जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-6

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-6





 



अश्विनची बस निघून गेल्यामुळे तन्वी हताश होऊन तिथल्याच एका बाकड्यावर बसली.यादरम्यान तिच्या गावची बसही निघून गेल्यामुळे तिला आता पुढची बस येईपर्यंत वाट पहावी लागणार होती. बसस्टॉपवर एवढ्या लोकांची वर्दळ असतानाही तिला एकटं वाटत होतं.



तिने पुन्हा मोबाईल पर्समधून बाहेर काढला आणि फेसबुक उघडून बसली.



अश्विनने अद्याप तिची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नव्हती,की तिचा मॅसेजसुद्धा पाहिला नव्हता.



आपण यावर काहीच करू शकत नाही,म्हणून तन्वीची चिडचिड होतं होती.



पण आता चिडून काहीच साध्य होणार नव्हतं.



ती तिथेच बाकड्यावर पाठीमागे डोकं टेकून,डोळे झाकून बसून राहिली.



सुमारे अर्ध्या तासानंतर तळेगावला जाणारी बस फलाटवर लागली.



इतक्यात निवेदन रूममधून निवेदिकेने पुकारलं,



"कृपया लक्ष द्या,सेंट्रल बसस्टँडवरून तळेगावला जाणारी बस xxxxxxx फलाट क्रमांक चारवर थांबली आहे."





अनाउन्समेन्ट ऐकून तन्वी जागेवरुन उठली आणि बस उभी असलेल्या दिशेने निघाली.



आज तिच्या मनासारखं काहीच घडत नव्हतं, सकाळी कॉलेजसाठी घरातून निघत असताना ती किती खूष होती. मनात कितीतरी नवीन स्वप्न घेऊन ती कॉलेजमध्ये आली होती. पण प्रत्यक्षात काही वेगळंच घडलं होतं.





तन्वीने बसचा दरवाजा मागे ओढला आणि ती बसमध्ये जाऊन बसली. थोड्याच वेळात बस प्रवाशांनी तुडुंब भरली. तन्वीने मन शांत व्हावं म्हणून युट्युबवर जगजीतसिंह यांच्या गझल प्ले केल्या आणि कानात हेडफोन घालून ती ऐकू लागली.





*तुम इतना जो मुस्कुरा रहे हो………



क्या गम है जिसको छुपा रहे हो……



तुम इतना जो मुस्कुरा रहे हो……





 



*झुकी झुकीसी नजर बेकरार है के नहीं……



दबा दबासा मगर दिलमे प्यार है के नहीं…..






 



अशा एकसे बढकर एक गझल तिच्या मनाला शांती देत होत्या. ती डोळे मिटून त्यात एवढी हरवून गेली की बस सुरु होऊन तिच्या गावाजवळ कधी आली तिला समजलं देखील नाही.





कंडक्टरने आवाज दिला,



"चला तळेगाव आलं तळेगाव. कोण उतरणार आहे पुढे या."



कंडक्टरच्या आवाजाने तन्वीची तंद्री भंग झाली आणि ती सीटवरून उठून दरवाज्याकडे निघाली.



तिच्यासह आणखी काही प्रवाशी बसमधून खाली उतरू लागले.



तन्वी लगबगीने खाली उतरली आणि तडक घराकडे निघाली.



वाटेत कोणाकडे लक्ष देण्याची तिची मनस्थिती नव्हती.



थोड्याच वेळात ती घरी पोहोचली.





नेहमीप्रमाणे दरवाजा बंद होता म्हणून तिने डोअरबेल वाजवली.



एकदा,दोनदा,तीनदा ती अधीरतेने बेल वाजवतच राहिली.





तन्वीच्या आईने आतून आवाज दिला,



"आले आले!कोण आहे?थोडातरी दम धीर आहे की नाही?"





तिने थोड्या रागातच दरवाजा उघडला, तर तन्वीला पाहून ती अचंबित झाली. कारण ती वेळेपेक्षा खूप आधी आली होती.



तन्वीची आई तन्वीला म्हणाली,



"काय गं!इतक्या लवकर कशी आलीस तू? कॉलेजची वेळ तर अजून बाकी आहे. तुझी तब्येत ठीक आहे ना?"





तन्वी क्षणाचाही विलंब न करता पुढे होऊन आईच्या कुशीत शिरली आणि गळ्यात पडून रडू लागली.





तन्वीची आई प्रचंड घाबरली. तिला हे सगळं अनपेक्षित होतं.



ती काळजीनं तन्वीला म्हणाली,



"बाळ!ये पिल्लू. अगं काय झालं रडायला? मला सांगशील का काय झालंय? कॉलेजमध्ये काही झालं का? अगं बोल ना काहीतरी."





तन्वी हुंदके देत म्हणाली,



"आई माझ्याकडून एक चुक झालीये आणि त्याची शिक्षा एका निरपराध मुलाला मिळाली."



आणि ती पुन्हा रडू लागली.



तिची आई तिला सावरत म्हणाली,



"ये बाळ!ये बच्चा, रडू नको गं. मला नीट सांग काय झालंय?"





आईने तिला खूप विचारणा केल्यावर तिने घडलेला सारा वृत्तांत आईला सांगितला.



आईने सगळा वृत्तांत ऐकून घेतला आणि ती म्हणाली,



"बाळ प्रत्येकवेळी असं जागच्या जागी रिऍक्ट होणं कमी कर, प्रत्येक ठिकाणी आक्रमकता दाखवणं महागात पडू शकत. म्हणून तुला मी नेहमी सांगत असते की जरा संयम राखायला शिक.



आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर थोडी संयमी वृत्तीही आवश्यक असते,बऱ्याचदा समोर जसं दिसत तसं प्रत्यक्षात असतंच असं नाही. त्यामुळे योग्य ती शहानिशा करून मगच त्यावर योग्य तो अंमल करावा. म्हणजे पश्चाताप होणार नाही."





यावर तन्वी आपली चुक कबूल करत म्हणाली,



"आई!झाली गं माझ्याकडून चूक. पण उद्या काय होईल? मला नंतर समजलेली हकीकत मी तिथे सांगितली तर माझ्यावर सगळे चिडतील गं. काय करू मी?"





 



तिला समजावत आई म्हणाली,



"हे बघ बाळ!जे झालं ते  झालं. जे खरं आहे ते सर्वांसमोर सांगून टाक.



दुसऱ्याच्या चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे आणि स्वतःची चूक असेल तर ती कबूल करता आली पाहिजे."





तन्वी आईकडे पाहून म्हणाली,



"ठीक आहे आई. मी उद्या सर्वांसमोर अश्विनची माफी मागून ह्या प्रकरणावर पडदा पाडते."





इकडे अश्विनही आपल्या घरी पोहोचला होता. त्यानेही आपल्या घरी कॉलेजमध्ये झालेल्या घटनेची माहिती दिली.



त्याचे वडील एक प्रसिद्ध लघुउद्योजक होते. त्यांना ह्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप झाला आणि ते रागाने लाल होऊन म्हणाले,



"अरे या अशा मुली स्वतःला समजतात तरी कोण? मुलं काय कॉलेजात फक्त मुलींची छेडछाड करण्यासाठी येतात का? यांना ना फक्त गोष्टीचं भांडवल करून प्रसिद्धी कशी मिळवायची एवढं चांगल जमत."





वडिलांचा चढलेला पारा लक्षात घेऊन अश्विन त्याना शांत करण्यासाठी म्हणाला,



"पप्पा!जाऊदे ओ. चुका माणसाकडूनच होतात. तिचा गैरसमज झाल्यामुळे सगळं घडत गेलं.त्यात तिचीही 100% चूक नाहीये."





अश्विनचे वडील म्हणाले,



"अरे पण अशामुळे तुझी काही चुकी नसताना आपलं नाव खराब झालं ना. मी उद्या येतोय तुझ्याबरोबर, बघू कोण काय म्हणतंय."





 



तो दिवस असाच निघून गेला.



दुसऱ्यादिवशी तन्वी कॉलेजसाठी आवराआवर करत होती, पण तिच्या मनात कॉलेजमध्ये काय होईल याची धास्ती होती.



तिच्या आईने ती बरोबर ओळखली आणि ती म्हणाली,



"तन्वी घाबरू नको, नेहमीसारखी कॉन्फिडन्ट रहा. सगळं ठीक होईल."





तन्वीने होकारार्थी मान हलवली आणि आईला नमस्कार करून ती घराबाहेर पडली.





इकडे अश्विन आपल्या वडिलांना बरोबर घेऊन कॉलेजला चालला होता. त्याच्या मनात आपला निर्दोषपणा सिद्ध होईल की नाही?याची धाकधूक होती.





आपापला प्रवास करून तन्वी आणि अश्विन दोघेही कॉलेजच्या दारात पोहोचले.योगायोग म्हणजे गेटवरच त्यांचा आमनासामना झाला. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. अश्विनच्या चेहऱ्यावर राग,तर तन्वीच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता.



तन्वीला त्याच्याशी बोलायचं होतं, पण अश्विनसोबत त्याचे वडील होते हे तन्वीने पाहिलं आणि तिने अश्विनशी बोलण्याचा आपला निर्णय बदलला.





अश्विनला घेऊन त्याचे वडील तडक स्टाफरूममध्ये गेले. लेक्चर सुरु होण्यासाठी अजून अवधी असल्यामुळे सगळे प्राध्यापक तिथे उपस्थित होते.





अश्विन नाईक सरांना म्हणाला,



"सर!मी पालकांना घेऊन आलो आहे."





त्यांनतर नाईक सर म्हणाले,



"अच्छा!या बसा."





अश्विनचे वडील म्हणाले,



"नमस्कार!मी अश्विनचा वडील यशवंतराव मोहिते.खरंतर आज मी ज्या कारणासाठी आलो आहे ते कारण मला आवडलेलं नाही, पण तुम्ही माझ्या मुलावर खूप चुकीचा आरोप केला आहे.त्यासंदर्भात मी वेळात वेळ काढून इथे आलो आहे. आरोपकर्त्या मुलीला लवकर बोलावून घ्या. मला घाई आहे."





नाईक सरांनी शिपायाला सांगून तन्वीला बोलवून घेतलं.



एरव्ही बिनधास्त वावरणारी तन्वी आज गांगरून गेली होती.



स्टाफरूममध्ये गेल्यावर तिला प्रश्न विचारायच्या आतच तन्वीने सांगितलं,



"सर माझा गैरसमज झाला होता, मुळात अश्विनने माझी ओढणी खेचली नव्हती.माझी ओढणी जिन्याच्या पायरीवरून लोळत होती आणि त्यावर चुकून अश्विनचा पाय पडल्यामुळे ती खेचली गेली. मी मागे वळून पाहायच्या आत त्याने ती उचलून माझ्याकडे देण्यासाठी हात पुढे केला. त्यामुळे मला वाटलं की त्यानेच मुद्दाम माझी ओढणी खेचली."





नाईक सर तन्वीला म्हणाले,



"पण तन्वी तू काल वर्गात वेगळंच सांगितलं होतंस. मग आज तुला कसं समजलं?"





तन्वी म्हणाली,



"सर मला आपल्या क्लासमधील जान्हवीने ही हकीकत सांगितली.हा प्रसंग घडला तेव्हा ती आमच्या पाठीमागे असल्याने तिला सत्य परिस्थिती माहित होती.उतावीळपणात मी अश्विनवर चुकीचा आरोप केला म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. मला माफ कर अश्विन."





 



अश्विनचे वडील म्हणाले,



"मुली, भलेही तू प्रांजळपणे चूक कबूल केली त्याबद्दल तुझं कौतुक वाटतं,पण  तरी मी तुला एक सल्ला देतो.



मुलींशी गैरवर्तन करणाऱ्यांना जरूर कठोर शिक्षा झाली पाहिजे, यात दुमत नाही. पण समोरचा व्यक्ती खरंच गुन्हेगार असल्याची आपल्यालाही खात्री असायला हवी. ती नसेल तर आणखी कोणाजवळ तरी त्यासंबंधित माहिती विचारून घ्यायला हवी. सरळ सरळ सर्वांसमोर एखाद्यावर आरोप करणे म्हणजे लोकांच्यात त्याची प्रतिमा मलीन करणे. आणि एकदा प्रतिभा मलीन झाली की ती व्यक्ती वारंवार संशयाच्या भोवऱ्यात सापडते. म्हणून थोडा संयम आणि चौकसपणा अंगी असावा म्हणजे एखाद्या व्यक्तीला चुकीची शिक्षा भोगावी लागणार नाही."





 



तन्वीने पुन्हा सगळ्यांची माफी मागितली,



"सॉरी काका!सॉरी सर!सॉरी अश्विन!माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. पुन्हा माझ्याकडून अशीं चूक होणार नाही."





अश्विनला क्लीन चिट मिळाल्यामुळे तो आनंदी झाला होता,पण त्याने आपल्या चेहऱ्यावर धीरगंभीर भाव कायम ठेवले होते.



तर तन्वीने सत्य परिस्थिती सांगून आपली चूक कबूल केल्यामुळे तिला मोकळ मोकळ वाटतं होतं.





नाईक सरांनी अश्विन आणि तन्वी यांना क्लासरूम मध्ये जायला सांगितलं.





क्लासरूम कडे जात असताना जिन्याजवळ गेल्यावर अश्विन तिथेच थांबला.तन्वी त्याच्या पाठोपाठच होती.



तिला वाटलं तो आपल्याशी बोलण्यासाठी थांबला आहे. म्हणून तिही थांबली पण अश्विनने तोंड विरुद्ध दिशेला फिरवलं.



तन्वी त्याला म्हणाली,



"अश्विन!तुझी नाराजी गेली नाही का रे अजून? मी माफी मागितली ना तुझी. मग आता हा राग सोडून दे ना."





अश्विन तोंड फुगवतच म्हणाला,



"ओ मॅडम!मी कोणावर नाराज वगैरे काही नाही. तुम्ही आधी जिन्यातून वरती जा,तुम्ही क्लासमध्ये गेल्यावरच मी जिन्यातून वरती येईन. उगाच माझ्यावर विनयभंग केल्याचा आरोप लावायलाही मागेपुढे पाहणार नाही तुम्ही."





तन्वी डोक्यावर हात मारत म्हणाली,



"कायपण बोलूं नको रे. असं बोलून मला अजून लाजवू नको आणि हे मॅडम वगैरे का बोलतोस?एवढा आदर द्यायला मी तुझ्यापेक्षा मोठी नाहीये समजलं. एकेरी बोल मला."





अश्विन चिडून बोलला,



"हे पहा मला एकेरी किंवा दुहेरी काहीच बोलायचं नाहीये. तुम्ही आधी जाताय की मीच जाऊ."





तन्वी म्हणाली,



"अरे प्लीज नको ना राग धरू. कालपासून मलाही खूप पश्चाताप झाला आहे. रात्रभर झोप नाही लागली मला."





अश्विन तिला म्हणाला,



"तुम्हाला झोप लागली की नाही लागली, यामुळे माझा सगळ्या क्लाससमोर जो अपमान केलात तो भरून निघणार नाही."





तन्वी म्हणाली,



"काय केलं म्हणजे तू मला माफ करशील? सांग माझी तयारी आहे."





अश्विन म्हणाला,



"मी सांगेन ते करणार का? नंतर नाही म्हणणार नाही ना?"





तन्वी क्षणभर गोंधळली, तिला वाटलं की हा काही भलतंच करायला तर सांगणार नाही ना?





तिची ही अवस्था अश्विनने बरोबर ओळखली आणि तो तिला म्हणाला,



"तुमच्या मनात अजूनही माझ्याबद्दल गैरसमज आहे, तो आधी दूर करा मग सांगेन काय करायचं."





तन्वी चपापली, अश्विनने तिच्या मनातलं अगदीं बरोबर ओळखलं होतं.



तन्वी त्याला म्हणाली,



"सॉरी वन्स अगेन!बोल मी काय केलं तर तुझा राग निवळेल?"





अश्विन म्हणाला,



"ज्या वर्गात तू सर्वांसमोर माझ्यावर आरोप केलेस,तिथे सर्वांसमोर तू तुझी चूक कबूल करायची आणि माझी जाहीर माफी मागायची. तसेच पुन्हा असं काही होणार नाही याची हमी द्यायची."





तन्वी विचारात पडली, हो म्हणावं की नाही म्हणावं?



सर्वांसमोर माफी मागावी तर तिचा स्वाभिमान आडवा येत होता आणि माफी नाही मागावी तर अश्विनच्या रागाचं मनावर नेहमी ओझं राहणार होतं.





नक्की काय करेल तन्वी?



यातून दोघांत मैत्री होईल का?



की पुढे जाऊन प्रेम होईल?



जाणून घेण्यासाठी वाचत रहा.



Stay tuned….





©®सारंग शहाजीराव चव्हाण.



कोल्हापूर.9975288835.





[कथेतील आगामी आकर्षण--कॉलेजमधील रंगीबेरंगी दुनिया,



कॉलेज स्पोर्ट्स मधील घडामोडी,



स्नेहसंमेलनातील मज्जा-मस्ती,



जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.



गतजन्म आणि याजन्मातील घटनांचा परस्पर संबंध.



एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]






 


🎭 Series Post

View all