जाऊ नको दूर. भाग -४(अंतिम)

कथा बापलेकीच्या निर्मळ नात्याची.


जाऊ नको दूर.
भाग -चार. (अंतिम)


"कधी कधी ना अगदी लहान बाळासारखा करतोस हं तू." त्याच्या जवळ येत रीमा म्हणाली.

"रोहन, आपली ईशू मोठी होत आहे रे. ना ती धड लहान राहिलीय ना धड मोठी झालीये. काही ना काही नवे करून पाहावेसे वाटते तिला. सगळे हार्मोनल चेंजेस आहेत रे, हे. त्यामुळे अशी वागतेय. पण पोर मोठी गोड आहे. हां आता आहे जराशी अल्लड, तेवढीच निरागस देखील आहे. नको एवढं मनाला लावून घेऊस. तू तिचा हिरो होतास आणि कायमच राहशील.

आत्ताही काही हवे असेल तर तुलाच सांगते ना ती. खेळायला पार्टनर म्हणून तूच हवा असतोस. तुला तिच्यासारखा डान्स शिकवायला केवढी मेहनत घेतेय ती. आणि गाणं? जेव्हा ती गाते तेव्हा तुझ्यासारखीच गाताना हरवून जाते. अजूनही झोपताना तुझीच कथा ऐकायची असते तिला. ती कधीच दूर गेली नव्हती. आफ्टरऑल जन्माआधीच लाडावून ठेवलेल्या लाडोबाचा बाबा आहेस तू! मी ना पैजेवर सांगू शकते, लग्न होऊन जेव्हा सासरी जायला निघेल ना तेव्हा माझ्या मिठीपेक्षा तुझ्या गळ्यात पडून जास्त रडेल ती. एवढा जवळचा आहेस तू." बोलता बोलता तिच्या कडा पाणावल्या.


"ए, काही काय बोलतेस गं? मी तिला सासरी पाठवणारच नाही. त्यापेक्षा एखादा घरजावई शोधेन." आपले डोळे पुसत तो.

वातावरण हलके करायला रीमाने टीव्ही ऑन केला, तर आलिया भट्टचा 'मुडके ना देखो दिलबरो' गाणे सुरू होते. त्याचे डोळे परत भरून आले.


"बाबा, काय आहे हे? आपली डान्स प्रॅक्टिस आहे ना आणि तू टीव्ही बघत बसला आहेस? एक स्टेपसुद्धा व्यवस्थित येत नाही तुला." आत आल्या आल्या ईशूने टीव्ही बंद करून आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला.

डान्स ची पोजिशन घेत तिने एक गिरकी मारून दाखवली.
"हं, असं माझ्यासारखं कर." ती.

तो मात्र तिच्याकडे टक लावून बघत होता. इतक्या दिवसांनी तिच्या तोंडून परत 'बाबा' ऐकताना तिची एक गोड पापी घ्यायची इच्छा तो आवरू शकला नाही.

"काय रे बाबा हे? पापी घेतलेलं मला आवडत नाही, माहिती आहे ना?" ती गाल पुसत म्हणाली.
तो मात्र मनात हसत होता.

"हसू नकोस. मी टिचर आहे तुझी. टीचरशी असं वागतात का?" तिने डोळे मोठे केले.

"सॉरी टिचर! " कान पकडून त्याने जीभ चावली.


"मॉम, कॅन यू ब्रिन्ग सम वॉटर फॉर मी? प्लीज." स्वयंपाकघरात डोकावून ती म्हणाली.

"आई वरून मॉम? आणि मला परत बाबा. माझी लेक माझ्या दूर नाही जवळच तर आहे." मनोमन तो सुखावला.

रीमा पाणी घेऊन हॉलमध्ये आली.

बापलेक 'बचपन का प्यार' गाण्यावर फेर धरून नाचत?? नाही नाही नाही, धिंगाणा घालत होते.

******* समाप्त *******


लहान असताना 'पापा की परी' असणारी बाबाची लाडकी वयात येताना त्याच्यापासून थोडी दुरावते पण म्हणून बाबावरचे तिचे प्रेम कमी होत नसते. काही संदर्भ जरूर बदलतात, प्रेम मात्र तसेच निर्मळ असते.
एका मुलीच्या आयुष्यात तिचा बाबाच तर पहिला हक्काचा माणूस असतो तिच्या जन्माआधीपासूनच ते शेवटपर्यंत..! कारण तो बापमाणूस असतो.

********
©Dr. Vrunda F. (वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

🎭 Series Post

View all