जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-10.

एक अनोखी प्रेमकथा.

जिवलगा-एक प्रेमकथा. भाग-10





 



आज अश्विन तन्वीला अडकवणाऱ्या व्यक्तीला सर्वासमोर आणणार असल्यामुळे,तन्वी पटपट आवरून कॉलेजसाठी बाहेर पडली.नेहमीप्रमाणे बसमधून प्रवास करतं असताना तन्वीने ज्या मुलाला कानशिलात लगावली होती,तो आणि त्याचा ग्रुप त्या बसमधून प्रवास करतं होता. तो मुलगा तन्वीकडे बघून हसत होता.तन्वीने सुरवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, पण तो जास्तच हसायला लागला. मग तन्वी त्याला हावभावानेच म्हणाली,



"अजून कानशिलात हवी आहे का?"



मग तो दुसरीकडे तोंड करून उभा राहिला. संपूर्ण प्रवासात त्याने पुन्हा एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही.



तन्वी आता कॉलेजमध्ये पोहोचली. तिने अश्विनला कॉल केला आणि म्हणाली,



"अश्विन!कुठे आहेस तू? मी लायब्ररीत तुझी वाट पाहतेय. लवकर ये."





अश्विन म्हणाला,



"मी ऑन द वे आहे. पाचच मिनिटात तिथं पोहोचतोय."





थोड्याच वेळात अश्विन लायब्ररीमध्ये आला आणि तन्वीला म्हणाला,



"तन्वी!मी आलो आहे.चल बाहेर जाऊन बोलूं."





तन्वी म्हणाली,



"हो बाहेरचं बोललेलं बर. चल राधेय कॅफेमध्ये जाऊ."





दोघेही राधेय कॅफे मध्ये गेले.





गेल्यागेल्या त्यांनी दोन कॉफ़ीची ऑर्डर दिली.



कॉफ़ी येईपर्यंत तन्वी म्हणाली,



"अश्विन तो मुलगा आज माझ्या बसमध्येचं होता आणि माझ्याकडे पाहून हसत होता."





अश्विन म्हणाला,



"कोण!दया शिर्के?"





तन्वी म्हणाली,



"हो तोच तो. मला त्याच नावही माहित नव्हतं. काल तू सांगितल्यावर मला समजलं."





अश्विन म्हणाला,



"त्याच हरामखोराने तुला यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.आज त्याच्या कॉलरला पकडून स्टाफरूममध्ये नाही आणला ना, तर अश्विन मोहिते नाव नाही लावणार."





तन्वी त्याला म्हणाली,



"अश्विन तू त्याला कसं काय शोधून काढलास? म्हणजे नेमकं काय प्लॅनिंग केलंस तू?"





इतक्यात वेटर कॉफी घेऊन आला.





अश्विन म्हणाला,



"आधी कॉफी घे. मग सांगतो."





तन्वी म्हणाली,



"कॉफी घेत घेत बोलूं. आपल्याला वेळ लावून चालणार नाही. क्लासही अटेंड करायचा आहे आणि मला उत्सुकताही लागून राहिलीये. म्हणून प्लीज लवकर सांग."





अश्विन हसत म्हणला,



"मुली मुलांपेक्षा उतावीळ असतात हे अगदीं खरं आहे आणि सुंदर मुली तर जरा जास्तच उतावीळ असतात."





तन्वी डोळे वटारत म्हणाली,



"अश्विन!इथे माझा जीव चाललाय आणि तुला जोक सुचत आहेत."





अश्विन म्हणाला,



"ओके!ओके!सांगतो ऐक. मी असेपर्यंत तुझा जीव जाऊ देणार नाही,काळजी नको करू."





तन्वी रागावत म्हणाली,



"कॉफी पिऊन झाली, आता तरी सांगशील ना?"





अश्विनने एक स्माईल दिली आणि तो सांगू लागला,



"तू शक्यता व्यक्त केल्याप्रमाणे सम्राटच्या डेअरडेव्हिल्स ग्रुपमधील मुलींना मी आपल्या स्पार्टन्स ग्रुपच्या साथीने टार्गेट केलं.डेअरडेव्हिल्सच्या मुलींचा घोळका जिथं बसलेला त्यांच्याजवळ जाऊन, त्यांना ऐकू जाईल अशी आम्ही चर्चा सुरु केली,मी म्हणालो,



"संत्या,अरे तन्वीच्या सॅकमध्ये बॉक्स ठेवणाऱ्या मुली लवकरच सापडणार आहेत."



संत्या म्हणाला,



"अशव्या!कशा काय सापडणार रे त्या मुली?"





मी म्हणालो,



"अरे त्यांच्याविरुद्ध एक मोठा पूरावा मला सापडला आहे. आणि शिवाय त्यावेळी त्या लेडीज रूममधून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातपण दिसल्या आहेत."





संत्या म्हणाला,



"काय सांगतोयस अशव्या!म्हणजे खरा गुन्हेगार सापडणार म्हण."





मी म्हणालो,



"अरे नुसता सापडणार नाही, तर त्याला कठोर शिक्षापण होणार. कॉलेजमधून काढतीलच, पण बऱ्याबोलाने गुन्हा कबूल नाही केला तर मग पोलिसांना बोलवून कारवाईसुद्धा करावी लागणार."





संत्या म्हणाला,



"म्हणजे त्या मुलींचं करियर बरबाद होणार की रे."





मी मारलेला खडा अचूक निशाण्यावर बसला होता. त्यातल्या संबंधित मुली कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या.त्यांची अवस्था बघून मला हसू आवरत नव्हतं.



मी हसू दाबून ठेवत म्हणालो,



"संत्या!या सगळ्यातुन वाचण्याची त्यांच्याकडे एक संधी आहे."





संत्या म्हणाला,



"कोणती संधी आहे रे?"





मी म्हणालो,



"जर त्यांनी गुन्हा कबूल केला आणि पुन्हा अशीं चूक करणार नाही अशीं हमी दिली तसेच यामागच्या सूत्रधाराचं नाव सांगितलं तर मी त्यांच्यासाठी सरांशी बोलू शकतो."





संत्या म्हणाला,



"देव त्यांना आतातरी सुबुद्धी देवो आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल करो."





मी म्हणालो,



"हो रे. लवकरच त्यांचा पर्दाफाश होणार आहे. त्यामुळे त्यांनी  लवकर हालचाल केली तरच त्या वाचू शकतात. नाहीतर मग करियरचं 'राम नाम सत्य' होईल."





आम्हाला आमचं काम झाल्याची खात्री झाल्यावर आम्ही तिथून बाजूला गेलो.



संत्या मी अन सगळा ग्रुप पोटात दुखेपर्यंत हसलो.



इतक्यात त्या दोघी तिघी तिथे आल्या आणि त्यांनी मला बाजूला बोलावून खरी हकीकत सांगितली. "





 



अश्विन कडून सगळं ऐकून घेतल्यावर तन्वी म्हणाली,



"अरे पण त्या मुलींनी असं का केलं ते मला सांग ना तू?"





अश्विन म्हणाला,



"हे बघ तन्वी. थोड्याच वेळात आपण त्यांना घेऊन स्टाफरूममध्ये जाणारच आहोत. त्यामुळे तू तेव्हा त्यांच्या तोंडूनच ऐक."





तन्वी समजून घेत म्हणाली,



"बर बाबा ठीक आहे. चल आता कॉलेजमध्ये जाऊ."





तन्वी आणि अश्विन यांना सोबत चालत येताना पाहून स्पार्टन्स ग्रुप आपसांत चर्चा करू लागला,



संतोष म्हणाला,



"जमतंय!जमतंय! अशव्याची गाडी पटरीवर आली बुवा एकदाची."





अजिंक्य म्हणाला,



"होय रे संत्या!बरोबर हिंदी सिनेमासारखं घडतंय बघ. तन्वीला पाहून पहिल्या नजरेत अशव्याचं गाडीवरून खाली पडणं, नंतर जिन्यातल्या प्रसंगामुळं भांडण होणं, नंतर तन्वीला आपली चूक कळणं,मग अश्विनची माफी मागणं आणि मैत्रीचा हात पुढे करणं, आधी अश्विनने नखरे करणं आणि तन्वी अडचणीत असल्यावर तिच्यासाठी मदतीला धावून जाणं. ये प्यार नहीं तो क्या है यारो?"



असं म्हणत ते जल्लोष करू लागले.





तन्वी आणि अश्विन जवळ येताच सगळा ग्रुप गाणं म्हणू लागला.



"दो दिलं मिल रहे है, मगर चुपके चुपके,



सबको हो रही है, खबर चुपके चुपके|



तन्वीला हे जरा विचित्र वाटतं होतं पण ही लोक हे गाणं का म्हणत आहेत हे अश्विनला बरोबर समजलं होतं.





तो संतोष आणि अजिंक्यकडे डोळे वटारून बघत होता.





तसे तो दोघेही आणखीनच जोरात गाणं म्हणू लागले.



अश्विन मनातल्या मनात म्हणाला,



"इथून लवकरात लवकर निघावं लागेल, नाहीतर हा संत्या आणि आज्या दोघेही माझी वाट लावतील. साल्याना स्फुरण चढलंय."





तिथून काढता पाय घेण्यासाठी अश्विन तन्वीला म्हणाला,



"तन्वी!चल आपण स्टाफरूममध्ये जाऊन नाईक सरांना सगळं सांगू."





तन्वी ही होकारार्थी मान हलवतं म्हणाली,



"हो!चल. लवकरात लवकर माझ्या माथ्यावर लागलेला हा डाग मला पुसुन काढायचा आहे."





अश्विन आणि तन्वी स्टाफरूमच्या दरवाजापाशी गेले आणि त्यांनी सरांना विचारलं,



"मे आय कम इन सर?"





नाईक सर म्हणाले,



"येस कम इन."





अश्विन आणि तन्वी दोघेही आत जाऊन सरांपुढे उभे राहिले.



 नाईक सर म्हणाले,



"बोला!काय काम आहे?"





अश्विन म्हणाला,



"सर!तन्वीच्या बॅगमध्ये सिगारेटचं पाकीट ठेवणारी व्यक्ती मला सापडली आहे. तिला आपल्यासमोर हजर करायचं आहे."





नाईक सर म्हणाले,



"कोण आहे ती हरामखोर?तिला माझ्यासमोर लवकर घेऊन या."





अश्विन म्हणाला,



"सर, एकच मिनिट मी कॉल लावून बोलवून घेतो."





नाईक सर म्हणाले,



"ठीक आहे."





अश्विनने त्या व्यक्तीला कॉल लावला आणि स्टाफरूममध्ये यायला सांगितलं.





पाचच मिनिटात तीन मुली स्टाफरूमच्या दरवाजातून सरांची परवानगी घेऊन आत आल्या.





अश्विन त्या मुलींना म्हणाला,



"पूजा, क्रांती आणि स्नेहल. तुम्ही सरांना सगळं खरंखरं सांगून टाका. मी आहे तुमच्या सोबत."





पूजा खाली मान घालून म्हणाली,



"सर आम्ही गुन्हेगार आहोत, तन्वी निर्दोष आहे. तिच्या सॅकमध्ये सिगारेटचा बॉक्स आम्हीच ठेवला होता.आम्हाला आमचा गुन्हा मान्य आहे."





नाईक सर संतापून म्हणाले,



"लाज वाटतं नाही का? वर तोंड करून सांगताय,की बॉक्स आम्ही ठेवला.



एका मुलीचं करियर संपवायला चालला होता तुम्ही. आज सिगारेटचा बॉक्स ठेवलात, भविष्यात बॉम्ब ठेवायला कमी करणार नाही तुम्ही. म्हणून तुम्हाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात येईल."





सरांना मध्येचं थांबवत अश्विन म्हणाला,



"सर!यांना शिक्षा देण्याआधी एक गोष्ट जाणून घ्यावी. ही फक्त प्यादी आहेत, खरा सूत्रधार तर वेगळाच आहे. त्यामुळे त्याला समोर आणणं जास्त गरजेचं आहे."





नाईक सर म्हणाले,



"कोण आहे तो?"





पूजा घाबरत घाबरत म्हणाली,



"त्याच नाव आहे दयानंद शिर्के.आमच्याच क्लासमध्ये आहे तो."





नाईक सर शिपायाला म्हणाले,



"सावंत!सेकंड ईयरच्या दयानंद शिर्केला बोलावून घेऊन ये."





 



सावंत त्याला बोलवायला निघून गेले.





मघापासून शांत असणारे बाकीचे सर आता आपसात चर्चा करू लागले.





थोड्याच वेळात सावंत दयानंदला घेऊन आले.





स्टाफरूममध्ये सगळ्यांना पाहून तो सटपटला.





नाईक सर त्याला पाहून म्हणाले,



"ये ये दयानंद की देवानंद. तुझीच वाट बघत आहोत आम्ही."





दयानंद दबकतच म्हणाला,



"सर!मी समजलो नाही. मला का बोलावलं आहे?"





नाईक सर म्हणाले,



"कळेल कळेल. जरा दम धर. मुलींनो आता सगळं सविस्तर सांगा."





पूजा घाबरत म्हणाली,



"सर!या दयानंदने आम्हाला तन्वीच्या बॅगमध्ये तो बॉक्स ठेवायला सांगितला होता."





यावर दयानंद म्हणाला,



"कसला बॉक्स? कोण तन्वी?काय बोलतेस तू पूजा? मला काहीच कळेना."





नाईक सर म्हणाले,



"नालायका!तूझ्या हातात दाखला काढून दिल्यावर तुला सगळं कळेल."





पूजा पुढे सांगू लागली,



"सर!हा एकदिवस माझ्याजवळ आला आणि म्हणाला की,



"तन्वीने मला भरल्या बसमध्ये कानशिलात लगावली होती,म्हणून मला तिचा बदला घ्यायचा आहे.यात तुम्हीच मला मदत करू शकता कारण तुमचा ग्रुप मोठा आहे आणि तुमचं नाव कोणीही सांगणार नाही.प्लीज आपल्या मैत्रीसाठी तुम्ही माझं एवढं काम करा.तुम्हाला फक्त एक बॉक्स तिच्या सॅकमध्ये ठेवायचा आहे."



मग आम्ही लेडीज रूममध्ये तिला धक्का देऊन तिच्याशी वाद घालू लागलो आणि तेव्हाच मी तिच्या सॅकमध्ये बॉक्स ठेवला."





नाईक सर म्हणाले,



"मूर्ख नालायक मुलींनो!मित्राने सांगितलं म्हणून काहीही करणार का? थोडीतरी स्वतःची बुद्धी वापरायची होती. तुमच्या या कृत्यामुळे तन्वीची आणि कॉलेजची किती बदनामी झाली याची कल्पना आहे का?सिटी कॉलेजच्या मुली सिगारेट फुकतात, अशीं सगळीकडे जाहिरात झाली आहे. त्याची भरपाई कशी करणार?"





पूजा आणि बाकीच्या दोघी खाली मान घालून उभ्या होत्या.





नाईक सर तन्वीला म्हणाले,



"तन्वी!या नालायकाला कशाबद्दल कानशिलात लगावली होतीस?"





तन्वीने त्यांना सगळी हकीकत सांगितल्यावर सर दयानंदवर जास्तच भडकले आणि म्हणाले,



"हरामखोरा हे असले धंदे करायला कॉलेजला येतो का? लाज वाटतं नाही का? आईबापाचे नाव खराब करताना काहीच वाटतं नाही का?उद्या तू तुझ्या आई वडिलांना घेऊनच कॉलेजला यायचं. त्यांनाही समजू दे, त्यांचा दिवटा काय दिवे लावतो."





आपण सापडलो आहोत याची दयानंदला आता पूर्ण खात्री झाली होती.



तो गयावया करत होता, पण सरांनी त्याला हाकलून लावलं.





त्यानंतर नाईक सर म्हणाले,



"तन्वी!या मुलींचं काय करायच ते तू ठरव. तू म्हणशील ती शिक्षा यांना देऊ."





तन्वी म्हणाली,



"सर!मला वाटतं की यांना सुधारण्याचा एक चान्स द्यायला हवा.



काहीवेळा नकळत किंवा अजाणतेपणी आपल्या हातून चुका होतात,त्यावेळी त्याच्या परिणामाची किंचीतशीही कल्पना आपल्याला नसते. पण त्यांच्या परिणामाची जाणीव झाली तर अशा चुका आपण टाळू शकतो.माणसाला प्रत्येक चुकीला शिक्षा देणे आवश्यकचं नसते. त्यापेक्षा ती चुक पुन्हा होता कामा नये याची जाणीव करून देणं जास्त इम्पॉर्टन्ट असतं.



म्हणून मला वाटतं त्यांना एक संधी द्यावी. दयानंद हा एक वाया गेलेला मुलगा आहे, तो जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी करत असतो. त्याला शिक्षा देणं योग्यच. पण या तिघींना आपण माफ करूया."





नाईक सर म्हणाले,



"वाह!तन्वी तू स्वतःला आरोपातून निर्दोष सिद्ध केलेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे तू तुझ्यातलं माणूसपण सिद्ध केलंस. या मुलींनी तुझ्या कॅरिअरमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला पण तू त्यांच्या कॅरिअरचा विचार केलास. आय एम प्राऊड ऑफ यु बेटा."





 



तन्वी म्हणाली,



"धन्यवाद सर!पण मला निर्दोष सिद्ध करण्यात सिंहाचा वाटत अश्विनचा आहे. तो नसता तर कदाचित मी निर्दोषत्व सिद्ध करू शकले नसते.म्हणून या कौतुकाचा खरा हक्कदार तोच आहे."





नाईक सर म्हणाले,



"हो नक्कीच!अश्विनसारखा मित्र तुला लाभला हे तुझ्या भाग्य म्हणायचं.एकजूट रहा आणि एकमेकांना अशीच साथ द्या."





अश्विन म्हणाला,



"सर मी फक्त माझं कर्तव्य केलं, बाकी काही नाही."





अशाप्रकारे या प्रकरणावर पडदा पडला.





अश्विन आणि तन्वी स्टाफरूममधून बाहेर आले.



तन्वीने अश्विनचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली,



" तू होतास म्हणून मी यातून निर्दोष सुटू शकले. आभार मानून तुला परकं करणार नाही. पण तू जे काही केलंस ते आयुष्यभर लक्षात ठेवीन. अश्विन आज तू माझ्या मनात घर केलंस.आपली मैत्री मी आयुष्यभर जपेन."





अश्विनला स्वप्नात असल्यासारखं वाटतं होतं, तन्वीच्या मुलायम हाताचा स्पर्श झाल्यावर तो मोहरून गेला होता आणि तिच्या गुलाबाच्या पाकळीसम असणाऱ्या नाजूक ओठांतून स्वतःसाठी एवढं सारं ऐकून त्याला अत्यानंद झाला होता.त्याच्या मनात तन्वीविषयी प्रेम वाटू लागलं होतं.पण तन्वीच्या मनात प्रेम होतं का????





 



तन्वी आणि अश्विन एकमेकांच्या प्रेमात पडतील का?



की कोणी वेगळी व्यक्ती या दोघांमध्ये येईल?



जाणून घेण्यासाठी वाचत रहा.



Stay tuned…..





क्रमशः





©® सारंग शहाजीराव चव्हाण.



कोल्हापूर. 9975288835.





 



[कथेतील आगामी आकर्षण--कॉलेजमधील रंगीबेरंगी दुनिया,



कॉलेज स्पोर्ट्स मधील घडामोडी,



स्नेहसंमेलनातील मज्जा-मस्ती,



जंगल कॅम्पमध्ये घडणारी विलक्षण घटना आणि समोर येणार एक धक्कादायक सत्य.



गतजन्म आणि याजन्मातील घटनांचा परस्पर संबंध.



एक लव्ह ट्रँगल. आणखी बरंच काही.]





 


🎭 Series Post

View all