जय भीम माझ्या नजरेतून

जय भीम सिनेमा यावर लेख
मारहाण , गुंडगिरी , नायकनायिकेचा टिपिकल रोमान्स आणि रोमँटिक गाणी या सर्वांना वगळून कधी कधी काही वास्तवदर्शी दर्जेदार सिनेमे बनतात जे व्यवस्थेवर प्रश्न उभे करतात. ऍमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला " जय भीम " हा असाच एक सिनेमा आहे. कित्येक वर्षांपूर्वी भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सुंदर सुसंस्कृत असे लिखित संविधान दिले. संविधानकर्त्यांनी एका न्यायप्रधान , समानता असलेल्या समृद्ध संपन्न भारताची कल्पना केली. पण समाजाच्या सर्वच घटकांना या स्वातंत्र्याचा , या संविधानाचा लाभ झाला का ? की या दुर्लक्षित घटकांना स्वातंत्र्याची फक्त आसवेच भेटली हा प्रश्न सिनेमा उपस्थित करतो. एनएच टेन , आर्टिकल फिफ्टीनप्रमाणेच हा पण सिनेमा जातीव्यवस्थेचे जळजळीत वास्तव डोळ्यासमोर आणतो. चित्रपटाची कथा राजाकननू या समाजाच्या दृष्टीने खालच्या दर्जाच्या एका आदिवासी जमातीच्या व्यक्तिभोवती फिरते. एकदा तो सरपंचच्या घरी घुसलेला साप पकडून देतो. दुर्दैवाने सापाहुन अधिक विषारी माणसे त्याला डसतात. चोरीचा खोटा आरोप त्याच्यावर होतो. त्याच्यासोबत त्याच्या भावाला आणि बहिणीच्या पतीलाही जेलमध्ये टाकतात. त्याच्या बहिणीसोबत कोठडीत पोलीस बलात्कार करतात. त्यांच्यासमोर त्यांच्या स्त्रीला नग्न करून जणू पोलीस त्या तीन पुरुषांच्या पौरुषत्वची खिल्ली उडवतात. महाभारतातील द्रौपदीने किमान काहीजणांकडे मदत मागितली होती. पण या केविलवाण्या पांचालीला रक्षकच भक्षक झालेले दिसत आहेत. माणसांना पशूहुन हीन वागणूक दिली जाते. जेलमध्ये गुन्हा कबूल व्हावा म्हणून अतोनात अत्याचार केले जातात जे पाहताना अंगावर शहारे येतात. अत्याचार करताना बेशुद्ध पडलेले आदिवासी जिवंत आहेत की मृत हे पाहण्यासाठी पोलीस डोळ्यात मिरचू टाकतात.
राजकननूची पत्नी एका शिक्षिकेच्या मदतीने चंद्रु या वकीलाकडे जाते. सिनेमाच्या पोस्टरवर दिसणारा चंद्रु वकील हा दुर्लक्षित घटकांच्या न्यायासाठी मोफत लढत असतो. कार्ल मार्क्स , पेरियार , बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्याच्यावर पगडा जाणवतो. त्याचा चष्मा हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चष्म्यासारखा भासतो. इतकेच नव्हे तर न्यायप्रधान समाजाच्या निर्मितीसाठी लढा देण्याची जिद्द आणि अन्यायाची चीड त्याच्या डोळ्यातून झळकते ते पाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तसेच त्याच ऊर्जेने आणि ध्येयाने प्रेरित डोळे आठवल्यावाचून राहत नाही. असे म्हणतात की संविधान सभेत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा चर्चेसाठी उभे राहत तेव्हा ते इतके अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत की सर्वांच्याच संमेचे निरसन होई आणि मग सार्वनुमत बनत. या चित्रपटात नायक चंद्रु जेव्हा वादविवाद करतो तेव्हा तसाच भास होतो. हेच " जय भीम " टायटल ठेवण्यामागचे कारण असावे.
चित्रपटात कुठेच " जय भीम " घोषणा नाही किंवा आंबेडकरवादी विचारसरणीचा पुरस्कारही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले मूल्ये जसे की समानता , स्वातंत्र्यता , न्याय ही आजही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली नाहीत. या आदिवासी लोकांची अवस्था पाहता आजही ही मूल्ये किती श्रेष्ठ आहेत आणि डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य किती महान आहे हे जाणवते. चंद्रु सांगिनीला म्हणजेच राजकननुच्या पत्नीला न्याय मिळवून देतो. पोलिसांनी केलेले अत्याचार न्यायाधीशसमोर उघडकीस आणतो.
" कहाणी " सिनेमात गर्भवती असल्याचे नाटक करणाऱ्या आणि आपल्या पतीच्या मृत्यूला जबाबदार आतंकवादीला मारणाऱ्या विद्या बालनचे कौतुक झाले होते. या सिनेमात अशिक्षित संगिनीपण गर्भवती आहे. तिलाही एक लहान मुलगी आहे. केस मागे घेण्यासाठी तिच्यावर हरएकप्रकारे दबाव आणला जातो. तिच्या लहानग्या मुलीला उचलून नेले जाते. तरीही ती स्वाभिमान विकायला तयार होत नाही. वरतून संगिनीला घरी पोलीस जीपने सोडण्याचे आदेश येतात तेव्हा संगिनी पोलीस जीपमध्ये बसत नाही. पोलीस तिच्या मागे मागे फिरत असतात पण ती घरी तशीच येते आणि एकदाही मागे वळून बघत नाही. एकदा तर लाखो रुपये देण्याची ऑफर तिला येते. " माझा मुलगा मोठा झाला आणि त्याने विचारले की हे पैसे कुठून आले तर तुझ्या बापाच्या हत्याराकडून आले असे उत्तर देऊ का ? आमच्याकडे पैसे नाहीत पण स्वाभिमान आहे. " असे सडेतोड उत्तर ती देते. ती साप चावलेल्या लोकांमधील विष काढते आणि प्राण वाचवते. पैश्यापेक्षा तिला प्राण महत्वाचे वाटतात. देहातील विष उतरवणे सोपे पण मनातील द्वेषाचे विष उतरवणे कठीणच असते. पतीला शोधण्यासाठी ती वकीलासोबत त्याही अवस्थेत फिरते. तिच्या पतीवर म्हणजे राजाकननुवर जेव्हा अत्याचार होत असतात तेव्हा जाचाला कंटाळून गुन्हा कबूल करू असे तिचे दीर म्हणतात पण तिचा पती म्हणतो की " ह्या जखमा भरून जातील पण चोरीचा कलंक कधीच मिटला जाणार नाही ". पतीचा हाच स्वाभिमानाचा वारसा ती चालवते.
प्रकाशराज यांचीही एका प्रामाणिक पोलिसाची भूमिका आहे. लोकशाही वाचवण्यासाठी कधीकधी हुकूमशाही करावी लागते ही त्याची विचारसरणी आहे पण नायक चंद्रु त्याला पोलिसांचे वर्तन गुंड्याहुन भयावह असते हे सांगतो. एक आदिवासी महिला माझ्या पतीला बापाला आणि मुलाला खोट्या गुन्ह्यात आत टाकले असे रडत सांगते. एक आदिवासी मुलगा चोरीच्या गुन्ह्यात आत जातो त्यामुळे शाळेत सर्वजण त्याच्याकडे संशयाच्या नजरेने बघतात आणि कंटाळून तो शाळा सोडतो. टार्गेट पूर्ण करण्यासाठी निष्पाप आदिवासी लोकांवर एकाहून अधिक गुन्हे लावले जातात. हे आदिवासी अशिक्षित आहेत आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नाहीत. ते पोलिसांच्या अत्याचाराचे शिकार होतात.
वरकरणी चित्रपट डावी विचारसरणीचा किंवा कम्युनिस्ट पार्टीचा पुरस्कार करणारा वाटू शकते. पण मुळात चित्रपट कुण्या पक्षाच्या जातीच्या धर्माच्या विरोधात नसून शोषित आणि शोषण करणारा यांच्यादरम्यान चाललेल्या लढ्याला दर्शवतो. समाजात आजही आर्थिक सामाजिक राजकीय अदृश्य दरी आहे. जी भरून काढायला हवी.
चित्रपटात नायक कुठेच मारहाण करत नाही. स्वतःचे म्हणणे मांडण्यासाठी आरडाओरडाही करत नाही. " कायदा " हेच त्याचे एकमेव शस्त्र आहे. न्यायव्यवस्थेवर त्याचा पूर्ण विश्वास आहे आणि तो कधीच कायदा हातात घेत नाही.
कथा 1995 ची असली तरी आजही अश्या घटना घडतात. जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत एका कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. केवळ संविधानात समानता लिहिल्याने ती प्रस्थापित होत नाही. त्यासाठी व्यवस्थाही तितकी ताकदीची उभी करावी लागते. आजही जातीव्यवस्था खोलवर रुतलेली आहे. शहरी भागात आरक्षणामुळे जातीव्यवस्थेवर ताशेरे ओढले जातात पण त्याचे स्वरूप याहून वेगळे आहे. आजही कितीतरी गावात काही समाजावर खोटे गुन्हे लावले जातात. आजही कितीतरी जमातींना गावाबाहेर रहावे लागते. गुन्हेगारी जमात म्हणून ते लोक बदनाम आहेत. चित्रपटात एक पोलीस विचारतो की या लोकांचा गुन्हा काय तर दुसरा म्हणतो की त्यांनी ( त्या जातीत ? ) जन्म घेतला. मुळात शिक्षण व्यवस्था अशी हवी की लोकांनी ही मूल्ये पाठ करण्यापेक्षा आत्मसात करावी. न्यायव्यवस्थेचा धाक सर्वत्र असावा. पोलीस आणि इतर सर्व अधिकारी जनतेचे सत्ताधीश नसून सेवक आहे ही भावना दृढ व्हावी. एनएच टेन सिनेमात " गुरगावच्या शेवटच्या मॉलपर्यंत तुमच्या संविधानाची हद्द आहे त्यानंतर खाप पंचायत सुरू होते " असा डायलॉग आहे. आजही लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचली नाही. अट्रोसिटी फक्त पोलीस कोठडीतच होईल असे नाही. एमबीबीएसला आरक्षणामुळे ऍडमिशन झालेला म्हणून मित्रांच्या जाचाला कंटाळून जेव्हा दलित विद्यार्थी आत्महत्या करतो तेव्हा ती पण मला अट्रोसिटीच वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एकाच जातीधर्मापुरता मर्यादित न ठेवता सर्व भारतीयांनी आत्मसात करण्याची गरज आहे. जेव्हा लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचेल तेव्हाच संविधान निर्माण करण्यामागचा हेतू साध्य होईल तोपर्यंत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात अर्थ नाही. सर्वांनी हा सुंदर सिनेमा नक्कीच पहावा. दोन जीबीचे नेट न पुरणाऱ्या युवा पिढीसमोर दोन चपात्याही न भेटणाऱ्या शोषित वर्गाचे नवे पण क्रूर जग पुढे येईल.

समाप्त