जीवनरेखा ( भाग-२ )

जीवनरेखा (भाग २)

   कथामालिका

शिर्षक - जीवनरेखा (भाग २)

विषय-  कौटुंबिक कथा

फेरी - ईरा राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा.


आपले आजी-आजोबा,आई-बाबा,काका-काकू यांचा जड

निरोप घेऊन राम व रश्मी आता नोकरीच्या ठिकाणी शहरात 

जाण्यासाठी निघाले.ईथपासून पुढे...


रामने आपल्या नोकरीच्या ठिकाणी शहरात एक फ्लॅट बुक केला.

आणि तिथे ते राहायला गेले. काही सामान त्यांनी घरून..

आणलेलेचं होते. इतरही काही आवश्यक सामान विकत घेऊन

आता ते राहू लागले. सकाळी रामचा डबा करून देणे, इतर

कामं आवरणे यात रश्मीचा बराचसा वेळ जायचा. पण

सासरच्या आठवणीने ती व्याकुळ व्हायची.


एक दिवस मात्र विपरीतच घडलं. राम ऑफिस मधून घरी येताना

रस्त्याने त्याचा अपघात झाला.लोकांनी लगेचं त्याला दवाखान्यात

नेले.पण दुर्दैवाने डाॅ.ने त्याला मृत घोषित केले.ही बातमी..

रश्मीला सांगण्यात आली.' नाही असं होणार नाही. तुम्ही खोटे..

सांगत आहात. 'असं म्हणतांनाचं तिची शुद्ध हरपली.

शुद्धीवर आल्यानंतर जेव्हा तिने रामचे मृत शरीर पाहिले..

तेव्हा मोठ्याने हंबरडा फोडला.रश्मीची अवस्था कुणालाचं 

बघवेना.बातमी कळताचं रामच्या घरची सर्व मंडळी आली.

रश्मीच्या माहेरचे लोक आले.सर्वचं अगदी धाय मोकलून 

रडत होते.


म्हणतात नां...नियतीपुढे कुणाचे चालत नाही.हा धक्का...

निश्चितचं सर्वांसाठी अत्यंत दुखःदायी होता. रामचे आजी आजोबा,

आई वडील, घरची सर्व मंडळी अगदी पुतळ्यावत बनले होते

रश्मीने रामला दिलेल्या हाका सर्वांचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या..

होत्या.शेवटी सर्वांनी एकमेकांना धीर देत कसेबसे सावरले.


रामची आजी तर सारखे म्हणत होती 'राम मी येते तुझ्यासोबत.

मला कां नाही नेलं परमेश्वराने.मी कुठे लपले होते रे.'

ते पाहून उपस्थितांची मने हेलावत होती.हळूहळू एक महिना..

लोटला. रश्मी आता तिच्या सासू-सासऱ्यांकडे राहू लागली.

तिच्याकडे पाहताना सर्वांच्या हृदयात कालवाकालव व्हायची.


खरंच 'स्त्रीचं आयुष्य म्हणजे दोन प्रहरांचं नाटक...

         संसारासाठी झिजणे, कितीही येता प्रसंग बिकट.


पण रश्मी अत्यंत धीराची. आपल्यावर आता घरची सर्व मंडळी

अवलंबून आहेत, आता आपलं दुःख बाजूला ठेवून आपल्याला

सर्वांना सांभाळायचं आहे हे तिने मनाशी ठरवले. बघता बघता

दोन वर्ष निघून गेली. रश्मीला सर्वांनी आपली मुलगीच मानले होते.

रामच्या आईच्या डोक्यात विचार आला, आपण आपल्या सुनेचे

दुसरे लग्न करून द्यायचे का? तिने लगेच तो विचार रामचे बाबा..

श्रीकांत जवळ बोलून दाखवला. 'अग सुषमा, खूप चांगला

विचार केलास तू.'

अगं आपण कुठपर्यंत तिला साथ देणार. उभं आयुष्य कसे..

काढेल ती एकटी. मला तर तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं की

खूप वाईट वाटतं.


अहो पण तिला पटेल का हे सर्व. सुषमा श्रीकांतला म्हणाली.

आपण तिला व्यवस्थित समजावून देऊ. पटेल तिला ते.

पाहूया तर. श्रीकांत व सुषमाने आपला निर्णय घरातील सर्वांना

सांगितला. घरच्या सर्वांनी देखील त्यांच्या मताचे स्वागत केले.

लक्ष्मीकांत चा मुलगा परागने तर या सर्वांचे कौतुक केले.

आपले आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू

यांच्या आधुनिक विचारसरणीचे त्याने स्वागत केले. सायलीला सुद्धा

आई-बाबांचे मत पटले. आता प्रश्न होता ही गोष्ट रश्मीला कशी

सांगायची. शेवटी रामच्या आईने, सुषमाने एक दिवस रश्मीला

जवळ बोलावले.' अग रश्मी तुला एक गोष्ट सांगू का?

सुषमा म्हणाली.

' कोणती हो आई. सांगा नां...

अग रश्मी, आम्ही सर्वांनी तुझे दुसरे लग्न लावून देण्याचा निर्णय

घेतला आहे. तुला उभं आयुष्य काढायचं आहे. जीवनात

कुणाची तरी साथ असणे खूप आवश्यक आहे. आम्ही काय

आज आहोत ,उद्या नाहीत. सुषमा म्हणाली.

आई, हे काय नवीनच. मी एवढी जड झाली का हो तुम्हाला.

नाही, मी नाही करणार दुसरे लग्न. तुम्हा सर्वांना सोडून नाही

जाणार मी. रश्मी म्हणाली.

अग रश्मी तू आमची मुलगी नां. मग मुलीला तर सासरी 

जावेच लागते.

नाही आई, मी आता अजून शिक्षण घेणार, नोकरी करणार.

आणि तुम्हालाही सांभाळणार. रश्मी ऐकायलाच तयार नव्हती.

सुषमा ने आता सायलीला बोलावले. व तिला यासंबंधी

बोलण्यास सांगितले. सायलीने मात्र रश्मीचा होकार मिळवला.


रश्मी सायलीला म्हणाली. ठीक आहे पण मला आधी माझे शिक्षण

पूर्ण करू द्या. नंतर मी नोकरी मिळविन. तेव्हाच मी लग्न करीन.

मला वाटतं स्त्रीने स्वावलंबी असणं केव्हाही चांगलं. कोणती वेळ

कशी येईल सांगता येत नाही. मी माझ्या पायावर उभी राहणार.

रश्मीने आपले मत सायली जवळ व्यक्त केले. अर्थातच सर्वांनी

होकार दिला.


रश्मीने M.S.C. नंतर बी.एड. केले. त्याचबरोबर मेहंदी,

पेंटिंग क्लासेस सुद्धा केले. तिला रामची खुप आठवण यायची.

'काय हो! आम्हा सर्वांना सोडून कां निघून गेलात. असे म्हणून..

ती रामच्या फोटोजवळ खूप रडायची. आता रश्मीने नोकरीसाठी

प्रयत्न सुरू केले. आणि एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळवली.

तिला सुरुवातीपासूनच शिक्षकी पेशा खूप आवडायचा.

सर्वप्रथम ही गोष्ट तिने सुषमाला म्हणजे आपल्या सासूबाईला 

सांगितली. ते ऐकून घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला.

आमच्या फोटो समोर उभी राहून रामला सुद्धा तिने नोकरी

मिळाल्याची गोष्ट सांगितली.' अहो पहा, आता मी स्वतःच्या पायावर

उभी झाले. आता माझी काळजी करू नका.


आणि ठरल्याप्रमाणे रश्मीसाठी वर संशोधन सुरू झाले. रश्मीला

चांगले स्थळ मिळावे, ती सुखी व्हावी अशी सर्वांची इच्छा.

लवकरच रश्मीला एक चांगले स्थळ चालून आले. मुलगा अगदी

तिला अनुरूप, मोठ्या हुद्द्यावर असलेला. अशा तऱ्हेने

साध्याच पद्धतीने रश्मीचा विवाह पार पडला. आपल्या सर्व

सासू-सासर्‍यांना, आजी आजोबाला, सायलीला बिलगुन ती..

रडत होती. सर्वांनाच रडू आवरत नव्हते. पण आज आपल्या

योग्य निर्णयामुळे एका जीवाला आनंद मिळाला. तिला तिचा

संसार मिळाला. या आनंदात सर्व होते. रश्मीची पाठवणी करताना

सर्वांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू निश्चितच आनंदाश्रू होते.


सायली म्हणाली' आई बाबा तुम्ही सर्वांनी मिळून जो निर्णय घेतला

तो खरंच खूप चांगला कुठल्याही मुलीच्या बाबतीत असे घडू नये.

पण दुर्दैवाने घडलेच तर तिच्या सासरच्या मंडळींनी तिला आपली

मुलगी समजून तिच्या लग्नाचा निर्णय निश्चितच घेतला पाहिजे.

पण तसे होत नाही. एक तर मुलीला तिचे आई वडील घेऊन 

जातात. किंवा ती स्वेच्छेने माहेरी जाते. खरे तर तिने सासरीच

राहायला पाहिजे. कारण सासरच्यांना तर मुलांचे दुःख

जास्त असते. सुनेने असे माहेरी निघून गेल्यावर ते अधिकच

दुःखी होतात. कधी कधी तर सुनेचे दुसरे लग्न लावून द्यावे

हा विचारही ते मनात आणत नाहीत. उलट तिलाच दुषणं..

लावतात. आई वडील ही आपल्या मुलीच्या बाबतीत असे विचार

कमीच करतात. समाज काय म्हणेल या भीतीने. अशा परिस्थितीत

ती मुलगी विनाकारण होरपळली जाते. कालमान परिस्थितीनुसार

आपले विचार निश्चितच बदलले पाहिजे. 'विचार बदला,

समाज बदलेल.'हीच खरी जीवनरेखा.


रश्मी आणि रमन च्या संसार वेलीवर लवकरच एक सुंदर फुलं..

उमलले. आपल्या सासू-सासर्‍यांना, छे! आपल्या आई-वडिलांना

भेटायला रश्मी आणि रमण अधून मधून यायचे. आपल्या दिराच्या

म्हणजे परागच्या लग्नात सुद्धा ती अगदी बहिणीच्या थाटात

वावरत होती.


रश्मी कडे सर्वजण अगदी समाधानाने बघत होते. एक मोठी

जबाबदारी सर्वांनी अत्यंत धीराने पार पाडली होती.


     कुटुंब म्हणजे, आपुलकीच्या तारेचे कुंपण...

     कुटुंब म्हणजे, नात्यातील रेशीम बंधांची गुंफण...

     कुटुंब म्हणजे, सुख-दुःखाच्या फुलांचे हार...

     कुटुंब म्हणजे, घट्ट, मजबूत विणकामाची तार...

     एकमेकांच्या जगण्याचा आधार .


कथा मालिकेचा हा भाग आवडल्यास लाईक व कमेंट जरूर करा.

समाप्त.

धन्यवाद.


लेखिका -सौ. रेखा देशमुख

टीम - अमरावती