जीवन माझे घडवायचे..

This poem is about a person self confidence.

राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा
विषय- मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार.
कवितेचे शीर्षक- जीवन माझे घडवायचे..


वाटेमधले कुंपण भेदुन पुढे जात राहीन 
विस्कटलेल्या स्वप्नांवर इमले बांधत राहीन 
हरायला मी जरी लागलो तरी हारणे नाही 
जीवन माझे घडवायाचे अता थांबणे नाही 

निराश वादळ फिरेल मागे जिद्दीला पाहून 
स्वाभिमान मी ठेवीन जागृत निंदेला ऐकून 
लक्ष्य दूरचे पण मी पाठलाग सोडणे नाही 
जीवन माझे घडवायाचे अता थांबणे नाही 

अनोळखी रस्त्यांवर शोधत जातो नवीन वळणे 
तुटलेल्याला सांधत जातो भले नशिबी जळणे 
जमेल तितके पुण्य गुणावे तिथे भागणे नाही 
जीवन माझे घडवायाचे अता थांबणे नाही 

वेळप्रसंगी प्रवाह भेदुन उलट दिशी पोहणे 
काळ लोटला तरी शेवटी यशश्रीला मोहणे 
ना यत्नांची कास सुटे वा मान टाकणे नाही 
जीवन माझे घडवायाचे अता थांबणे नाही 

शिल्पकार मी आयुष्याचा जीवन घडवत जातो 
त्रुटी राहिल्या तरी दागिन्यांपरीच मिरवत जातो 
तुटलेल्या तुकड्यांची गाथा उगा सांगणे नाही 
जीवन माझे घडवायाचे अता थांबणे नाही 

© मयुरेश तांबे
जिल्हा- रायगड-रत्नागिरी