Login

जावे त्यांच्या वंशा !

A short story about Diwali

रात्रीचे बारा वाजत आले होते, इकडे मधुराच्या घरातून  बेसनाचा खमंग घमघमाट सुटलेला. एका शेगडीवर बेसन तर दुसऱ्या शेगडीवर तिने चिवड्यासाठीपोहे भाजत ठेवलेले. एकोणी वेलची सोलून वेलची पूड करायची तयारी. बरं हे सगळं एकदम हळू आवाजात चाललेलं नाहीतर परत पिल्लं उठून बसतील आणि फराळ सगळा तसाच राहील.

ऐन दिवाळीच्या तोंडावर रिलिज आल्यामुळे अख्खा आठवडा रोजचाच उशीर होत होता. शेवटी आज रिलिज झालं एकदाच. पळतच म्हणजे रिक्षात बसून मनाने पळत घरी आली. आठ वाजून गेले होते. सांभाळणारी ताई, "आज पण उशीर झालाच..", अस काहीस पुटपुटत लगेच सटकली.

इकडे हिने पटापट मुलांची जेवणं अटोपली. नवऱ्यावर मुलांना सोपवून ती स्वयंपाकघरात घुसली.ओटा आवराला. वाण्याने पाठवलेले सामान कधीचे तिची वाट पाहत पडलेलं.सगळया गडबडीत ताईला फक्त खोबऱ्याचे काप करायला तेवढे जमले होते. 

रात्री दहा वाजता मधुराच्या फराळाला सुरुवात झाली. 

"मिळायला काय सगळं बाहेर मिळतं, पण लाडवात ना वेलची ना जायफळ. म्हणतात साजूक तुपातले पण कधीचे असतात, आणि वास पण येतो दोनच दिवसात.  उगाच छोट्याला खोकला वगैरे झाला तर काय घ्या? चिवड्यात काजू आणि खोबरं अगदी  शोधलं तर एक दोन नावापुरतेच. आपल्या पिल्लानी आवडीने फराळ करावा म्हणून हा सारा आटापिटा. नाही तर काय एक फोन फिरवला की काम झालं. पण हे shortcuts काही समाधान मिळवून देत नाहीत हे मात्र खर." मधुराच स्वगत.

  *** 

फार नाही अगदी सात एक वर्षांपूर्वीची गोष्ट. मधुराची लग्नानंतर पहिलीच दिवाळी. नऊ वाजता दरात चप्पल काढत असतानाच सासूबाईनी विचारलच," अग येवढा उशीर? ऑफिस मध्ये खूप काम होतं का? " 

"नाही. अहो मी आज ड्रेस बघायला गेलेले. एकही आवडला नाही , चार दुकान बघितली. आता उद्या परत जायला लागेल. आता ड्रेस कधी घेणार, मग लागलं तर अल्टरेशन, मॅचिंग चे earrings.. कस काय जमणारे सगळं? दिवाळी party tar तोंडावर आलिये.

"स्वतच्याच नादात त्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे काना डोळा करत ती बेडरूम मध्ये गेली .रात्री जेवताना सासऱ्यानी विषय काढलाच. 

"अग तू जरा फराळात हिला काही मदत कर."

"अहो बाबा, आजकाल सगळं काही तयार मिळतं. अगदी छान असतं. कुठे घरी करत बसायचं? मी कधीची आईना सांगतेय आस्वाद मध्ये सगळी ऑर्डर देते फराळाची. पण त्या ऐकताच नाहीयेत. कशाला तासन् तास खपून घरी करत बसायचं ?"

" अग पण त्याला काय घराची सर येणारे का?"

" खरंच खूप छान मिळतं. करू का ऑर्डर?" 

दोन वर्षांपूर्वी आई बरोबर झालेल्या संभाषणाचा रिपीट टेलिकास्ट म्हणा ना हवं तर. तेव्हा आईने ऐकलं नाही आता हे पण ऐकत नाहीत. "ह्यांना सहज सोप्या गोष्टी आवडतच नाहीत का?," स्वतःच्या मनाशी पुटपुटत तिकडून सटकली. " दिवाळी तोंडावर आलीये. सगळं शॉपिंग बाकी आहे. परत ऑफिस आहेच. करा काय हवं ते. "

****

जुन्या जिव्हाळ्याच्या आठवणीतून बाहेर पडत, इकडे खमंग भाजलेलं बेसन उतरवून , तिने चिवड्याच्या फोडणीसाठी कढई गॅसवर चढवली.

सात वर्षांपूर्वीच्या जुन्या मधुरावर गालात हसत, आईच नेहमीचं वाक्य पुटपुटली" जावे त्यांच्या वंशा! हेच खरं!"

घरी केलेला किंवा विकतचा  फराळ खा आणि मस्त रहा.  सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा