संघर्ष..परिक्षा आयुष्याची!!

संघर्षाशिवाय आयुष्य नाही नि बिना संघर्षाशिवाय आयुष्याला काहीच किंमत नाही.
संघर्ष.. परिक्षा आयुष्याची !!
विषय - संघर्ष (गोष्ट छोटी डोंगराएवढी)

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
उभे असतात संघर्षाचे असंख्य महामेरू..
तरून जातो तोच हा भवसागर
जो कधीही म्हणत नाही
आता मी काय नि कसे करु??
लढतो, झगडतो, कित्येकदा पडतो,
पण तरी अंधारातही आशेचा किरण तो शोधतो..
प्रयत्नांची पराकाष्ठा करुन नि
जिद्दीला हाताशी धरुन
यशाला गवसणी देखील घालतो..
संघर्ष नसेल ते आयुष्य कसले?
असे मनाला वारंवार समजावतो,
तोच जीवनात नेहमी इतिहास घडवतो..
संघर्षाशिवाय या फुकटच्या देहाची
किंमत देखील शून्य भासते..
कारण जगण्याची कला संघर्षातूनच उमगते..
सुखाच्या पाठून दुःखाची चाहूल
ही आपसूकच येत असते..
जसे अपयशामागून यशाचे द्वार
खुले होणार यात मुळीही शंका नसते..

खरंच, "आयुष्य म्हणजे जणू खेळ असतो ऊन सावल्यांचा. कितीही सुख आले नशिबी तरी दुःखालाही द्यावा लागतोच निवारा."

बारकाईने जर समाज निरीक्षण केले तर असे लक्षात येते की जीवनाच्या या वाटेवर प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो.
छोट्या छोट्या गोष्टीतही सुख मानावेच लागते. पण कितीही सुख मिळाले तरी समाधान मिळेलच असे नाही.
आणि या समाधानासाठीच व्यक्तीला शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष हा करावाच लागतो.

संघर्ष हा फक्त मानवालाच करावा लागतो असे नाही, तर अगदी किड्या मुंग्यानाही तो कधी चुकला नाही. थोडक्यात काय तर, पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याला त्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो.

इवलेसे फुलपाखरू आपल्याला त्याच्या मनमोहक सौंदर्याने भुरळ घालते. क्षणिक जरी असले आयुष्य त्याचे तरी देखील ते अगदी मनसोक्त जगते. रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत ते आनंदाने बागडताना दिसते. पण त्याचा संघर्ष कधी कोणाला दिसतो का हो??

तर नाही, कारण इथे प्रत्येक जण आपापले दुःख कुरवाळत बसलेले असते. फुकट मिळालेले आयुष्यही मानवाला त्याच्या दुःखापुढे लहान का बरं वाटते? मग फुलपाखराने तर किती रडत बसायला हवे? नाही का??

जणू रडण्याचे पेटंट फक्त मानव जातीलाच मिळाले आहे असे वाटते. पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी असूनही, छोट्या छोट्या गोष्टीतही माणूस असमाधानी दिसतो. कारण जीवनाची एकच बाजू तो नेहमी पाहत असतो. सुखी, समाधानी आणि आल्हाददायक जीवनाची स्वप्न तो रोजच उघड्या डोळ्यांनी रंगवत असतो. तर मग हे सारे मिळवताना संघर्ष करावाच लागणार, याला थोडीच ना तो अपुवाद ठरतो.

कोणाचा सुरू असतो जगण्यासाठी संघर्ष, कोणाचा दोन वेळच्या अन्नासाठी तर कोणाचा या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी. या साऱ्यांत सगळेच यशस्वी होतात असे नाही. पण कोणी अपयशी देखील होत नाही. कारण अपयश जरी आले तरी दर वेळी मिळणारा नवीन अनुभवच पुढील संघर्षाचा खरा मार्गदर्शक ठरतो.

म्हणुनच काही गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात..

शिकावे नेहमी त्या इवल्याशा मुंगीकडून
साऱ्या जीवनाचे सार तिच्या कृतीत दडलेले आहे..

शिकावे त्या इवल्याशा चिऊ ताईकडून
काडी काडीचा संघर्ष तिच्या घरट्यात दडलेला आहे..

शिकावे त्या आईकडून जिने पतीच्या माघारी हिमतीने
संघर्षाला आपली ढाल बनवले नि लेकरांना घडवले आहे..

शिकावे त्या वीरपत्नी आणि वीर मातेकडून
ज्यांनी देशासाठी आपल्या सर्वात जवळच्या व्यक्तीला गमावले आहे..

शिकावे त्या बाप नावाच्या माणसाकडून
ज्याने स्वतः उपाशी राहून आपल्या कुटुंबाला पोसले आहे..

या सर्वांपुढे मग आपण करत असलेला संघर्ष छोटा की मोठा? हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.

रडत न बसता, नशिबाला न कोसता, जो आलेल्या परिस्थितीचा जिद्दीने सामना करतो तो आयुष्याच्या कठीणातल्या कठीण परीक्षेतदेखील पास होणार यात मुळीच शंका नाही. फक्त संयम तेव्हढा बाळगणे गरजेचे असते.

सुखामागुन दुःख नि अपयशामागून यश ही आवर्तने आलटून पालटून प्रत्येकाच्या आयुष्यात होतच राहणार. आपण फक्त सकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रेरणा स्वतःच बनले तर कितीही संकटे आली तरी त्यांना सामोरे जाण्याचे बळ देखील आपसूकच मिळेल.

"संघर्षाशिवाय आयुष्य नाही नि बिना संघर्षाच्या आयुष्याला काहीच किंमत नाही."

जर आयुष्यात कुठल्याही गोष्टीसाठी संघर्षच केला नाही तर फुकट काहीही मिळणार नाही आणि चुकून देवाच्या कृपेने मिळालेच तर त्याची काडीचीही किंमत उरणार नाही.

एक गोष्ट प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवायला हवी ...

संघर्ष असला कितीही मोठा तरी घाबरून न जाता जिद्दीने त्यावर मात करण्याची तयारी ठेवावी. "संघर्ष" हा एकट्याचीच परीक्षा असते हे नेहमी ध्यानात ठेवावे. कितीही अवघड पेपर असला आयुष्याचा तरी तो ज्याचा त्यालाच सोडवावा लागतो हे कधीही न विसरावे.
कठीण समयी जरी व्यक्ती एकटी असली तरी विजयानंतर मात्र सगळी दुनिया त्याच्या सोबत असते.

स्वामी विवेकानंदांनी देखील याबाबतीत अत्यंत सुंदर शब्दात संघर्षाचे प्रेरणादायी असे वर्णन केले आहे....

"जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी l"

खरंच आयुष्याच्या प्रत्येक परिक्षेत पास व्हायचे असेल तर प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकालाच संघर्षाचा पेपर हा सोडवावाच लागणार आहे, हे प्रत्येकानेच स्वतःच्या मनावर बिंबवणेही तितकेच गरजेचे आहे. स्वतःच स्वतःची ताकद बनून संघर्षाला पायदळी तुडवण्याची शपथ घेतली तर विजयाची वाट मग दूर नाही, हे सत्य कोणीही बदलू शकणार नाही. हो ना?

समाप्त

धन्यवाद..

©® कविता वायकरमानावेचसंघर्ष.. परिक्षा आयुष्याची !!संघर्ष.. परिक्षा आयुष्याची !!