जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-9

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-9

जोशी मॅडम आणि देसाई मॅडम तन्वीची सॅक घेऊन स्टाफरूमकडे गेल्या. त्या पाठोपाठ तन्वीही तिकडे गेली.

आणि कॉलेजच्या लेडीज रूममध्ये खळबळ माजली.

हा सारा प्रकार एकदम धक्कादायक होता.बघता बघता लेडीज रूममधील ही बातमी सगळ्या कॉलेजमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि आपापसात तर्क वितर्क लावले जाऊ लागले.

जान्हवी आणि प्रीतीसह काही मैत्रिणींनी तन्वीच्या काळजीने स्टाफरूमकडे धाव घेतली.

स्टाफरूममध्ये सगळे सर आणि मॅडम उपस्थित होते. देसाई मॅडमनी तन्वीची सॅक टेबलवर पालथी केली तर त्यातून तो बॉक्स टेबलवर पडला.

सगळे सर अवाक झाले.

नाईक सर तन्वीकडे पाहत म्हणाले,

"तन्वी हे काय बघतोय मी? तुझ्या सॅक मध्ये सिगरेटचा बॉक्स? किती धक्कादायक आणि लाजिरवाणी गोष्ट आहे.हे शारदेचं पवित्र मंदिर आहे, अशाठिकाणी अशीं घटना घडते याची खरंतर लाज वाटायला हवी."

तन्वी त्यांना समजावत म्हणाली,

"सर!तो बॉक्स माझा नाही. माझ्या बॅगमध्ये तो कसा आला, हे मला माहित नाही."

नाईक सर म्हणाले,

"तन्वी! तुला मी एक चांगली सुसंस्कारित मुलगी मानत होतो. पण तू आज हे काय करून बसलीस?"

तन्वी केविलवाणा चेहरा करतं म्हणाली,

"सर माझ्यावर विश्वास ठेवा. मी असं काहीच केलं नाही. मला माहित नाही माझ्या सॅकमध्ये तो कोणी ठेवला आणि मी का आणीन असा बॉक्स?"

मराठी विषयांचे सहस्त्रबुद्धे सर म्हणाले,

"बाळ तन्वी!खरं काय खोटं काय ते तुलाच माहित. पण जर खरंच तू दोषी असशील तर ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे."


 

तन्वी म्हणाली,

"सर कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलत आहे.माझे वडील सीमारेषेवर जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य पार पाडत आहेत आणि त्यांनी मला खूप चांगले संस्कार दिले आहेत. हे असलं कृत्य त्या संस्काराच्या विरुद्ध आहे.निदान त्यांच्या संस्कारावरती तरी विश्वास ठेवा."

नाईक सर म्हणाले,

"जोशी मॅडम तुम्ही सांगा, नक्की काय काय घडलं?"

जोशी मॅडम सांगू लागल्या,

"मी आणि देसाई मॅडम इथे स्टाफरूममध्ये बसलो असताना आम्हाला इथल्या लँडलाईनवर एक फोन आला.पलीकडून एका व्यक्तीने सांगितलं की,

'तन्वी देशमुखच्या सॅकमध्ये सिगारेटचा बॉक्स आहे आणि ती लेडीज रूम मध्ये सगळ्या मुलींना सिगारेट पुरवते.तुम्ही आताच्या आता तिथे जाऊन तिची सॅक तपासा.' आणि तिकडून कॉल कट केला.मग मी आणि देसाई मॅडम लेडीजरूममध्ये गेलो आणि तन्वीची सॅक तपासली तर त्यात आम्हाला खरंच हा सिगरेटचा बॉक्स सापडला."

नाईक सर यावर म्हणाले,

"तन्वी!फोनवरील अनोळखी व्यक्तीने जशी माहिती दिली,ती खरी ठरली आहे. यावर तू काय बोलशील?"

तन्वी म्हणाली,

"सर!हा माझ्या विरोधात रचलेला कट आहे. यात मला मुद्दाम अडकवण्यात आलं आहे. तसं नसत तर फोन करणाऱ्या व्यक्तीला कसं माहित माझ्या सॅकमध्ये सिगारेटचा बॉक्स आहे? सर अहो, मलाच माहित नव्हतं मग त्या व्यक्तीला कसं माहित? याचाच अर्थ फोन करणाऱ्यानेच माझ्या सॅकमध्ये तो बॉक्स ठेवला असणार."


 

देसाई मॅडम मध्ये बोलत म्हणाल्या,

"तन्वी!तुझ्या विरोधात कोण कट रचू शकतं?यामध्ये कोणाचा काय फायदा असू शकतो?"

तन्वी म्हणाली,

"मॅडम काही दिवसापूर्वी मला सम्राट जाधवने जिन्यात अडवलं होतं आणि आपल्या ग्रुपमध्ये जॉईन हो म्हणून दबाव टाकत होता. मी त्याला नकार देताच त्याने'तुला महागात पडेल' अशीं मला धमकी दिली होती.त्यामुळे माझा त्याच्यावर संशय आहे."

नाईक सर शिपायाला म्हणाले,

"साळवी!जा आणि सम्राट जाधव कुठे असेल तिथून त्याला घेऊन इथे ये."

साळवी सम्राटला शोधायला गेला.

तोपर्यंत स्टाफरूममध्ये तर्कवितर्क लढवले जात होते.

थोड्याच वेळात साळवी एकटाच परत आला आणि म्हणाला,

"सर, सम्राट कॉलेजला आलेला नाही आणि त्याच्या मित्रांकडून असं समजल आहे की तो आजारी असल्यामुळे दोन दिवसापासून कॉलेजला आलेलाचं नाही."

नाईक सर म्हणाले,

"तन्वी!तू ज्याच्यावर आरोप केला आहेस, तो तर कॉलेजला आलाचं नाही.मग हे सगळं त्याने केलं,असं कसं म्हणू शकतेस? त्याने तसं करण्यासाठी इथं हजर तरी असायला हवा होता."

तन्वी थोडा विचार करून म्हणाली,

"सर अमेरिकेत 2001 ला वर्ल्ड ट्रेड सेंटरवर विमानाने धडक देऊन जो हल्ला केला गेला,तेव्हा ओसामा बिन लादेन त्या विमानात नव्हता. पण हल्ल्याचा सूत्रधार तोच होता. तसंच सम्राटचं इथं असणं गरजेचं नाही. तो बाकी लोकांकडून हे काम करून घेऊ शकतो."

तन्वीच्या हुशारी आणि  हजरजबाबीपणा मुळे सगळेच थोड्या विचारात पडले.

सहस्त्रबुद्धे सर म्हणाले,

"तन्वी!तुझ्या बोलण्यात पॉईंट आहे.पण तू निर्दोष आहेस हे तुला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा खरा गुन्हेगार समोर येईल."


 

यावर  नाईक सर म्हणाले,

"तन्वी!मी तुला चार दिवसाची मुदत देतो. यादरम्यान तू तुझं निर्दोषत्व सिद्ध करायला हवं.नाहीतर नाईलाजाने आम्हाला तुझ्यावर कारवाई करावी लागेल. कारण हे प्रकरण खूपच गंभीर आहे. आपल्या कॉलेजच्या रेप्युटेशनचा सवाल आहे, त्यामुळे यात काही कसूर केली जाणार नाही.तुझ्याकडे चार दिवस आहेत. तू आता जाऊ शकतेस."

तन्वी म्हणाली,

"सर!मी निर्दोष आहे, हे मी नक्की सिद्ध करेन."

तन्वी स्टाफरूम मधून बाहेर पडली तेव्हा बाहेर बऱ्याच मुलींचा गराडा होता.

तन्वीचं काय झालं? याची त्यांना उत्सुकता होती.

जान्हवी आणि प्रीती तन्वीला धीर देत म्हणाल्या,

"तन्वी!आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आम्हाला माहित आहे तू निर्दोष आहेस."

तन्वी म्हणाली,

"तुम्ही माझ्याबरोबर आहात म्हटल्यावर मी नक्की सहीसलामत सुटेन,यात शंका नाही.पण आता वेगवान हालचाली करून खरा गुन्हेगार शोधून काढायला हवा. तरच मी पूर्णपणे निर्दोष सिद्ध होईन."

बघता बघता हा विषय कॉलेजभर झाला होता,

अश्विनला ही घटना कळताच तो तन्वीला शोधत तिच्यापर्यंत आला.

अश्विन म्हणाला,

"तन्वी!काय झालं? तुझ्या सॅकमध्ये तो बॉक्स कसाकाय सापडला?"

तन्वी कपाळावर आठ्या पाडत म्हणाली,

"अरे यार!मलापण कळेना झालय की तो बॉक्स तिथे कसा आला."

अश्विन म्हणाला,

"तन्वी!मला तुला या संदर्भात काही गोष्टी विचारायच्या आहेत. पण इथं नको थोडं बाजूला जाऊया."

तन्वी म्हणाली,

"अश्विन!मी बघेन काय करायचं ते. उगाच तूला त्रास नको."

अश्विन थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला,

"तुला मी आधीच सावध केलं होतं,पण तू तेव्हाही माझं ऐकलं नाहीस.किमान आज माझं ऐकून घे.मी तुला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतो.

एक मित्र म्हणून तेवढं करू देशील ना?"

अश्विन तन्वीच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता, त्याच्या डोळ्यात तन्वीला काळजी आणि आपुलकी दिसून आली.

तन्वी म्हणाली,

"ठीक आहे! तू सांग,काय करायचं आता?"

अश्विन म्हणाला,

"सकाळपासून काय काय घडलं ते मला सविस्तर सगळं सांग. म्हणजे सॅक कुठे ठेवली होती का? किंवा गर्दीत धक्काबुकी वगैरे काही झाली, असं काही घडलं का?त्यातूनच काहीतरी धागा आपल्या हाती लागेल."

तन्वी सांगू लागली,

"मी नेहमीप्रमाणे बसने सकाळी कॉलेजला आले,बसमध्येतरी असं काही घडलं नाही. कॉलेजमध्ये आल्यावर मी लेडीज रूममध्ये गेले,तेव्हा तिथे काही मुलींची आणि माझी धडक झाली. तिथे त्यांनी माझ्याबरोबर थोडी बाचाबाची केली. पण काही सिनियर मुलींच्या मध्यस्थीने तो वाद मिटला आणि त्या मुली बाहेर निघून गेल्या. इतक्यात मॅडम आल्या आणि त्यांनी माझी सॅक तपासली. त्यात त्यांना सिगारेटच्या पॅकेटचा बॉक्स सापडला."


 

अश्विन विचार करत म्हणाला,

"तन्वी!तुझी ज्यांच्याशी धडक झाली त्यांना तू ओळखू शकतेस का? कोण होत्या? कोणत्या वर्षात शिकत आहेत वगैरे काही माहित आहे का?"

तन्वी म्हणाली,

"नाही रे!मी त्यांना ओळखत नाही. पण त्या सम्राटच्या ग्रुपमधील असाव्यात असा माझा अंदाज आहे."

अश्विन म्हणाला,

"तुला खात्री आहे का? म्हणजे त्यांच्या ग्रुपमेंबर्सच्या हातावर टॅटू असतो. तसा काही होता का?"

तन्वी म्हणाली,

"टॅटू होता की नाही याकडे माझं लक्ष गेलं नसावं.पण असतीलही, काही नक्की सांगता येत नाही."

अश्विन तिला म्हणाला,

"तन्वी!तू टेन्शन घेऊ नको. मी माझ्या पद्धतीने या सगळ्याचा छडा लावतो."

तन्वी म्हणाली,

"अश्विन!जे काही करशील ते जपूनच कर.त्या सम्राटपासून सावध राहून कर. तुला काही त्रास झाला तर मला ते आवडणार नाही."

तन्वीला आपली काळजी आहे हे पाहिल्यावर अश्विन आतल्या आत सुखावून गेला.त्याच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. तो फक्त गालातल्या गालात हसू लागला.

त्याला हसताना पाहून तन्वी म्हणाली,

"काय रे!हसायला काय झालं?"

अश्विन भानावर आला आणि म्हणाला,

"अगं काही नाही. असच हसत होतो."

तन्वीही हसत म्हणाली,

"वेडा कुठला!उगाचच हसतो."

त्याच्या डोक्यावर टपली मारून ती  तिथून आपल्या मैत्रिणींमध्ये निघून गेली.

सम्राटसुद्धा आपल्या ग्रुपमध्ये गेला.

ग्रुपमधील मित्र मैत्रिणींना त्याने तन्वीच्या बाबत घडलेली हकीकत सांगितली.

आणि त्यांनी सर्वांनी मिळून एक योजना आखली.

अश्विन त्या योजनेनुसार एकेक पाऊलं टाकत गेला 

आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची योजना फळाला आली.

अश्विनला खूप आनंद झाला,कारण त्याने तन्वीला निर्दोष सिद्ध करणारा पुरावा शोधला होता आणि खरा गुन्हेगारही आता जास्त दूर नव्हता.

तन्वीला ही माहिती देण्यासाठी अश्विन तिला कॅम्पसमध्ये शोधत होता,पण तोपर्यंत ती घरी गेल्यामुळे तो तिला प्रत्यक्ष सांगू शकला नाही.

 मग त्याने तन्वीला कॉल केला आणि सांगितलं,

अश्विन: 

"हॅलो तन्वी!"

तन्वी:

"हॅलो!बोल अश्विन."

अश्विन:

"कुठं आहे तू?तुझ्यासाठी एक खुशखबर आहे.तुझ्या सॅकमध्ये बॉक्स ठेवणारी व्यक्ती मला सापडली आहे."

तन्वी:(अधीरपणे)

"काय!कोण आहे ती व्यक्ती? सम्राटच आहे ना? मला माहीत होतं तोच असणार."

अश्विन:

"नाही तन्वी!ती व्यक्ती सम्राट नाही. दुसरीचं आहे."

तन्वी:

"सम्राट नाही, तर मग कोण आहे?"

अश्विनने तन्वीला त्याच नाव सांगितलं.

अश्विन:

"त्या व्यक्तीचं  नाव आहे  xxxxxxxxxxxxxx.  बॉक्स प्रकरणातील सूत्रधार हीच व्यक्ती आहे.बाकीचं तू उद्या कॉलेजला आल्यावर सांगीन."

तन्वी आश्चर्यचकित झाली.

तन्वी:

"बापरे!मला तर याची कल्पनाही नव्हती.धन्यवाद अश्विन,तुझे आभार कोणत्या शब्दात मानावे हेच मला कळतं नाहीये."

अश्विन:

"अरे!आभार मानून मला परकं करू नको. आपल्यात मैत्री आहे आणि

 मी जे काही केलं ते मैत्रीखातर केलं."

तन्वी:

"हो बाबा!मी माझे आभार परत घेते. पण तुला कल्पना नाही, की तू माझ्या मनावरचं किती मोठं ओझं हलकं केलंस."

अश्विन:

"हो ठीक आहे. पण हे तू लगेच कोणाला बोलूं नको, कारण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला समजलं आहे हे त्याला कळता कामा नये. उद्या त्याचा सर्वांसमोर पर्दाफाश करू."

तन्वी:

"येस बॉस, तुम्ही म्हणालं तसं करू."

दोघेही हसू लागले आणि एकमेकांचा निरोप घेऊन त्यांनी फोन ठेवून दिला.

तन्वीला आता आतुरता होती, खऱ्या गुन्हेगाराला उद्या सर्वांसमोर आणण्याची……..

कोण असेल खरा गुन्हेगार?

तन्वीला अडकवून त्या व्यक्तीला काय मिळणार होतं?

तन्वीला अडचणीत असताना मदत केल्यामुळे अश्विन आणि तिच्यात प्रेम फुलणार का?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

Stay tuned……….

क्रमशः

©® सारंग शहाजीराव चव्हाण.

कोल्हापूर 9975288835.

[सर्व वाचकांना एक आवाहन आहे, आपल्याला या स्टोरीत फक्त गुलाबी प्रेम वाचायला आवडेल की त्याचबरोबर इतर गोष्टीही वाचायला आवडतील? प्रेमकथेबरोबरचं प्रत्येक भागात काहीतरी सामाजिक गोष्टी मांडायचा माझा प्रयत्न असतो. तरी आपल्याला नक्की काय आवडेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आपल्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत आहे.]


 

[कथेतील आगामी आकर्षण--कॉलेजमधील रंगीबेरंगी दुनिया,

कॉलेज स्पोर्ट्स मधील घडामोडी,

स्नेहसंमेलनातील मज्जा-मस्ती,

जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.

गतजन्म आणि याजन्मातील घटनांचा परस्पर संबंध.

एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]




 

🎭 Series Post

View all