Jan 22, 2022
कथामालिका

जाऊबाई जोरात (भाग 7)

Read Later
जाऊबाई जोरात (भाग 7)

जाऊबाई जोरात ( भाग 7)

भटजीकाकांच्या सांगण्यानुसार रेवतीने मनोजच्या उपरण्याच्या टोकाची व इंदूच्या शालीच्या टोकाची गाठ मारली. मनोजचा होणारा स्पर्श इंदुच्या अंगभर रोमांच पसरवत होता. तिने मनोजच्या उजव्या हाताला तिची बोटं लावली होती. खऱ्या अर्थाने ती आत्ता मनोजची पत्नी झाली होती. मखरातला सत्यनारायण नवदाम्पत्याला भरभरुन आशिष देत होता. 

गाठ सोडताना इंदू म्हणाली,'वहिनी नाव घ्या.' तिचं ते बोलणं रेवतीला रुचलं नाही. रेवती म्हणाली,'तू मला आत्ता शिकवणार का गाठ सोडताना नाव घ्यायचं असतं ते. पाढा म्ह़टल्यासारखं मधे अरविंद घालून तिने भरभर नाव घेतलं व तिथून निसटली. इंदूचं मन मात्र खट्टू झालं. 

------------------------------

लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांनी एकेक करुन आपापल्या घरची वाट धरली. तात्या,माई,गजाभाऊ,प्रसन्ना पुजेसाठी आले होते. तेही रात्रीच्या गाडीला जायला निघाले नि इंदूला गहिवर आला. तिला माहेरीही जायचं होतं नि सासरीही रहायचं होतं. 

प्रत्येक नववधुची माहेरच्यांना निरोप देताना जी दोलायमान अवस्था होते तीच तिची झाली होती. जीजी मात्र तिच्या पाठीवर हात फिरवत होत्या. सगळी गेली तरी इंदूला अश्रुंचे कढ अधनंमधनं येतच होते. रेवती तिचं नेलपेंट रिमुव्हरने काढण्यात मग्न होती. 

जीजीच्या सांगण्यावरुन इंदू मनोजच्या बेडरूमधे गेली. तिने दागिने पेटीत काढून ठेवले नि चेंज करायला जाणार तितक्यात मनोजचा आवाज..इंद्रायणी दार उघडतेस नं. इंदू बिचारी कावरीबावरी झाली. तिने थांबाथांबा म्हणत पटाटा कपडे बदलले नि बाटीकचा सुती गाऊन चढवून दार उघडलं. मनोज दाराची कडी लावून तिच्याजवळ आला तसा तिचा उर धपापायला लागला. 

एरवी मनोजशी इतकी छान,मनमोकळ्या गप्पा मारायची ती पण याप्रसंगी मात्र अगदी बावरली. मनोजने तिचा हात धरून तिला खिडकीत न्हेलं. खिडकी उघडली. ताटलीएवढा  रुपेरी चांदवा जणू त्या दोघांना शुभेच्छा देण्याची वाट पहात होता. रातराणीचा धुंद सुगंध वातावरणाला मोहून टाकत होता. 

मनोजने लाजऱ्या इंदूची हनुवटी तर्जनीने वर उचलली. तिच्या पापण्या झुकल्या होत्या. गाल लज्जेने आरक्त झाले होते. इतक्यात समोरच्या बिल्डींगच्या खिडकीतून,'हे शाब्बास चालूदे चालूदे' असा पोरांचा आवाज ऐकू येताच मनोज दचकला. त्याने वरती पाहिले. त्याची लहानपणापासूची लंगोटीयारांची गँग त्यांना गच्चीतून वाकून बघत होती.

आता मात्र इंदूला हसू फुटलं. तिच्या मनावरचा ताण क्षणात निवळला. मनोजने मग बघतो तुमच्याकडे असं नजरेने दटावत खिडकी बंद केली आणि इंदूला कवेत घेतलं. मध्यान्ह झाली तरी ती दोघं प्रीतीच्या गोष्टी करीत,एकमेकांच्या बाहुपाशात विरघळून जात होती.

 
दुसऱ्या दिवशी नवं जोडपं जीजीसोबत मुंबादेवीला नमस्कार करुन,ओटी भरुन आलं. अधनंमधनं ज्यांना काही कारणाने लग्नाला यायला मिळालं नाही असे पाहुणे येऊन शुभेच्छा देऊन जात होते. रात्रीचा काय तो नवीन जोडप्याला हवाहवासा एकांत मिळत होता. दिवस उगवूच नये असं न वाटलं तर नवल असे त्या दोघा लव्हबर्डचे गुलाबी  दिवस  बहरात आले होते. 

जीजीची नित्याची कामं चालू होती. दोन्ही लेकांची लग्नं झाल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. हल्ली तिला पहाटे लवकर जाग यायची,अगदी उजेडायच्या आधी. जीजीने खाली जास्वंद लावली होती पण मॉर्निंग वॉक करणारे सोबत पिशव्या घेऊन फिरायचे नि कंपाऊंडच्या आत डोकावून हाताला मिळतील तेवढ्या कळ्या ओरबाडायचे. मुक्या कळ्यांनाही सोडत नव्हते. म्हणून जीजीने दार उघडलं नि फुलं काढायला परडी घेऊन गेली. 

चारेक फुलं मिळाली तिला,मग तिने प्राजक्ताची फांदी हलवली व तो सडा वेचू लागली. बिल्डींगखालच्या पिवळ्या दिव्यामुळे फुलं दिसत होती तिला पण कोणी प्लास्टिकची पिशवी टाकलेली खाली. नेमका त्यावरून जीजीचा पाय घसरला. तिला उठता देखील येईना. 

कुत्री का भुंकताहेत म्हणून शेडमधे चहा करणारा शेरा वॉचमन बघू लागला. जीजीला पडलेली बघताच त्याने फोन करुन मनोला कळवलं. अरविंद व मनोज दोघांनी मिळून जीजीचे हात मानेवर घेऊन तिला वरती आणलं. जीजीच्या गालाला थोडं लागलं होतं नि पाय मुरगळला होता. 

मनोजने जीजीची जखम डेटॉलने स्वच्छ केली व तिला ड्रेसिंग केलं. इंदूने हळकुंड व तुरटीची वरवंट्याने पूड केली व ती पूड कोमट पाण्यात कालवून जीजीच्या दुखऱ्या अंगावर लावली. तेवढ्यात रेवतीही उठली. ब्रश करत हॉलमधे आली. जीजींच्या पायाकडे पहात म्हणाली,'हे काय करुन घेतलस जीजी..' 
यावर अरविंद म्हणाला,'फुलं काढताना पाय घसरला गं जीजीचा,तरी बरं वॉचमन आला धावत सांगायला नाहीतर उजाडेपर्यंत जीजी तिथेच राहिली असती. आवाजही फुटत नव्हता बिचारीच्या तोंडातून.'

रेवती म्हणाली,'काय हे जीजी तुम्ही कामात कामं वाढवून ठेवता. दहा रुपयाची फुलपुडी घ्यायची तर नाही. झाडं लावलैत जसा काय स्वत:चा बंगला आहे नि अंधारात जातात फुलं काढायला,तरी नशीब एवढ्यावरच भागलं. फ्रेक्चर ब्रिक्चर झालं असतं म्हणजे..'

इंदू म्हणाली,'काही फ्रेक्चर नाहीए. जरा नसा दुखावल्या गेल्यात तरी संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, मनातली भीती जाण्यासाठी. बाकी आपली जीजी अगदी धडधाकट आहे.' असं म्हणत इंदूने जीजीला पाणी प्यायला लावलं. 

रेवतीला रागच आला इंदूचा.. म्हणाली,'तुला बरं बाई असं  तुपसाखरेसारखं गोडगोड बोलता येतं. आत्ता तू लाडकी न् मी दोडकी जीजीची.'

जीजी म्हणाली,'असं काहीबाही मनात आणू नको गं रेवा. आईला सगळी बाळं सारखी असतात.' रेवतीला बरं वाटलं. तीही थोडा वेळ जीजीच्यासोबत बसली. 

रेवती पोळपाट काढत म्हणाली,'शी बाई,आत्ता सगळ्याच कामाला उशीर होणार. उशिरा गेलं तर गाडी चुकणार मग पुढे बॉसचा ओरडा. सगळ्या दिवसाचा विचका.'

इंदूने जीजीला झोपवलं नि रेवतीला म्हणाली,'वहिनी,तुम्ही जा आंघोळीला. मी बघते भाजीपोळीचं पण माझी आंघोळ करायची राहिली या बोवाळात. आंघोळ केल्यावरच  डबा करु का?'

'अगं तसलं काही पाळत नाही आम्ही. ब्रश वगैरे केलास ना बास झालं. तू घे पोळीभाजी करायला. मी येते लवकर.'

इंदूने पटापट भाजी चिरली व फोडणीला टाकली. कणिक मळून पोळ्या लाटायला घेतल्या.  रेवती अरविंदला हाका मारु लागली,'अरु माझ्या ऑफ व्हाइट ड्रेसला इस्त्री कर जरा. आज माझं प्रेझेन्टेशन आहे. प्लीज अरु.'

अरविंद म्हणाला,'ए नाही हा. मला दाढी करायचीय. जीजी पडली त्या गोंधळात आधीच उशीर झालाय.'

रेवतीने आतून सूर लावला,'अरविंद,तुला ना माझ्या कष्टाची कदरच नाही. काकूबाईसारखी बायको मिळायला हवी होती तुला..द सो कॉल्ड ग्रुहिणी.'

इंदूने बाथरुमचं दार ठोठवत आवाज दिला,'वहिनी माझं डब्याचं आवरलं की करते तुमच्या ड्रेसला इस्त्री. अरविंददादा ड्रेस काढून देतील मला. तुम्ही दोघं भांडू नका. जीजीला आराम करु द्या.'

रेवती शॉवर घेत तिच्यावर डाफरली,'कोण भांडतय. इथे वेळ कुणाला आहे भांडायला. एवढंस मी माझ्या नवऱ्याला बोलले तर लगेच मी माझ्या नवऱ्याशी वाद घालते म्हणून आरोप करतेस माझ्यावर. आज आलीस तू आणि तू मला शिकवणार कसं वागायचं ते.'

अरविंदला अरुचं बोलणं मुळीच आवडलं नाही. त्याने इंदूला नजरेनेच सॉरी म्हंटलं. इंदूनेही डोळ्यात आलेलं पाणी हाताने चटकन पुसलं.

अरविंद नाश्ता करताना, 'इंदू भाजी झकास झालेय गं' असं म्हणायला विसरला नाही. इंदूने ड्रेसला केलेली इस्त्रीही रेवतीच्या पसंतीस पडली नाही. तिला म्हणाली,'इंदू,तुझी जाऊ मोठ्या कंपनीत कामाला आहे म्हंटलं. कुठच्या गावातल्या सिनेमाला जात नाही. किती चुण्या ठेवल्यास या ड्रेसवर. असो,मला आधीच उशीर झालाय.' असं म्हणत पटापटा नाश्ता करुन रेवती ऑफिसला निघाली.

इंदूने घरातलं सर्व आवरलं,दुपारसाठी चवळीची आमटी,भात,कोशिंबीर केली. सकाळची पोळीभाजी होतीच. मनोज फोटोच्या कामात व्यस्त होता. दुपारी जेवताना जीजीने इंदूच्या स्वैंपाकाचं कौतुक केलं,चव आहे हो पोरीच्या हाताला असं म्हणाली तेंव्हा मनोजला जीजी त्याचीच स्तुती करतेय असं वाटलं. सकाळचा वहिनीचा तमाशा त्याच्या कानावर गेला होता पण लगेच इंदूची बाजू घेतली असती तर वहिनीच्या हातात आयतं कोलीत दिल्यासारखं झालं असतं. 

मनोजला ठाऊक होतं की इंदू सगळं सांभाळून घेईल. काही माणसांच्या स्वभावाला औषध नसतं हे तो जाणून होता तरी या एकत्र कुटुंबाला एकसंध ठेवताना त्याला इंदूचं मनही जपायचं होतं,तिला फुलवायचं होतं,जे जे सुख तिला उपभोगायला मिळालं नाही ते सर्व त्याला तिला द्यायचं होतं. खूप स्वप्नफुलं होती त्याच्या मनात त्यांच्या भावी आयुष्याची.

संध्याकाळी इंदू व मनोज जीजींना दवाखान्यात घेऊन गेले. एक्स रे काढला. डॉ. म्हणाले,'मुका मार आहे. पायाच्या नसा दुखावल्या आहेत. काही दिवस धावपळ कमी करा. आता तर दुसरी सुनबाई आली आहे दिमतीला तेंव्हा मजा करा आणि हो या वयात हाडांची घनता कमी होते तेंव्हा जरा जपून चालत जा.  आधीसारखी बेफिकिरी महागात पडू शकते.' 

डॉक्टरांनी दिलेल्या औषध,गोळ्या घेऊन घरी यायला अंमळ उशीर झाला. 

इंदू,मनोज जीजीला पलंगावर बसवत होते इतक्यात रेवतीही ऑफिसातून आली.  नेहमी ऑफिसातून आली की तिला जीजीच्या हातचा कडक  चहा मिळायचा पण जीजीच जागेवर बसलेली व इंदू पाणी गरम करुन टर्किश टॉवेलने तिचा पाय शेकवत होती. डॉक्टरांनी मीठ घातलेल्या गरम पाण्याने पाय शेकवण्यास व नंतर त्या उबदार त्वचेवर मलम लावण्यास सांगितलं होतं. 

रेवती चरफडली,'किती दिवस या पायाचं बाळंतपण चालणार देव जाणे. साधा कपभर चहा मिळायची मुसीबत. अरविंदही तेवढ्यात आला. फ्रेश होताच त्याने साऱ्यांसाठी चहा मांडला. रेवतीचा राग जरा शांत झाला. तिने सगळ्यांना चहा दिला व अरविंदला म्हणाली,'ऑफिसात आज जरा डोकं गरम झालेलं, त्यामुळे..' अरविंदने तिच्या पाठीवर थोपटलं व रागावर ताबा मिळवायला शीक म्हणाला. 

रेवती व इंदूने मिळून रात्रीचा स्वैंपाक केला. जीजी आजारी पडल्याने रेवतीची गोची होत होती. तिनै आईला रात्री फोन लावला व मी रहायला येऊ का?असं विचारलं.

तिची आई म्हणाली,'आत्ताच नं दिराचं लग्न झालंय तुझ्या. नव्या नवरीला जरा घरातले रितीरिवाज समजावून सांग. एवढ्या दुरून आलेय पोर. तुझ्यासारखं तिचं माहेर जवळ नाही गं.  आठवण येत असेल तिला घरच्यांची. माझंही माहेर दूर कर्नाटकातलं म्हणून विशेष आस्था हो तिच्याबद्दल. जीजी सांभाळून घेतीलच म्हणा आणि जीजींच्या पायाला लागलंय ना. दोघींनी मिळून घर सांभाळा. जीजी बरी झाली की सगळीच या जेवायला.'

'हो हो,आम्हीच कशाला अख्ख्या बिल्डींगमधली माणसं घेऊन येतो. काय गं आई मला तू विकत आणलयस का एकदोन रुपयाला. कधीच माझी बाजू घेत नाहीस. माझ्या मैत्रिणींच्या आया बघ कशी विचारपूस करतात त्यांची नाहीतर तू. मीच तेवढी वाईट बाकी सगळे सद्गुणांचे पुतळे वाटतात तुला अगदी जावईसुद्धा.'

'आहेच माझा जावई लाखात एक
त्याशिवाय का सांभाळतोय माझी द्वाड लेक,'असं म्हणून रेवतीची आई हसू लागली.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now