

अश्विनीने लग्नानंतर काही वर्षे नोकरी केली पण आरूषच्या जन्मानंतर तिने नोकरी सोडली व आरूषला आपला पूर्ण वेळ देवू लागली.
नव्या सोसायटीत कोणी ओळखीचे नव्हते. सर्व अनोळखीचं होते. त्यामुळे नव्या घरात ,नव्या सोसायटीत रूळायला थोडा वेळ लागणार होता. सकाळची कामे ,दुपारचा आराम झाला की, अश्विनी आरूषला संध्याकाळी सोसायटीच्या गार्डन मध्ये खेळायला नेऊ लागली. गार्डन मध्ये काही आरूषच्या वयाची तर काही थोडी मोठी मुले यायची. त्यांच्याबरोबर त्यांच्या आई पण असायच्या. मुले खेळता खेळता एकमेकाशी बोलायची,हसायची ...आणि त्यामुळे त्यांची पटकन मैत्री पण झाली.
लहान मुले निरागस ,निष्पाप ,निःस्वार्थी असतात. त्यांना फक्त प्रेमाची भावना कळत असते. त्यामुळे त्यांची कोणाशीही लवकर मैत्री होते.
पण जसेजसे वय वाढत जाते..अनुभव यायला लागतात,मोठ्यांची शिकवण मिळत जाते.तसतसे मनात अनेक प्रश्न तयार होत असतात आणि निष्पाप, निरागस,अल्लड मन कधी स्वार्थी, व्यवहारी होऊन जातं कळतही नाही.
मुलांची मैत्री झाली होती पण अश्विनीची त्या मुलांच्या आईंशी हाय,हॅलो पर्यंतच ओळख झाली होती.
असेचं दिवस जात होते..
आरूषच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अश्विनीने सोसायटीतील आरूषच्या मित्रांना बोलावले आणि त्यांच्या आईवडिलांनाही बोलावले. वाढदिवस खूप छान झाला. लहानांसारखे मोठ्यांनीही खूप एन्जॉय केला. हसणे,बोलणे,गप्पा गोष्टी यात इतके रंगले की, जसे आपण एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहोत ,असेच सर्वांना वाटत होते.
खरचं काही नात्यांना जुळायला वेळ लागत नाही. मन जुळले की नाते जुळते आणि मैत्रीचे नाते हे ही असेचं नाते असते.
अश्विनीला तिच्या सोसायटीत मैत्रीचे नाते मिळाले होते आणि हळूहळू ते नाते फुलत चालले होते. मुलांचे वाढदिवस, गणपती, सत्यनारायण पूजा ,हळदीकुंकू या निमित्ताने एकमेकांकडे जाणेयेणे सुरू झाले. गाठीभेटीतून विचार, स्वभाव कळत गेले ...जुळत गेले आणि अहो ताई वरून झालेली ओळख अगं मीरा, अगं सविता पर्यंत पोहोचली आणि अश्विनी, मीरा,सविता,अर्चना, प्रतिभा ,सीमा यांची घट्ट मैत्री झाली.
मुले तर नवीन मित्र मिळाल्याने खूश होतेचं पण त्यांच्या आया त्यांच्यापेक्षा जास्त खूश झाल्या होत्या. त्या सर्व आपल्या मैत्रीचा भरपूर आनंद घेत होत्या. मूव्हीला जाणे, शॉपिंगला जाणे. पिकनिकला जाणे. किट्टी पार्टी करणे.अशी सर्व मस्त मजा करत होत्या.सर्वजणी खूप आनंदी, उत्साही होत्या. यापूर्वी कधीही न भेटलेल्या, एकमेकींसाठी अनोळखी असलेल्या त्या सर्व मैत्रीणी.. मैत्रीच्या नात्याचा मनसोक्त आनंद घेत होत्या.
जीवनात सुखाबरोबर दुःख ही असते. चांगल्या अनुभवाबरोबर वाईट अनुभव ही येत असतात. नातेवाईक, मित्रमंडळी यातही काहींशी खूप छान जमते,त्यांच्याशी चांगली बॉंडींग होते, अशी नाती आयुष्यभर आनंद देते.
पण प्रत्येक नात्यात ,मित्रमंडळीत एखादी तरी व्यक्ती अशी असते की, त्या व्यक्तीला सांभाळून घ्यावे लागते, त्या व्यक्तिशी नाते कसेतरी निभवावे लागते.त्या व्यक्तीचे वागणे,बोलणे,स्वभाव आवडत नसला तरी नातेवाईक म्हणून ,मित्रमैत्रीण म्हणून त्या व्यक्तिशी चांगले वागण्याचा प्रयत्न करावा लागतो.
काही वेळेस काही नाती घाईघाईत इतकी पटकन जुळतात आणि नंतर एकमेकांचे स्वभाव, गुण दोष कळायला लागले की मगं नातं तुटायला ही वेळ लागत नाही.
काहीजण मनापासून नाते निभावतात पण काही स्वार्थासाठी नाते बनवतात आणि नात्यांचा उपयोग करतात. आणि वेळ आली की मग आपले खरे रूप दाखवतात.
अश्विनी आणि तिच्या मैत्रीणींचा छान ग्रुप तयार झाला होता. पण त्यांच्यात सीमा ही थोडी वेगळीच होती. इतरांपेक्षा ती थोडी जास्त श्रीमंत होती. त्यामुळे की काय, किंवा मुळात तिचा स्वभावच तसा होता की काय.. बोलण्यात उद्धट होती, कोणाला स्वतः काही मदत करायची नाही पण इतरांकडून मात्र मदतीची अपेक्षा ठेवायची, स्वतःच्या घरी कधी कोणाला खाऊपिऊ घालत नव्हती पण इतरांकडे जाऊन हक्काने खायची प्यायची. स्वभावाने तापट होती. सुरूवातीला बाकी मैत्रीणींना तिच्याबद्दल कळले नाही पण जसेजसे अनुभव येत गेले तसे तिच्याबद्दल कळत गेले. बाकी मैत्रीणींचे स्वभाव छान जुळले होते. त्या एकमेकींना निःस्वार्थ मदत करत होत्या. सीमाच त्यांच्यात गैरसमज निर्माण करत होती. सर्वांना हे समजत होते पण तिच्याशी एकदम संबंध तरी कसे तोडायचे? हा ही प्रश्न होताच.
ती तशी होती पण या सर्व मनाने खूप चांगल्या होत्या. आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घेत होत्या. सीमाचे वागणे आवडत नसले तरी तिच्या मुलांवर प्रेम करायच्या,त्यांचे लाड करायच्या .
पण कधीना कधी खरा मुखवटा बाहेर पडतोच .
सीमाचेही असेच झाले. तिच्या मुलाचे मीराच्या मुलाशी खेळताना थोडे भांडण झाले. भांडण कसले लहान मुलांमध्ये ! एकीकडे भांडतातही आणि दुसरीकडे पुन्हा खेळायलाही लागतात. पण सीमाने त्या लुटुपुटूच्या भांडणाचा राईचा पर्वत केला आणि मोठ्यांनाही त्यात ओढले. मीरावर आणि इतर मैत्रीणींवर नको ते आरोप केले.त्या तिला सर्व सांभाळून घेत होत्या आणि उलट तिचं सर्वांना दोष देत होती. त्यामुळे सर्व मैत्रीणींना तिचा खूप राग आला .तिच्याशी त्यांनी बोलणे बंद केले.
सर्व व्यवस्थित शांत होत होते. पण सीमा प्रत्येकीला मेसेजेस करून त्रास देवू लागली. मग सर्वांनी तिचा नंबरही ब्लॉक केला. हे करताना त्या सर्वांना वाईट वाटत होते.
नाते जुळवणे सोपे असते
पण टिकवून ठेवणे अवघड असते.
सीमाच्या वागण्याचा सर्वांनाच त्रास झाला होता. आपण तिच्या शी इतके चांगले वागुनही तिने आपल्याशी असे वागावे ? याचे सर्वांना वाईट वाटत होते.
जीवनात असे लोक येतात
आणि खूप मोठा अनुभव देऊन जातात.
सीमाच्या अशा वागण्यामुळे, सीमाशी नंतर कोणीही कोणता संबंध ठेवला नाही. ती सोसायटीच्या इतर स्त्रियांशी बोलू लागली. त्यांच्याशी चांगले संबंध बनविण्याचा प्रयत्न करू लागली.आणि या सर्वांबद्दल वाईटबरे सांगू लागली.
अश्विनी आणि तिच्या मैत्रीणींना या दुःखद अनुभवातून सावरायला वेळ लागला. पण वाईट व्यक्ती साठी आपली मैत्री ,आपले आयुष्य का दुःखात ठेवायचे? उलट \"जे होत ते चांगल्यासाठी होत\" असे समजूया आणि आपल्या मैत्रीचा आनंद घेऊ या. असे सर्वांनी ठरवले आणि त्या पुन्हा छान आनंद घेऊ लागल्या. अश्विनी आणि तिच्या मैत्रीणींची मैत्री खरी मैत्री होती म्हणून सीमासारख्या पोकळ मैत्री करणाऱ्या मैत्रीणीच्या त्रासापासून त्यांची सुटका झाली. यासाठी त्यांनी देवाचे मनोमन आभार मानले.
जिथे खरे प्रेम असते तिथे आनंद असतो आणि
जिथे खोटारडेपणा असतो तिथे दुःख असते.
अश्विनी आणि तिच्या मैत्रीणी तर मैत्रीचा आनंद घेत होत्या पण सीमाला आपण चांगली मैत्री गमावल्याचा पश्चाताप,दुःख आयुष्यात कधी ना कधी होईलच.
शेवटी असेचं म्हणावेसे वाटते...
\"काही व्यक्तींच आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं असतं
आणि काही व्यक्तींच आपल्या आयुष्यात नसणं हेचं चांगल असतं\"
समाप्त
नलिनी बहाळकर