जाऊबाई जोरात (अंतिम भाग)

Jaubai jorat (antim bhag)

जाऊबाई जोरात (अंतिम भाग)

रेवती  म्हणाली,'काकू आम्ही तुम्हाला मान देतो म्हणून तुम्ही आमच्या घरगुती गोष्टीत ढवळाढवळ करायलाच पाहिजे का! जा ना तुमच्या घरी.'

इंदू म्हणाली,'काय बोलतेस रेवती तू! त्या परक्या आहेत का आपल्याला!'

'तू गप गं. मला नको शहाणपणा शिकवू.  आम्ही घेऊ दुसरं घर.'

अरविंदचा रेवतीच्या कानाखाली मारायला उठलेला हात त्याने कसाबसा आवरला. रेवती पेटलीच,'का थांबलास. हाच तुझा पुरुषार्थ असेल तर दाखव माझ्या गालफडात मारुन मग मी बघते तुमच्या सगळ्यांची. महिलांच्या बाजूने कित्येक कायदे आहेत हे विसरु नकोस.'

-----------------

मनोज मुठी आवळत बेडरुममधे गेला. जीजीला हा सगळा प्रकार पाहून आणखीच धाप लागली. इंदूने तिला गोळी नि पाणी दिलं. 

दोंतेकाकू या घटनेनंतर पहिल्यासारख्या यायच्या बंद झाल्या. आपल्या घरात राहू लागल्या. खाली बागेत संध्याकाळी फिरताना तेवढ्या दिसायच्या. जीजीही खाली जायची. दोघीजणी पुलावर फिरायला जायच्या. जीजीने रेवतीच्यावतीने त्यांची माफी देखील मागितली होती. त्या आश्वासक हसल्या होत्या.

म्हणतात ना संकटं आली की पाठोपाठ येतात तसंच काहीसं रेवतीबाबत झालं.  तिने  अरविंदला त्याची सेविंग्स जास्त व्याज देणाऱ्या एका इन्व्हेस्टमेंट ग्रुपमधे ठेवण्यास भाग पाडलं होतं.

 तीन वर्षात मुद्दल दुप्पट होणार होती पण झालं भलतच तो ग्रुपही फ्रॉड निघाला. या सगळ्या गोष्टींचा अरविंदच्या मनावर जबरदस्त ताण आला.

--------------

मंगळागौरीसाठी म्हणून गजाभाऊ इंदूस घेऊन गेले. इंदूला आलेली पहातच तिच्या साऱ्या सख्या गोळा झाल्या. कोणाची लग्नं ठरली होती तर कोणी इंदूसारखंच माहेरचं सुख उपभोगायला आल्या होत्या. इंदुच्या घरचं,मुंबईचं सुख ऐकण्यास सगळ्या आतुर होत्या.

 प्रसन्नाही त्यांच्यासोबत बसून इंदूच्या गप्पा.ऐकत होता. इंदूने त्यांना मुंबईदर्शन,हेंगिंग गार्डन,सिद्धीविनायक मंदिर,जिजामाता उद्यान असं पाहिलेलं बरंच काही सांगितलं. 

पहिली मंगळागौर इंदूकडे होणार होती. इंदू व तिच्या सख्यांनी पत्री गोळा केल्या. फुले जमवली. दोन दिवस आधी भिजवून ठेवलेले वाल सोलले. दामूभटजींनी मंगळागौरीची पूजा सांगितली. माईंनी मुलींकडून गौर मांडून घेतली,फुलं वहायला सांगितलं. भटजींनी मुलींना मंगळागौरीची कहाणी सांगितली. मुलींनी आरती केली. घरभर उदबत्त्यांचा,कापुराचा सुगंध दरवळत होता. 

जय देवी मंगळागौरी ओवाळू सोनिया ताटी
रतनांचे दिवे माणिकाच्या ज्योती जय देवी मंगळागौरी..मुली तल्लीन होऊन गात होत्या. 

फराळासाठी नवीन आई व माईंनी मिळून चकल्या,लाडू,कडबोळ्या,करंज्या,खिचडी व डाळिंब्यांची उसळ बनवली होती. म्हाताऱ्यांपासून लहानग्यांपर्यत सगळी यथेच्छ जेवली. 

तद्नंतर  देवीसमोर खेळ सुरु झाले. झिम्मा,फुगड्या,खुंटणमिरची..एक का दोन. पोरींच्या उत्साहाला अगदी उधाण आलं होतं. नवीन आई व माईही त्यांत सामील झाल्या होत्या. पहाटे पुन्हा आरती झाली. नवीन आईने गुरगुटा भात शिजवला सोबतीला सांडग्या मिरच्या तळल्या नि इंदूला वाढलं.

 नवीन आई आत्ता इंदूशी छान बोलतचालत होती. तिच्या मनात प्रसन्नाला पदवी परीक्षा दिल्यानंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचं होतं. इंदू प्रसन्नासोबत शेतात गेली. नुकतच भाताच्या गोट्यात दूध भरु लागलं होतं. सळसळतं हिरवंगार शेत ती डोळे भरुन पहात होती. तो माहेराचा वारा अक्षरशः पिऊन घेत होती. 

प्रसन्ना म्हणाला,'इंदुक्का,तू आल्यावर हे शेत हसू लागलं बघ. नाहीतर कशातच उत्साह नव्हता. तुझी खूप आठवण येते बघ.'

 इंदू म्हणाली,'अरे आता मोठा झालास तू. माझी कसली आठवण काढतोस. कॉलेजातल्या एखाद्या मुलीची काढत असशील. कोण असली तर सांग बरं. मी कुणाला नाही सांगणार तुझं गुपित.'

प्रसन्ना गालातल्या गालात हसला. इंदू म्हणाली,'म्हणजे पाणी मुरतय एकंदरीत.' इतक्यात नवीन आई साद घालू लागली म्हणून.दोघे घराकडे वळले.

--------------------

 सकाळीच अरविंदला साहेबांनी  फायरिंग केलं होतं. त्याच्यापेक्षा ज्युनिअर,नव्याने आलेल्या स्टाफसमोर त्याला वाटेलं तसं,वाट्टेल ते बोलले होते. 

अरविंदचा मित्र शाम त्याला जवळच्या उपहारग्रुहात घेऊन गेला. सोबत डबे होतेच. व्हेज पुलाव मागवला. 
शाम म्हणाला,'किती अपसेट होतोस अऱ्या!'
'अरे काय सांगू तुला. अगदी भाताच्या गोट्याएवढी चूक असली तरी मलाच बोलतो तो खडूस. ही खालची शेफारलैत. कामं करत नाहीत मग हा मला धारेवर धरतो.'

शाम म्हणाला,'खडूसला घरी बायकोपोरं भाव देत नसणार तेव्हा तिथली भडास इथे आपल्यावर काढतो.'

'ते तसंही असेल कदाचित पण मग पार्सिलिटी का करतो.'

'अरे सरळय. त्याला जसं हवं तसं आपल्याला वागता येत नाही. त्याचा खिसा भरायला आपण मदत केली पाहिजे जे आपल्याला बापजन्मात शक्य नाही,नाहीतर इतक्यात फायस्टार हॉटेलमध्ये जेवत असलो असतो. तू नको टेंशन घेऊस.'

दोघांनी मग हाफ हाफ लस्सी घेतली. मनोज विचारातच होता. घरी गेलं की रेवतीची कटकट. तिला झटपट श्रीमंत व्हायचंय. तिच्या नादाला लागून सगळी सेव्हींग त्या सो अँड सो इनव्हेस्टमेंट ग्रुपमधे घातली. 

वर्षभरात त्या माणसाने आपल्यासारख्याच गरजवंतांचे पैसे गुंडाळले नि पोबारा केला. आठवडाभरापुर्वी पेपरात आलेलं,त्यात बऱ्याच पेंशनरने आपली पुंजी गुंतवली होती. काही जण हा धक्का नाही पचवू शकले ते गेले वर कायमचे. 

साला तसं वर गेलं तर सगळेच प्रॉब्लेम सुटतील पण जीव द्यायचा कसा? काडी लावून घ्यायची तर घासलेट पाहिजे. तेतरी कुठे मिळतय. विचार करत तो पुलावर आला. नदी संथ वहात होती. तिच्या प्रवाहाकडे बघत म्हणाला,'पोहता येतय नाहीतर बुडून मरता आलं असतं.'

 घरी आला. इंदू माहेरी गेल्याने घरात जीजी नि रेवतीच होते. जीजीला दम्याचा त्रास सुरु झाला होता. सारखा श्वास वरखाली व्हायचा. रेवतीची एकटीचीच कटकट चाललेली. 

तिची मावस बहीण केरळ,कन्याकुमारी ट्रीपला जाऊन आली त्याचं वर्णन ऐकल्याने रेवतीचा तीळपापड झाला होता. मी इथेच सडणार. आम्हांला कुठचं असं फिरायला मिळतय असं बरळणं चाललं होतं. अरविंदला रागच आला. त्याला खूप चीड येत होती. इतक्यात जीजीने गोळ्या मागितल्या. 

जीजीला गोळ्या देताना त्याचं लक्ष झोपेच्या गोळ्यांच्या डबीकडे गेलं. त्याने हळूच ती डबी बेडरुममधे न्हेली. रेवती उद्याच्या डब्याची तयारी करत होती. अरविंदने कसलाही विचार न करता सगळ्या गोळ्या घशात टाकल्या नि घटाघटा पाणी प्याला.  

थोड्याच वेळात त्याला गुंगी येऊ लागली. रेवती बेडरुममधे येताच तिला ती रिकामी बाटली पडलेली दिसली नि अरविंद बेडवर पडला होता. नेमकं मनोजही चार दिवसाच्या ऑफिस टूरवर गेला होता. 

तिने घाईघाईत दरवाजा उघडला. दोंतेकाकूंना बोलावलं. दोंतेकाकूंनी आजुबाजूच्या मुलांना हाका मारुन बोलावून घेतलं. ताबडतोब अरविंदला जवळच्या इस्पितळात दाखल केलं गेलं. रेवतीचे वडील आले,त्यांनी पोलिस वगैरे सर्व परिस्थिती निस्तरली.

दोंतेकाकू दोन रात्र रेवतीच्या सोबतीला राहिली. तिला डबाही घेऊन जात होती शिवाय जीजीला शेजारची मंडळी बघत होती. 

दोंतेकांकूंना उलट उत्तरं केलेल्याचा रेवतीला आता पश्चाताप होत होता. ती दोंतेकाकूंजवळ जाऊन त्यांना सॉरी म्हणाली.

दोंते काकू म्हणाल्या,'सॉरी कसलं म्हणतेस. माझ्या मनात काही नाही बाळा. अगं मी अशी एकटीदुकटी रहाते. एक मुलगी होती मला. अगदी तुझ्यासारखीच होती माझी यमुना पण पहिल्या बाळंतपणात गेली ती.  जावयांनी दुसरं लग्न केलं. यमुनेचा मुलगा पाचेक वर्ष माझ्याकडे होता पण त्याच्या बापसाने त्याला दूर कुठल्या होस्टेलमधे टाकला नंतर हे अंथरूणाला खिळले नि गेले वर्षभरात.
 मीच राहिले एकटी.

 जीजींशी घरोबा माझा. ही दोघं अरविंद नि मनोज मला माझीच मुलं वाटतात. कदाचित मी माझं आईपण त्यांच्यातून अनुभवते. हा तुझा अरविंद,जीजीने कधी मारलं की माझ्याकडे धाव घ्यायचा. माझ्याच हातची पुरणपोळी आवडायची त्याला आणि आवडते अजुनही. मग या माझ्या मुलाला काही झालं तर कशी चैन पडेल गं मला!

हल्ली मी सासूगिरी करते तुम्हा दोघींवर. तोही माझा स्वार्थच. ऋणानुबंध आहेत गं माझे तुमच्या कुटुंबाशी. जमल्यास या काकूला माफ कर बाळा.'

रेवतीने काकूंच्या ओठांवर हात ठेवला व म्हणाली,'काकू वाटल्यास दोन मारा मला पण माफी नका हो मागू माझी. माझा अरु बरा होईल ना काकू?'

'अगदी खडखडीत बरा होईल बघ. चल पूस बरं डोळे. डॉक्टर आले तर तुलाच सलाईन लावतील.'

इंदूच्या घरी अरविंदच्या आजारपणाची बातमी पोहोचली. इंदूचे डोळे सासरच्या वाटेला लागले. गजाभाऊ तिला सासरी सोडून आले. इंदू खूप बोलली अरविंदला. ती दादा मानत होती त्याला. त्याने असं काही पाऊल उचलावं हे तिच्या कल्पनाशक्तीच्या पलिकडलं होतं. 

मनोजही दौरा आटपून लगोलग आला. सगळी आता अरविंदला अधिक जपू लागली होती. मानसोपचारतज्ञांकडून त्याच्यावर उपचार होत होते. काही दिवसांत त्याच्यात हवी तशी सुधारणाही दिसू लागली होती आणि महिनाभरात तो पुन्हा कामावर रुजू झाला. 

कोणत्याही माणसाच्या वक्तव्याचा आपल्या मनावर वाईट परिणाम होऊ द्यायचा नाही हे तो शिकला होता. रेवती आपल्यावर खरोखर प्रेम करते आणि आत्ता तीही पैशासाठी तगादा लावत नाही,घालूनपाडून बोलत नाही हे जाणवल्याने तो बराच निर्धास्त झाला होता. 

दोन दिवसांपूर्वी रेवतीने त्याला ती दोघं आईबाबा होणार असल्याची गोड बातमीही दिली होती.

------------------

 रेवती ज्या कंपनीत नोकरी करत होती ती दिवाळखोरीत निघाली व कंपनीने काही कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा ब्रेक दिला ज्यात रेवतीही होती.

रेवती तिच्या आईच्या घरी गेली.
'रेवती,अगं बरं झालं आलीस. आत्ताच बाबांनी तुझी आठवण काढलेली. गाजरहलवा केलाय तुझ्यासाठी. जा हातपाय धुवून घे बरं.

रेवती हातपाय धुवून खिडकीजवळच्या सेटीवर जाऊन बसली.

'किती दिवसांनी आलीस गं. काय झालंय ? अशी गप्प का तू?' 

'आई,' असं म्हणून रेवती रडू लागली.

तिचा आवाज ऐकून रेवतीचे वडीलही जवळ आले.

'रेवती काही सांगणारेस की अशीच मुळूमुळू रडत बसणार आहेस? जावईबापू बरे आहेत ना? नाही म्हणजे मधे झोपेच्या गोळ्या घेतलेल्या म्हणून विचारतो,रेवतीचे वडील म्हणाले.

'बाबा,मी सांगत होते ना तुम्हाला,अरविंदच्या ऑफिसमधल्या लुष्टेबद्दल.'

'हां एकदा बोललेलीस खरं,त्याच्याकडे दोन गाड्या आहेत,त्याच्या बायकोकडे नखशिखांत दागिने आहेस वगैरे त्यावरुन तर मी तुला दम दिलेला तेंव्हापासून तुटक वागू लागलीस माझ्याशी नि ते कुठल्या बिल्डरकडे पैसे भरलेस त्याच्या जमिनीची खातरजमा न करता त्याबद्द्लही जाग दाखवली नाहीस. जावईबापूंना जास्त व्याज देणाऱ्या संस्थेत बचत करायला भाग पाडलेस त्याबद्द्लही बापाशी आधी बोलावं वाटलं नाही तुला. परीणाम काय झाला!तुझी बचत बिल्डरने खाल्ली. जावईबापूंनाही भणंग केलंस. आत्ता नवीन काही करून आली असशील म्हणून रडत असशील. मोठ्या माणसांचा सल्ला घ्यायचा नाही. श्रीमंत होण्यासाठी चुकीच्या मार्गांचा अवलंब करायचा मग दुसरं काय होणार!'

'अहो किती बोलताय तिला! कबुलय काही निर्णय चुकले तिचे पण म्हणून सारखं टोचून कशाला बोललं पाहिजे. लेक आहे ती आपली. आपण नाही सांभाळून घेणार तर कोण घेणार,'रेवतीची आई म्हणाली.

'नाही,आई बोलूदे बाबांना. मी आहेच बोलून घेण्यासारखी. मी त्या अरविंदच्या ऑफिसमधल्या लुष्टेबद्द्ल बोलले होते ना तुम्हांला.'

'त्याचं काय झालं आता?'

'आई,काल त्याला व त्याच्या वरच्या साहेबाला ऑफिसमधे एंटीकरप्शन विभागाने सापळा रचून पकडलं पाच लाखाची लाच घेताना.'

रेवती असं म्हणून परत रडू लागली.

'रेवा,अगं किती रडशील आता. अरविंद सुरक्षित आहे ना?'

'हो आई,अरविंदने माझं ऐकलं नाही म्हणून तो यात अडकला नाही. नाहीतर सस्पेंड..आई मी वाईट आहे गं.' 

आत्ता मात्र रेवतीचे वडील तिच्या बाजूला बसले म्हणाले,'रेवती,रडू नकोस. देवाचे आभार मान, तुझा पती प्रामाणिक,सरळ चालीचा आहे म्हणून. अगं पैशापेक्षा अब्रू महत्त्वाची असते बाळा. आम्ही तुला ओरडतो ते तुझ्या भल्यासाठी. आता डोळे पूस नि आपण दोघं मिळून गाजरहलवा खाऊया. ए,वाढ गं मला नि माझ्या लेकीला हलवा. आज मी  माझ्या लेकीला भरवणार तिच्या लहानपणी चिऊकाऊचा घास भरवायचो तसं.'

रेवती म्हणाली,'आईबाबा,अजून एक वाईट बातमी आहे. मला दोन वर्षाचा ब्रेक मिळालाय कंपनीकडून. आत्ता काम नाही मला.'

आईने तिची समजूत घालत म्हंटलं,'दोनच वर्षना. अश्शी जातील बघ भुर्रकन उडून आणि पैशाची चिंता करु नकोस. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी.'

रेवती म्हणाली,'एक चांगली बातमी पण आहे माझ्याकडे. तुम्ही दोघं आजीआजोबा होणार आहात.'

रेवतीच्या आईने तिला मिठीत घेतलं,म्हणाली,'रेवा,गधडे,आधी ही गोड बातमी सांगायची सोडून काय चर्हाट लावून बसलेलीस गं.'

रेवतीच्या बाबांचे डोळेही लेक आई होणार या बातमीने लकाकले. त्यांनी गाजरहलवा भरवून तिचं तोंड गोड केलं.

रेवतीच्या वडिलांनी अरविंदलाही बोलवून घेतलं. रेवतीच्या मन:स्थितीबद्दल सांगितलं व तिला जपा म्हणाले. जावईबापू व लेकीसाठी खास ओल्या नारळाच्या करंज्या,पुरीभाजी,वरणभात, बीटाची कोशिंबीर,करवंदाचं लोणचं असा बेत केला होता. दोघांना जोडीने जेवायला बसवलं. 

 अरविंद व रेवती आईबाबांचा निरोप घेऊन घरी जायला निघाले. वाटेत अरविंद म्हणाला,'रेवा,झालं ते झालं. परतपरत त्याच गोष्टी उगाळत बसण्यात अर्थ नाही. पाठच्या चुकांतून शिकून पुढे चालत रहायला पाहिजे. थांबला तो संपला रेवा. मी एकदा थांबायचा प्रयत्न केला पण तुम्ही सगळ्यांनी वाचवलत मला. आत्ता यापुढे तसं नाही होणार  माझ्या हातून.

रेवा त्याचा हात हाती धरुन चालत राहिली.

या कठीण प्रसंगात,इंदू मात्र खंबीरपणे रेवती व अरविंदच्या पाठीशी उभी राहिली. रेवतीला तिने आपल्या 'स्वादिष्ट स्वैंपाकघरा'त सहभागी करुन घेतलं. रेवतीलाही आपल्या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयांचा पश्चाताप होत होता. 

इंदूने स्वतःकडची पुंजी मोडून त्यांची आर्थिक घडी बसवून दिली. पुर्वीचं काहीही मनात ठेवलं नाही. रेवतीच्या बाबांनीही आर्थिक हातभार लावला. दोघी मिळून झपाट्याने काम करु लागल्या. दोंतेकाकू आत्ता इंदूबरोबर रेवतीचंही कौतुक करु लागल्या. रेवती आई होणार असल्याने तिचे डोहाळे पुरवू लागल्या. पहिली सोनोग्राफी झाली तेंव्हा डॉक्टरांनी रेवतीला बेडरेस्ट घ्यावी लागेल असं सांगितलं. इंदू म्हणाली,'काहीच हरकत नाही. आपण सगळे मिळून काळजी घेऊ रेवतीची.'

इंदू  तिच्या कामासोबतच रेवतीचीही देखभाल करु लागली.  तिला वेळेवर नाश्ता,जेवण देणं,आनंदी ठेवणं सगळं सगळं  करु लागली. यात वेळात वेळ काढून ती मुलांना शिकवतही होती. इंदूकडून रेवती निरपेक्ष भावनेने एखाद्याची सेवा कशी करायची हे शिकत होती. त्या दोघींमधले बंध अधिकाधिक द्रुढ होत होते. 

आठव्या महिन्यातच रेवतीला कळा येऊ लागल्या. सिझेरियन झालं. रेवतीच्या आईसोबत इंदू,दोंतेकाकू दोघीही होत्या.  डॉक्टरांनी इटुकलीचिटुकली लक्ष्मी आणून अरविंदच्या हातात दिली. अरविंदच्या मनात आलं,जर आज मी त्या गोळ्यांमुळे हयात नसतो तर किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो. इंदू वाकून छकुलीकडे बघू लागली तसं तिने इंदूचं बोट घट्ट धरलं. ते इवलेइवले डोळे,नाजुक ओठ,कापसासारखे मऊ गाल.. इंदू अनिमिष नेत्राने पहात राहिली छकुलीकडे.

-----------

छकुलीमुळे घरात आनंदीआनंद झाला. तिचं न्हाऊमाखू, ओव्याधुपाची धुरी,तिचं हसणं,तिचं रडणं यात सगळी दंगून गेली. जीजीचाही दमा जणू पळूनच गेला. दोन्ही आज्जी मिळून नातीला सांभाळत होत्या. इंदू व रेवती दुप्पट वेगाने आणि उत्साहाने कामाला लागल्या होत्या.

 दोन वर्षानंतर परत रेवतीला कंपनीकडून कामावर हजर होण्याचं पत्र आलं पण रेवतीने ती ऑफर नाकारली. इंदुप्रमाणेच 'स्वादिष्ट स्वैंपाकघर' या घरगुतीउद्योगातच तिने पुढची वाटचाल करायचं ठरवलं. दोन वर्षांनी इंदू व रेवतीने मोक्याच्या ठिकाणी जागा घेतली. म्युनसिपालटीकडून उपहारगृह चालविण्याचा परवाना प्राप्त करुन घेतला.

 नवीन उपहारग्रुहाचं नाव 'जाऊबाई जोरात' असं ठेवण्यात आलं. जीजींच्या हस्ते 'जाऊबाई जोरात' उपहारग्रुहाचं उद्घाटन करण्यात आलं. या शुभप्रसंगी रेवतीचे आईबाबा, इंदूचे आईबाबा,तात्या,माई,प्रसन्ना हे सर्व उपस्थित होते. 

 या संघर्षाच्या वाटचालीत बिल्डींगमधल्या रहिवाशांनीही या कुटुंबाला भरपूर मदत केली होती. जीजी उद्घाटनावेळी भावूक झाली होती. तिने सर्व रहिवाशांचे मनापासून आभार मानले.

समाप्त

मंडळी कथेच्या प्रत्येक भागास तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू एका नवीन कथेसोबत.

🎭 Series Post

View all