Jan 23, 2022
सामाजिक

जीवन गाणे

Read Later
जीवन गाणे

संसाराच्या कालचक्रात अडकून, रोजच्या भांडणाला कंटाळलेला अमर रागारागाने घरातून बाहेर पडला. तो रागात तसाच चालत गेला. चालता चालता तो घरापासून बराच लांब गेला. तिथे एका बाकड्यावर बसून विचार करत होता. विचारचक्र चालू होते.

अमरला तर आता जगण्याची इच्छा नव्हती. रोजच्या त्या भांडणाला तो कंटाळला होता. कोठेतरी जीव द्यावा? असे त्याला वाटत होते. त्या विचारचक्रात असतानाच त्याच्या शेजारीच एक वयस्कर जोडपे येऊन बसले. इतर बाकडे पण रिकामे नव्हते. म्हणून तो तिथेच बसून राहिला आणि विचार करू लागला.

रेवा आणि अमर एकत्रच काॅलेजला होते. रेवा अगदी सिम्पल पण दिसायला देखणी, गोरी पान, सरळ नाक, रेशमी केस अगदी हिराॅईनला लाजवेल असे सौंदर्य. अभ्यासातही एकदम हुशार. कोणीही तिला पाहिले की तिच्या प्रेमात पडेल अशीच होती ती. अमरचेही असेच झाले होते. पण रेवाच्या घरची इतकी काही श्रीमंती नव्हती. खाऊन पिऊन सुखी होते.

अमर दिसायला सर्वसाधारण इतर मुलांप्रमाणे होता. पण शरीरयष्टी मजबूत, उंच असा होता. घरची परिस्थिती एकदम श्रीमंती. वडिलांचा व्यवसाय होता. घरी जे हवे ते सगळे होते.

अमरला अगदी पहिल्या दिवसापासून रेवा आवडत होती. पण लगेच प्रपोज कसे करायचे म्हणून तो गप्प होता. मित्रांच्या घोळक्यातून त्या दोघांची मैत्री आणि मैत्रीतून प्रेम कसे झाले हे त्यांचे त्यांनाच कळले नाही.

शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघांनी आपापल्या घरी सांगितले. रेवाच्या घरी काहीच अडचण नव्हती. पण अमरच्या घरी तिच्या आईला श्रीमंत घरचीच मुलगी सून म्हणून हवी होती. त्यामुळे सुरुवातीला आढेवेढे घेत नंतर मुलासाठी त्या तयार झाल्या.

लग्न अगदी मोठ्याने घराण्याला शोभेल असे अमरच्या घरच्यांनी केले. सर्व विधीवत लग्न पार पडले. मग रेवाचा गृहप्रवेश होऊन ती घरात प्रवेश करते. अमरचे घर म्हणजे अगदी राजवाडाच. घरात सगळी शिस्त होती.

लग्नानंतर रेवा थोडे दिवस माहेरी जाऊन आली त्यावर तिला एक दिवसही माहेरला पाठवले नाही. रेवा माहेरला जाण्यासाठी जेव्हा सासूबाईंना विचारते तेव्हा "तिथे काय आहे जायला. इथे सगळ्या सुविधा आहेत. काही गरज नाही जायची." असे त्या बोलत असत.

रेवाचे बाबा रेवाच्या आवडीचे काही खाऊ घेऊन आले तर तिच्या सासूबाई लगेच ते कामवाल्या सखूला देऊन टाकत आणि "आमच्यात असलं कोण खात नाही." असे तिला म्हणत. पण एकदाही रेवाच्या मनाचा विचार करत नसत. रेवा मनोमन खूप दुःखी होई. अमरला सांगितले तर तो तिचीच समजूत काढे.

नवीन असेपर्यंत सगळे ठीक होते. पण हळूहळू रेवा आणि तिच्या सासूमध्ये भांडण होऊ लागली. अमर सुरूवातीला त्यांना समजावून सांगत होता. पण नंतर परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली. तो रेवाकडे दुर्लक्ष करू लागला. तिच्यासोबत बोलणे सोडायचा. कित्येकदा तर त्या नवरा बयकोमध्येच भांडणं होऊ लागली.

म्हणून त्या दिवशी रागाने अमर घरातून बाहेर निघून गेला. त्याच्या शेजारीच ते जोडपे बोलताना अमर भानावर आला.

"तुला पाणीपुरी आवडते ना. आपण जाताना खाऊन जाऊ." आजोबा

"हो आणि आईस्क्रीम पण घेऊ." आजी

"हो घेऊ की." आजोबा हसतच म्हणाले

"तुम्ही माझ्या आवडीनिवडी खूप जपता हो." आजी

"मग जपायलाच हव. आयुष्यभर साथ देईन असे लग्नात वचन दिले आहे." आजोबा

आजी गालात लाजत होत्या आणि हळूच हसत होत्या.
"अगं, सात जन्माची साथ अपुली. असे रडत कुढत काढायचे नाही असे आपण अगदी सुरुवातीलाच ठरवले होते. त्यामुळे इतकी वर्षे सुखी संसार केला. चढउतार येतातच ग. पण म्हणून रडायचं नाही तर त्याच उमेदीने परत उठून लढायच. असेही आपण ठरवले होते." आजोबा

"हो ना. कुरबुरी तर असणारच पण त्यातच गुरफटून जायचं नसतं. हे तुमच्याकडूनच शिकले मी." आजी

या आजी आजोबांच्या बोलण्याने अमरला एक नवी उमेद मिळाली. तो आत्महत्या करायचा विचार करत होता. ते सोडून तो नव्या उमेदीने घरी परतला. आनंदी आयुष्य जगायला.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..