जाऊबाई जोरात (भाग 6)

Jaubai jorat

जाऊबाई जोरात (भाग 6)

दिवसभर मनोज विचारांची जुळवाजुळव करत होता. रात्री तात्या खळ्यात शतपावली करत होते तेव्हा मनोज म्हणाला,'तात्या,मी करु का इंदूशी लग्न?'

तात्या म्हणाले,'उपकार म्हणून करु नकोस हो.'

मनोज खाली मान घालून म्हणाला,'तसं नाही ओ तात्या. कसं सांगू तुम्हांला. इंदू आवडायला लागलेय मला. आताशा रात्री स्वप्नातही येते. मी प्रेमात पडलोय इंद्रायणीच्या.' हे सांगताना मनोज चक्क लाजत होता. 

-------------------------------

तात्या माईस म्हणाले,'माई,आयकलास मा. आपल्या इंदूचा भाग्य उजाळला. देवाक साखार ठेव.' माई ही गोड बातमी ऐकून खूष झाली. 

दुसऱ्या दिवशी तात्या व मनोज इंदुच्या घरी गेले. मनोजने इंदूस मागणी घातली. तात्या म्हणाले,'इंदे,तुझ्या हातची कॉफी कर बघू जायफळ घालून. अगो,आनंदाची बातमी आणलेय मी.'

गजाभाऊ म्हणाले,'घाटपांड्यांनी पसंती कळवली का?'

'घाटपांड्या,छे! त्याहीपेक्षा उजवं स्थळ स्वतःच्या पायाने चालून आलंय आपल्या इंदूसाठी. नवरामुलगा कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. भरघोस पगार आहे. सोन्यानाण्याची अजिबात अपेक्षा नाही. आपली इंदू ओळखते त्याला.'

गजाभाऊ म्हणाले,'तात्यांनू,निदान फोटो तरी आणायचा होतात मुलाचा.'

'फोटो कशास! अख्खा मुलगाच घेऊन आलो आहे. माझ्या शेजारी बसला आहे पण इंदूस पसंत आहे का ते विचारावयास हवे.'

इंदू लाजून आत पळाली. गजाभाऊंस व नव्या आईसही आनंद झाला. खर्चाचा व्याप वाचणार होता. शिवाय जावई मुंबईस म्हंटल्यावर मुंबईस काही कारणास्तव गेलं की रहावयास हक्काचं घर मिळणार होतं.

 तात्यांनी मनोजला मागिलदारी पाठवलं. इंदू तिथे गुलाबाच्या फुलाला गोंजारत उभी होती. मनोज तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला व म्हणाला,'इंदू तुला मी आवडत नसेन तर सांग तसं. आपली मैत्री अबाधित राहील. त्याबद्दल शंका नको.' 

इंदू गुलाबाच्या फुलाला गोंजारत म्हणाली,'मनोज कसं सांगू तुला..'
मनोजच्या चेहऱ्यावर भीती उमटली. तो ठीक आहे, होता है. लेटअस  रिमेन फ्रेंड्स असं काहीबाही म्हणाला व जायला निघणार इतक्यात.. इंदूने त्याला हाकारलं,'मनोज,मला जीजीची धाकटी सून व्हायला आवडेल बरं.' मनोजला आश्चर्याचा धक्काच बसला. 'तुझी तर ना. कसलं घाबरवलस मला,'असं म्हणत तो इंदुपाठी पळू लागला.

--------------------

तात्यांनी जीजीस फोन लावला व ही शुभबातमी सांगितली. जीजीला ही बातमी ऐकून खूप आनंद झाला. तात्यांना म्हणाली,'गेल्या जन्मीचं नातं असणार माझं नि इंदूचं तेव्हा या जन्मी सुनेच्या रुपाने येतेय माझ्या आयुष्यात.' जीजीने ही आनंदाची वार्ता अरविंद व रेवतीला सांगितली. रेवतीने तोंड कसनुसं केलं पण जीजीने तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केलं. 

ठरावास जीजी,अरविंद, रेवती व रेवतीचे वडीलही जीजीच्या आग्रहास्तव गेले. लग्न गावी करायचं ठरलं. नव्या आईने रेवतीची ओटी भरली. रेवतीही नवी आई,माई व इंदूशी छान बोलली. गजाभाऊंनी मंडळींना घरभाटलं दाखवलं. एका महिन्यानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. 

-------

माईंनी इंदू व तिच्या आईवडिलांना, भावाला केळवणास बोलवलं. गोडगोड पुरणपोळीचं जेवण खाऊ घातलं. इंदूस चांदीचा करंडा व अगरबत्तीचं घर भेट दिलं. तात्या गजाभाऊंसोबत लग्नाच्या तयारीला लागले होते. दारात हिरवागार माटव घातला. पोसवलेल्या केळी प्रवेशद्वारावर लावल्या. वर्हाड लग्नाच्या आदल्यादिवशी आलं. तात्यांच्या घरी त्यांची चोख व्यवस्था केली होती.

  इंदूच्या मैत्रिणींनी इंदूच्या तळहातांवर मेंदी काढली. इंदूच्या गोऱ्यापान हातांवर मेंदी अगदी उठून दिसत होती.  संध्याकाळी साखरपुडा झाला. मनोजच्या बोटात अंगठी घालताना इंदूची बोटं थरथरत होती. चेहरा घर्मबिंदूने डवरल्याने ती अधिकच सुंदर दिसत होती. 

रात्री श्रीमंतपुजन झालं. 
दिवसभराच्या दगदगीने इंदुचे डोळे मिटले. मध्यरात्री तिला जाग आली. ती उठून बसली. तिच्या कडेला गजाभाऊ बसले होते. इंदू म्हणाली,बाबा तुम्ही झोपला नाहीत?'

गजाभाऊ म्हणाले,' इंदू, तू उद्या सासरी जाणार. तुझ्या नवीन घरी जाणार. माहेरी मी तुझे कसले लाड केले नाहीत. सतत माझ्या बायकोला पोचवणारी या नजरेने तुझ्याकडे बघत आलो. नवीन आईनेही तुला खूप त्रास दिला पण मी तिलाही कधी जाब विचारला नाही. तू मात्र निमुटपणे सगळं सहन करत आलीस बाळा. इंदूबाळा या निष्ठूर बापाला माफ कर. राग मनात ठेवून जाऊ नकोस.'

इंदू बापाच्या कुशीत शिरुन बरीच रडली. आज तिच्या जीवनातला सगळ्यात आनंदी क्षण होता. तिच्या वडिलांनी तिला आपली मानलं होतं,कवेत घेतलं होतं,बापाची माया,आश्वासक आधार दिला होता.

लग्नात जांभळ्या रंगाचं काठापदराचं लुगडं नेसून माई वावरत होत्या. वर्हाडाच्या जेवणखाणाच्या तयारीकडेही जातीने लक्ष देत होत्या. सदरा,कोट,धोतर व डोक्यावर कडक टोपी अशा वेषात तात्या मांडवात फिरत होते. वाजपवाल्यांना सूचना करत होते. भटजीबुवांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याची जवाबदारी प्रसन्ना व त्याचे मित्र पार पाडत होते. इंदुची मऊमऊ भाटीही यजमानीणबाईसारखी उगाचच मंडपातून फिरत होती. कधी इंदू व मनोजच्यासमोर बसून जाणकारासारखे होम,सप्तपदी हे विधी पहात होती. 

इंदूसाठी झुमके,पैंजण,सोन्याचा हार,वरासाठी अंगठी  बनवून घेताना नव्या आईने स्वत:साठी चार पेडाचे ठसठशीत मंगळसुत्र बनवून घेतले. गळ्याबरोबर डाळिंबी खड्याचा तनमणी,नवकोरं मंगळसूत्र व अबोली रंगाची साडी ल्यालेली गव्हाळ वर्णाची, शेलाट्या बांध्याची नवी आई नवरदेवकडच्यांना आधी गजाभाऊंची बहीणच वाटली. 

मोरपिसी रंगाच्या शालूत इंदूचा गौरवर्ण उठून दिसत होता. मोगऱ्याचे गजरे तिच्या मोकळ्या सोडलेल्या कुरळ्या केसांवर खुलून दिसत होते. रेवतीही शरारा,मेचिंग ज्वेलरी घालून छान नटली होती. मोती रंगाची साडी नेसलेल्या जीजीला राहून राहून बापूंची आठवण येत होती. तिच्याही नकळत तिच्या पापण्यांचे काठ ओलावत होते. माईच्या ते लक्षात आले. तिने जीजीला पाणी आणून दिलं. तिच्या सोबतीला थोडा वेळ बसल्या. 

कानमुरडीच्या वेळी प्रसन्नाने मनोजचा कान जोरात पिरगाळला व म्हणाला,'माझ्या इंदुक्काला त्रास देशाल तर माझ्याशी गाठ हा ह्या धेनात ठेवा पावण्यांनू.'

निरोपाचा समय जवळ आला तसं नव्या आईने इंदूची ओटी भरली. इंदूने भाटीला जवळ घेतलं. तिच्या मऊसूत अंगावर हात फिरवताना तिच्या डोळ्यातले कढत थेंब भाटीच्या अंगावर पडले. भाटीचं अंग शहारलं. तिला खाली ठेवून इंदूने सख्या शेजारणींचा निरोप घेतला.

 भरल्या डोळ्यांनी नि दाटल्या गळ्याने ती तात्यामाईंना बिलगली. तात्यांच्या घशात आलेला कढ त्यांनी कसाबसा थांबवला. गजाभाऊ तर खूपच रडत होते. त्यांच्या वेदना त्यांना व इंदूला समजत होत्या. 

इंदूने गजाभाऊ व नवीन आईचा निरोप घेतला पण प्रसन्ना कुठे दिसेना. शेवटी मागिलदारी दोन्ही हातांच्या घडीत डोकं घालून रडत बसलेला प्रसन्ना तात्यांच्या नजरेस पडला. तात्यांनी त्याची कशीबशी समजूत काढली. आपण अधनंमधनं इंदुक्काला बघायला जाऊ म्हणाले नि त्याला इंदुक्काजवळ घेऊन आले. 

इंदुक्काला घट्ट मिठी मारुन तो रडू लागला. अश्रुंचे कढ दोघा बहीणभावांना येत होते. कोण म्हणेल ही सावत्र बहीणभावंड! ते द्रुश्य पाहून आजुबाजूच्या निसर्गालाही गहिवर आला होता. शेवटी इंदूने स्वत:ला सावरलं व प्रसन्नाचे डोळे पुसत म्हणाली,'प्रसन्ना,अरे कॉलेजात शिकणारा तरुण तू. रडतोस कसला. तुझ्या इंदुक्काला भेटावसं वाटलं की ताबडतोब गाडीत बसून ये. वेळ कमी असला तर फोनवर बोल.' 

मनोजचा हात पकडून इंदुक्का गाडीत बसली. कावऱ्याबावऱ्या नजरेने पाठीमागचं माहेर नजरेच्या कक्षेपासून धुसर होईस्तोवर हात हलवीत राहिली.

-----------------

बिल्डींगमधल्या मुलींनी जीजींच्या दारात सुंदर रांगोळी रेखाटली होती.  इंदूने सर्वांच्या आग्रहातसव उखाणा घेतला,'दोन दिवे दोन ज्योती दोन शिंपले दोन मोती मनोजराव माझे पती आणि मी त्यांची अखंड सौभाग्यवती.'  उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं. इंदूने उंबरठ्यावरचं मापटं ओलांडलं आणि अशा रितीने तिने सासरच्या घरात प्रवेश केला. 

पुर्ण दिवस मनोज व इंदूला खेळ खेळवण्यात गेला. या कामात शेजारणी व रेवतीची आई अग्रेसर होत्या. 

 दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या पुजेला नवीन जोडपं बसलं. पुजेसाठी तिला आकाशी रंगाची,शंकरपाळीची नक्षी पदरावर असलेली,सोनेरी काठाची नऊवार रेवतीच्या आईने नेसवली होती.

 भटजीकाकांच्या सांगण्यानुसार रेवतीने मनोजच्या उपरण्याच्या टोकाची व इंदूच्या शालीच्या टोकाची गाठ मारली. मनोजचा होणारा स्पर्श इंदुच्या अंगभर रोमांच पसरवत होता. तिने मनोजच्या उजव्या हाताला तिची बोटं लावली होती. खऱ्या अर्थाने ती आत्ता मनोजची पत्नी झाली होती. मखरातला सत्यनारायण नवदाम्पत्याला भरभरुन आशिष देत होता. 

गाठ सोडताना इंदू म्हणाली,'वहिनी नाव घ्या.' तिचं ते बोलणं रेवतीला रुचलं नाही. रेवती म्हणाली,'तू मला आत्ता शिकवणार का गाठ सोडताना नाव घ्यायचं असतं ते. पाढा म्ह़टल्यासारखं मधे अरविंद घालून तिने भरभर नाव घेतलं व तिथून निसटली. इंदूचं मन मात्र खट्टू झालं. 

क्रमशः

🎭 Series Post

View all