जाऊबाई जोरात (भाग 3)

Jaubai jorat (part 3)

जाऊबाई जोरात (भाग 3)

मनोज व अरविंद ऑफिसला गेले होते. इंदू व जीजीने मिळून दुपारचं जेवण बनवलं. जीजींच्या हातचा कढीभात इंदूला खूप आवडला,तिला माईच्या हातच्या दूधभाताची आठवण आली नि तिच्या गालावरुन आसवं वाहू लागली तसे नानाही हळवे झाले. जीजीने तिच्या पाठीवर हात फिरवला तशी ती सावरली. परीक्षा झाली की न्यायला येतो असं सांगून तात्यांनी इंदूचा निरोप घेतला.

----------------------------^^^^^^---------------------------------

संध्याकाळ झाली. सहा वाजता मनोज आला. गाडीत जाम गर्दी होती असल्याने सगळं अंग घामाघूम झालं होतं. कधी एकदा बाथरुममधे जाऊन शॉवर घेतोय असं त्याला झालं होतं. त्याने कपडे काढले,टॉवेल घेतलं व बाथरुममधे गेला. अगदी मोठ्या आवाजात याssहू चाहे कोई मुझे जंगली कहे। कहेने दो जी कहेता रहे। हम प्यार के तुफानों मे घिरे है हम क्या करे। असं त्याचं शॉवर घेत बाथरुम सिंगिंग कम डान्सीग होतं. 

इंदु जीजीच्या सांगण्यानुसार वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करत होती गेलरीमधे. कपड्यांचा ढीग घेऊन ती हॉलमधे यायला नि कंबरेला टॉवेल गुंडाळलेला,ओलेता उघडाबंब मनोज बाथरुममधून ओले केस कोरडे करत हॉलमधे यायला एकच गाठ पडली.  दोघांची नजरानजर झाली नि दोघेही तंतरले,बावचळले. जीजी बेडरुममधे गव्हाचं दळण काढायला गेलेली. मनोजची चांगलीच फजिती झाली. तो बाथरुममधे पळाला.  वापस आला व त्या कपड्याच्या ढिगांतले टिशर्ट,बर्म्युडा घेऊन गेला.

जीजीने मनोजला इंद्रायणीच्या येण्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. उगा तो नकारघंटा लावेल की काय अशी भीती होती तिच्या मनात आणि काहीही करुन या वर्षभरात मनोजला बोहल्यावर चढवायचं होतं तिच्या मनात. मनोज तसा लहानपणापासनच हट्टी. आपलं तेच खरं करणारा त्याचा स्वभाव चार वर्षांपूर्वी त्याचे वडील गेले तेंव्हापासून हळवा झाला होता. 

पुर्वी जीजींशी क्षुल्लक मुद्द्यावरुन तावातावाने भांडणारा मनोज आत्ता जीजीचं मन जपू लागला होता. वहिनीचं घुमेपण त्याला बिलकुल पसंत नव्हतं. तिचा एककल्ली स्वभाव पाहून कितीदा त्याच्या मनात येई की दुसरी रुम घेऊ नी आईसोबत तिकडे रहायला जाऊ. एकेका मित्रांची लग्न होत होती. मनोज जायचा अक्षता टाकायला. तिथे त्याला विचारणा व्हायचीच,'काय मग मनोज यंदा कर्तव्य आहे?' मनोज नुसताच गालातल्या गालात हसायचा.

इंदुला कसंनुसं झालं होतं. असा उघडबंब तरुण पुरुष ती प्रथमच पहात होती. तिच्याही नकळत एक शिरशिरी तिच्या अंगात आली मग तिने समजावलं स्वतःला,'इंदे,तात्यांनी,माईने आपल्याला अभ्यास करायला वेळ मिळावा,व्यवस्थित परीक्षा देता यावी म्हणून इथे पाठवलय. उगा भलतंसलतं पाप मनात आणू नकोस.' तिने दोन्ही गालांना हात लावून देवाची माफी मागितली नि पुस्तक पुढ्यात घेऊन बसली. इतक्यात प्रसन्नाचा फोन आला. प्रसन्नाला तिने गाडीतल्या प्रवासाबाबत,जीजी,तिचं घर याबतची सगळी इत्थंभूत माहिती दिली व म्हणाली की तिची काळजी करू नकोस. नीट अभ्यास कर.' प्रसन्नाशी बोलून तिला हलकंहलकं वाटलं. 

इंदू गावाकडची संध्याकाळ आठवू लागली. गुरं गोठ्याकडे येण्याची ही वेळ. गुरांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज. नदीच्या पैलतीरावरच्या मंदिरातल्या घंटेचा आवाज, विहिरीच्या रहाटाचा आवाज,तिची मांजर,त्या मांजरीचं सारखं पायात घुटमळणं आणि काय काय. पुस्तक पोटावर ठेवून ती गेलरीतल्या आरामखुर्चीत पडून राहिली.

इकडे कधी नव्हे तो मनोज जीजीवर भडकला.

'जीजी ती हॉलमधली मुलगी कोण? आणि ती आपल्या घरात काय करतेय?'

' ती होय. अरे ती इंदू म्हणजे इंद्रायणी नाव तिचं. तिला प्रेमाने इंदू म्हणतात. तू कसा माझा मनू तशी ती इंदू.'

'इंदू तुझी? कधीपासून? दत्तक घेतलंस तिला? आणि आणलं कोणी तिला इथे?'

'अरे थांब. किती रागावतोस! सांगते,सगळं सांगते.' दळणाचा डबा बाजूला ठेवून जीजी बेडवर बसली. तिने पदराने तोंड पुसलं.

'तुझ्या बापूंचे मित्र,तात्या आठवतात ना. इंद्रायणी त्यांची मानसकन्या. तिची कसलीशी परीक्षा आहे दहाएक दिवसांनी. घरी सावत्र आई आहे. अभ्यास होत नाही तिचा म्हणून तात्यांनी.."

'म्हणून दहा दिवस आधीच इथे आणून ठेवायचं!'

'बरोबरयं तुझं. तुझी परवानगी घ्यायला हवी होती मी आधी. राहिलच बघ माझं पण अरुशी बोलले होते रे त्याला काहीच हरकत नव्हती.'

'अगं पण जीजी ती तरुण..'

'काय म्हणालास!'

'क..क..काही नाही. जाऊदेत. मी माझ्या रुममधे जातो. मला चहा आणि लाडू दे.' 

जीजीला मनोजचं हसू आलं.

जेवणाचं ताटसुद्धा मनोज त्याच्या खोलीत घेऊन गेला. जीजी आणि इंदूने जेवून घेतलं. इंदूने साबणाच्या पाण्याने ओटा स्वच्छ पुसून काढला. जीजी बाकीची आवराआवर करेस्तोवर अरविंद आला. तो फ्रेश झाला तसं जीजींनी त्याचं पान वाढलं. भांडी घासून इंदू बाहेर आली तेंव्हा जीजीने त्या दोघांची ओळख करुन दिली. अरविंदने इंदूची,तिच्या अभ्यासाची विचारपूस केली. काही अडलं तर विनासंकोच विचार म्हणूनही सांगितलं. 

अरविंदने विचारलं,'जीजी, मनोज बाहेर गेलाय का?' 
'नाही रे. आत बसलाय कडी लावून.' अरविंद हसला. इंदूने चुलीत भाजलेले काजू आणले होते. ते गरम करायला तव्यावर ठेवले. घरात असा सुगंध सुटला! इंदूने प्लेटमधे काजुगर काढून टिपॉयवर न्हेऊन ठेवले. 

'अरे वा. गावची भेट वाटतं,'अरविंद.म्हणाला.
'हो दादा, खाऊन तर बघा किती चविष्ट लागतात.'
'अगं हो,किती मस्त लागतायत. हो ना जीजी,'असं जोरात ओरडत अरविंद मनोजच्या खोलीजवळ गेला. हे चुलीत भाजलेले काजूचे घर म्हणजे मनोजचा वीक पॉइंट होता. तो शेवटी दार उघडून बाहेर आला नि मुठभर काजूगर घेऊन बसला. जीजी,अरविंद व इंदूच्या गावाविषयी गप्पा चालू होत्या नि मनोज त्या ऐकून न ऐकल्यासारखं करत होता.

दोनतीन दिवसांत इंदू जीजीच्या घराला रूळली. मनोज व तिचे एकदोनदा पुसटसे बोलणे झाले होते. अरविंददादाशी मात्र गट्टी जमली होती. एकदा जीजी अंघोळीला जायला निघाली तसं इंदूने तिला थोडं थांबायला सांगितलं. दूध व चण्याचं पीठ कालवलेली वाटी घेऊन ती जीजीसोबत बाथरुममधे गेली.
जीजी म्हणाली,'हे गो काय? लहान बाळ आहे का इथे?'
'जीजी ब्लाऊज काढ बघू.'
जीजीने लहान मुलासारखं तिचं ऐकायचं ठरवलं नि ब्लाऊज काढला.

 इंदूने जीजीच्या पाठीवर ऊनऊन पाणी ओतलं व गोरटेल्या पाठीला कालवलेलं दूध,बेसन चोळलं. 'जीजी,काल पाठ खाजवीत होतीस ना तेव्हाच ठरवलं होतं आज तुझी पाठ चोळून द्यायची. माईलाही मी आठपंधरादिवसांनी देते पाठ चोळून.'
'बापू ना पोरं घरी नसली नि सुट्टीला घरी असले की अशीच पाठ चोळून द्यायचे गं माझी.' बापूंची आठवण येताच जीजीचा आवाज कातर झाला.
'जीजी,किती गं तू हळवी. सोड सारखंसारखं जुन्या आठवणींत गुंतून रहाणं,बरं राहिलीस तर काही हरकत नाही पण डोळ्यात टिपं आणू नकोस गं.'
जीजी हो म्हणाली.
जीजी,काय गे हे तुझे इवलेसे केस! आमच्या बाहुलीचे तरी लांब होते यापेक्षा.'
'इंदे,काय सांगू तुला. माझे केस किती लांब होते. ढुंगणाच्या खाली असायचा वेणीचा शेपटा पण बाळंतपणात,इतर बारीकसारीक आजारपणात गळती लागली ती कायमचीच.'

इंदूने पाहिलं, कुंडीत कडीपत्ता तरारला होता. लाल जास्वंदही होती. इंदूने खोबरेल तेलाच्या बाटलीतलं तेल पातेल्यात उकळावयास ठेवलं व त्यात कडीपत्ता,वाळलेल्या आवळ्याच्या फोडी,जास्वंदीची पानं घातली. तेल सिद्ध झालं तसं तिने ते निवू दिलं व  एका काचेच्या बरणीत गाळून घेतलं. रोज रात्री निजण्यापुर्वी इंदू जीजीच्या डोक्याच्या त्वचेला मसाज करु लागली.

मनोजला इंदूने त्याच्या आईची अशी देखभाल करणं आवडू लागलं होतं तरी तो म्हणालाच,'कितना भी खत डालो,पौधा नहीं उगनेवाला.' इंदूने त्याच्याकडे रागाने पाहिलं. 

जीजी म्हणाली,'हात मेल्या,ती पोर तिचा अभ्यास करून माझ्या डोक्याला मालीश करतेय तर तुझं कायतरी भलतंच. जरा वेळ असला की अभ्यासाकडे बघ की तिच्या. जाईल आता चारेक दिवसांत मग परत कशाला येतेय जीजीकडे!'

'असं का गं म्हणतेस जीजी?'

'अगं म्हणजे नंतर लग्न होईल नं तुझं. तात्या,गजाभाऊ दोघंही स्थळं बघत असतील तुझ्यासाठी.'

'काहीतरीच हां जीजी तुझं.'

'इंदे,सांग तरी तुझ्या अपेक्षा मला. माझ्या ओळखीत कुणी असेल तर मीही सुचवीन स्थळं.'

'जीजी,मला नं साधासरळ,बायकोमुलांवर माया करणारा,प्रेमळ,सुस्वभावी,निर्व्यसनी असा जोडीदार हवा.'

'बऱ्याच अपेक्षा आहेत तुझ्या भावी जोडीदाराबद्दल,'मनोज म्हणाला.

'असणारच. नवरा म्हणजे बटाटा थोडीच आहे जो एक कुजका निघाला म्हणून दुसरा घेऊन येऊ!' इंदूच्या या बोलण्यावर सगळेच हसले. 

'हे बाकी शंभर टक्के खरं बोललीस हं इंदू, अगं नवरा म्हणजे नारळ. बरा तर बरा.' जीजी म्हणाली यावर अरविंद म्हणाला अँड वायसेवर्सा. हेच तत्व स्त्रियांनाही लागू होतं. एखाद्याची बायको त्याच्या ऐकण्यातली नसली की त्याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार खावा लागतो. 

अरविंदच्या या बोलण्यावर सगळीच चिडीचूप झाली. जीजीला कळत होतं अरविंदचं कायतरी बिनसलंय पण नेमकं काय हेच कळत नव्हतं. 

त्यादिवशी रात्री बाराच्या सुमारास रेवतीचा फोन आला. 'अरविंद, मला नवीन घर हवंय मुंबईत, आपल्या दोघांचं.'

'झाडाला लटकतात का पैसे? मुंबईतल्या साध्या वनरुमकिचनची किंमत ठाऊक आहे ना तुला.'

'का,तुझा कुलिग घेऊ शकतो मग तू का नाही घेऊ शकत मुंबईत घर?'

'हे बघ रेवती तुला माहितीय,आपल्या दोघांच्या पगारातही मुंबईमधे घर घेणं शक्य नाही. दुसरं म्हणजे  मला साहेब आणि गिर्हाईकामधलं दलाल होणं आवडत नाही. तसे संस्कारच  नाहीत माझ्यावर. कुत्र्यासारखं शेपूट हलवत साहेबाच्या मागे फिरणं,त्याला वाममार्गाने पैसे मिळवून देणं आणि त्यात आपलं उखळ पांढरं करुन घेणं हे सगळं नाही जमणार मला.'

'नाही जमणार तर रहा सडत आयशीसोबत. मी केरळहून डायरेक्ट माझ्या आईकडेच जाईन.'

'हे तुझे विचार तुझ्या आईवडिलांनाही पटणार नाहीत,रेवा.'

रेवतीने फोन ठेवून दिला होता नि अरविंदा रुममधे येरझारा घालत होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all