जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-4

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-4



 

तन्वी आणि अश्विन क्लासरूमच्या बाहेरील पॅसेजमध्ये वाद घालत उभे असताना,प्राध्यापक नाईक तिथे आले.

त्यांनी या दोघांना तिथे एकमेकांशी बोलताना पाहिलं आणि म्हणाले,

"बाहेर काय करताय दोघ? सगळेजण क्लासरूम मध्ये गेले असताना तुमचं इथं काय चाललंय?आत चला दोघेही."

तन्वी म्हणाली,

"सर पण याने.."

सरांनी तिचं बोलणं अर्ध्यावर थांबवलं आणि म्हणाले,

"हे पहा!या कॉलेजचे काही नियम आहेत, ते सर्वांनी पाळणं बंधनकारक आहे.त्यातील एक नियम असाही आहे की,

"क्लासच्या वेळेत कोणीही क्लासरूमच्या बाहेर जाणार नाही किंवा पॅसेजमध्ये  उभं राहणार नाही. त्यामुळे आता तुम्ही आतमध्ये जा. आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे विनाकारण मला कडक भूमिका घेणं भाग पाडू नका."

सरांच्या कडक आवाजामुळे तन्वी आणि अश्विन यांना क्लासरुममध्ये जाणं भाग पडलं.

क्लासमध्ये गेल्यावर तन्वी आणि अश्विन आपापल्या बाकावर बसले, इतक्यात प्राध्यापक नाईक आतमध्ये आले.

सर्वांनी उभं राहून त्यांना मान दिला.

त्यानंतर प्रा.नाईक म्हणाले,

"गुड मॉर्निंग एव्हरीवन.प्लीज सीटडाऊन."

सर्वजण आपापल्या जागी बसले.

नाईक सरांनी सगळ्या क्लासवर एक नजर फिरवली आणि एक दीर्घ श्वास घेत म्हणाले,

"अच्छा!आज तुमचा या कॉलेजमधील पहिला दिवस आहे आणि त्याच

बरोबर पहिलंच लेक्चर आहे.तरी आज आपण लेक्चर घेणार नसून सगळ्यांची ओळख करून घेऊन,मनमोकळा संवाद साधणार आहोत.त्यामुळे आता आपण सर्वांची ओळख करून घेऊ."

ते सर्वप्रथम आपली ओळख करून देत म्हणाले,

"नमस्कार मी प्राध्यापक मनोज नाईक.

मी गेली पंधरा वर्षे या कॉलेजमध्ये कार्यरत आहे.मी तुम्हाला इतिहास हा  विषय शिकवणार आहे."

नाईक सरांनी स्मितहास्य करत आपली ओळख करून दिली.

आता सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून घेण्यासाठी ते समोरच्या बाकावर बसलेल्या विध्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले,

"चला आता एकापाठोपाठ एक सर्वजण आपापली ओळख करून द्या."

त्याचबरोबर विध्यार्थ्यांनी आपली ओळख करून द्यायला सुरवात केली.

हळूहळू करत अश्विनचा नंबर आला, तो आपली ओळख करून देण्यासाठी वर उठला, तन्वीला त्याच नाव जाणून घ्यायची उत्सुकता होती, कारण ती नाईक सरांकडे त्याची तक्रार करणार होती. तिचं सगळं लक्ष अश्विनकडे होतं.

अश्विनने आपलं नाव सांगितलं,

"अश्विन यशवंत मोहिते.

माझं गाव, मु.पोस्ट.मोहितेवाडी.

मला बाईकवरून फिरायला आवडतं,गाणी ऐकायला आवडतं आणि मला कविता लिहायला आवडतात."

सर अश्विनकडे पाहत म्हणाले,

"तू कविता करतोस? म्हण बघू एखादी तुझी कविता."

अश्विनने कविता म्हणून दाखवली,

भेटलीस अनामिक वळणावर,

अनं मी तुझ्यात गेलो हरवून,

बाहेरपण एक जग आहे,

मी क्षणात गेलो विसरून.

कसं अनं किती सांगू मी,

प्रेम किती करतो तुझ्यावर,

तुझे रूप चित्ती धरता,

हसू उमटतं नकळत ओठांवर.

तू बोलली नाही तर,

कितीक प्रश्न मला छळतात,

क्षणात पापण्या होतात ओल्या,

नकळत मग अश्रू गळतात.

क्षणोक्षणी मला तुझी,

खूप येते गं आठवण,

तुझ्याच प्रेमाच्या प्राणवायूची,

हृदयात केलीये साठवण.

रोजरोज मी अनेकदा,

तुझ्याच प्रेमात पडतो,

प्रत्येक क्षणात मी तुझ्यावर,

नव्याने प्रेम करतो.

आयुष्यभर जपेन मी,

तुझी माझी ही प्रीत,

आता तूच माझी कविता,

अनं तुझं माझं गीत.

कविता ऐकून सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला.

नाईक सर खूष होतं म्हणाले,

"वाह!खूप सुंदर कविता.तुझ्याकडून वेगवेगळ्या विषयावरील कविता ऐकायला आम्हाला आवडेल.कीप रायटिंग."

अश्विन म्हणाला,

"धन्यवाद सर, धन्यवाद क्लास."

तन्वीलासुद्धा कविता आवडली होती. पण तिने चेहऱ्यावर तसं अजिबात दाखवलं नाही.

त्यांनतर अजिंक्य आणि संतोषने आपली ओळख करून दिली.

एक एक करत तन्वीचा नंबर आला.तिनेही आपलं नाव सांगितलं,

"तन्वी शेखर देशमुख."

मु. पोस्ट-तळेगाव.

मला ड्रायव्हिंग, ट्रेकिंग, मार्शल आर्टस् आवडत, तसेच मला सिंगिंग सुद्धा खूप आवडत."

नाईक सर म्हणाले,

"अरे वाह!गाणंही गातेस का? छान छान. एखाद गाणं म्हण पाहू."

तन्वी म्हणाली,

"हो सर!मी गाणं नक्की गाईन, पण मी काही गाण्याचं शिक्षण वगैरे घेतलेलं नाही.एक आवड म्हणून गाते, त्यामुळे काही चुकलं तर समजून घ्या."

"केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली,

मिटले चुकून डोळे हरवून रात गेली………….

गाणं सर्वांना खूपच आवडलं. नाईक सर म्हणाले,

"तन्वी!खूप सुंदर गातेस.आशाजी सारखाच मधुर आवाज आहे तुझा.कीप इट अप बेटा."

अश्विनला तन्वी पाहताक्षणी आवडली होती.'लव्ह ऍट फर्स्ट साईट' म्हणतात अगदीं तसच. तिचं गायन ऐकून तर तो पुरता घायाळ झाला होता.

तन्वीच्या तंद्रीत असणाऱ्या अश्विनला अजिंक्य हळूच म्हणाला,

"अच्छा!तर वहिनीसाहेबाचं नाव तन्वी आहे."

अश्विन भानावर येत म्हणाला,

"अरे वहिनी काय वहिनी? काहीही काय बोलतोय तू?"

त्यावर संतोष मध्ये बोलला,

"वहिनीला वहिनीच म्हणणार ना रे भावा?"

अश्विन म्हणाला,

"हो का?तुमच्या वहिनीने आतापासूनचं मला छळायला सुरु केल आहे. तिची मदत करायला गेलो तर मलाच मारायला उठली.असली कसली रे तुमची वहिनी?"

अजिंक्य म्हणाला,

"अरे यार!आतापासूनच सवय करून घे, म्हणजे नंतर त्रास होणार नाही. हाहाहाहा."



 

अजिंक्य बोलण्याच्या भरात एवढ्या मोठ्यांनी हसला की नाईक सरांनी त्याला आवाज दिला,

"लाल शर्ट,उठून उभा रहा. तूच तूच अश्विनचा शेजारी."

अजिंक्य गडबडून उभा राहिला,

नाईक सर त्याला म्हणाले,

"नाव काय म्हणालास तुझं?"

अजिंक्य म्हणाला,

"अजिंक्य पोतदार."

नाईक सर म्हणाले,

"बाळ अजिंक्य!हसायला काय झालं? काही जोक झाला का?"

अजिंक्य बेंचावरील पेनाशी खेळत खेळत म्हणाला,

"काही नाही सर, चुकून हसलो."

नाईक सर हनुवटीला हात लावून म्हणाले,

"उगाचच कोणी हसत का? जे काही असेल ते सांग, सगळे मिळून हसुया रे."

अजिंक्य म्हणाला,

"सर सॉरी."

नाईक सर म्हणाले,

"बस खाली!मूर्ख कुठला.चुकून हसलो म्हणे."

सगळा वर्ग खुदुखुदू हसू लागला.

सर्वांना उद्देशून नाईक सर म्हणाले,

"हे एक शारदेचं पवित्र मंदिर आहे. इथून विद्या प्राप्त करून मुलं कुठच्या कुठे पोहोचली आहेत. त्यांचा आदर्श घ्या.

टिंगलटवाळी करणं,चंगीभंगी वृत्तीनुसार वागणं हे आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतं. हीच वेळ आहे योग्य त्या मार्गाने भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याची.आता योग्य मार्ग निवडाल तर यश तुम्हाला शोधत तुमच्या रस्त्यावर आपोआप समोर येईल.

शेवटी निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे. पण इथे आहात तोपर्यंत तुम्हाला इथले नियम आणि अटी पाळाव्याच लागतील.बाकी कोणाला अजून काही अडचण किंवा काही सूचवायचं असेल त्यांनी सांगू शकता."

सगळा क्लास एकदम शांत झाला होता. इतक्यात तन्वीने हात वर केला आणि म्हणाली,

"सर!मला काही बोलायचं आहे."

नाईक सर्व म्हणाले,

"हो तन्वी!बोल काय बोलायचं आहे? काही अडचण आहे का?"

तन्वी उठून उभी राहिली आणि म्हणाली,

"सर!आज कॉलेजमधील पहिला दिवस आहे. आजच्या दिवशीच ही गोष्ट सांगताना मला वाईट वाटत आहे, पण सांगणं गरजेचं आहे.

दुखण्यावर योग्यवेळी औषधोपचार करणं आवश्यक असतं, म्हणजे ते दुखणं बळावत नाही.

अगदीं तशीच ही गोष्ट आहे."

नाईक सर प्रश्नार्थक चेहऱ्याने म्हणाले,

"तन्वी, तुला काय म्हणायचं आहे? स्पष्ट बोलशील तर आम्हाला कळेल."

तन्वी म्हणाली,

"सर आज मी सगळ्यांबरोबर जिन्यातुन वरती येत होते, तर जिन्यात एका मुलाने माझ्याशी गैरवर्तन केलं."

नाईक सर आश्चर्यचकित होऊन म्हणाले,

"काय! आपल्या कॉलेजमध्ये हे घडलं? तेही पहिल्याच दिवशी. कोण आहे तो नालायक मुलगा? फक्त नाव सांग, मग बघतो त्याच्याकडे."

तन्वी अश्विनकडे बघत म्हणाली,

"सर तुम्ही ज्याच्या कवितेचं कौतुक केलं होतं, तोच अश्विन मोहिते. त्याने जिन्यात मुद्दाम माझी ओढणी खेचली."

नाईक सर संतापून म्हणाले,

"अश्विन!हे काय ऐकतोय मी? कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तू  इतकं घाणेरडं कृत्य केलंस. लाज नाही वाटली का रे?"

अश्विन आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी सरांना समजावत म्हणाला,

"सर माझं ऐकून तरी घ्या. मग मला हवी ती शिक्षा करा. मी मुद्दाम तिची ओढणी खेचली नाही. माझ्या पायात आल्यामुळे ती खेचली गेली."

तन्वी म्हणाली,

"खोटं साफ खोटं. मी मागे वळून पाहिलं तेव्हा ओढणी याच्या हातात होती."

नाईक सर रागाने लालबुंद होऊन म्हणाले,

"मूर्ख!नालायक!चल चालता हो बाहेर.थोड्यावेळापूर्वी मी तुला काय समजलो होतो आणि तू काय निघालास.जाऊन स्टाफरूम बाहेर उभा रहा.सर्व स्टाफसमोर तुझा न्यायनिवाडा करतो.चल निघ बाहेर."

अश्विनने नाईलाजाने आपली सॅक पाठीवर अडकवली आणि एकदा तन्वीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागलं होतं. का कुणास ठाऊक पण तन्वीच्या मनात त्याक्षणी कसंतरीच झालं. 'आपण चुकलो की काय?'असा प्रश्न तिच्या मनाला पडला.

अश्विन जड अंतःकरणाने क्लासच्या बाहेर पडला.

सगळ्या वर्गात निरव शांतता पसरली होती.

नाईक सर सर्वांना म्हणाले,

"सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या. हे कॉलेज जेवढं शैक्षणिक गुणवत्तेसाठी ओळखलं जातं, तेवढचं शिस्त आणि अनुशासनासाठी ओळखलं जातं. त्यासाठी गरज पडेल तेव्हा कठोर पाऊलं उचलली जातात. वेळप्रसंगी उपद्रवी विध्यार्थ्यांना रेस्टिकेटसुद्धा केलं गेलं आहे,त्यामुळे सर्वांनी याचं भान राखावं."

थोड्याच वेळात नाईक सरांचं लेक्चर संपलं आणि ते क्लासमधून निघून गेले.

त्यांनतर एक मुलगी तन्वीजवळ आली आणि म्हणाली,

"तन्वी!चुकीचं वागलीस तू. त्याने तुझी ओढणी खेचली नव्हती."

तन्वी म्हणाली,

"तुला काय म्हणायचं आहे?"

ती मुलगी म्हणाली,

"जिथे ही घटना घडली तेव्हा आम्ही तुमच्या पाठोपाठ होतो,तुझी ओढणी जिन्याच्या पायरीवरून लोळत होती. त्यावर चुकून त्याचा पाय पडला आणि ती खेचली गेली. त्याने ती उचलून तुला देण्यासाठी आपल्या हातात घेतली होती. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय."

तन्वी डोक्याला हात लावत म्हणाली,

"ओह माय गॉड!हे काय करून बसले मी."

तन्वीला आपली चुक लक्षात आली.स्वतःच्या गैरसमजामुळे अश्विनला आज वर्गाबाहेर काढल्यामुळे ती खूप खजील झाली होती. नाईक सर त्याला अजून काही वेगळी शिक्षा देतील का? याची तिला हुरहूर लागून राहिली होती.

अश्विनला दिलेल्या शिक्षेचे त्याच्यावर काय पडसाद उमटतील?

तन्वी त्याची माफी मागून हे प्रकरण मिटवून घेईल काय?

काय होईल पुढे?

याची उत्तर मिळण्यासाठी वाचत रहा.

Stay tuned…..

क्रमशः

©®सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.



























 

🎭 Series Post

View all