जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-3

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा  भाग-3


 

तन्वीने बसमधून उतरल्यावर बसचा दरवाजा लावला आणि बस पुढच्या प्रवासाला निघून गेली.

बसस्टॉप पासून गाव अर्धा किलोमीटर आतमध्ये असल्याने गावात पायी चालत जावं लागत होतं.

त्यामुळे सर्व माणसं गावाच्या दिशेने चालत सुटली.

तन्वीने पाहिलं की सुमारे ऐंशी-पंच्याऐंशी वर्षाची एक आजी आणि एक दहा वर्षाचा मुलगा गावाच्या दिशेने चालत जात होते. आजीच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात एक पिशवी होती. पिशवी बरीच जड असावी हे तन्वीच्या लक्षात आलं आणि ती त्या आजीला म्हणाली,

"आजी मी गावापर्यंत पिशवी घेऊ का? तुम्हाला ती खूप जड झाली आहे असं मला वाटत."

यावर आजी आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून तन्वीकडे निरखून पाहू लागली.

 तन्वी पुन्हा म्हणाली,

"आजी मी गावापर्यंत तुमची पिशवी घेऊ का?"

आता आजी म्हणाली,

"हो हो बाळ!लय उपकार होतील तुझे."

असे म्हणत तिने पिशवी तन्वीच्या हातात दिली.

चालता चालता आजी म्हणाली,

"कुणाची पोर गं तू? मी काय ओळखलं नाही."

तन्वी आजीला म्हणाली,

"मी शेखर देशमुख यांची मुलगी तन्वी."

हे ऐकून आजी अचानक थांबली आणि तन्वीकडे बघत म्हणाली,

"तू शेखरची पोर हायसं?"

तन्वीला काहीच समजेना.

ती म्हणाली,

"हो!पण काय झालं? तुम्ही माझ्याकडे अशा का बघत आहात?"

आजी आनंदून म्हणाली,

"अगं पोरी, तुझा बा माझ्या नामाचा दोस्त हुत बघ."


 

तन्वी प्रश्नार्थक चेहरा करून म्हणाली,

"कोण नामा? आणि दोस्त होते म्हणजे आता दोस्त नाहीत का?"

आजी दुःखी चेहरा करून म्हणाली,

"अगं!हूतीच म्हणावं लागलं. माझा नामा आता या जगात नाही राहिला."

तन्वी म्हणाली,

"मला माफ करा, मला माहित नव्हतं. पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. कर्माचे भोग कोणाला चुकले आहेत का?"

 आजी म्हणाली,

"व्हय पोरी. तेच म्हणायचं. पर तुझा बा देवमाणूस हाय बघ. त्यो लहान असल्यापासून सगळ्यास्नी मदत करायला धावायचा. तेच गुण तुझ्यात हायत बघ. लय मोठी होशील. आशीर्वाद हाय तुला माझा."

तन्वीला हे ऐकून खूप आनंद झाला.

आपल्या बाबांचं कोणी कौतुक केल की तिचा ऊर अभिमानाने भरून यायचा.

एव्हाना तन्वी गावात पोहोचली होती. तिने मारुतीच्या मंदिरासमोर आजीकडे ती पिशवी दिली आणि मारुतीला वंदन करून आपल्या घराकडे निघाली.दोन गल्ल्या पार केल्यानंतर तन्वीचं घर आलं.

तन्वी घरी पोहोचली तेव्हा तिची आई तन्वीच्या बाबांशी मोबाईलवर बोलत होती.

तन्वीला आलेलं पाहून ती म्हणाली,

"हे पहा!आलं तुमचं लाडकं कन्यारत्न.आज कॉलेजला ऍडमिशनसाठी गेल्या होत्या बाईसाहेब."

असं म्हणत तिने तन्वीकडे हसत पाहिलं.

पलीकडून तन्वीचे बाबा म्हणाले,

"हो मग!आहेच माझी मुलगी रत्न. लाखात एक आहे माझी तन्वी."

तन्वीची आई हसतच त्यांना म्हणाली,

"हो हो!पुरे झालं लेकीचं कौतुक.आता लवकर सुट्टीवर यायचं तेवढं बघा."

तन्वीचे बाबा म्हणाले,

"हो गं!लवकरच येईन. सुट्टीसाठी अर्ज टाकला आहे. पण आम्हा आर्मीवाल्यांना कधी इमर्जन्सी लागू होईल काही सांगता येत नाही.एकीकडे तो पाकिस्तान तर दुसरीकडे चीन, काहीना काही कुरघोडी करतच असतात."

तन्वीची आई घाबरत म्हणाली,

"नका हो सांगू असं काही. खूप भीती वाटते आणि मन कशातच लागत नाही.तुम्ही लवकर रिटायरमेंट घेऊन घरी या. खूप झाली देशसेवा, आता कुटुंबासाठी वेळ द्या."

तन्वीचे बाबा म्हणाले,

"हो बाई हो. तुझंच खरं. चल मी फोन ठेवतो. ड्युटीवर जायला हवं."

असं म्हणून त्यांनी फोन कट केला.

इतक्यात तन्वी फ्रेश होऊन आईजवळ आली.

आणि तिने आईला दिवसभराचा संपूर्ण वृतांत दिला.

सगळं ऐकून घेऊन आई तिला म्हणाली,

"बाळ तन्वी! तू धाडसी आहेस,हिम्मतवान आहेस. पण तरीही काळजी घेत जा. मुलीच्या जातीला अतिधाडस बर नव्हे.वेळ सांगून येत नाही, तेव्हा आपण सावध असलेलं बर."

यावर तन्वी म्हणाली,

"आई!तुझा आणि बाबांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर मी सगळ्या संकटाना समर्थपणे तोंड देईन.तू विनाकारण काळजी नको करू."

तन्वीची आई म्हणाली,

"हो बाई तुझंच बरोबर. अगदी बापासारखी हट्टी आहेस.बर असो!कॉलेज कधीपासून सुरु होणार आहे?"

तन्वी म्हणाली,

 "परवा आमची प्रवेशाची यादी जाहीर होणार आहे आणि लवकरच कॉलेजही सुरु होईल."

"ठीक आहे."

म्हणून तन्वीची आई आपल्या कामात व्यस्त झाली.

दोन दिवसांनी कॉलेजच्या संकेतस्थळावर प्रवेशाची यादी जाहीर झाली.

तन्वीचं ऍडमिशन झालेलं होतं.



 

आणि तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा सगळ्या मुलामुलींना होती.

कॉलेजच्या सोनेरी दुनियेतील तो पहिला दिवस.नवे कॉलेज,नवे सहकारी, नवे मित्र, नव्या इच्छा,नवी ध्येय उराशी बाळगून प्रत्येकजण कॉलेजसाठी घरातून निघाले होते.

तन्वीसुद्धा आपलं आवरून कॉलेजसाठी निघाली.तसं हे नटूनथटून मिरवण्याची तिला गरजच नव्हती. देवाने तिला नैसर्गिक सौंदर्याची देणगी बहाल केली होती.तिने आपली सॅक पाठीवर अडकवून आधी आईला आणि मग देवाला नमस्कार करून ती कॉलेजसाठी घरातून निघाली. तळेगाव ते कोल्हापूर बसने प्रवास केल्यांनतर बस स्टॅन्डपासून कॉलेजपर्यंत रिक्षा करून जावं लागायचं.

असा सगळा प्रवास करून तन्वी कॉलेजच्या दारात पोहोचली.

तिने कॉलेजच्या कमानीवर  सिटी कॉलेज हे नाव पाहिलं आणि तिच्या मनात विचार आला की आजपासून ही आपली कर्मभूमी. नकळत ती खाली झुकली आणि तिने जमिनीला हात लावून नमस्कार केला.त्यानंतर तिने गेटमधून आत प्रवेश केला.

ती हळूहळू कॉलेजच्या इमारतीकडे निघाली तेव्हा तिच सौंदर्य पाहून सगळी मुलं घायाळ होतं होती. पाच फूट तीन इंच इतकी माफक उंची,काळे लांबसडक आणि मुलायम केस, बदामी डोळे,

सरळ चाफेकळी नाक,सतेज कांती आणि चालताना दिसून येणारा प्रचंड आत्मविश्वास. यामुळे बघताक्षणी प्रत्येकजण फिदा होतं होता.

तसंच त्यानेही तिला समोरून चालत येताना पाहिलं आणि तो तिच्यात इतका हरवून गेला की तो ज्या बाईकवर बसला होता तिथून घसरून खाली पडला.

सगळेजण त्याच्यावर हसू लागले. तसं तन्वीचही लक्ष तिकडं गेलं  आणि तिलाही हसू आवरलं नाही.

इतक्यात त्याचा मित्र अजिंक्य त्याला उद्देशून म्हणाला,

"अरे यार अश्विन! असा कसा पडलास रे?"

इतक्यात दुसरा मित्र संतोष म्हणाला,

"अरे नुसताच पडला आहेस की प्रेमा बिमात पडलास?"

सगळीकडे जाम हशा पिकला.

अश्विन स्वतःला सावरत म्हणाला,

"अरे ये मित्र आहात की शत्रू? मी पडलो असताना मला उठवायचं सोडून काय खिल्ली उडवताय माझी? पण म्हणतात ना, हर एक फ्रेंड कमीना होता है.

मला आज ते 100% पटलं आहे."

अजिंक्य म्हणाला,

"अरे तू का पडलासं ते आम्ही पाहिलं आहे. तुझी विकेट गेली आहे बघ."

संतोष म्हणाला,

"होय रे नुसती विकेट नाही तर क्लीन बोल्ड झालाय."

असं म्हणून दोघेही जोरात हसू लागले.

अश्विन चिडून म्हणाला,

"आज्या,संत्या जरा गप्प बसा. उगाच काहीपण अर्थ लावू नका.चुकून माझा तोल गेला, बाकी तुम्हाला वाटतं तस काही झालं नाही."

संतोष त्याला आणखी चिडवत म्हणाला,

"अच्छा चुकून काय बर बर. हाहाहाहा.

अरे पण काय सॉलिड मुलगी आहे यार!शप्पत ही तर मॅरेज मटेरियल आहे. पण तूला नसेलच आवडली तर मी ट्राय करतो."

अजिंक्य म्हणाला,

"हो हो मलापण खूप आवडली आहे बुवा,

तू लवकर काय ते ठरव भावा."

सगळं ऐकून अश्विन म्हणाला,

"मूर्खांनो, आज कॉलेजचा पहिला दिवस असताना हे नको तसले धंदे करू नका.चला क्लास अटेंड करू."

अजिंक्य मोठ्याने हसत म्हणाला,

"ओहो!अरे सरळ सरळ सांग ना, की तुला ती आवडली आहे आणि तुम्ही यात पडू नका."

अश्विन म्हणाला,

"अरे येड्या डोक्यांच्यानो!चला क्लास सुरु होईल आणि या कॉलेजमधील पहिला तास मला मिस करायचा नाहीये."

सगळ्यांना अश्विनचं बोलणं पटलं म्हणून ते सगळे क्लासरूमच्या दिशेने निघाले. फर्स्ट ईयरचं क्लासरूम दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे जिना चढून वरती जावं लागत होतं.त्यामुळे जिन्यात गर्दी झाली होती.

अश्विन आणि त्याचे मित्र जिन्याजवळ पोहोचले असताना लायब्ररीमधून तन्वी जिन्याच्या दिशेने येताना अश्विनला दिसली.

तो मित्रांना म्हणाला,

"अरे एक मिनिट!बहुतेक मला कॉल आला आहे."

 असं म्हणत त्याने उगाचच खिशातून मोबाईल बाहेर काढला आणि कानाला लावला.

"हॅलो, हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो."

असं म्हणत त्याने मोबाईल परत खिशात ठेऊन दिला. एव्हाना तन्वी अश्विनच्या समोरून जिन्यावरून वर जाऊ लागली.

अश्विन तिच्या पाठोपाठ जिना चढू लागला.

तन्वीची ओढणी एकाबाजूला जमिनीबरोबर लोळत होती. त्यावर चुकून अश्विनचा पाय पडला आणि ओढणी खेचली गेली. त्यामुळे तन्वीची ओढणी खाली पडली. तन्वी पाठीमागे बघणार इतक्यात अश्विनने ती उचलली असल्यामुळे तिला वाटलं की अश्विननेचं मुद्दाम तिची ओढणी खेचली आहे. तिला त्याचा प्रचंड राग आला. अश्विनने ओढणी तिला देण्यासाठी हात पुढे केला. तर तन्वी म्हणाली,

"How dare you? तुझी हिम्मत कशी झाली माझी ओढणी ओढायची?"

असं म्हणत तिने त्याच्यावर हात उगारला, पण अश्विनने सावधपणे तो आपल्या हातानी पकडला.

अश्विनने हात पकडल्यामुळे तन्वी अधिकच संतापली आणि हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली.

अश्विन रागाने  तिला म्हणाला,

"ओ मॅडम!तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का?मी तुमची पडलेली ओढणी उचलून तुम्हाला देत होतो तर तुम्ही मलाच मारायला हात उगारता?"

तन्वीपण संतापून म्हणाली,

"ए, माझा हात सोड. नाहीतर तुझी काही खैर नाही. मी तुझ्यासारख्या मुलांना चांगलंच ओळखते. मुलींची छेड काढायची आणि काहीच नं झाल्याचा आव आणायचा.पण तुझ्यासारख्याना कसं वठणीवर आणायचं ते मला चांगलंच कळतं."

हे सगळं जिन्यात चालू असल्यामुळे जिन्यात गर्दी झाली, कोणालाच वरती जाता येत नव्हत.

इतक्यात कोणीतरी ओरडलं,

"अरे ए! सर आलेत लवकर वरती चला."

त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि सगळे जिन्यातून वरती धावू लागले. नाईलाजाने अश्विनने तन्वीचा हात सोडला आणि तो जिन्यातून वर जाऊ लागला इतक्यात तन्वीने त्याचा पाठलाग सुरु केला.

ती त्याच्याजवळ जाऊन म्हणाली,

"तुला असं सोडणार नाही मी. तुला काय वाटलं मीपण बाकी मुलींसारखी असेन. चुकीच्या मुलीशी पंगा घेतला तू. आता सर क्लासमध्ये येऊदेत, पहिल्याच दिवशी तुला पुस्तकात नसणारा धडा नाही शिकवला ना तर तन्वी नाव नाही लावणार."

अश्विन तिला म्हणाला,

"ए मॅड आहेस का तू? गप्प बसलोय म्हणून काहीही बोलशील का? आणि तू म्हणतेस तसं मी काहीच केलेलं नाही.कर नाही त्याला डर कशाला?

 त्यामुळे जास्त स्मार्ट बनायची गरज नाही. तुला सरांना सांगायचं आहे ना? बिनधास्त सांग."

इतक्यात सर त्यांच्याजवळ येऊन पोहोचले.

काय होईल पुढे?

तन्वी खरच सरांना सांगेल का?

सर अश्विनवर काय कारवाई करणार?

यासाठी वाचत रहा.

Stay tuned…..

क्रमशः 

©®सारंग शहाजीराव चव्हाण

कोल्हापूर 9975288835.


 

[ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल.]


 

🎭 Series Post

View all