Feb 28, 2024
प्रेम

जाऊ नको दूर!

Read Later
जाऊ नको दूर!

जाऊ नको दूर..!

बाबा आणि मुलीच्या निर्मळ नात्याची छोटीशी कथा!


"बाबा, माझ्या सिक्स्टीन बर्थडेला ना मला आय फोन थर्टिन प्रो मॅक्स मोबाईल हवाय!"


"अगं राणी हा मोबाईल काय वाईट आहे?" आपल्या हातातील मोबाईल तिच्या हातात ठेवत तो म्हणाला.

"आणि इतके दिवस हाच मोबाईल तर 'माझा, माझा' म्हणून वापरत होतीस ना? ह्यावरचे वॉलपेपर बघ, तुझ्याच आवडीचे आहे आणि त्यावर नाव पण तुझेच लिहिलेय की नाही."  तो.


"हो, पण आता ओल्ड वाटतोय हा पीस.  आय वॉन्ट न्यू.

डॅड, नॉऊ आय एम ग्रोअन अप! तुझी ती चिमुकली ईशी नाही राहिलेय मी. आय एम ओन्ली 'आय.एम.' इनिशिअल्स ऑफ ईशा माहिरे!"
 

"डॅड? हे काय नवीन आता? आत्तापर्यंत बाबा म्हणत होतीस ना? अचानक डॅड?"


"या! फ्रॉम टुडे आय विल कॉल यू डॅड."

"पण का?"


"माय लाईफ, माय रुल्स!" कपाळावर आलेले केस आपल्या विशिष्ट स्टाईलने उडवत ती म्हणाली.
त्याचा मोबाईल त्याच्याच हातात ठेवत ईशू आपल्या खोलीत निघून गेली.हा आहे रोहन अन ही त्याची लाडाची लेक, ईशी! तिच्या भाषेत सांगायचे तर 'आय. एम.' म्हणजे ईशा माहिरे.


"काय चाललंय हिचं? आज एकदम डॅड? मग तुला काय मॉम वगैरे म्हणते की काय?"  रोहन स्वयंपाकघरात येत बायकोला म्हणाला.

"नाही. मी अजूनपर्यंत तरी आईच आहे तिची. तू तेवढा बदलला आहेस."   रीमा हसून म्हणाली.

तो तिच्याकडे काही न समजून बघत राहिला.


"अरे, आई म्हणताना आपले ओठ एकमेकांना टच होत नाहीत. बाबा म्हणताना ते हमखास चिपकतात. म्हणून ती तुला डॅड म्हणतेय. कदाचित चिपकू बाबा तिला नको असेल?"


"हे काय गं? मला कळेल असे सांग काहीतरी."

तो 'बाबा' आणि 'डॅड' म्हणून बघत आपल्या ओठावर लक्ष केंद्रित करून म्हणाला.

"अरे, मॅडमनी ओठांना लिपस्टिक लावलीय. ओठ एकमेकांना टच झाले तर लिपस्टिक खराब होते असं यू ट्यूब वरून ज्ञान मिळालंय तिला. बाकी काही नाही. काही दिवसांनी गाडी परत बाबावर येते की नाही ते बघ.

ही घे मस्त कडक कॉफी. फ्रेश वाटेल."  कॉफीचा कप त्याच्या समोर ठेवत ती.


" ईशू माझ्यापासून दूर होत चाललीय का गं? "  काळजीने तो.

"अहं, जराशी मोठी झालीय!" कॉफीचा घोट घेऊन रीमा म्हणाली.

********
ईशी नुकतीच बाराव्या वयात पदार्पण करत होती. हे वय म्हणजे आपल्यालाच तेवढे सगळे कळते नि आईबाबा म्हणजे एकदमच आऊटडेटेड, ओल्ड फॅशन्ड असे वाटणाऱ्या वयाच्या टप्प्याची सुरुवात.
आपली ईशी याच मुलांच्या टप्प्यातील.


"बाबा, हा पेन बघ. मला ना अगदी असाच पेन हवाय. ओन्ली फिफ्टी रुपीज चा आहे यार!"

"अगं, आत्ताच नाही का तीन दिवसांपूर्वी दोन पेन घेतलेत?"

" ते आता मला आवडेनासे झालेत. आता मला हा पेन हवाय."
****

"बाबा, ही पिंक बॅग का आणलीस रे?"

"अगं,जनरली मुलींना पिंक कलर जास्त आवडतो ना म्हणून."

"आय एम नॉट द्याट एनी जनरल मुलगी. आय एम स्पेशल वन अँड आय लाईक ओन्ली ब्लॅक कलर!" ती गाल फुगवून म्हणाली.

"लहान असताना पिंक पिंक हवे म्हणणारी आता ब्लॅक ची दिवानी झालीय." तो मनाशीच हसला.

" काय? अतिलाडाने चढलीय ना डोक्यावर? आधीच सांगत होते, कधी कधी तिला नाही म्हणायला शिक रे. पण नाही. लाडाची लेक ना? "
स्वयंपाकघरातून बापलेकीचा संवाद ऐकणारी रीमा बाहेर येत त्याला म्हणाली.

"असू दे गं. लाडाचं कोकरू आहे. माझ्याजवळ नाहीतर आणखी कोणाजवळ हट्ट करेल ती?"
त्याने हसून विषय बाजूला सारला.

******

तिच्याशी झालेले एक एक संवाद रोहन ला आठवत होता नि हलकेच त्याच्या ओठावर हसू उमटले.


'जन्माला आली तेव्हा एवढीशी तर पिल्लू होती. माझ्या हाताच्या कोपरापेक्षाही कमीच लांबीची. आणि आता पाहता पाहता आपल्या आईपेक्षाही उंच झालीय. तिचे आता फुलात रूपांतर व्हायला लागलेय अन मी अजूनही कळीच समजतोय.'त्याला आठवलं, लहान असताना ईशू त्याच्याशी किती अटॅच होती. आता फक्त कामपूरती बोलते. बोलते काय? फक्त फर्मान सोडते. एखाद्या राणीसारखी! काही म्हटले तर तिचं एकच उत्तर, " मी तुझी छोटूशी राजकुमारी नाहीये. आय एम अ क्वीन! " काय तर म्हणे "आय एम ओन्ली आय. एम."
तिचे बोलणे आठवून परत त्याला हसू आले.


'माझे राणी, तू कितीही मोठी झालीस तरी ह्या बाबाची प्रिन्सेसच राहशील. आणि अशी किती मोठी झालीस गं तू? फक्त आईपेक्षा उंचच झालीस ना? आणखी खूप मोठी हो. आकाशाला गवसणी घाल. आपल्या कर्तृत्वाने खूप उंच हो!'

तो मनातच म्हणत होता. कारण प्रत्यक्षात बोलला असता तर तिने परत त्याला आऊटडेटेड बॉक्स मध्ये टाकले असते.

'चिमणी होती तेव्हा सतत कशी मागे मागे करायची? आईची लाडकी होतीच पण तिच्यापेक्षा पोरगी आपल्यावर जास्त जीव टाकते ही फिलिंग पण किती मस्त होती ना?'  तो स्वतःशीच विचार करत बसला होता.


हे खरेच होते. आईच्या पोटात असतानापासूनच तिला बाबाची विशेष ओढ होती.

"थकले रे रोहन, आता झोपूया? बाळ देखील झोपलेय बहुधा. तेवढी हालचाल जाणवत नाहीये." रात्री रीमाने असे म्हणायचा अवकाश की हा सरळ तिच्या पोटावर अलवार हात फिरवायचा.


'और इस दिल मे क्या रखा है,
तेरा ही नाम लिखा रखा है..'

त्याच्या गाण्याचा सुर कानापर्यंत पोहचला की दुसऱ्याच सेकंदाला रीमाच्या पोटातील तो इवलासा गोळा हालचाल करायला लागे. बाबाच्या आवाजाची जादू आईच्या उदरात असल्यापासूनच तिने ओळखायला लागली होती.

जन्माला आली तीच मुळी प्रिमॅच्युअर बेबी म्हणून. जणू बाबाला भेटण्याची भारीच ओढ.

मग आयसीयू मध्ये भरती. काचेच्या पेटीत आईबाबाविना अनोळखी दोन तीन आपल्यासारख्याच चिमण्या जिवासोबत तिचे वास्तव्य!
तिथे तिला भेटताना पायावर नाव लिहिलेली पट्टी वाचून ओळखायचं की हीच आपली लेक. कारण सगळी लेकरं सारखीच दिसायची. पण ही पट्ठी मात्र बाबाचा आवाज कानावर पडला की हळुवार का होईना पण हालचाल करून प्रतिसाद द्यायची.


आपल्या लेकीला त्या अवस्थेत बघून रीमाने त्याच्या मिठीत रडून तरी घेतलं होतं. तो मात्र डोळ्यातील अश्रू डोळ्यातच ठेऊन "होईल ती लवकर बरी!" असा बायकोला धीर देत होता.

बाप होता ना? बापाने रडून कसे चालणार?

दवाखान्यातून निघतांना "चल रे पिल्ल्या, निघतो आता." असं जरी याने म्हटलं तरी डोळे मिटून असलेली ती चार पाच दिवसांची चिमणी आपला गुलाबी ओठ बाहेर काढून हुंदका द्यायची.

" बाबा.. जाऊ नको दूर!" असेच काहीसे ती त्या हुंदक्यातून सांगायची.

तो मग "बरं बाळा नाही जात. थांबतो." असा म्हणाला की ही लबाड बरोबर गप्प व्हायची.
तीन चारदा असे झाले की पाचव्यांदा हा काही न बोलताच डोळे पुसत निघून जायचा. डोळे मिटून असलेल्या तिला बाबा गेलाय हे गावीही नसायचे.


एक महिना दवाखाना आणि नंतर एक महिना आईच्या माहेरी राहिल्यावर ईशी पहिल्यांदा घरी आली तेव्हा फुलांच्या पाकळ्यांनी याने तिचे स्वागत केले.


त्याचं लाडाचं इवलूसं पिल्लू मोठं नाटकूलं होतं. अंगावरचं दूध पुरेना म्हणून डॉक्टरांनी वरचे दूध सुरू करायला लावले. ही मुजोर ते दूध तोंडात घ्यायलाही तयार नसायची. तेव्हा हा तिच्यापुढे झुनझूने वाजवत नाचून दाखवायचा. तीन चार महिन्याची चिमूरडी, बापाचा नाच सुरू असला की तेवढे दूध कसेबसे प्यायची. तो नाचायचा थांबला की हिचे भोकाड पसरणे सुरू!


झोपताना आईच्या मांडीपेक्षा बाबाची मांडी जास्त प्रिय. मांडीवरून खाली ठेवायला जरा जरी हलला तरी हिचे डोळे पुन्हा सुरू व्हायचे. पाळण्यात झोपवतांना दोरी हलवायला हाच हवा. तोही उभा! पाय दुखले म्हणून बसायची सोय नाही. हिच्या रडण्याचा आवाज सुरू झालाच म्हणून समजायचा. त्याचं 'और इस दिल मे..' दहा वेळा गाऊन झाल्यावर त्याच्याकडे बघतच ती झोपणार. अर्धा एक तास हात दुखेपर्यंत त्याला राबवून घेणार अशी ही त्याची लाडकी ईशी.

नावही तर त्यानेच शोधून ठेवलं. 'ईशी' म्हणजे साक्षात देवी! मुळात देवाला न मानणारा तो, कोणत्याही शुभ कामाला जाताना मात्र हिच्या पायावर डोके ठेऊन जाणार. ती ह्याच्यासाठी शुभ आहे हा त्याचा गोड समज! त्याला जॉब पक्का झाला तेव्हाही तो लेकीचाच पायगुण आहे असे म्हणायचा.

असा हा ईशूवेडा बाप! तिच्यासाठी नाचला काय, गळा कोरडा पडेपर्यंत गायचा काय!
थोडी मोठी झाली तशी ती गोष्टीसाठी रुसून बसायची.

"किती गोष्टी सांगू गं?"  तो विचारायचा.

"दहा!" तिचे ठरलेले उत्तर असायचे. झोपताना एका गोष्टीने कधीच मन भरत नव्हते.


त्याच्या प्रेमाच्या बदल्यात तीही त्याला भरभरून प्रेम द्यायची. तो ऑफिसमधून परतला की दुडूदुडू धावत जाऊन त्याची बॅग घेऊन यायची. त्याला ग्लासमध्ये सांडत लवंडत का होईना, पाणी आणून द्यायची.


हीच ईशी आता जराशी मोठी झालीय. त्याने तिचे बालपणीचे आवडते गाणे गायला घेतले की तिला ते आता ओल्ड वाटते.

'स्मुथ लाईक बटर,
लाईक अ क्रिमिनल अंडर कव्हर.
गॉन पॉप लाईक ट्रबल,
ब्रेक इट इन यूअर हार्ट लाईक द्याट..'

असे त्याच्या कानावर कधी न पडलेले शब्द ती त्याला स्वतःच्या आवाजात ऐकवायला लागलीय. अर्थात गायनाचे बीज त्याच्याकडूनच हिच्यात आलेत बरं का.

तीन चार महिन्याची असताना त्याचा न कळणारा डान्स टक लावून आनंद लुटणारी ती आता, "तुला डान्स मधलं काहीच कसं कळत नाही रे? " म्हणून स्वतःसोबत नाचवायला लागली.


"लेक मोठी होतेय, तशी माझ्यापासून दूर जातेय का गं?"
एकदा हळवे होत बायकोला त्याने विचारलेच.

"काहीही रे तुझं! असं कधी असते का? मुलीचा पहिला हिरो तर तिचा बाबा असतो. ती का तुझ्यापासून दूर जाईल?"  हसून रीमा उत्तरली.


"तसं नाही गं. पण तुझ्याशी जेवढे मोकळेपणाने ती बोलते तेवढे हल्ली माझ्याशी नाही बोलत ती. काही हवे असेल तर तेवढे फक्त मागते, बाकी इतर कुठे काय सांगते? आणि हिरो म्हणशील तर ते कोरियन बीटीएस गँग चे चिकणे मुलं हिरो आहेत तिचे. काय तर म्हणे, 'स्मुथ लाईक बटर..'

मोबाईल बघतोस ना माझा? वॉलपेपर देखील त्यांचाच."  तो काहीसा खट्टू होत म्हणाला.


"कधी कधी ना अगदी लहान बाळासारखा करतोस हं तू." त्याच्या जवळ येत रीमा म्हणाली.


"रोहन, आपली ईशू मोठी होत आहे रे. ना ती धड लहान राहिलीय ना धड मोठी झालीये. काही ना काही नवे करून पाहावेसे वाटते तिला. सगळे हार्मोनल चेंजेस आहेत रे, हे. त्यामुळे अशी वागतेय. पण पोर मोठी गोड आहे. हां आता आहे जराशी अल्लड, तेवढीच निरागस देखील आहे. नको एवढं मनाला लावून घेऊस. तू तिचा हिरो होतास आणि कायमच राहशील.

आत्ताही काही हवे असेल तर तुलाच सांगते ना ती. खेळायला पार्टनर म्हणून तूच हवा असतोस. तुला तिच्यासारखा डान्स शिकवायला केवढी मेहनत घेतेय ती. आणि गाणं? जेव्हा ती गाते तेव्हा तुझ्यासारखीच गाताना हरवून जाते. अजूनही झोपताना तुझीच कथा ऐकायची असते तिला. ती कधीच दूर गेली नव्हती. आफ्टरऑल जन्माआधीच लाडावून ठेवलेल्या लाडोबाचा बाबा आहेस तू!

मी ना पैजेवर सांगू शकते, लग्न होऊन जेव्हा सासरी जायला निघेल ना तेव्हा माझ्या मिठीपेक्षा तुझ्या गळ्यात पडून जास्त रडेल ती. एवढा जवळचा आहेस तू." बोलता बोलता तिच्या कडा पानावल्या.


"ए, काही काय बोलतेस गं? मी तिला सासरी पाठवणारच नाही. त्यापेक्षा एखादा घरजावई शोधेन."  आपले डोळे पुसत तो.

वातावरण हलके करायला रीमाने टीव्ही ऑन केला, तर आलिया भट्टचा 'मुडके ना देखो दिलबरो..' गाणे सुरू होते. त्याचे डोळे परत भरून आले.


"बाबा, काय आहे हे? आपली डान्स प्रॅक्टिस आहे ना आणि तू टीव्ही बघत बसला आहेस? एक स्टेपसुद्धा व्यवस्थित येत नाही तुला." आत आल्या आल्या ईशूने टीव्ही बंद करून आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला.

डान्स ची पोजिशन घेत तिने एक गिरकी मारून दाखवली.
"हं, असं माझ्यासारखं कर."  ती.

तो मात्र तिच्याकडे टक लावून बघत होता. इतक्या दिवसांनी तिच्या तोंडून परत 'बाबा' ऐकताना तिची एक गोड पापी घ्यायची इच्छा तो आवरू शकला नाही.

"काय रे बाबा हे? पापी घेतलेलं मला आवडत नाही, माहिती आहे ना?"   ती गाल पुसत म्हणाली.
तो मात्र मनात हसत होता.

"हसू नकोस. मी टिचर आहे तुझी. टीचरशी असं वागतात का?"
तिने डोळे मोठे केले.

"सॉरी टिचर! " कान पकडून त्याने जीभ चावली.


"मॉम, कॅन यू ब्रिन्ग सम वॉटर फॉर मी? प्लीज!" स्वयंपाकघरात डोकावून ती म्हणाली.

"आई वरून मॉम? आणि मला परत बाबा. माझी लेक माझ्या दूर नाही जवळच तर आहे."   मनोमन तो सुखावला.

रीमा पाणी घेऊन हॉलमध्ये आली.

बापलेक 'बचपन का प्यार..' गाण्यावर फेर धरून नाचत?? नाही नाही, धिंगाणा घालत होते.

******* समाप्त *******


लहान असताना 'पापा की परी' असणारी बाबाची लाडकी वयात येताना त्याच्यापासून थोडी दुरावते पण म्हणून बाबावरचे तिचे प्रेम कमी होत नसते. काही संदर्भ जरूर बदलतात, प्रेम मात्र तसेच निर्मळ असते.
एका मुलीच्या आयुष्यात तिचा बाबाच तर पहिला हक्काचा माणूस असतो! तिच्या जन्माआधीपासूनच ते शेवटपर्यंत..! कारण तो बापमाणूस असतो.

********
©Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

            *साहित्यचोरी गुन्हा आहे.*


फोटो गुगल साभार!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//