Aug 09, 2022
Kathamalika

जाऊबाई जोरात(भाग4)

Read Later
जाऊबाई जोरात(भाग4)

#जाऊबाई_जोरात  (भाग 4)

'हे बघ रेवती तुला माहितीय,आपल्या दोघांच्या पगारातही मुंबईमधे घर घेणं शक्य नाही. दुसरं म्हणजे  मला साहेब आणि गिर्हाईकामधलं दलाल होणं आवडत नाही. तसे संस्कारच  नाहीत माझ्यावर. कुत्र्यासारखं शेपूट हलवत साहेबाच्या मागे फिरणं,त्याला वाममार्गाने पैसे मिळवून देणं आणि त्यात आपलं उखळ पांढरं करुन घेणं हे सगळं नाही जमणार मला.'

'नाही जमणार तर रहा सडत आयशीसोबत. मी केरळहून डायरेक्ट माझ्या आईकडेच जाईन.'

'हे तुझे विचार तुझ्या आईवडिलांनाही पटणार नाहीत,रेवा.'

रेवतीने फोन ठेवून दिला होता नि अरविंदा रुममधे येरझारा घालत होता.

----------------------------------------------

रात्री बाथरुमला जायला आलेल्या जीजीने अरविंदचं मोठ्यामोठ्याने बोलणं ऐकलं. आईच ती शेवटी. पोटच्या लेकाचा विषाद तिला कळणार नाही का! मनोजने कधी हातचलाखी केली असेल लहानपणी पण अरविंदचा तो स्वभावच नव्हता. 

जीजीला आठवलं,एकदा अरविंदचा पहिला नंबर आला होता. पेपर मिळाले तेंव्हा खूप खूष झाला होता तो. बाईंनी त्याला उभं रहायला सांगून सर्वांना टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या पण मग घरी ते पेपर बघताना एका चुकीच्या उत्तराला बाईंनी दोन गुण दिलेले जीजीच्या लक्षात आलं. 

अरविंदने तिचा चेहरा पाहून तिला काय झालं म्हणून विचारलं असता ती भांबावली. चूक दाखवून दिली तर लेकाचा पहिला नंबर जाणार या धास्तीने गप्पच राहिली पण अरविंदने तो पेपर परत पाहिला. त्याला त्याची चूक लक्षात आली आणि डोळ्यात पाणीही आलं त्याच्या. काय निर्णय घ्यायचा ते बापूंनी त्याच्यावरच सोडलं होतं. बापूंचाच लेक तो. शाळेत जाताच त्याने बाईंना स्वत:चं चुकीचं उत्तर दाखवलं व गुण कमी करण्यास सांगितलं. बाई खूप खूष झाल्या होत्या त्याच्या प्रामाणिकपणावर. बाईंनी त्याला एक गोष्टीचं पुस्तक भेट म्हणून दिलं होतं त्यावेळी आणि आत्ता मात्र या त्याच्या प्रामाणिकपणामुळेच त्याची गोची झाली होती. रेवती त्याला इतरांसारखं वागायला सांगत होती,जे त्याला कदापि शक्य नव्हतं. जीजी बराच वेळ फिरत्या पंख्याकडे बघत जागी होती. मधे कसा कोण जाणे अरविंद येऊन गेला व म्हणाला तिला,'जीजी, नको एवढा विचार करुस. होईल सगळं व्यवस्थित.'

रविवारी अरविंद मित्रांसोबत ट्रेकींगला गेला होता. किचनमधून इडलीचटणीचा सुवास येत होता. इंदूने रात्री भिजत घातलेल्या रिठा,शिकेकाईने केस धुतले होते. ती गेलरीत कॉफी पित  बसली होती. 

इतक्यात खाली फुलवाला दिसला तिला. तिने त्याला वर यायला सांगितलं व दोन मोगऱ्याचे गजरे घेतले. केस थोडे वाळले तसे जीजीने तिला सैलसर वेणी घालून दिली व तिने वेणीत ते मोगऱ्याचे गजरे माळले. जराशी पावडर नि दोन भुवयांमधे किंचीत वर लहानसं गंध हाच काय तो श्रुंगार इंदूचा. तरी तिच्या या साधेपणातच किती उठून दिसत होती ती! 

मनोज तिची खिल्ली उडवण्यासाठी मोठ्याने म्हणाला,'ऐकलस का जीजी,आज इंद्रायणीचा भात कर . आपल्याकडे आहे न् इंद्रायणीचा तांदूळ.' इंदूने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. 

'रागावल्यावर कसली लाली चढते हिच्या नाकावर,' मनोज स्वगत म्हणाला. 

इंदूने पुस्तकात डोकं खुपसलं तसं जीजी मनोजवर करवादली,म्हणाली,'आज वेळ आहे नं मनु तुला. जरा सत्कारणी लाव टिंगलटवाळी करत बसण्यापेक्षा. ज्ञान वाटल्यानं ज्ञान वाढतं. जरा बैस इंदूसोबत आणि शिकव तिला. उद्या परीक्षा आहे तिची आणि हो इंदू,आज तरी तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. स्वैंपाकाचं मी बघते.'

जीजी किचनमधे गेली तसं मनोज एक खुर्ची घेऊन इंदूच्या बाजूला बसला व  तिला काही ट्रीक्स शिकवू लागला पण हाय! तिच्या न्हालेल्या केसांना येत असलेला शिकेकाईचा  सुगंध आणि त्यात भर म्हणून की काय तिने माळलेले ते पांढराशुभ्र मोगऱ्याचा गजरे..मनोजला काही सुचेनासं झालं. डोळे मिटून तो त्या सुगंधाच्या बोळांत फिरत होता. इंदू गालातल्या गालात हसत तिचं काम करत बसली होती.

-----------

रेवतीला परत घरी आलेली पाहून तिच्या आईने विचारलंच,'रेवा अगं तुझ्या घरी जायचं होतंस नं. अरविंदराव वाट बघत असतील. त्यांना बोललीस का? का परत भांडलीस त्यांच्याशी?'

'आत्ता मला घरात घेणार नाहीएस का तू?'

'रेवा राजा तू आधीच घरात आली आहेस बघ पाहू.'

रेवा तणतणत बाथरुममधे गेली नि शॉवर घेऊन आली. तोवर तिच्या आईने तिच्यासाठी चहा बनवून ठेवला होता. वातावरण थोडं शांत झाल्यावर आई पुन्हा विचारती झाली,'रेवती काय झालं गं?'

'काहीच तर नाही,'असं म्हणत रेवती रिमोटची बटणं दाबू लागली.

'काहीच नाही कसं? अरविंदरावांचा फोन आला होता मला. त्यांनी सांगितलं मला तुझ्या त्यांच्याविषयीच्या अपेक्षा. नवऱ्याला वाममार्गाने पैसा कमवायला सांगतेस!'रेवाचे वडील गरजले.

रेवा या अचानक झालेल्या गोळीबाराने जरा दचकलीच पण नंतर सावरून म्हणाली,'काय झालं असं सांगितलं तर! अरविंदासोबत काम करणारा त्याचा कलीग,आमच्याच बिल्डींगमधे तळमजल्याला रहायचा. दोघांचाही हुद्दा एक पण अरविंदा मोटरसायकलवरून फिरतो नि त्या लुष्टेकडे दोन फोर व्हिलर आहेत. 

लुष्टेची बायको दरवर्षी हळदीकुंकवाला नवीन सोन्याचा दागिना घेते. शिवाय शंभर रुपयाच्या वरचं वाण लुटते. सोसायटीतल्या बायकांत विशेष पत आहे तिची. अंगभर सोन्यानं मढवलय तिला लुष्टेने. सगळ्याजणी कौतुक करतात तिच्या नवनवीन डिझाइन्सच्या दागिन्यांचं. नुकतेच सोन्याचे पैंजणही घेतलैत तिने.चेंबुरला थ्रीबीएचकेचा फ्लेट घेतलाय तोही हा ब्लॉक न विकता. साड्या,ड्रेस तर बघायलाच नको शिवाय फॉरिन टूरही करतात. नाहीतर हा अरविंदा. हफ्ते भरतोय मोटरसायकलीचे.'

'अगं रेवती ते कुणालातरी लुबाडलेलं लाभत नाही बाळा. जातंच ते परत.'

'कुठल्या जमान्यात वावरतेस आई तुसुद्धा. तुझंही खरंच आहे म्हणा. आमच्या पिताश्रींनीही तेच तर केलं. कधी तुझी हौसमौज नाही की कधी आम्हांला मनासारखी खरेदी करू दिली नाही.  एवढ्या महत्त्वाच्या पोस्टवर होते. आरामात आम्हां दोघांनाही चांगल्या पदावर चिकटवू शकले असते पण नाही. ते यांच्या तत्वात बसत नाही.'

'रेवती,तुझे दादा किती मोठ्या पोस्टवरुन मानाने सेवानिवृत्त झाले आहेत, याचा तुला अभिमान असला पाहिजे.'

'आई,म्हणूनच तू अशी लंकेची पार्वती राहिलीस बघ.' आत्ता मात्र रेवतीचे वडील भडकले. त्यांनी रेवतीवर खाडकन हात उगारला. क्षणभर  रेवतीला काय झालं कळलंच नाही. तिच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. ती आपली बेग घेऊन आली तशी चालू पडली.

रेवतीची आई तिला थांबवू पहात होती पण रेवतीच्या वडिलांनी तिला अडवलं. रेवतीची आई बराच वेळ दाराकडे बघत राहिली..उद्वेगाने म्हणाली,'चुकलो का हो आपण मुलांवर संस्कार करण्यात?' रेवतीचे बाबा म्हणाले,'नाही गं. आपण आपल्या परीने सगळं करत आलोय तिचं. आता तिने किती आत्मसात केलंय अथवा घेतलय ते तिच्यावर आहे. तू नको जास्त मनाला लावून घेऊस.'

रेवती घरी आली. सगळी अगदी काहीच न घडल्यासारखी वागत होती. जीजीने तिची इंदूशी ओळख करून दिली. रात्री अरविंद आणि तिच्यात काही संभाषण झालंच नाही. दोघं दोन टोकांना झोपले. 

सकाळी इंदूची परीक्षा होती. अरविंदकडे इंदूला परीक्षाकेंद्रावर नेण्याची जबाबदारी सोपवली होती. ते दोघं नऊपर्यंत बाहेर पडले. अरविंदने मग तिथेच गार्डनमधे वेळ काढला व पेपर संपताच इंदूला घरी घेऊन आला.

तात्यांचा पाय मुरगळल्याने तात्यांनी त्यांना मुंबईस येणं शक्य नसल्याचं जीजींना कळवलं व इंदूस मनोजसोबत गावी पाठवावयास सांगीतलं.

चारेक दिवसांनी कसलीशी सार्वजनिक सुट्टी होती. जीजीच्या सांगण्यानुसार मनोज इंदूस मुंबईतली काही प्रेक्षणीय ठिकाणं दाखवण्यास घेऊन गेला. सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. तारापोरवाला मत्सालय,नेहरु सायन्स सेंटर,म्हातारीचा बुट,संजय गांधी नेशनल पार्क असं बरंच फिरले. खाऊगल्लीत पेटपूजा केली. संध्याकाळी ती दोघं गोराई बीचवर आली. तो विशालकाय समुद्र बघून तर इंदू पार वेडी झाली. मनोज म्हणाला,'इंद्रायणी,कोकणातली न् तू. तुला समुद्राचं एवढं नवल!'

'अरे पण आमच्या गावाहून फार लांब आहे समुद्र. तिथे कोण न्हेतय मला! गावची जत्रा सोडून बाहेर अशी कधी फिरलीच नाही रे मी.' इंदू पाण्यात खेळू लागली,त्या फेसाळत्या लाटा अंगावर झेलू लागली. तितक्यात तिथे अतितंग कपडे घातलेल्या काही युवती आल्या तशी मनोजला म्हणाली,'चल मनोज,घरी जाऊया जीजी वाट बघत असेल.'

'अगं थांब तू खेळ. मी जरा नेत्रसुख घेतो,'मनोज मिश्किलपणे हसत म्हणाला.

'हो कां. चावट कुठचा. अरे पण तुमच्या शहरात मुली अशा कशा रे बिनधास्त फिरतात. मघापासून कितीतरीजणी मला अर्ध्र्या चड्डीत दिसल्या. ईस बाई.'

'अगं इस काय त्यात. आधुनिक आहेत त्या.'

'कमी कपडे घालण्यात कुठला आला रे आधुनिकपणा. आधुनिकपणा विचारात हवा,आचारात हवा. कपडे सुटसुटीत हवे.'

'जा तर सांग जा त्यांना जे मला सांगतेयस ते.'

'तू गप रे. तुझ्याशी शेअर केलं फक्त.'

'बरं चल नारळपाणी घेऊ.'

दोघं मग नारळपाणी प्यायले. इंदू म्हणाली,'तू घरी ये आमच्या. आमच्या माडाचं शहाळं फोडून देते तुला. कितीतरी फरक आहे रे या पाण्यात नि त्या ताज्या नारळपाण्यात आणि मलई तर अहा!'

'माडावर चढता येतं तुला?'

'नाही रे पण इतर झाडांवर सरसर चढते बरं का मी खारुताईसारखी. प्रसन्ना चढतो माडावर.'

मनोजने इंदूला त्याच्या ऑफिसातील चढाओढ,टेंशन्स शेअर केले. मनोजला जाणवलं,इंदू एक उत्तम लिसनर आहे. तिच्याशी मनातल्या चिंता शेअर केल्याने त्यालाही जरा मोकळं वाटलं.

दोघंही मग बुडत्या सुर्यबिंबाचा,आकाशातील रंगपंचमीचा खेळ बघत बसले. घरी पोहोचायला रात्री नऊ वाजले. 

अंगाला वाळू चिकटल्यामुळे जीजीने दोघांनाही गरम पाण्याची अंघोळ करायला लावली. जीजीने वरणभात मेथीची भाजी करुन ठेवली होती. रेवतीने पोळ्या करायला घेतल्या. त्या दोघांसाठीही पोळ्या करायला लागणार म्हणून तिची चिडचिड झाली. जेवणं आवरल्यावर सगळी आईसक्रीम खात असताना इंदू जीजीला दिवसभराच्या गंमतीजमती सांगत होती.

  रेवती मनोज व इंदूला उद्देशून म्हणाली,' हे बरं लिव्ह इन चालतं लग्नाआधी. बघून स्थळ बघितलं तर कुठचं,गावाकडचं.' इंदू रेवतीवर चिडली. ती म्हणाली,'दिदी, आम्ही खेड्याकडची माणसं स्वाभिमान दागिन्यांसारखा मिरवतो. आत्ता खेडं पुर्वीसारखं राहिलं नाही. खेड्यात उत्क्रांती घडते आहे पण माणुसकी सोडली नाही खेड्याने. माणूसपण जपलं आहे.' जीजीच्या नेमकं हेच मनात होतं आणि ते इंदूने बोलून दाखवलं. इंदूचं सडेतोड उत्तर ऐकून रेवती सोडून सर्व खूष झाले.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now