जाऊबाई जोरात(भाग 8)

Jaubai jorat (part 8)

जाऊबाई जोरात  (भाग 8)

रेवती व इंदूने मिळून रात्रीचा स्वैंपाक केला. जीजी आजारी पडल्याने रेवतीची गोची होत होती. तिने आईला रात्री फोन लावला व मी रहायला येऊ का?असं विचारलं.

तिची आई म्हणाली,'आत्ताच नं दिराचं लग्न झालंय तुझ्या. नव्या नवरीला जरा घरातले रितीरिवाज समजावून सांग. एवढ्या दुरून आलेय पोर. तुझ्यासारखं तिचं माहेर जवळ नाही गं.  आठवण येत असेल तिला घरच्यांची. माझंही माहेर दूर कर्नाटकातलं म्हणून विशेष आस्था हो तिच्याबद्दल. जीजी सांभाळून घेतीलच म्हणा आणि जीजींच्या पायाला लागलंय ना. दोघींनी मिळून घर सांभाळा. जीजी बरी झाली की सगळीच या जेवायला.'

'हो हो,आम्हीच कशाला अख्ख्या बिल्डींगमधली माणसं घेऊन येतो. काय गं आई मला तू विकत आणलयस का एकदोन रुपयाला. कधीच माझी बाजू घेत नाहीस. माझ्या मैत्रिणींच्या आया बघ कशी विचारपूस करतात त्यांची नाहीतर तू. मीच तेवढी वाईट बाकी सगळे सद्गुणांचे पुतळे वाटतात तुला अगदी जावईसुद्धा.'

'आहेच माझा जावई लाखात एक
त्याशिवाय का सांभाळतोय माझी द्वाड लेक,'असं म्हणून रेवतीची आई हसू लागली.

-----------------

'बरं चल गुड नाइट,'म्हणत रेवतीने फोन ठेवला.

रेवतीला तिची आई अशी का वागते असं वाटणं साहजिकच होतं पण रेवतीच्या आईने तिच्या सासूबाई व नणंदबाई यांतली बोलणी ऐकलेली. नणंदबाई तिच्या आईला सासरची गार्हाणी सांगायची,नवऱ्याबायकोंतली छोटी छोटी भांडणं सांगायची नि त्यामुळे रेवतीच्या नणंदेच्या घरात सतत कलह होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं होतं.

 रेवतीचा स्वभावही बऱ्यापैकी तिच्या आत्यासारखा असल्याने रेवतीची आई सजग बनली होती. ती रेवतीला सासरला धरुन रहायला विनवत होती.

---------------------

इंदू जीजीला गोळ्या,पाणी देऊन झोपायला जाणार इतक्यात तात्यांचा फोन आला,'हेलो इंदूबाळा मी तात्या बोलतोय.'

'हां तात्या नमस्कार.'

'बरी आहेस नं तू. कशी आहेत घरातली माणसं? अगं लग्न जमवून देणाऱ्यावर तुम्ही सुरळीत नांदू लागेस्तोवर जबाबदारी असते. जमलं तर ईश्वरक्रुपा नि नाही जमलं तर जमवणाऱ्याच्या गळ्यात... असो ते जाऊदे. घरी फोन करत जा बाळा.'

'हो तात्या,सगळी माणसं निर्मळ स्वभावाची आहेत इथली. मला नीट समजावून घेतात. तुम्ही काही काळजी नका करु माझी. माईस जपा.'

'हो गं. माईस देतो थांब.'

मग इंदू माईसोबत माई इकडे असं,तसं सगळं नवनवलाईचं शेअर करत बसली. माई जीजीशीही बोलल्या. त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली.

जीजीच मग इंदूला म्हणाली,'इंदू जा बरं नीज जा आत्ता.' तशी इंदू बेडरुममधे गेली. मनोज अधिरतेने तिची वाट पहात होता. मनोजने इंदूचे मुलायम हात आपल्या हातांत घेतले व म्हणाला,'इंदू आपलं हनिमुनला जायचं बारगळलं नं का जाऊया?'

'अरे मनु,असं का म्हणतोस. जीजीला बरं नाही आणि आपण हनिमुनला गेलो तर तिकडे जीव लागेल का आपला? तू असं कर त्यापेक्षा. इथेच कर ना मधुचंद्र. तो बघ चंद्र आपल्या प्रीतीचा साक्षीदार. ते रातराणीचे झुबके पहा. मग मनोजच्या गळ्यात आपले रेशमी हात गुंफत इंदू म्हणाली
तुझ्या सायहातांचे स्पर्श गंधाळलेले
सख्या दे मजला पांघराया
तुझ्या श्वासफुलांचा अत्तरफाया
सख्या दे जरा अंथराया

---------------------

इंदूला सासरी येऊन चार महिने झाले होते. इंदूचं पहिलंवहिलं हळदीकुंकू होतं. इंदूने मनोजला गजरे आणावयास सांगितले. मनोज म्हणाला,'अगं एस्टरची फुलं वाटतात ना.'

'तसं काही फिक्स नसतं रे. आपल्याला हवी ती वाटायची. गावी नं आमचा कुंदा खूप फुलायचा मग काय  फुलं विकत आणावी लगत नव्हती. अबोली,कुंदाच्या फुलांचे हे लांबलचक गजरे करायचो. ते जाऊदे तू गजरे आणि हलवा आण. मी लाडू करेन घरी.'

इंदूने जेवणाचं आवरल्यावर लाडू वळले. गुलाबदाणी,अत्तरदाणी तयार ठेवली. गजरे फ्रीजमधे ठेवले. संध्याकाळी रेवतीला जरा लवकर घरी यायला सांगितलं होतं. रेवतीनेही येईन म्हंटलं होतं. इंदू मनासारखी नटली. गुलबक्षी रंगाची नऊवारी साडी,कानात मोत्यांच्या कुड्या,गळ्याभोवती तनमणी,नाकात पाणीदार मोत्यांची नथ,नथीत चमकणारा डाळिंबी खडा,भाळी चंद्रकोर,डोळ्यात काजळरेघ. .मनोजला तर ती अशी सजूनधजून त्याच्या समोरच बसून रहावीशी वाटत होती.

हळूहळू एकेक शेजारीण येऊ लागली. इंदूने इतर शेजारणींसोबत जीजीलाही हळदकुंकू लावून तिळगुळ दिला, तेंव्हा जमलेल्यातल्या काहीं जणींनी कुजबुजायला सुरुवात केली. इंदूने हळदकुंकवाची वाणं वाटली. जीजीच्या हातात गजरा दिला मात्र,लक्ष चांदण्यांच्या प्रकाशासारखा जीजीचा चेहरा उजळला. 

जीजीच्या डोळ्यांतून आसवं वाहू लागली. इंदू म्हणाली,'जीजी असं रडायचं नाही,तू फुलं केसात माळलीस की ही तुझी लेकरंही खूष होतील न् फुलांचाही मान वाढेल. हळदकुंकू, फुलं ही लहानपणापासूनची आपली श्रुंगारसाधनं. त्यांपासून कोणत्याही स्त्रीला दूर करु नये. इंदूचं ऐकून एकदोघी आपल्या सासवांना(ज्या अशावेळी हौस असुनही निव्वळ पती हयात नसल्याने मन मारुन मागे रहातात)या मानासाठी घेऊन आल्या.  रेवतीही साडी नेसून आली. तिने आरशांच वाण वाटलं. सगळ्याजणींना वेलचीजायफळयुक्त मसालादूध व लक्ष्मीनारायण चिवडा दिला. 

निघताना दोंते काकू बोलल्याच,'जीजींची परंपरा तू चालू केलीस इंद्रायणी. रेवतीस दोन वर्ष झाली या घरात येऊन पण तिला वाटले नाही हो हळदीकुंकू वगैरे घालावयाचे."
रेवतीचा राग उफाळून आला. ती म्हणाली,'काकू हळदीकुंकू घालणं न घालणं हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरंतर ही सगळी रिकामटेकड्यांची कामं पण इंदूच्या इच्छेचा मान ठेवून मीही या कार्यक्रमात सहभागी झाले.' दोंते काकू म्हणाल्या,'रिकामटेकड्या कोणाला म्हणतेस गं रेवा? आम्ही बायका घर सांभाळतो म्हणजे तुला रिकामटेकड्या वाटतो का? ही इंदू घरात रहाते,घरातली सगळी कामं करते म्हणून तू निर्धास्तपणे ऑफिसला जाऊ शकतेस समजलं.'

रेवती म्हणाली,'ते तर मी इंदू यायच्या आधीही जात होतीच की.'

दोंतेकाकू म्हणाल्या,'जीजी आता आजारी असतात. त्यांना अशा अवस्थेत टाकून घरऑफिस करणं झेपलं असतं का तुला. मला सांगतेय मोठी. आधी निम्म्याहून अधिक कामं जीजीच तर करायच्या.'

रेवती आत्ता पुढे काही बोलणार इतक्यात खालच्या मजल्यावरची संचिता लुष्टे आली आणि इतक्या रंगात आलेली शेजारणीशेजारणींची वादावादीआपसूक बारगळली.

संचिता तिच्या मम्मीलाही घेऊन आली होती. विशेष म्हणजे मम्मीसाठी तिने सुप्रसिद्ध जे अँड के सोनाराकडूनघडवून घेतलेले सोन्याचे कान तिच्या मम्मी घालून आल्या होत्या. संचितानेही जरदोशी वर्क केलेली महागातली साडी नेसली होती. संगिता हे सारं अगदी भरभरुन सांगत होती आणि तिच्या मम्मीच्या चेहऱ्यावरही लेकीबद्दल प्राऊड फील दित होता.

संचिताशी बोलण्यात,तिच्या महागड्या साडीबद्दल,तिच्या आईच्या सोन्याच्या कानांबद्दल चौकशी करण्यात रेवती दोंतेकाकूंबरोबर झालेली बाचाबाची विसरुन गेली. रात्री अरविंदला मात्र तिने त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल परत झापलं. तो जर संचिताच्या नवऱ्यासारखा चलाख असता तर तीही आज सोन्यानाण्याने नटली असती. 

रात्री तिला तसं वैभवशाली स्वप्नही पडलं. स्वप्नात अरविंदने तिला भरपूर नोटा आणून दिल्या होत्या. दोघांनी मिळून महागडी ज्वेलरी,कपडे खरेदी केले,गाडी बुक करून आले,फायस्टार हॉटेलात जेवले. इतक्यात गजर ठणाणा वाजू लागला होता. रेवतीचं नित्याचं आयुष्य पुन्हा चालू झालं होतं. 

--------------------

इंदूच्या लाघवी स्वभावामुळे बिल्डींगमधली मुलं,मुली तिच्याशी गप्पा मारायला,अभ्यासाविषयी शंका विचारायला येऊ लागली. इंदू कुठे जाणार असेल तर शेजारणीही तिला हक्काने एखादी नसलेली वस्तू किंवा भाजीची जुडी आणायला सांगू लागल्या. परीक्षा असली की मुलं इंदूकडे येऊन हॉलमधे अभ्यासाला बसू लागली.

 रेवतीला या सगळ्याचा त्रास होत होता. शेवटी ती इंदुला तोंडावर बोललीच,'इंदू,तू असं सगळ्यांसमोर गुडी गुडी असण्याचं नाटक करतैस,ते किती दिवस निभावणार आहेस? रियल लाइफ आहे ही. रंगमंच नव्हे.' इंदू होता होईल तो मोठी जाऊ म्हणून तिला मान देत होती. रेवतीला काही बोलून तिला अरविंददादाचा अपमान करायचा नव्हता. खरंतर तिला रेवतीला वहिनी म्हणायचं होतं पण रेवतीनेच तिला नावानेच हाक मार असं बजावलं होतं.

जीजीच्या भावाचा फोन आला होता. त्यांची बायको आजारी होती. जीजीला थोडे दिवस सोबतीला येतेस का विचारत होते. जीजी म्हणाली सुनामुलांना विचारुन सांगते. इंदू म्हणाली,'मनासारखं वागू शकत नाही का गं जीजी एखादी स्त्री. तुझी मुलं मोठी झाली,सुना आल्याहेत घरात. भाऊ हक्काने बोलवतोय तर जा की गं. त्यांचाही थोडाबहुत हक्क आहेच ना गं त्यांचा तुझ्यावर. जीजीला इंदूचं म्हणणं पटलं. मनोज तिला सोडायला गेला. 

घरात अरविंद आणि इंदूच होते. रेवती पार्लरमधे गेली होती. इंदूने विचारलं,'दादा,तुमचे कपडे आहेत का धुवायचे. मशीन लावतेय. द्या जरा.'

अरविंद म्हणाला,'जरा इथे बस पाहू.'

इंदू अरविंदच्यासमोर बसली.

अरविंद म्हणाला,'हे बघ इंदू मी तू घरात आल्यापासून पहातोय. रेवती तुला काहीबाही टोचून बोलते पण तू उलट उत्तर करत नाहीस. सगळी कामं स्वतः  करत बसतेस.'

'दादा,रेवती का परकी आहे मला. मला नाही राग येत तिच्या बोलण्याचा. म्हणजे थोडाफार येतो खरा पण नव्या आईमुळे मला अशा वाग्बाणांची सवय झालेय. तुम्ही नका त्याचं वाईट वाटून घेऊ.'

अरविंद म्हणाला,'नाही इंदु, उद्यापासून तुम्हा दोघांची कामं तुम्ही करायची. रेवती नि मी आमची करु. थोडं कडक वागावच लागेल आपल्याला. ही माझी आज्ञा समज हवं तर.'

इंदू,'काय दादा तुम्हीपण' म्हणत हसली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच इंदूने फक्त मनोज व स्वतःसाठी नाश्ता बनवला. रेवतीला सांगितलं की तुमचा डबा तुम्ही बनवा.

रेवती म्हणाली,'जीजी घरात असताना गरीब गाईसारखी वागतेस. जीजी काय गेली,जीभ शेफारली तुझी.'

क्रमशः

🎭 Series Post

View all