळे उघड."

असं म्हणून तो तिला गदागदा हलवू लागला. मग तन्वी भानावर आली आणि झाला प्रकार लक्षात आल्यावर ती स्वतःशीच लाजू लागली.

तिला आणखी चिडवत विरेन म्हणाला,

"अच्छा!तर असा असतो तुमचा पंच. घाबरलो बाबा मी तरी. हाहाहाहा."

तन्वी लाजून गालात हसतच तिथून कॉलेजच्या दिशेने पळत सुटली.

इकडे विरेनसुद्धा गालातल्या गालात हसत होता.

आणि मनातल्या मनात तो बोलूं लागला.

"किती निरागस आणि गोड आहे की मुलगी. क्षणभर मलाही तिचा मोह झाला होता.पण मला अशा मोहात अडकून चालणार नाही. पण माझ्या मनात नसतानाही दिवसेंदिवस मी तिच्याकडे का आकर्षित होतं असेन?"

असा विचार करतं करतं तो कॉलेजच्या दिशेने निघाला.

तन्वी क्लासरूममध्ये पोहोचल्यावर विचार करू लागली,

"माझ्याकडून काही चूक झाली का? तो माझ्याबद्दल काय विचार करतं असेल? मी वाईट मुलगी आहें असं त्याला वाटलं असेल का?"

इतक्यात विरेनही क्लासरुममध्ये आला.त्याची आणि तन्वीची नजरानजर झाली आणि तन्वीने नजर चोरली.ते पाहून विरेन आणखी गालात हसू लागला आणि मनोमन म्हणाला,

"वेडी रे वेडी. किती लाजते."

या विचारातच तो आपल्या जागेवर जाऊन बसला.

एक एक करत सगळे लेक्चर पार पडले.कॉलेज सुटल्यावर नेहमी विरेनबरोबर बोलत स्टँडपर्यंत जाणारी तन्वी आज एकटीच सुसाट चालत निघून गेली. विरेनला तिचं हे वागणं खटकलं पण त्यामागचं कारणं त्याला माहीत असल्याने त्याने तिला जाऊ दिल. त्याला माहित होतं की थोडा वेळ द्यावा लागणार.म्हणून तोही आपल्या गावी निघून गेला.

बघता बघता जंगल कॅम्पला जाण्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता.

सरांनी यादीतील सर्वांना सूचना देण्यासाठी एकत्र बोलावलं होतं.

तिकडे जाण्यापूर्वी तन्वी विरेनशी बोलण्यासाठी त्याला शोधू लागली. त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता.सगळीकडे शोधून झालं तरी तो कुठेच दिसत नव्हता.शेवटी त्याला शोधत ती लायब्ररीत गेली तर विरेन तिथे बसला होता.

तन्वी त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली,

"अरे विरेन काय यार तू.मी तुला सगळीकडे शोधून कंटाळले आणि तू इथं पुस्तकात डोकं घालून बसला आहेस."

विरेन हसत म्हणाला,

"तन्वी मॅडम!पुस्तकात डोकं घातलं तरच डोक्यात पुस्तकं येत असतं आणि एकदा पुस्तक डोक्यात आलं की भविष्य उज्वल होतं असतं."

तन्वी हात जोडून म्हणाली,

"ओ मिस्टर तत्वज्ञानी.बस्स करा तुमचं तत्वज्ञान. अभ्यासावेळी अभ्यास करतेच मी. पण इतर ऍक्टिव्हिटीमध्येही सहभाग घेणं इम्पॉर्टन्ट असतं."

विरेन म्हणाला,

"घे ना मग.कोणी अडवलंय तुला."

तन्वी रागाने फुत्कारत जवळ जवळ ओरडूनच म्हणाली,

"विरेन!खूप झालं हा आता. तू मुद्दाम करत आहेस."

तन्वीचा आवाज ऐकून सगळे डिस्टर्ब् झाले.लायब्रेरियन मॅडमनी तन्वीकडे रागाने पाहिलं आणि म्हणाल्या,

"कृपया शांतता राखा. बाकीच्यांना स्वतःचा त्रास होऊ देऊ नका. ही अभ्यास करण्याची जागा आहे. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो बाहेर जाऊन सोडवा."

तन्वी खाली मान घालून म्हणाली,

"आय एम सॉरी मॅडम."

आणि तिने विरेनच्या हाताला पकडलं आणि म्हणाली,

"आता तू गुपचूप माझ्याबरोबर बाहेर चल. नाहीतर मी अजून जोरात ओरडेन."

विरेनला आता तिच्यासोबत जाण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. तन्वीने त्याला अक्षरशः खेचत बाहेर आणलं.

बाहेर आल्यावर ती त्याला म्हणाली,

"विरेन!थोड्याच वेळात जंगल कॅम्पसाठी जाणाऱ्या विध्यार्थ्यांची मीटिंग घेतली जाणार आहे आणि आवश्यक त्या सूचना केल्या जाणार आहेत. तरी तू त्या मीटिंगला यायचं आहेस आणि जंगल कॅम्पलासुद्धा यायलाच हवं तू."

विरेन हात जोडत म्हणाला,

"प्लीज तन्वी समजून घे, मी शंभर टक्के फिट नाहीये. मलाही यावंसं वाटत आहें पण माझा नाईलाज आहे."

तन्वी म्हणाली,

"ठीक आहे. मग मीपण जात नाही. तू नाहीस तर मी जाऊन काय करू?"

विरेन म्हणाला,

"तन्वी!वेडेपणा करू नको. माझी तब्येत बरी नाही म्हणून मी येत नाही. पण तुझा तसा काहीच प्रॉब्लेम नाही."

तन्वी नाक मुरडत म्हणाली,

"तू नको सांगू. माझं मी पाहून घेईन. तुला काळजी करण्याची अजिबात गरज नाही."

विरेन नाईलाजाने म्हणाला,

"तू असं ऐकणार नाहीस. चल ठीक आहे मी येईन मीटिंगला. पण तू असा हट्ट करणं सोडून दे. प्रत्येकवेळी असं अजिबात चालणार नाही."

तन्वीला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर अचानक वेगळीच चमक निर्माण झाली.

ती म्हणाली,

"थँक्स विरेन!चल आपण मीटिंगच्या ठिकाणी जाऊन बसू."

विरेन नाईलाजाने तिच्यासोबत चालू लागला.

दोघेही मीटिंग हॉलमध्ये पोहोचले. थोडयाच वेळात सगळे विद्यार्थी आणि शिक्षक स्टाफ तिथे हजर झालेत.

स्पोर्ट्सच्या सरांनी  आवश्यक त्या सगळ्या सूचना दिल्या आणि सगळ्यात शेवटी मुलांचे आणि मुलींचे टीम लीडर नेमण्यात आलेत. मुलींमधून तन्वीला तर मुलांमधून अश्विनला लीडर नेमण्यात आलं.

त्यांना पुढे बोलावून दोघांचं अभिनंदन करण्यात आलं. तन्वीला खूप आनंद झाला. तिने विरेनकडे पाहिलं तेव्हा विरेनने थम्सअप करून तिला शुभेच्छा दिल्या.

तन्वीला आणि अश्विनला काही विशेष सूचना देण्यात येत होत्या. इतक्यात विरेन तिथून निघून गेला.

सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर तन्वीने पाहिलं तर विरेन कुठे दिसत नव्हता. तिची नजर त्याला हॉलभर शोधत होती पण तो दिसला नाही.

ती त्याच्या शोधात बाहेर पडली पण तो निघून गेला होता.

तिने त्याचा मोबाईल ट्राय केला तर तो बंद होता.

तो असा अचानक निघून गेल्यामुळे ती उदास झाली.

"त्याचा संपर्क नाही झाला तर तो उद्या येणार आहे की नाही हे कसं समजणार? आणि आता आपल्याला टीम लिडर बनवल्यामुळे विरेन जरी आला नाही तरीही कॅम्पला जावंच लागेल." अशा विचारांनी तिला घेरलं होतं.

त्या विचारातच ती घरी निघून गेली.

रात्री झोपल्यावरसुद्धा तिच्या मनात विचार सुरु होते.

"विरेन येईल की नाही? तो आला तर आपल्याला खुपवेळ एकत्र घालवता येईल. त्या निसर्गरम्य झाडावेलीत, पानांफुलात, दऱ्याखोऱ्यात फिरताना किती छान वाटेल.

हिरवागार नजारा,

तो गार गार वारा,

अंगावर येईल शहारा,

त्यात प्रीतीचा उबारा.

आणि तो आलाच नाही तर…….?

तिने तेव्हाही त्याला फोन लावला, तर तो बंद होता.तो येईल की नाही हे आता उद्या सकाळी बस निघतानाचं कळणार होतं. अंथरुणावर तळमळत तळमळत तिचा पहाटे थोडा डोळा लागला होता इतक्यात आईने तिला हाक दिली,

"तनु!ये बाळं. अगं उठ. तुला आवरायला हवं. नंतर वेळ झाला तर तुझी धावपळ होईल."

तन्वी उठून आपलं आवरायला लागली. झोप न झाल्यामुळे तिच्या डोळ्यांत अजून झोप दिसत होती. तरीपण तिला आवरून लवकर निघणं गरजेचं होतं.

तिने बॅग रात्रीच भरून ठेवली होती.बाकीचं सगळं आटोपून आईला नमस्कार करून ती बाहेर पडली.

तन्वीकडे लिडरशिप दिली असल्यामुळे तिला वेळेत पोहोचणं गरजेचं होतं,म्हणून ती लगबगीने कॉलेजला पोहोचली.

एक एक करत सगळे विद्यार्थी आणि स्पोर्ट्सच्या सरांसह आणखी काही स्टाफ असे सगळेजण वेळेवर हजर झाले होते.

पण तन्वीची नजर विरेनला शोधत होती.सगळेजण आपापलं साहित्य बसच्या टप्पावर चढवत होते. तन्वी मात्र विरेनच्या मोबाईलवर कॉलवर कॉल लावत होती, पण कॉल लागत नव्हता. त्यामुळे तिचा मनस्ताप होतं होता.

सगळं साहित्य वरती ठेऊन सगळेजण बसमध्ये आपापल्या जागेवर जाऊन बसले. तन्वी मात्र विरेनच्या येण्याच्या रस्त्याकडे डोळे लावून बसली होती.बराच वेळ झाला पण विरेन काही आला नव्हता. तन्वीची खूप तळमळ होतं होती. आणखी थोडी वाट पाहू असं तिला वाटत होतं.

पण बसमधून सगळे तन्वीला हाक देऊ लागले. बसच्या ड्रायव्हरने बस सुरु केली आणि नाईलाजाने तिला बसमध्ये चढाव लागलं. बसमध्ये चढतानाही ती अजून वाकून पाहत होती,कारण तिला अजूनही वेडी आशा होती.ती शिंदे सरांना म्हणाली,

"सर!विरेन अजून आला नाही. थोडावेळ थांबूया ना."

शिंदे सर म्हणाले,

"तन्वी!हे कॅम्प म्हणजे फक्त भटकंती नव्हे. हा एक अभ्यास दौरा आहे. यात शिस्त आणि अनुशासन सगळ्यात महत्वाचं आहे.ज्याची सुरवात आतापासूनच झाली आहे. जो सुरवातीलाच हे पाळू शकत नाही त्याच्यासाठी आपण अजिबात थांबणार नाही आहोत."

तन्वी म्हणाली,

"सर त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला असेल. थोडावेळ वाट पाहूया ना."

शिंदे सरांनी ड्रायव्हरला आवाज दिला,

"ड्रायव्हर चला निघूया आपण."

ड्रायव्हरने सरांचा आदेश ऐकला आणि बस पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

सगळे खूप उत्सुक होते, पण तन्वी स्वतःशीच नाराज झाली होती. तसा तिला विरेनचा रागही आला होता. ती अजूनही खिडकीतून वाकून पाठीमागे पाहत होती. तिला असं वाटतं होतं की कुठूनतरी विरेन येईल.

पण बसने जसा हायवे गाठला तशी विरेनची येण्याची शक्यता धूसर होतं गेली. तन्वीने डोळे मिटले आणि पाठीमागे डोकं टेकून ती शांत बसली. पण मनात विचारांचं काहूर माजलं होतं.

क्रमशः 

©®श्री सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर.9975288835.

[तब्येत ठीक नव्हती त्यामुळे कथेचे भाग पोस्ट करायला वेळ झाला.त्याबद्दल मी दिलगीर आहे.तसेच इथून पुढचे भाग वेळेवर पोस्ट करीन अशी खात्री देतो.]

[कथेतील आगामी आकर्षण-

जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.

गतजन्म आणि या जन्मातील घटनांचा परस्पर संबंध.

एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]


 

🎭 Series Post

View all