Jan 22, 2022
कथामालिका

जाऊबाई जोरात (भाग 9)

Read Later
जाऊबाई जोरात (भाग 9)

जाऊबाई जोरात(भाग 9)

'दादा,रेवती का परकी आहे मला. मला नाही राग येत तिच्या बोलण्याचा. म्हणजे थोडाफार येतो खरा पण नव्या आईमुळे मला अशा वाग्बाणांची सवय झालेय. तुम्ही नका त्याचं वाईट वाटून घेऊ,'इंदू म्हणाली.

अरविंद म्हणाला,'नाही इंदु, उद्यापासून तुम्हा दोघांची कामं तुम्ही करायची. रेवती नि मी आमची करु. थोडं कडक वागावच लागेल आपल्याला. ही माझी आज्ञा समज हवं तर.'

इंदू,'काय दादा तुम्हीपण' म्हणत हसली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच इंदूने फक्त मनोज व स्वतःसाठी नाश्ता बनवला. रेवतीला सांगितलं की तुमचा डबा तुम्ही बनवा.

रेवती म्हणाली,'जीजी घरात असताना गरीब गाईसारखी वागतेस. जीजी काय गेली,जीभ शेफारली तुझी.'

------------------

इंदू म्हणाली,'मला तळमजल्यावरच्या ऑफिसमधे शिकवणी घ्यायचीय मुलांची. बिल्डींगमधली सगळीच रिक्वेस्ट करताहेत. मुलांनाही हाच काय तो वेळ मोकळा असतो. दोन तासात आवरलं की घरी येणार मी.'

रेवतीने मग बडबडत डब्याची तयारी केली. इंदू छान वेणी घालून चाफ्याचं फूल माळून शिकवणी घ्यायला निघून गेली. मनोजही ऑफिसला जायला निघाला.

इकडे रेवतीने अरविंदला झापायला सुरुवात केली,'तरी मी तुला सांगत होते. वेगळं घर घेऊया पण नाही. तुला इथंच रहायचंय ना. मलाच काहीतरी पावलं उचलायला हवीत. 

रेवतीच्या ऑफिसमधे तिची कलिग, रिया हिने आज सर्वांना पार्टी दिली होती. चिकन बिरयानी,तंदुरी,व्हेज कुर्मा सहकाऱ्यांची अगदी मजा होती.  रियाचं सगळे अभिनंदन करत होते. पार्टीचं कारणही तसंच होतं.  ठाण्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर एक नवीन ग्रुहसंकुल स्थापन झालं होतं. रियाने तिथल्या एका टॉवरमधे दहाव्या मजल्यावरचा फ्लेट बुक केला होता.

रेवतीने विचार केला,नाहीतरी अरविंद आपलं ऐकणार नाही. घराचं स्वप्न पुर्ण व्हायचं असेल तर आपल्यालाच हातपाय हलवायला हवेत. तिने काही दिवसांत त्या बंधो बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या ऑफिसला भेट दिली. त्या बिल्डरने तिला अगदी थोडेच फ्लेट विकायचे शिल्लक आहेत. त्वरा करा तरच तुमचा नंबर लागेल नाहीतर पुढच्या महिन्यापासून जागांचे भाव अजून वाढतील असं सांगितलं. रेवतीने लोनसाठी एप्लाय केले. काही दिवसांत लोन मंजूर झालं.

रेवतीही घरात आता चांगली वागू लागली. सगळ्यांशी गोड बोलू लागली. अरविंदला मात्र तिने अंधारात ठेवलं होतं.

 एके दिवशी मनोज हताश होऊन आला. रिसेशनमुळे त्याला कामावरुन कमी केलं होतं. मनोज डोकं धरुन बसला होता. इंदूला त्याने नोकरी गेल्याचं सांगताच इंदूही घाबरली. असं काहीतरी घडेल असं तिला वाटलं देखील नव्हतं. अरविंददादा मदतीला होताच तरी पुढे काय हा भला मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा होता. 

मनोज सतत विचारांत गुंतलेला असायचा. त्याला असं चिंताग्रस्त पाहून  इंदूला फार वाईट वाटायचं. ती त्याला समजवायची,मनोज,तुला हिच्यापेक्षा उत्तम  नोकरी मिळेल बघ.' तो कसंनुसं हसायचा. म्हणायचा,'इंदू,एवढं सोप्पं नाही गं नोकरी मिळवणं.' इंदू म्हणायची,'नक्की मिळेल. नाही मिळाली तर आपण दुकान टाकू कसलंतरी.' इंदूची सकारात्मकता मनोजला बळ देत होती. तो अर्ज भरु लागला होता.

जीजीला हे समजताच जीजीही भावाकडचा मुक्काम आटपून घराकडे आली. तिने मनोजला समजावलं. अशा कठीण परिस्थितीत तग धरुन राहिलं की पुढे चांगले दिवस नक्की येतात म्हणून धीर दिला.

 इंदूने नोकरी केली असती पण फक्त पदवीपरीक्षा उत्तीर्ण. मिळून मिळून किती पगार मिळणार. त्यात तो राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला ज्यात तिचा नंबर नव्हता. 

यावेळी मात्र दोंते काकू धावून आल्या तिच्या मदतीला. इंदूला म्हणाल्या,'इंदू,घाबरु नकोस. तुझ्या हाताला चव आहे गं. इतकी स्वादिष्ट शेजारपाळं खाऊ घालतेस मला. याच कलेचा उपयोग कर. सणावाराला पुरणपोळी,मोदक,श्रीखंड बनव. विक्रीचं बिल्डींगमधील मुलं बघतील. काही ज्येष्ठ मंडळी एकटीच रहातात. त्यांच्यासाठी पथ्याचे डबे बनव. तुला ऑर्डर्स आणून देण्याचं काम आम्ही करु,मात्र नाराज होऊ नकोस.'

बिल्डींगमधल्या मुलांनी इंदुला सणासमारंभाच्या जेवणाच्या ऑर्डर्स आणून द्यायला सुरुवात केली. जीजीही मदत करत होत्या. काकूही वावरत होत्या पण त्यांच्याने उरकेना. घरचा डबा मिळतोय म्हंटल्यावर मागणी वाढली मग त्यांनी ओळखीच्या चार बाया हाताखाली कामाला घेतल्या. 

ज्वारी,नागलीच्या भाकरीला विशेष मागणी होती. दोंतेकाकूंच्या हातचे खव्याचे गुलाबजाम तर हातोहात खपायचे. 'स्वादिष्ट स्वैंपाकघर' थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झालं. इंदूच्या गाठीला चार पैसे जमू लागले. तिच्या धर्माने बायांना रोजगार मिळू लागला. आत्ता ती कोणाची नोकर नव्हती,स्वयंसिद्धा होती.

 एका गिर्हाईकाच्या ओळखीतून बड्या कंपनीत मनोजला पुन्हा नोकरी मिळाली तेंव्हा जीजीने घरी सत्यनारायणाची पूजा घातली. 

सगळं चांगलं चाललं होतं. रेवतीही बरी वागत होती. इंदूला मदत करत नव्हती पण तिच्या कामाच्या आड येत नव्हती आणि एके दिवशी रेवतीने सर्वांना सरप्राइज दिलं,नवीन घरी न्हेलं. वनबीएचकेचा तो फ्लेट हवेशीर होता. आजुबाजूला जास्त मनुष्यवस्ती नव्हती. शेती होती. दूरवर डोंगररांगा दिसत होत्या. 

रेवतीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून जीजी खूष झाली. जीजी मनात म्हणाली,'कुठेही रहा पण सुखात रहा.' अरविंदच्या मनाविरुद्ध रेवती त्याला घेऊन नवीन घरात रहायला आली. घरात महागडं फर्निचर घेतलं.  शिवाय नवीन सोसायटीमधे हायफाय महिला..त्यांच्या किटीपार्टीजमधे रेवती भाग घेऊ लागली.  रेवतीचा पगार हफ्ते भरण्यात  नि या उच्चभ्रू राहणीमानाशी जुळवून घेण्यात जात होता. घरखर्च अरविंद चालवत होता. 

आणि एके दिवशी  गेटजवळ म्युन्सिपालटीने  शासकीय जमिनीवर अतिक्रमण असल्याकारणाने सदर बांथकाम हे अनधिकृत आहे व रहिवाश्यांनी सदर जागा पंधरा दिवसाच्या आत रिकामी कराव्यात,अन्यथा शासकीय यंत्रणेमार्फत सदर जमिनीचा ताबा घेण्यात येईल अशी नोटीस लावली. 

सोसायटीतील लोकं एकत्र येऊन बिल्डरकडे गेली पण बिल्डर आधीच त्याचा गाशा गुंडाळून फरार झाला होता. रेवती व अरविंद घर खाली करुन परत जीजीकडे रहायला आले. जीजी काहीच बोलली नाही पण दोंते काकू बोलल्याच,'अरे अरविंदा नवीन घर घ्यायचं म्हणजे सतरा वेळा शहानिशा करावी लागते. कोणातरी वडिलधाऱ्यांना विचारुन  पावलं उचलायला हवी होती तुम्ही. निदान रेवतीच्या आईवडिलांना तरी..'

रेवती  म्हणाली,'काकू आम्ही तुम्हाला मान देतो म्हणून तुम्ही आमच्या घरगुती गोष्टीत ढवळाढवळ करायलाच पाहिजे का! जा ना तुमच्या घरी.'

इंदू म्हणाली,'काय बोलतेस रेवती तू! त्या परक्या आहेत का आपल्याला!'

'तू गप गं. मला नको शहाणपणा शिकवू.  आम्ही घेऊ दुसरं घर.'

अरविंदचा रेवतीच्या कानाखाली मारायला उठलेला हात त्याने कसाबसा आवरला. रेवती पेटलीच,'का थांबलास. हाच तुझा पुरुषार्थ असेल तर दाखव माझ्या गालफडात मारुन मग मी बघते तुमच्या सगळ्यांची. महिलांच्या बाजूने कित्येक कायदे आहेत हे विसरु नकोस.'

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now