Aug 09, 2022
कथामालिका

जाऊबाई जोरात (भाग 5)

Read Later
जाऊबाई जोरात (भाग 5)

जाऊबाई जोरात(भाग 5)

रेवती मनोज व इंदूला उद्देशून म्हणाली,' हे बरं लिव्ह इन चालतं लग्नाआधी. बघून स्थळ बघितलं तर कुठचं,गावाकडचं.' इंदू रेवतीवर चिडली. ती म्हणाली,'दिदी, आम्ही खेड्याकडची माणसं स्वाभिमान दागिन्यांसारखा मिरवतो. आत्ता खेडं पुर्वीसारखं राहिलं नाही. खेड्यात उत्क्रांती घडते आहे पण माणुसकी सोडली नाही खेड्याने. माणूसपण जपलं आहे.' जीजीच्या नेमकं हेच मनात होतं आणि ते इंदूने बोलून दाखवलं. इंदूचं सडेतोड उत्तर ऐकून रेवती सोडून सर्व खूष झाले.

-----------------------------------------

अरविंदने इंदू व मनोजसाठी तिकीटं बुक केली. जीजीने फराळचं करुन दिलं. रेवतीनेही चकल्या तळायला मदत केली. रेवतीला सगळ्यांसोबत बोलताना पाहिलं की अरविंदला बरं वाटायचं. शेजारच्या दोंते काकू चकलीचा खमंग वास सुटताच बेल वाजवू लागल्या. 

'काय जीजी आज चकल्या वाटतं. विशेष काय?'

'अहो वहिनी,ही इंदू आलेली नं परीक्षेसाठी ती उद्या जायचीय. मी म्हंटलं विकतचं काही घेऊन देण्यापेक्षा घरचंच बनवून देऊ,'जीजी म्हणाल्या.

'अरे वा,आज रेवती चकल्या तळतेय म्हणजे तर बघायलाच पाहिजे चव घेऊन.'

रेवतीने दोंते काकूंना चकल्यांची प्लेट दिली.

'खुसखुशीत झाल्यात गं. तुला सांगते रेवती चकलीचं गणित हे तळणावर अवलंबून असतं. पेशन्स महत्त्वाचा. मंद आचेवर तळाव्या लागतात. नाहीतर त्या पद्मिनीच्या चकलीसारख्या होतात. अगं चकली खातोय का शेंगोळे खातोय असा प्रश्न पडतो बघ. त्या वरच्या रेडेकर वहिनींच्या चकल्या तर पकडीशिवाय फुटतच नैत." असं म्हणत दोंते काकू तोंडाला पदर लावून हसू लागल्या.

'दोंते काकू, कालच मला इस्त्रीवाली सांगत होती की तुम्ही तिच्या दुकानाच्या पायरीवर बसून गप्पा मारता ,त्यात माझा विषय काढला होतात व  मला काहीच स्वैंपाक करता येत नाही असं तिथे जमलेल्या बायकांना सांगत होता,' रेवती असं बोलली मात्र दोंते काकूंना जोराचा ठसका लागला. इंदू चकल्या गाळत होती. तिने उठून माठातलं गार पाणी दिलं त्यांना. पाणी पिताच त्या सावध झाल्या व 'अरविंदा,चकली फारच तिखट रे बाबा तुझी,'असं म्हणत,हातवारे करत निघून गेल्या. अरविंद रेवतीकडे पाहून हसू लागला. मग इंदू नि मनोजलाही हसू आवरेना. जीजी मनात म्हणत होती,'कठीण आहे माझ्या सुनबाईचं!'

ठाण्यावरुन ट्रेन सुटणार होती. इंदूने लवकर उठून आवरलं. मनोज उठेना तसं अरविंदाने त्याच्या पांघरुणावर ग्लासभर पाणी ओतलं. कुडकुडत मनोज बाथरुममधे पळाला. जीजीने पुरीभाजीचा डबा दिला. इंदू म्हणाली,'कशाला दगदग केलीस जीजी?'
जीजी म्हणाली,'अगं असुदे. बाहेरचं तेलकट खाऊ नका. डब्यातलं वाटूनवाटून खा. बाजुच्यांनाही द्यावं थोडं. मी थोडं जास्तीचं दिलंय.'
'जीजी तुही ये गं कधी आमच्याकडे. रहायलाच ये नंथोडे दिवस. हवापालट होईल बघ तुझा.'
जीजीने इंदुच्या कपाळावर तिचे ओठ टेकवले.

 जीजीला नमस्कार करून,रेवती व दादाचा निरोप घेऊन दोघं निघाली. ठाण्याच्या प्लेटफॉर्मवर प्रवाशांची बरीच गर्दी होती. बोगी नंबर पाहून डबा कुठे येणार हे बघत मनोज बेगा घेऊन पुढे जाऊ लागला. त्याच्या मागोमाग गर्दीतून वाट काढत इंदू चालली होती. गाडी येताच इतर प्रवाशांसोबत ही दोघं बोगीत घुसली. सीट शोधून मनोजने बेगा खाली ठेवल्या व इंदूस खिडकीजवळची सीट दिली. ती बसल्यावर तो बसला.  काही मिनिटांत आजीआजोबा आले. आजीची सीट वरची होती. मनोज वरती चढला व आपली सीट त्याने आजीस बसण्यास दिली. आज्जीआजोबा खूष झाले. 

गाडी सुरु झाली. मनोजला वरून इंदू दिसत होती. मनामधे कुठेतरी त्याला आता ती तिच्या घरी जाणार याची हुरहूर लागली होती. आज्जी तिच्याशी इकडच्यातिडच्या गप्पा मारत होती. इंदू आज्जीच्या गप्पा कुतुहलाने ऐकत होती. आज्जीलाही श्रोता मिळाला म्हणून किती न् काय सांगू असं झालं होतं. 

इंदूच्या केसांच्या बटा वाऱ्यावर उडत होत्या. मनोजला ती एखाद्या राजकुमारीसारखी भासत होती. रत्नागिरी आली तसा इंदुने डबा काढला. आधी मनोजला एका झाकणात पुरीभाजी दिली. आज्जीआजोबांनाही कागदाच्या प्लेटमधे दिली मग तिने घेतली. आज्जीनेही मेथीचे पराठे न् लिंबाचं लोणचं दिलं त्यांना. आज्जी मनोजला म्हणाली,'लग्न ठरलं वाटतं तुमचं. छान दिसतोय बरं जोडा.' मनोजने हसत इंदूकडे पाहिलं. तिच्या नाकाचा शेंडा पुन्हा लाल झाला होता.

आज्जीआजोबा उतरताना त्यांना सामान उतरवायला मनोजने मदत केली. तो इंदूच्या शेजारी येऊन बसला. इंदूला झोप लागली होती. तिने नकळत तिचं डोकं मनोजच्या खांद्यावर टेकवलं. पाऊणएक तासाने गाव जवळ आलं तसं मनोजने तिला उठवलं. इंदू तोंड धुवून आली. मनोजचा कंगवा घेऊन तिने केस विंचरले. मनोजने सामान दरवाज्याकडे न्हेलं. गाडी थांबली तसे ते उतरले. 

भात कापून झाल्याने शेतं ओस दिसत होती. पिकांचे वाळलेले बारीक खुंट चपलेला लागत होते. थोड्याच अंतरावर पाणंद लागली. संध्याकाळ होत आल्याने गुरं घराच्या दिशेने निघाली होती. त्यांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजुळ आवाज कानास सुखावत होता. 

 मागंपुढं चालत असताना जाणाऱ्या एकदोन बाया इंदूला विचारत होत्या,'कवा इलस गो ?' नि इंदू हसून,'ह्या काय निकताच' म्हणत होती. इंदूचं घर आलं. आड्यावर तिचा भाऊ तिची वाट पहात होता. मनोज मग इंदूचा निरोप घेऊन  प्रसन्नासोबत तात्यांच्या घराकडे वळला. मनोजच्या कानी इंदूच्या नव्या आईचे विखारी शब्द आले,'बाईसाहेब परीक्षेच्या नावाखाली जीवाची मुंबय करून इल्या. कामा टाळूचेसाठी सोंगा दुसरा काय,' मनोजला इंदुच्या नव्या आईचा खूप राग आला. 

प्रसन्नाच्या लक्षात आलं ते. तो म्हणाला,'इंदुक्काक सवय असा रे नव्या आईच्या रागाची. तुया मनार घेऊ नको.' प्रसन्ना दिसायला इंदूसारखाच होता. मनोजने प्रसन्नाकडे त्याच्या कॉलेजविषयी चौकशी केली. 

माडापोफळींत लपलेलं तात्यांचं चिरेबंदी घर फार सुंदर दिसत होतं. हिरव्यागार व्रुक्षराजींतून पाखरांची सुमधूर किलबिल ऐकू येत होती. एकूणच प्रसन्न वातावरण होतं. मनोजला सोडून प्रसन्ना घरी पळाला. त्याला इंदुक्काशी खूप काही बोलायचं होतं.

तात्या खळ्यात आरामखुर्ची घालून रेडिओवर गाणी ऐकत बसले होते. त्यांनी दोन्ही हात फैलावत मनोजला मिठीत घेतलं . म्हणाले,मनोज तुझा बापू तरुणपणी अगदी तुझ्यासारखा दिसायचा रे. न्हाणीतल्या कढत पाण्याने मनोज अंघोळ करत होता. त्या धुरकट पाण्याने न्हाल्याने मनोजला आलेला प्रवासाचा शीण कुठल्याकुठे गेला.

 मनोज स्वैंपाकघरात आला. माई चुलीजवळ बसून जाळीदार घावणे काढत होत्या. बाजूला वायलावर चहा उकळत होता. भरपूर चहाघावणे खाऊन झाल्यावर मनोजला जीजीने माईसाठी दिलेल्या भेटीची आठवण झाली जी त्याने माईकडे सुपूर्द केली. 

तात्या मनोजला परसवातली झाडं,आमराई बघण्यासाठी घेऊन गेले. नुकताच आंब्यांना मोहोर येत होता. त्याचा धुंद सुगंध वातावरणात मिसळला होता. काजूच्या झाडांनाही लाल पालवी फुटली होती. त्याच्या मोहराचाही विशिष्ट असा सुवासिक गंध येत होता. ओहोळाजवळ कपडे धुवायला आलेल्या इंदुला पहात तात्या म्हणाले,'जरा म्हणून आराम नाही रे पोरीला. सतत कामाला जुंपलेली असते म्हणून तुमच्याकडे परीक्षेला पाठवलं होतं. तुम्ही उत्तम सोय केली तिची.' 

मनोजने तात्यांना बापू व त्यांच्या मैत्रीबद्दल विचारलं तेंव्हा ते म्हणाले,'बापूची मावळण(आत्या) पुर्वी याच गावात थोरल्या आंब्याशेजारी रहायची. सुट्टीला बापू तिच्याकडे रहायला यायचा. आत्याचं घर आत्ता मोडकळीस आलंय. ती लोकं इकडे येत नाहीत. बापू नि मी सुट्टीत धमाल करायचो. अगदी पुढे कॉलेजात जायला लागलो तरी बापूचा उन्हाळ्यातला मुक्काम ठरलेला होता. पुढे त्याची आत्या तिच्या थोरल्या मुलाकडे वसईस रहायला गेली ते परत आलीच नाही. बापू मात्र वेळ काढून मला भेटायला यायचा.'

इतक्यात प्रसन्ना येताना दिसला.
'अरे,आत्ता ना गेलास. काय भिंगरी लावलेस की काय पायाला!' तात्या म्हणाले.

'उद्या इंदुक्काला बघायला पाहुणे येणार आहेत. तुम्हांला बोलवलंय. सकाळी दहा वाजता या. येतो मी आणि हो या दादालाही घेऊन या सोबत.'
'अरे थांब. एवढा कशाला पळतो आहेस वाघ पाठी लागल्यासारखा. नवऱ्यामुलाचं नाव सांग बरं. 'ढवळेंचा द्वितीय पुत्र,लोकेश वामन ढवळे,'प्रसन्नाने उत्तर दिलं

प्रसन्ना गेला तसं  तात्या म्हणाले 'बाशिंग बळ जड आहे त्याचं. एमआयडीसीत नोकरीला जातो. सध्या पस्तीशीचा आहे.' 

'काय बोलता तात्या एवढं अंतर चालतं, वधुवरात?' मनोज म्हणाला.

'अरे आपण कोण चालवणारे,तिच्या आवसीबापाशीस मान्य आहे मग आपण काय बोलणार.' तात्या उद्विगनतेने म्हणाले. त्या मुलास फिट्स येत असल्याचेही ऐकिवात आहे. मनोज रात्रभर तळतमळत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर गोडगोजिरी,हसरी,निरागस इंद्रायणी येत राहिली. 

पहाटे उठून इंदूने न्हाणीत आग घातली. पाणी भरलं,झाडलोट केली,पुजेसाठी लालबुंद जास्वंदीची फुलं काढली. गजाभाऊंनी तिच्यासाठी अंजिरी रंगाची सोनेरी बुट्टेवाली साडी आणली होती. इंदू ती साडी नेसली. चहा,पोहे करुन तयार झाली.ठरलेल्या वेळेस मंडळी आली. नवरामुलगा,त्याचा मोठा भाऊ,आईवडील,मध्यस्थी सर्व बैठकीत बसले. तेवढ्यात तात्या व मनोजही आले. थोडी इकडचीतिकडची चर्चा झाल्यावर नवऱ्यामुलीस आणावयास सांगितलं. 

इंदू चहा घेऊन गेली. इंदूने सर्वांना चहा दिला,वाकून नमस्कार केला व बाजूला खुर्चीवर बसली. नवऱ्यामुलाच्या वडिलांनी इंदूस नाव,शिक्षण विचारले. त्यांचं विचारुन झालं तसं तात्यांच्या सांगण्यानुसार इंदू आत गेली. प्रसन्नाने बाहेर कांदेपोहे आणून दिले.
'हे आमचे धाकटे चिरंजीव,' गजाभाऊ म्हणाले. प्रसन्नाने नवऱ्यामुलाला नीट न्याहाळलं व आत गेला. 

'आम्हांला वाटलं होतं,मुलगी नोकरीला आहे.' मध्यस्थी म्हणाले. 

'नुकतीच मुंबईला जाऊन स्पर्धापरीक्षा दिली आमच्या इंदूने," गजाभाऊ म्हणाले.

'तशा परीक्षा कैक देतात हो. हजारातून एखादा पास होतो. त्या निकालाच्या आशेवर पुढची बोलणी करणं केवळ निरर्थक आहे.' नवऱ्यामुलाचे वडील म्हणाले.

गजाभाऊ नाराज झाले पण नवऱ्यामुलाचे ज्येष्ठ बंधु म्हणाले,'ठीक आहे. चालीवर घेऊ पण नवऱ्यामुलाला घसघशीत चेन घाला. मुलीस सोन्याचा हार,चार घसघशीत बांगड्या,कर्णफुलं एवढं तरी तुम्ही घालालच. अर्थात स्त्रीधन असतं ते. वेळाकाळाला उपयोगी येतं.'

गजाभाऊ म्हणाले,'जमेल तेवढं करीनच मी पण सोन्याची चेन व बांगड्या नाही हो जमायच्या.'

थोडावेळ कोणी काहीच बोलले नाही. पाहुणेमंडळी सावकाश निर्णय कळवतो असं सांगून निघून गेली. गजाभाऊ त्यांना सोडायला गेले.

प्रसन्ना इंदूस म्हणाला, 'इंदुक्का,मला तो ढेरपोट्या भाओजी मुळीच आवडला नाही. इंदू खुसूखुसू हसली. तिला हसताना पाहून नवीन आई म्हणाली,'हिला काय जातंय फिदीफिदी हसायला. ही ब्याद उजवताना आमच्या नाकी नऊ येतात. दात पाडून खर्च करायचा तर हिच्या लग्नात. हिला एवढं सोनंनाणं घालून मग प्रसन्नासाठी काय! याच्या लग्नाचीही सोय करुन ठेवली पाहिजे.'

मनोज सोप्यावर बसला होता. त्याला हे बोलणं ऐकू येत होतं. तो विचार करत होता,'अशा लोभी माणसांच्या हाती का देताहेत इंदूला,एखाद्या खाटकाच्या हाती शेरडू दिल्यासारखं.'

दिवसभर मनोज विचारांची जुळवाजुळव करत होता. रात्री तात्या खळ्यात शतपावली करत होते तेव्हा मनोज म्हणाला,'तात्या,मी करु का इंदूशी लग्न?'

तात्या म्हणाले,'उपकार म्हणून करु नकोस हो.'

मनोज खाली मान घालून म्हणाला,'तसं नाही ओ तात्या. कसं सांगू तुम्हांला. इंदू आवडायला लागलेय मला. आताशा रात्री स्वप्नातही येते. मी प्रेमात पडलोय इंद्रायणीच्या.' हे सांगताना मनोज चक्क लाजत होता. 

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now