जिवलगा-गोष्ट पुनर्जन्माची. भाग- 16.

गोष्ट पुनर्जन्माची.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-16.

[गोष्ट पुनर्जन्माची]

कॉलेजच्या स्नेहसंमेलनात आपल्याबरोबर परफॉर्मन्स देण्यासाठी तन्वीने विरेनकडे हट्ट केला होता. प्रथमत: त्याने तिला नकार दिला, पण तिच्या डोळ्यातील पाणी बघून त्याने आपला निर्णय बदलला आणि तो त्यासाठी तयार झाला.

विरेन आणि तन्वीने सादर करत असलेल्या डान्सची प्रॅक्टिस सुरु केली.

सुरवातीला कोणालाच माहित नसलेली ही गोष्ट आता सगळ्या कॉलेजमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. बघता बघता ही बातमी अश्विनपर्यंत पोहोचली. त्याला तर विश्वासाचं बसेना की, तन्वीने आपला ग्रुपडान्स डावलून विरेन बरोबर स्वतंत्र डान्स करायचं ठरवलं आहे.

त्याच्या मनात विरेनबाबत आधी राग होता पण आता त्याच रूपांतर द्वेषात झालं होतं.तो त्याला पाण्यात पाहू लागला होता. तन्वीचं प्रेम मिळवण्याचं त्याच स्वप्न धुळीस मिळताना त्याला दिसत होतं. त्यामुळे त्याचा तिळपापड होतं होता.आपल्या ग्रुपच्या डान्सच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचं लक्ष लागत नव्हतं.

स्नेहसंमेलन जसं जसं जवळ येत होतं, तसं तसं सर्वत्र उत्साहाचं वातावरण झालं होतं.प्रत्येकालाचं ते स्टेज गाजवायचं होतं. त्यापरीने सगळ्यांची मेहनत सुरु होती.पण अश्विनचं सगळं लक्ष तन्वी आणि विरेनकडे होतं.

त्याच्या मनात विचारचक्र सुरु होते,

"तन्वी आणि विरेन कोणतं गाणं घेतील? त्यांचा परफॉर्मन्स आपल्यापेक्षा वरचढ झाला तर काय करायचं?काहीही झालं तरी त्यांचा परफॉर्मन्स आपल्यापेक्षा चांगला होता कामा नये. त्यांच्यापेक्षा आपला परफॉर्मन्स बेस्टच असायला हवा आणि तन्वीला आपल्या निर्णयाचा पश्चाताप व्हायला हवा."

इकडे तन्वी आणि विरेन मात्र आपल्या डान्स प्रॅक्टिसमध्ये अजिबात कसूर करत नव्हते. त्यांची कोणाशीही स्पर्धा नव्हती. तन्वी तर फक्त विरेन तिच्या सोबत आहे म्हणूनच खूप आनंदी होती आणि विरेन तन्वी आनंदी आहे हे पाहून खूष होता. दोघांनाही कळत नव्हतं,की ते दोघेही एकमेकांकडे का आकर्षित होतं आहेत. दोघांनाही अधूनमधून विचित्र भास होतं होते.ज्यांची उत्तरं दोघांकडेही नव्हती. कदाचित येणारा काळ त्यांना ती उत्तरं देणार असावा,पण दोघांना एकमेकांचा सहवास आवडत होता.


 

असेच दिवस पुढे ढकलत होते आणि बघता स्नेहसंमेलन उद्यावर येऊन ठेपलं होतं.

त्यामुळे आज सगळयांची रंगीत तालीम होणार होती.

एकीकडे अश्विन आणि ग्रुप जोरदार तयारी करतं होता, तर दुसरीकडे तन्वी आणि विरेन उद्याच्या दिवसाची रंगीत तालीम करण्यात गुंग होते.

 दोघांनीही आपली वेशभूषा अंगावर चढवली होती.

तन्वीने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता त्यावर सोनेरी रंगाची चुनरी कमरेला बांधली होती.नाकामध्ये बारीकशी नथनी,कानात झुमके, गळ्यात नेकलेस,तिने अगदी अप्सरेला लाजवेल असा शृंगार केला होता.

तर विरेनने पांढरा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यावर सोनेरी कलरचं जॅकेट घातलं होतं, त्यामध्ये तो अक्षरशः रुबाबदार दिसत होता.

दोघांनीही आपापली पोझिशन घेतली आणि गाणं सुरु झालं,

"बिन साजन झुला झुलू, मैं वादा कैसे भुलू?

जी करता है ये मेरा, मैं उडके गगनको छुलूl"

दामिनी फिल्म मधील या सुपरहिट गाण्यावर दोघांनीही फेर धरला आणि अगदी अमीर खान आणि मीनाक्षी शेषाद्रीलाही लाजवेल अस अप्रतिम नृत्य दोघांनीही सादर केलं. उपस्थित असणाऱ्या कोरिओग्राफरने दोघांचंही खूप कौतुक केलं आणि उद्याच्या परफॉर्मन्सबद्दल शुभेच्छा दिल्या.

तो म्हणाला,

"विरेन आणि तन्वी, तुमच्या दोघांची केमिस्ट्री मस्तच जुळून आलीये. असाच परफॉर्मन्स उद्याच्या स्टेजवर दिलात तर सगळीकडे तुमच्याच नावाचा बोलबाला होईल. बेस्ट लक उद्यासाठी! आता डायरेक्ट स्टेजवरच भेटू."

विरेन आणि तन्वीने त्याचे आभार मानले आणि कोरिओग्राफर निघून गेला.

तन्वीने विरेनचा हात पकडला आणि म्हणाली,

"थँक्स विरेन!तू माझ्या शब्दाला मान देऊन माझ्यासोबत डान्स साठी तयार झालास."

विरेन हसत म्हणाला,

"तन्वी!खरं तर मी या डान्स वगैरेपासून चार हात दूर असतो आणि मी तुला स्पष्ट नकारच दिला होता.पण तुझ्या डोळ्यांत अश्रू पाहिले आणि मला काय झालं माहित नाही? पण मला हृदयातून कसतरीच झालं. म्हणून मी तुला डान्ससाठी होकार दिला."

तन्वी त्याला म्हणाली,

"विरेन!मला माहित आहे.तू असा झगमगाटापासून दूरच असतोस आणि तुझे कोणी खास असे मित्र पण नाहीत.'आपण भले आणि आपले काम भले' या विचारधारेप्रमाणे तू जगत आला आहेस. पण आपल्याला समाजाच्या मूळ प्रवाहात येणं खूप गरजेचं असतं. स्वतःला अशा मर्यादित चौकटीत बंदिस्त करू नको.चारचौघात मिळून मिसळून जगायला हवं. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यायला हवा.मैत्री या संकल्पनेची अनुभूती घेता यायला हवी. मग बघ आयुष्य अजून सुंदर होईल."

विरेन तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागला.

तन्वी त्याला म्हणाली,

"अय हॅलो!असं काय बघतोस माझ्याकडे?"

विरेन म्हणाला,

"तन्वी! अगं किती सुंदररित्या समजावून सांगतेस.एक प्रोफेसर म्हणून तुझं खूप छान करियर होईल.पण प्रोफेसर झालीस तर आतासारखा डॅशिंग स्वभाव थोडासा कमी करावा लागेल. नाहीतर दररोज एका विद्यार्थ्याला बडवून काढशील आणि बिचारे कॉलेज सोडून जातील."

असं म्हणून तो हसू लागला.

तन्वी डोळे मोठे करतं म्हणाली,

"विरेन!तू माझी स्तुती करतोयस की माझी खेचतो आहेस?"


 

विरेन म्हणाला,

"अगं जास्त स्तुती आणि थोडीशी मस्करी."


 

तन्वी म्हणाली,

"मला तर स्तुती कमी आणि मस्करी जास्त वाटतेय."

विरेन म्हणाला,

"बरं बाई!सॉरी म्हणतो मी पुन्हा नाही करणार मस्करी!"

तन्वी म्हणाली,

"अरे नाराज नको होऊ.चालेल मला!मीपण तुझी थोडी मस्करी केली."

दोघेही खळखळून हसू लागले. दोघांनाही हे कळतं नव्हतं की त्या दोघांच्या आयुष्यात असा अचानक कसाकाय बदल झाला?

कॉलेजमध्ये एवढी मुलं तन्वीवर मरायची. अर्थात तिला प्रत्यक्ष सांगण्याची हिम्मत आजवर अश्विन सोडला तर कोणाची झाली नव्हती. ती गोष्ट वेगळी. पण अशा कोणत्याही मुलाला भीक न घालणारी तन्वी!आता चक्क विरेनच्या सहवासासाठी तळमळत होती. आणि कोणत्याही मुलांमुलीत न मिसळणारा किंवा बाहेरच्या जगापासून अलिप्त राहणारा विरेन!तन्वीच्या डोळ्यांत अश्रू आल्यावर पाघळून गेला होता. तिला दुःख झालेलं त्याला बघवत नव्हतं.

तर या अशा दोघांनाही आपल्या आयुष्यात नक्की काय चाललंय? हे समजत नव्हतं.पण त्याचंही काही खास कारण होतं. येणाऱ्या काळात खूप विलक्षण गोष्टी घडणार होत्या आणि त्याचबरोबर बऱ्याच गोष्टींवरून पडदा उठणार होता.पण ती वेळ अजून थोडी दूर होती.

तन्वी आणि विरेन आपली डान्स प्रॅक्टिस आटोपून घरी निघून गेले.

त्यांचा जो कोरिओग्राफर होता तोच अश्विनच्या ग्रुपचा कोरिओग्राफर असल्याने तन्वी आणि विरेन याच्या रंगीत तालमीची बातमी त्याच्यामार्फत अश्विनपर्यंत पोहोचली.

कोरिओग्राफरने त्याच्यासमोर विरेन आणि तन्वीचं कौतुक केल्यामुळे अश्विन जास्तच बिथरला.तो प्रॅक्टिस सोडून बाहेर गेला आणि त्याने एक कॉल लावला. थोडावेळ बोलल्यानंतर तो आतमध्ये आला.बाहेर जाताना त्याच्या चेहऱ्यावर राग होता तो आत येताना दिसत नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.हा आनंद कसला होता कोण जाणे?

थोड्याच वेळात त्यांचीही रंगीत तालीम पार पडली आणि सगळे उद्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊन घरी निघून गेले.

इकडे तन्वीने घरी पोहोचल्यावर आईशी उद्याच्या परफॉर्मन्स आणि रंगीत तालीम विषयी चर्चा केली आणि उद्या कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रह केला. नाही होय म्हणत म्हणत आई येण्यासाठी तयार झाली.

त्यानंतर दैनंदिन कामे आटोपून त्या दोघीही झोपी गेल्या.


 

तन्वी अंथरुणावर पडल्या पडल्या विरेनबरोबरचा डान्स आठवत होती आणि त्याच्याबरोबर कल्पनाविश्वात गुंग झाली होती. अशातच तिची गाढ झोप लागली.

आणि पहाटे ठीक तीन वाजता ती अचानक जोरात ओरडत उठली.

तिच्या आवाजाने शेजारच्या खोलीत झोपलेली आई धावतच आतमध्ये आली.तिच्या पोटात भीतीने गोळा आला.

तिने धावत येऊन तन्वीच्या खोलीतली लाईट लावली आणि पाहते तो काय!तन्वी खूप घाबरली होती आणि ती घामाघूम झाली होती. तिचं अंग थरथर कापत होतं.

आईने तिला पोटाशी घेऊन धीर दिला आणि म्हणाली,

"ये बाळ!तनु!अगं काय होतंय तुला?तुझी तब्येत ठीक आहे ना?"

असेल म्हणत तिने तन्वीच्या कपाळाला हात लावून तिला ताप आलाय का?तपासून पाहिलं.

ताप वगैरे काही नव्हतं.

तन्वी तिला म्हणाली,

"आई!आई!त्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला पळत्या घोड्यावरून खाली पाडलं. त्यामुळे त्याला खूप लागलं आहे.आई!बघ ना किती रक्त आलंय. आपल्याला काहीतरी करायला हवं.माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे."

आणि ती जोरजोरात रडू लागली.

तन्वीच्या आईला ती काय बोलतेय?याचा काहीच संदर्भ लागत नव्हता.

ती तन्वीला म्हणाली,

"तनु बाळ!तू वाईट स्वप्न पाहिलंस का? शांत हो बघू आधी. तू आपल्या घरी आहेस आणि तुला वाटतं तसं इथं काहीच घडलं नाही. शांत हो बाळ शांत हो."

पण तन्वीच्या डोळ्यासमोरून ते दृश्य जातं नव्हतं. ती खूप प्रयत्न करत होती पण बराच वेळ तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर नाचत होता.

थोड्या वेळाने ती भानावर आली. तेव्हा तिला झाल्या प्रकारातलं काहीच माहित नसल्यासारखं वाटतं होतं.

ती आईला म्हणाली,

"आई!तू इथं काय करत आहेस? झोपली नाहीस का?"

आई हैराण झाली. पण वेळ सावरून नेत ती म्हणाली,

"नाही गं!झोप लागत नव्हती म्हणून आले तुझ्याकडे."

तन्वी हसत म्हणाली,

"अच्छा!असं आहे तर. घाबरट कुठली. भीती वाटते तर इथं माझ्याजवळच झोपत जा ना."

आई म्हणाली,

"अगं वेडाबाई!तुला अभ्यासात व्यत्यय नको,म्हणून मी दुसरीकडं झोपते.तुला माहित आहे ना?"

तन्वी म्हणाली,

"अगं आई!मस्करी केली मी. चल इथेच झोप आता."

आई म्हणाली,

"ठीक आहे."

थोड्याच वेळात दोघीही तिथं झोपी गेल्या.

रोज ठरल्या वेळेला उठून दोघीनीही आपलं कामकाज आटोपलं.

आज तन्वीच्या कॉलेजच स्नेहसंमेलन असल्याने स्वारी भलतीच खूष होती. नेहमीपेक्षा थोड्या जास्त वेगाने कामे आटोपून दोघी स्नेहसंमेलनाला जाण्यासाठी छान सजून तयार झाल्या. इतक्यात तन्वीला विरेनचा कॉल आला,

विरेन:हॅलो तन्वी!मी घरातून आता निघतोय. हॉलवर आलीस की मला कॉल कर."

तन्वी म्हणाली,

"ओके बॉस!मी पण आता निघतेय."

विरेन म्हणाला,

"ठीक आहे. ओके बाय."

तन्वी आणि तिची आई घरातून निघाल्या. थोड्याच वेळात त्यांना बस मिळाली आणि त्या त्यातून कॉलेजकडे निघाल्या.

इतक्यात प्रीतीचा तन्वीला कॉल आला,

प्रीती:हॅलो तन्वी!अगं विरेनचा ऍक्सीडेन्ट झालाय."

तन्वी ओरडून म्हणाली,

"काय? कुठे? कशाने? तो कुठेय आता?"

प्रीती म्हणाली,

"अगं त्याच्या बाईकला कोणीतरी धडक देऊन उडवलं. त्यामुळे त्याच्या पायाला आणि डोक्याला थोडा मार लागलाय. आता त्याला हॉस्पिटलला नेलंय."

तन्वी म्हणाली,

"तो कुठेय आता? कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं त्याला?"

प्रीती म्हणाली,

"स्वामी समर्थ हॉस्पिटल, पेठ नाक्याजवळ."

तन्वीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने  कसबसं आईला सगळं सांगितलं आणि बस स्टॉपवर थांबताच त्या उतरल्या आणि रिक्षाने स्वामी समर्थ हॉस्पिटलकडे धावल्या.

विरेनचा अपघात आणि तन्वीचं स्वप्न यांचा परस्पर काही संबंध असेल का?

विरेन अशा अवस्थेत तन्वी बरोबर परफॉर्मन्स देऊ शकेल का?

की परफॉर्मन्सच कॅन्सल होईल?

हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर.9975288835.


 

[तब्येत ठीक नसल्यामुळे कथेचे भाग पोस्ट करायला वेळ झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे.आपण समजून घ्याल अशी आशा आहे.]

[कथेतील आगामी आकर्षण--कॉलेजमधील रंगीबेरंगी दुनिया,

कॉलेज स्पोर्ट्स मधील घडामोडी,

स्नेहसंमेलनातील मज्जा-मस्ती,

जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.

गतजन्म आणि या जन्मातील घटनांचा परस्पर संबंध.

एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]










 

🎭 Series Post

View all