Jan 19, 2021
Kathamalika

जाऊबाई जोरात(भाग 1)

Read Later
जाऊबाई जोरात(भाग 1)

#जाऊबाई_जोरात (भाग 1)

मनोजने दाराची बेल वाजवली. जीजीने दरवाजा उघडला. डोळ्याला चष्मा,गोरापान देह,कपाळावरचे विरळ होत चाललेले केस ज्यांना एका छोट्याशा क्लीपने बांधून ठेवलं होतं,डायबेटिसमुळे हातापायाच्या वाती होत चाललेल्या,अशी ठेंगणीशी जीजी.

 मनोजने बुट काढले. मोजे काढून बुटांत सरकवले. खांद्यावरची बेग समोरच्या सोफ्यावर ठेवत तो हातपाय धुवायला निघून गेला. शॉवर घेऊन टॉवेलने अंग खसाखसा पुसलं नि गेलरीतल्या दोरीवर आणून वाळत टाकलं.

 जीजीचं निरीक्षण चालू होतं. मनोज हल्ली बरीचशी आपली कामं आपणच करत होता. मनोज तिचा धाकटा मुलगा. थोरला अरविंद. अरविंदचं लग्न झालं होतं, दिड वर्षापूर्वी. त्याची बायको रेवती त्यांच्याच गावची. अगदी पत्रिका बघून,घर वगैरे पाहून लग्न जुळवलं होतं. रेवतीचे आईवडील दोघंही देवमाणसं पण रेवती.. ती थोडी अलगच होती. 

जीजीने लग्नाच्या पहिल्या दिवसापासनं रेवतीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. नवीन जोडपं म्हणून जीजी रेवतीला सकाळी उठवतही नसे. तिचं ऑफिसही तसं उशिराचंच होतं. जीजीने तिच्या दोन,मनोजच्या चार,अरविंदच्या चार यासोबत रेवतीच्या तीन पोळ्या करायला घेतल्या होत्या. भाजी तर आधीसारखीच करत होती. तिच्या सराईत हातांना पोळीभाजीच्या डब्याची सवयच होती. 

रेवतीनेच उठून डबा करावा वगैरे तिच्या मनात कधी आलं नाही पण जीजीला वाटायचं मात्र नक्की,अरु नि मन्या जसा एखाद्या पदार्थासाठी हट्ट करतात तसा रेवतीनेही आपल्याजवळ करावा. तसं जीजीने एकदोनदा रेवतीला तिची आवड विचारण्याचा प्रयत्नही केला होता पण तिने काही विशेष नाही असं साधसं उत्तर दिलं होतं का जीजीच्या जाणिवेची दखलच घेतली नव्हती. 

एकदा रेवतीच्या पगाराबाबत अरविंदने तिला विचारलं असता तिने सरळ सांगितलं होतं की माझा पगार मी घरखर्चाला देणार नाही. पुढे घर घेण्यासाठी मी बचत करणार आहे. अरविंदला तिचं ते बोलणं रुचलं नव्हतं. वेगळं घर घ्यायची गरज नव्हतीच कारण मुलांची गरज लक्षात घेऊन अरविंदच्या वडिलांनी टुबीएचकेचं हे घर घेतलं होतं.  घर चालवण्यासाठी रेवतीच्या पगाराची गरज नव्हतीच. जीजीला नवऱ्याची पेंशन मिळत होती शिवाय दोघं लेक हवं नको ते घरात आणून टाकत होते. काहीच कमी नव्हतं. रेवतीचं हे अळूच्या पानाप्रमाणे अलिप्त रहाणं अरविंदसोबत मनोजच्या मनावरही आघात करुन गेलं.

शनिवार,रविवार रेवती आईकडे जायची. सोमवारी संध्याकाळीच घरी यायची. जीजीलाही वाटायचं,सुट्टीच्या दिवशी तिने घरी रहावं. दोघींनी मिळून गप्पा मारत कामं आवरावीत पण छे.
अरविंदही सुट्टीच्या दिवसांत पोरका वाटे. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना जाणवे.

 दहा दिवसांपूर्वी जीजी भोवळ येऊन घरात पडली. नशीब, शनिवार होता त्यामुळे अरविंद व मनोज दोघेही घरात होते. जीजींचा उजवा हात दुखावला. डॉक्टरांनी त्याची जास्त हालचाल होऊ नये म्हणून गळ्यात बांधला. अरविंदने रेवतीला फोन लावून कळवलं पण तिने नागपुरच्या बहिणीकडे भाचीच्या बर्थडेसाठी जात असून यायला चारेक दिवस लागतील म्हणून सांगितलं. अरविंद रागाने मुठ दाबत राहिला नि मनोज त्याच्या अगतिकपणाकडे बघत राहिला. 

मनोजने आठवडाभर सुट्टी घेतली. मुलीला लाजवेल अशी जीजीची सगळी कामं केली त्याने. अंघोळ घालायला शेजारच्या वहिनी यायच्या. बाकी जीजीचे केस विंचरुन ते क्लीपमधे अडकवणं,तिला भरवणं,पाणी पाजणं,औषध,गोळ्या देणं,तिच्यासोबत भूतकाळातल्या आठवणींत रमणं,जुने अल्बम बघणं,एक का दोन. जीजी म्हणायची, माझे लेक काही कमी सेवा नाही करत माझी. बेटी होना सौभाग्याचं लक्षण म्हणे पण नाही ज्यांना बेटी होत त्यांनी मायूस होऊ नये. बेटेही काही कमी सालस नसतात. त्यांनाही काळीज असतं.

मनोजने जीजीसाठी मोड आलेल्या मेथीची खीर बनवली होती.
"कशी झालेय जीजी?"

'अगदी रुचकर. तुझ्या हाताला चव आहे रे मनु.'

'असणारच. मुलगा कुणाचाहे!'

जीजी गालात हसली मग म्हणाली,' मनू,लग्नाचं वय झालं रे तुझं. तुझ्या आवडीची कुणी असेल तर सांग.'

'तसलं काही नाही गं जीजी.'

'बरं,मग मी स्थळं शोधायला लागू?'

'नको ना जीजी.'

'अरे पण..तिसीचा होत आलास की. कधी करणारैस लग्न म्हातारा झाल्यावर!'

'जीजी,खरं सांगू तुला. मला खरंच इच्छा नाही लग्न करायची.'

'का रे राजा?'

'एक सून आली तरी तुझं काम सुटलंय का? कशाला आणि दुसरी सून हवी तुला!'

'अरे म्हणजे काय सुना म्हणजे काही दासी नव्हे माझ्या.'

'मी कुठे म्हणतोय तसं पण निदान तुझ्याशी दोन गोड शब्द तरी बोलते का तुझी सून!'

जीजीचा चेहरा पडला. मनोजने जीजीची दुखरी नस दाबली होती. भिडस्त स्वभावाची जीजी लेकांशीही विनयतेने बोले, सुनेशी तर बघायलाच नको पण रेवतीला जीजीबद्दल मायाच नव्हती. मुळात ती माहेरच्या कोषातून बाहेरच आली नव्हती. 

साताठ दिवसांनी रेवती परत आली. एखाद्या शेजाऱ्याची विचारपूस करतात तशीच विचारपूस तिने जीजीची केली व तिच्या रुममधे निघून गेली पण यावेळी मात्र जीजीने तिला दोन्ही वेळच्या पोळ्या लाटायला सांगितल्या.

 जराशा नाराजीनेच तिने पोळपाट लाटणं हाती घेतलं. जीजी म्हणालीही तिला,'खूप छान पोळ्या लाटतेस.' ती नुसतंच बरं म्हणाली. जीजीला वाटत होतं,रेवतीने तिला नागपूरच्या गमतीजमती सांगाव्यात. इथे सगळं कसं मेनेज केलं विचारावं पण नाही.

त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी रेवतीला एका प्रोजेक्टसाठी पंधरा दिवस केरळला जावं लागलं. अरविंदबाबत जीजी असताना तिला टेंशन नव्हतं.

क्रमशः