जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-5

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-5

अश्विनची चूक नसतानाही आपल्यामुळे विनाकारण शिक्षा भोगावी लागली म्हणून तन्वीला खूप वाईट वाटतं होतं, तसंच तिला स्वतःचा रागही आला होता.आता याक्षणी जाऊन अश्विनची माफी मागावी असं तिला वाटत होतं, पण सुट्टी झाल्याशिवाय ती क्लासरूममधून बाहेर जाऊ शकणार नव्हती.

आयुष्यात पहिल्यांदा तिला आपल्या आक्रमक स्वभावामुळे पश्चाताप करण्याची वेळ आली होती.

तिचं मन कशातच लागत नव्हतं. नाईकसर अश्विनला सगळ्या स्टाफसमोर घेऊन जाणार होते. म्हणजे त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई नक्की केली जाणार,अशीं भीती तन्वीच्या मनात निर्माण झाली होती.

समोर सुरु असणाऱ्या लेक्चरमध्ये तिचं अजिबात लक्ष लागत नव्हतं. तन्वी जितकी डॅशिंग होती तितकीच ती हळवीसुद्धा होती.आपल्यामुळे एका निरपराध्याला शिक्षा होणार म्हणून ती अंतःकरणातून खूपच दुःखी झाली होती.

तिकडे नाईक सरांनी अश्विनला स्टाफरूमच्या बाहेर उभा राहायला सांगितल्यामुळे अश्विन तिथे निमूटपणे उभा होता.

थोड्याच वेळात नाईक सर तिथे आले आणि म्हणाले,

"अश्विन!आतमध्ये ये."

अश्विन आतमध्ये गेला, तर तिथे अजून दोन तीन शिक्षक उपस्थित होते.

नाईक सर त्यांना म्हणाले,

"आज कॉलेजच्या पहिल्याच दिवशी याने एक गलिच्छ काम केलं आहे.त्यामुळे याला कोणत शासन करायचं?ते आपण सर्वांनी ठरवण्यासाठी याला इथे बोलवलं आहे."

पी टी च्या सूर्यवंशी सरांनी विचारलं,

"नाईक सर!काय केलंय या मुलाने?"

नाईक सर म्हणाले,

"मला सांगताना सुद्धा लाज वाटत आहे,आज याने जिन्यात एका मुलीची ओढणी खेचली."

सूर्यवंशी सर संतापून अश्विनकडे बघत म्हणाले,

"काय! हरामखोर,नालायक तुला जरातरी लाज लज्जा शरम काहीच वाटलं नाही का? आम्हाला तो अधिकार नाही, नाहीतर तुला पोकळ बांबूने फोडून काढला असता."

अश्विन जीव तोडून सांगत होता,

"सर मी खरंच तुम्ही म्हणताय असं काही केलं नाहीये. मी एका चांगल्या घरातला मुलगा आहे.माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत, त्यामुळे मी असलं काही करणं शक्य नाही."

मराठी विषयाचे सहस्त्रबुद्धे सर म्हणाले,

"वाह!पहिल्याच दिवशी तुझे संस्कार दाखवलेस.चांगल्या घरातील मुलं असं दुष्कृत्य करतात का?मजनूगिरी करायला येतोस का रे इथे? तुझ्यासारख्या मुलांमुळे मुलीना कॉलेजला पाठवायला पालकांना भीती वाटते. म्हणून तू उद्या पालकांना घेऊन मगच कॉलेजला यायचं. त्यांच्यासमोरच तुझा निकाल लावू."

सर्वांनी सहस्त्रबुद्धे सरांच्या बोलण्याला दुजोरा दिला.

सरांच बोलणं ऐकून अश्विनच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तो सरांच्या हातापाया पडू लागला,

"सर!माझं ऐकून तरी घ्या. त्या मुलीचा काहीतरी गैरसमज झाला आहे.तिची ओढणी माझ्या पायाखाली सापडली होती, मी मुद्दाम नव्हती खेचली. प्लीज माझ्या घरच्यांना यामध्ये आणू नका. त्यांना खूप दुःख होईल."

सूर्यवंशी सर म्हणाले,

"घरच्यांचा विचार तू आधी करायला हवा होता. आता तू त्यांना घेऊनच कॉलेजला यायचं."

आपल्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही हे पाहून अश्विन ढसाढसा रडू लागला.

ते पाहून नाईक सर त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाले,

"हे बघ बाळ, कदाचित तू निर्दोष असशीलही. पण हे प्रकरण गंभीर आहे.अशा घटनांमुळे कॉलेजचं रेप्युटेशन खराब होतं. त्यामुळे आम्हाला कानाडोळा करून चालत नाही. तरी तू उद्या पालकांना घेऊन ये. त्या मुलीचीसुद्धा उद्या सर्व स्टाफसमोर पुन्हा विचारणा केली जाईल."

अश्विन काहीच न बोलता जड पाऊलांनी स्टाफरूमच्या बाहेर पडला.

आयुष्यात पहिल्यांदा न केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा मिळत होती.

तो मनातल्या मनात विचार करत होता,

'आपल्यावर मुलीच्या छेडछाडीच्या आरोप लावला आहे हे घरी कोणत्या तोंडाने सांगू? घरच्यांना काय वाटेल? उद्या जर मला दोषी ठरवलं गेलं,तर सगळ्या कॉलेजमधील मुलं मुली माझ्याबद्दल काय विचार करतील?'

या विचारानं त्याचं डोकं सुन्न झालं होतं. कॉलेजच्या वॉटरटँकच्या नळाजवळ जाऊन त्याने थंडगार पाणी आपल्या तोंडावर मारून घेतलं. खिशातील हातरूमालने चेहरा पुसुन घेतला आणि तो मनात काहीतरी निर्धार करून तिथून निघून गेला.

इकडे लेक्चर संपल्यावर तन्वी धावतच स्टाफरूमकडे गेली. तिने स्टाफरूममध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये अश्विन कुठेच दिसत नव्हता.

ती मागे फिरणार इतक्यात नाईक सरांनी तिला पाहिलं आणि म्हणाले,

"अरे तन्वी!इकडे ये बेटा."

तन्वी आतमध्ये जाऊन म्हणाली,

"काय झालं सर?"

नाईक सर म्हणाले,

"तुझ्याशी गैरवर्तन करणाऱ्या अश्विनला सर्वांनी चांगलाच फैलावर घेतला.

उद्या त्याला पालकांना घेऊनच कॉलेजला यायला सांगितलं आहे."

तन्वी कपाळाला हात लावत म्हणाली,

"ओह नो!पण सर माझी तक्रार मला मागे घ्यायची होती."

नाईक सर तिच्याकडे पाहत म्हणाले,

"तन्वी!हा काय खेळ आहे का? हवं तेव्हा तक्रार केली,हवं तेव्हा मागे घेतली आणि हो! ही गोष्ट आता तुझ्यापुरती मर्यादित नसून ती कॉलेजच्या इभ्रतीची गोष्ट बनली आहे. त्यामुळे उद्या तूपण वेळेवर हजर रहा.जे काय बोलायचं ते सर्वासमोर बोल."

तन्वी नाराजी व्यक्त करत म्हणाली,

"पण सर……"

तिला मध्येच थांबवत नाईक सर म्हणाले,

"पण-पंतु,किंतु-परंतु आता काही चालणार नाही. उद्या ठीक वेळेवर हजर रहा. आता तू निघू शकतेस."


 

तन्वी हतबल होऊन स्टाफरूममधून बाहेर पडली.

ती स्वतःवरच चिडली असल्यामुळे तिची लेक्चरला बसण्याची अजिबात मनस्थिती नव्हती. त्यामुळे राहिलेली लेक्चर बुडवून ती कॉलेजच्या बाहेर पडली.

अजून तिची कोणाशीच ओळख नसल्यामुळे तिची कोणी मैत्रीणसुद्धा नव्हती. त्यामुळे कोणाजवळ मन हलकं करण्याची सोयही नव्हती. तिच्या मनावर असलेलं हे अपराधीपणाचं ओझं तिला असह्य झालं होतं, म्हणून तिने थेट घरी जाऊन आईशी बोलण्याचं ठरवलं.झपझप पाऊलं टाकतं ती गेटमधून बाहेर पडली.तिने इकडे तिकडे पाहिलं तर एकही रिक्षा तिला दिसत नव्हती.पाच मिनिटं वाट बघितल्यानंतर तिने बसस्टँडपर्यंत पायी चालत जाण्याचं ठरवलं.

तिच्या डोक्यात फक्त आणि फक्त अश्विनचा रडवेला चेहरा दिसत होता, तिच्यामुळे आज पहिल्यांदा कोणीतरी रडलं होतं. नेहमी गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत असणारा तन्वीचा चेहरा आज पुरता सुकला होता. तिच्या चालण्यात रोजचा आत्मविश्वास दिसत नव्हता.चालता चालता ती एक दोनवेळा ठेचकळून पडता पडता वाचली होती. वीस-बावीस मिनिटं चालल्यानंतर ती बसस्टँडवर पोहोचली. तिच्या गावची बस फलाटावर उभी होती.ती बसमध्ये चढून चार पाच सीट सोडून असणाऱ्या विंडो सीटवर जाऊन बसली.बस सुटायला अजून बराच अवधी बाकी होता. तन्वीचं मन कशातच लागत नव्हतं.

तिने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यात फेसबुकवर अश्विनला सर्च करू लागली.

अश्विन मोहिते, नावाची बरीच अकाऊंट तिला दिसली. तिने एक एक अकाऊंट चेक करायला सुरवात केली. एका अकाउंट वर बाईक रेसिंगचा प्रोफाइल फोटो होता,शिवाय त्याच्या अकाऊंटवर स्टडीड ऍट सिटी कॉलेज असं लिहिलेलं होतं. तिने त्याला अंदाजाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.त्याने आपल्याला मित्र यादीत सामील केल तर आपण त्याची माफी मागू शकू असं तिला वाटलं.तिने त्याला मेसेंजरवर 'हाय अश्विन!प्लीज ऍड मी.'' असा मॅसेज केला आणि ती त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली.

एव्हाना बस प्रवाशांनी फुल्ल भरली होती, शिवाय बस सुटण्याची वेळी झाली होती. कंडक्टरने बसची बेल वाजवली आणि बस जागेवरून हलली. इतक्यात तन्वीचं लक्ष खिडकीतून पलीकडच्या बसमध्ये गेलं.

त्या बस मध्ये अश्विन बसला होता. तन्वीने त्याला जोरात आवाज दिला,

"अश्विन!ये अश्विन, अश्विन, अरे इकडे बघ ना, ये अश्विन."

बसमधील सगळे प्रवाशी तिच्याकडे बघत होते,पण तिला त्याची तमा नव्हती.

तिने त्याला हाक मारणं सुरूच ठेवलं. पण त्याने कानात हेडफोन घातले असल्याने त्याला काहीच ऐकू जातं नव्हतं.

तन्वीचा आवाज ऐकून अश्विनच्या शेजारच्या प्रवाशाने अश्विनला हलवून तन्वीकडे बोट करून त्याला सांगितलं.

अश्विनने तन्वीला पाहिलं पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

तन्वी जागेवरून उठली आणि तिने कंडक्टरला आवाज दिला,

"काका मी उतरणार आहे बस थांबवा."

कंडक्टरने रागाने मागे पाहिलं आणि म्हणाला,

"कोण आहे रे? मघापासून काय झोपलेला का? बस आता कुठे हलली होती तोपर्यंत थांबा म्हणताय."

तन्वी पुढे निघून आल्यावर कंडक्टरने तिला पाहिलं आणि तो चपापला. तन्वीचा  बसमधील प्रसंग त्याला आठवला आणि तो म्हणाला,

"मॅडम! तुम्ही आहात होय? माफ करा,मला वाटलं दुसरंच कोणीतरी आहे. सावकाश उतरा,काही घाई नाही."

तन्वीचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, ती लगबगीने उतरली आणि अश्विनच्या बसकडे धावली. पण ती बसपर्यंत पोहोचायच्या आत बस निघाली होती.तन्वी बसमागे धावू लागली पण बसने आता वेग पकडला असल्यामुळे तन्वी तिथपर्यंत पोहोचू शकली नाही. बस दूर निघून गेली आणि तन्वी धापा टाकत दूर जाणाऱ्या बसकडे बघत उभी राहिली.

अश्विन आपल्या पालकांना घेऊन कॉलेजला येणार का?

की तो कोणता दुसरा पर्याय निवडेल?

तसेच तो तन्वीला माफ करेल का?

हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा.

Stay tuned…...

क्रमशः

©®सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.

🎭 Series Post

View all