जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-8.

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-8

तन्वीने सम्राटबरोबर घडलेला किस्सा जान्हवी आणि प्रीतीला सांगितल्यावर,

तन्वीच्या काळजीपोटी जान्हवी तिला म्हणाली,

"तन्वी तुला सावध राहायला हवं.आम्ही तुझ्याबरोबर आहोतच, पण तरीही वेळ सांगून येत नाही."

जान्हवीच्या बोलण्याला दुजोरा देत प्रीती म्हणाली,

"होय गं तन्वी!मी सिनियर लोकांकडून सम्राटबद्दल ऐकलं आहे. नीच मधील नीच माणूस आहे तो. त्यामुळे सावध राहावंच लागेल. ग्रुपनेचं यावं जावं लागेल. म्हणजे तो काही करू शकणार नाही."

तन्वी त्या दोघींना म्हणाली,

"तुम्हाला काळजी वाटणं साहजिक आहे. पण कोणाच्या भीतीने आपण आपलं मनमुक्त जगणं का थांबवायचं?

अन्याय करणाऱ्याबरोबरच अन्याय सहन करणारापण गुन्हेगार असतो.

म्हणून कोणाच्या दबावाखाली जगण्यापेक्षा आपल्या मर्जीने जगायला हवं.

सम्राटच्या दहशतीखाली राहण्यापेक्षा त्याच्या दहशतीला झुगारून जगता यायला हवं."

जान्हवी म्हणाली,

"तू कशी एवढी बिनधास्त राहू शकते गं?तुला जराही भीती वाटत नाही का?"

तन्वी म्हणाली,

"मैत्रिणींनो!भीती सर्वांना असते,पण आपल्याला तिच्यावर मात करता आली पाहिजे. एकदा का भीतीने मान वर काढली की मग ती आपल्याला कधी मान  वर काढू देत नाही.म्हणून भीतीला पायदळी तुडवून पुढे जायचं असतं."

प्रीती म्हणाली,

"म्हणजे कसं गं?"

तन्वी हसत हसत त्यांना म्हणाली,

"मी तुम्हाला सांगितलं आहे,की मी मार्शल आर्टस् शिकली आहे. ते काय फक्त शो साठी नाही गं, वेळ पडली तर त्याचा उपयोग करायचा.मी तुम्हालापण शिकवायचं म्हणत आहे,पण तुम्ही फक्त टाळाटाळ करत असता."

प्रीती म्हणाली,

"हो गं!आम्ही नक्की शिकू."

तन्वी हसत म्हणाली,

"कधी शिकणार?लग्न झाल्यावर का? नवरोबाला मार्शल आर्ट्सचा नमुना दाखवणार का?"

आणि ती जोरात हसू लागली.

प्रीती डोळे वटारत म्हणाली,

"ये बाई!मला इतक्यात लग्न नाही करायचं.बघू सात आठ वर्षानंतर. तोपर्यंत लाईफ मस्त एन्जॉय करू."

यावर सगळ्या खळखळून हसू लागल्या.

इतक्यात अश्विन तिथे आला.त्याच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. अधीरपणे त्याने तन्वीला विचारलं,

"तन्वी!सम्राटने तुझी छेड काढली ही गोष्ट खरी आहे का?"

तन्वी म्हणाली,

"तुला कोणी सांगितलं?"

अश्विन म्हणाला,

"ते इम्पॉर्टन्ट नाहीये.तो तुला काय बोलला तेवढं सांग."

तन्वी म्हणाली,

"का रे? तुला कशाला हवयं? आणि जरी मी सांगितलं तरी तू काय करणार आहेस?"

अश्विन तन्वीला समजावत म्हणाला,

"तन्वी! तो सम्राट एक नंबरचा लफंगा आणि बदमाश मुलगा आहे, त्याने तुला त्रास दिला म्हणून तुझी काळजी वाटली."

तन्वी म्हणाली,

"हे बघ अश्विन!जे झालं ते झालं. त्याला एवढं महत्व द्यायची गरज नाही. मला हा विषय वाढवायचा नाही. त्यामुळे तूपण मला त्याबाबतीत प्रश्न विचारू नको."

अश्विन डोक्यावर हात मारून घेत म्हणाला,

"अगं तन्वी तुला कसं समजावू? तुला वाटतं एवढी ही गोष्ट सोपी नाही. म्हणून तुमच्यात काय घडलं ते जाणून घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे."

तन्वी म्हणाली,

"अरे पण तू या सगळ्या गोष्टीमध्ये का पडतं आहेस? जे काय असेल ते मी आणि तो सम्राट बघून घेऊ ना."


 

अश्विन तिला समजावत म्हणाला,

"एकीकडे मला मैत्री स्वीकार म्हणून हट्ट करायचा आणि मित्र म्हणून काही विचारलं तर एकदम परक्यासारखं वागवायचं, ही तुझी पद्धत योग्य आहे का तन्वी?"

तन्वी एक भुवई वर करून म्हणाली,

"अरे तुला तो अधिकार मिळाला असता,पण तू माझी मैत्री स्वीकारली असती तर. पण तू म्हणालास की मी काही सांगू शकत नाही. मग आज कोणत्या अधिकाराने विचारतं आहेस?"

अश्विन म्हणाला,

"काही नाती बोलून दाखवावी लागत नाहीत, ती आपल्या कृतीतून दाखवून द्यायची असतात. आपल्या मैत्रीचपण असच काहीसं आहे. मैत्री आहे म्हणूनच काळजी वाटते, हे तुला कळतं नाही का तन्वी?"

तन्वी गालात हसून म्हणाली,

"अच्छा!म्हणजे मैत्री स्वीकारली असं समजायचं तर."


 

अश्विन म्हणाला,

"हम्म!आता सांग काय झालं तुझं सम्राटबरोबर?"


 

तन्वीने त्याला सांगितलं,

"मला त्याने जिन्यात मुद्दाम अडवलं होतं आणि आपल्या ग्रुपमध्ये सामील हो म्हणून सांगत होता. मग मी नकार दिल्यावर मला धमकी देऊन निघून गेला."


 

अश्विनच्या रागाचा पारा चढला,त्याच्या डोळ्यात अंगार दिसू लागलं,कानाच्या पाळ्या गरम झाल्या.

मुठी आवळतच तो म्हणाला,

"तू बघच आता त्याला कसा सरळ करतो. तसही मला खुन्नस देतच होता. आज मला त्याचा हिशोब करायची संधी चालून आली आहे."

तन्वी त्याला समजावत म्हणाली,

"अश्विन!तू यात पडू नको.मला हे प्रकरण माझ्या पद्धतीने हाताळू दे. मित्र म्हणून मदतीचा हात पुढे केलास त्याबद्दल मला आनंदच आहे. पण ही माझी म्हणजेच एका स्त्रीची लढाई आहे ती मलाच लढू दे."

सम्राट तिला समजावत म्हणाला,

"अगं पण तन्वी, त्यांच्यासमोर तुझा कसा निभाव लागणार? आमची मदत तुला घ्यावीच लागेल."

तन्वी अश्विनला म्हणाली,

अश्विन!स्त्रियांनी अजून किती दिवस पुरुषांच्या सामर्थ्याच्या कुबड्या घेऊन संकटाशी लढायचं? स्वतःमधील क्षमतेचा वापर तिने करायलाच हवा. या पृथ्वीतलावर असं कोणतं संकट नाही जे एक स्त्री परतवून नाही लावू शकत. मनात आणलं तर ती या जगाची उलथापालथ करू शकते, कारणं आपण ज्या जमिनीवर राहतो ती एक स्त्रीरुप आहे, जिला आपण पृथ्वी म्हणून ओळखतो. त्याचबरोबर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं बीज या मातीत पेरलं त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब,राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यांनी अनेक वर्षे मुघलांना सळो की पळो करून सोडलं त्या करवीर संस्थापिका भद्रकाली छत्रपती ताराबाईसाहेब,आपल्या छोट्याश्या दामोदरला पाठीवर बांधून ज्यांनी इंग्रजांशी लढा दिला त्या राणी लक्ष्मीबाई आणि अशा कितीतरी लढवय्या स्त्रियांना या मातीने जन्म दिला. त्या मातीतली स्त्री आजही आपल्या आतल्या ताकतीशी अनभिज्ञ आहे याचं वाईट वाटत. याला जबाबदार कोण आहे? पावलोपावली स्त्रीला तिच्या दुबळेपणाची जाणीव करून देणारा पुरुष की गुलामीची सवय लागलेली स्त्री? कारण काहीही असलं तरी स्त्रीने निशंक होऊन उठलं पाहिजे. महिषासुराचा वध करणारी दुर्गामाता तिने अंगिकारली पाहिजे.

पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या परंपरा ही आमुची

या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी जसा इतिहास घडवला आहे तसाच वर्तमान आणि भविष्यकाळ घडवायला हवा. "

अश्विन आणि तन्वीच्या मैत्रिणी तिच्या तोंडाकडे बघतच राहिले.

 अश्विन हसत तन्वीला म्हणाला,

"तन्वी तुझ्यात मला क्रांतिवीर मधील नाना पाटेकर दिसतो बघ. बोलायला लागलीस ना, की समोरचा संमोहित होऊन जातो.समाजप्रबोधन करण्याचं कसब आहे तुझ्यात."

तन्वी म्हणाली,

"वो कवी महाशय!मला हरभऱ्यावर चढवून झालं असेल तर आम्ही जाऊ शकतो का आता?"

अश्विन तिला म्हणाला,

"तन्वी!यू आर इम्पॉसिबल."

यावर सगळेच हसू लागले आणि तिथून निघाले.

कॉलेजमधून बाहेर जाताना तन्वी ग्रुपमधूनच जात होती, इतक्यात तिला सम्राटचा ग्रुप रस्त्याच्या बाजूला उभा असलेला दिसला आणि ती सावध झाली.

थोडावेळ रिक्षाची वाट पाहिल्यावर तन्वीला रिक्षा मिळाली आणि ती रिक्षाने निघून गेली.

सम्राटने तिला त्रास देणं तन्वीला अपेक्षित होतं पण तसं काहीच झालं नाही.

असाच आणखी एक आठवडा गेला तरी सम्राट तन्वीच्या वाटेला गेला नव्हता. त्यामुळे तन्वीला त्याची धमकी पोकळ वाटू लागली.

हळूहळू तिने सम्राटकडे दुर्लक्ष केलं.

आणि एके दिवशी तन्वी नेहमीप्रमाणे कॉलेजला आली आणि मैत्रिणींबरोबर लेडीजरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी गेली.लेडीज रूममध्ये बऱ्याच मुली असल्यामुळे जाताजाता तन्वीचा आणि काही मुलींचा एकमेकांना धक्का लागला. त्यांच्यामध्ये थोडी हमरीतुमरी झाली, पण काही मुलींच्या मध्यस्थीने वातावरण निवळलं.

इतक्यात कॉलेजच्या ऑफिसमधील फोन खणाणला आणि जोशी मॅडम,देसाई मॅडम तातडीने लेडीजरूममध्ये पोहोचल्या.

जोशी मॅडमनी आवाज दिला,

"तन्वी देशमुख!तन्वी कुठे आहेस तू?समोर ये."

तन्वीला ऐकू जाताच ती घोळक्यातून वाट काढत समोर आली आणि म्हणाली,

"काय झालं मॅडम? काही काम आहे का माझ्याकडे?"

देसाई मॅडम म्हणाल्या,

"तन्वी सॅक इकडे आण."

तन्वीला काही समजेना, तिने सॅक देसाई मॅडमकडे दिली.

त्यांनी सॅकची चेन ओढली आणि आतमध्ये हात घालून एक छोटासा बॉक्स बाहेर काढला. तो बॉक्स पाहून सगळे अचंबित झाले.

तन्वीला तर खूप मोठा धक्का बसला.

ती म्हणाली,

"मॅ… मॅ….मॅडम. हे माझ्या सॅकमध्ये कसं आलं? कसं शक्य आहे हे?"

जोशी मॅडम म्हणाल्या,

"तन्वी!हे आम्ही तुला विचारायला हवं,हे काय आहे म्हणून.उलट तूच भोळेपणाचा आव आणतेस."

तन्वी त्यांना पटवून देत म्हणाली,

"मॅडम विश्वास ठेवा, हा बॉक्स माझा नाही. हा यात कसा आला मला माहित नाही."

देसाई मॅडम म्हणाल्या,

"हे बघ!जे काही स्पष्टीकरण द्यायचं असे ते स्टाफरूम मध्ये द्यायचं. चल ये आमच्या पाठोपाठ."

तन्वी काकुळतीला येऊन म्हणाली,

"मॅडम!ऐका माझं, हे माझं नाहीये, मॅडम!मॅडम!"

मॅडम तन्वीची सॅक स्टाफरूममध्ये घेऊन गेल्या आणि त्यांच्या पाठोपाठ तन्वी त्यांना समजावत गेली.

क्रमशः

काय असेल त्या बॉक्समध्ये?

आणि तो तिथे कसा आला?

तन्वी खरंच गुन्हेगार असेल की तिला यात कोणीतरी अडकवलंय?

जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

Stay tuned……

©® सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.

[कथेतील आगामी आकर्षण--कॉलेजमधील रंगीबेरंगी दुनिया,

कॉलेज स्पोर्ट्स मधील घडामोडी,

स्नेहसंमेलनातील मज्जा-मस्ती,

जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.

गतजन्म आणि याजन्मातील घटनांचा परस्पर संबंध.

एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]




 

🎭 Series Post

View all