Jan 23, 2021
कथामालिका

जाऊबाई जोरात(भाग 2)

Read Later
जाऊबाई जोरात(भाग 2)

जाऊबाई जोरात(भाग 2)

जराशा नाराजीनेच तिने पोळपाट लाटणं हाती घेतलं. जीजी म्हणालीही तिला,'खूप छान पोळ्या लाटतेस.' ती नुसतंच बरं म्हणाली. जीजीला वाटत होतं,रेवतीने तिला नागपूरच्या गमतीजमती सांगाव्यात. इथे सगळं कसं मेनेज केलं विचारावं पण नाही.

त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी रेवतीला एका प्रोजेक्टसाठी पंधरा दिवस केरळला जावं लागलं. अरविंदबाबत जीजी असताना तिला टेंशन नव्हतं.

------------------------------^^^^^^^^----------------------------

तात्यांचा म्हणजे जीजींच्या यजमानांच्या स्नेह्याचा फोन आल्यापासनं जीजी खूष होती. तात्या  यायचे होते आणि सोबत इंद्रायणीस घेऊन येणार होते. इंद्रायणी ही तात्यांची मानसकन्या. 

फार लहानपणी तिची आई गेली. हिची आई गेली ती ह्या नतद्रष्ट कारटीमुळेच अशी सगळीजणं म्हणायची. घरातलीच असं बोलायची तर बाहेरच्यांच काय. वडील तर तिला हिडीसपिडीस करायचे. पुढे तिच्या वडिलांची तालुक्याच्या गावाला बदली झाली तेंव्हा ते एकटेच जायला निघाले असता त्यांच्या भावाने व वहिनीने जात असशील तर तुझ्या लेकीस घेऊन जा. आम्हांला आमचंच जड झालंय. तुझी आणि कोठे सांभाळायची असं सांगितलं. इंद्रायणीच्या वडिलांनी,गजामाऊंनी मुकाट्याने मग इंदुलाही बरोबर घेतलं. 

इंदु तेंव्हा सहासात वर्षाची असेल पण गजाभाऊंचा ओरडा खातखात बरीचशी कामं करु लागली होती. घरात झाडलोट करणं,तांदूळ निवडणं,भांडी घासणं अशी तिला झेपतील तेवढी कामं ती करायची. पुढे गजाभाऊंनी एका माळ्याच्या मुलीशी लग्न केलं. दोघांत जवळजवळ वीसेक वर्षांच अंतर होतं पण गजाभाऊंची सरकारी नोकरी म्हणून माळी आपली सोन्यासारखी लेक त्यांच्या स्वाधीन करायला तयार झाला. 

नवीन आई येणार ती आपल्यावर खूप खूप माया करणार असं इंदूला वाटत होतं आणि झालंही तसंच त्यांच्या लग्नानंतर दिढेक वर्ष नवीन आईने इंदूला खूप लळा लावला. इंदू खूप खूष होती पण नवीन आईला लेक झाला नि सगळं गणितच बदललं. 

नवीन आई,इंदूलाच सगळी कामं सांगू लागली. बाळाचे शीशुचे कपडेही इंदूच धुवे. तिला ते काम मुळीच आवडत नसे पण नाही बोलायची हिंमत नव्हती. तसं एकदा तिनं धीर करुन म्हंटलं असता गजाभाऊंनी तिच्या गालावर सणसणीत लगावली होती. गजाभाऊंची पाची बोटं तिच्या कोवळ्या गालावर उमटली होती. 

असं काही झालं की इंदू देवळात जाऊन बसे एकटीच,एक टक देवाकडे बघत. मग पुजारीबाबा विचारत,इंदू काय झालं गो? का बरं अशी बसलीस?' इंदू म्हणे,'पुजारीबाबा,देवबाप्पा खरंच असतो का हो! मला नाही खरं वाटत आणि असलाच तर तो का बरं माझ्या आईला घेऊन गेला? शालू,मालन,नली,लली या सगळ्यांना आई आहे. मलाच का नाही. माझ्यावर कुणी प्रेम करत नाही. नवी आई थोडं चांगलं वागायची पण मला भाऊ आल्यापासनं तीही माझ्याशी तुटक बोलते. सगळी कामं करायला लावते." 

इंदुचं हे बोलणं देवळात नमस्कार करायला आलेल्या तात्यांनी ऐकलं,त्यांचं ह्रदय हेलावलं. तात्यांनी इंदुला उचलून घेतलं. तिला आपल्या सदऱ्याच्या खिशातलं चॉकलेट दिलं. तिच्या गोबऱ्या गालांवरची आसवं त्यांनी रुमालाने पुसली व म्हणाले,'इंदूबाळ तू खूप शहाणी आहेस. देवाला विश्वास आहे की तू स्वतःला संभाळू शकशील म्हणून देवाने..पुढचे शब्द तात्यांच्या ओठातच राहिले. त्यांच्या गळ्यात आवंढा दाटून आला नि नकळत त्यांचेही नेत्रकाठ ओलावले तसं इंदूने तिच्या झग्याच्या टोकाने त्यांचे डोळे पुसले नि म्हणाली,'मोठ्ठी माणसं रडतात का?'

तात्यांना तिच्या बोलण्याचं हसू आलं. त्यांनी तिच्या गोबऱ्या गालाचा पापा घेतला. परतताना तात्यांनी इंदूला आपल्या घरी न्हेलं. घरी माई होत्या. माई म्हणजे तात्या़च्या सौभाग्यवती. गोरीपान,काठपदराचं लुगडं नेसलेली माई इंदूला खूप आवडली. तात्यांना मुलबाळ नव्हतं. माईला इंदुची हकीगत कळताच माईने तिला छातीशी कवटाळलं. तिला ऊनऊन दूधभात खाऊ घातला. माई तिला म्हणाली अशीच फुरसतीने येत जा अधीमधी आणि मग इंदूही कामं आटोपली,अभ्यास संपला की माईकडे जाऊ लागली. तिच्याशी गप्पा करु लागली. माई तिच्यासाठी लाडू,रेवड्या राखून ठेवे. पुढे पुढे इंदुचा भाऊ प्रसन्नाही तिच्यासोबत तात्यामाईंकडे जाऊ लागला. 

प्रसन्नाचा इंदुक्कावर खूप जीव होता. तिच्याशिवाय त्याचं पानही हलत नसे. प्रसन्नाही इंदूसोबत त्याच्या आईस नवीन आई बोले. नवीन आईने त्याला एकट्यास काय खावयास दिलं तर तो नवीन आईच्या नकळत इंदुक्काचा वाटा खिशात घालून ठेवे व इंदुक्का तळ्यावर कपडे धुवावयास गेली असता मागून जाऊन आपल्या चिमुकल्या हातांनी तिचे डोळे झाके मग इंदुने त्याचं नाव घेतलं की मोठ्ठे डोळे करत खुदकन हसत तिला खिशातला खाऊ देई. 

दिवस,महिने,वर्षे बघता बघता सरत गेली नि इंदू शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयात गेली. पतपेढीची नोकरी करत तिने आपल्या शिक्षणाचा भार उचलला. इतर मुली सिनेमा पहावयास जायच्या,हसायच्या खिदळायच्या पण इंदू या साऱ्यापासनं अलिप्त होती. तिला शिकून लवकर मोठं व्हायचं होतं. नवीन आई व तात्यांच्या घरापासनं दूर दूर जायचं होतं पण प्रसन्ना मात्र तिला तिच्या विश्वात हवा होता. तो तिचा लाडका भाऊ होता. 

इंदू बीए झाली आणि  तिने एमपीएससीचा फॉर्म भरला. तात्यांनी तिला मुंबईचं परीक्षाकेंद्र घ्यावयास सांगितलं ते जीजीच्या विश्वासावर. जीजीकडे तिची सगळी सोय होईल याची तात्यांना खात्री होती व गजाभाऊही प्रकरण बाहेरच्या बाहेर निपटतय म्हणून गप्प राहिले. 

प्रथमच इंदू मुंबईस जावयास निघाली होती. पाणावलेल्या डोळ्यांनी तिने माईस नमस्कार केला. देवळातल्या बाप्पाला नमस्कार केला. प्रसन्ना तर रडवेला झाला होता. तिनेच मग त्याची समजूत काढली,'अरे दहाबारा दिवसात येतेय मी परत.' 

सकाळीच जीजीच्या दाराची बेल वाजली. दारात इंदू व तात्या उभे. जीजींनी त्यांना आत घेतलं. अंघोळीस पाणी दिलं. जीजीने चहा करायला घेतला तसं इंदू तिच्यामागे जाऊन उभी राहिली व जीजीला काही मदत करु का विचारु लागली. जीजीने तिला शिरा करण्यासाठी साहित्य काढून दिलं व तात्यांच्या गप्पांना जाऊन बसली. तात्या म्हणाले,जीजी, ते परीक्षेचं निमित्त बघ. इंदूला आणलेय तुला दाखविण्यासाठी. दहाएक दिवस तुझ्यासोबत राहिली की ठरव धाकटी सून म्हणून तुला आवडतेय का ते." 

स्वैंपाकघरातून शिऱ्याचा सुवास येत होता. तात्या म्हणाले,"पोरीच्या हाताला चव आहे गं. बालपणापासून आईच्या मायेला पारखी झाली तरी माईने तिच्या पदराची सावली दिलेय तिला.'

मनोज व अरविंद ऑफिसला गेले होते. इंदू व जीजीने मिळून दुपारचं जेवण बनवलं. जीजींच्या हातचा कढीभात इंदूला खूप आवडला,तिला माईच्या हातच्या दूधभाताची आठवण आली नि तिच्या गालावरुन आसवं वाहू लागली तसे नानाही हळवे झाले. जीजीने तिच्या पाठीवर हात फिरवला तशी ती सावरली. परीक्षा झाली की न्यायला येतो असं सांगून तात्यांनी इंदूचा निरोप घेतला.

क्रमश: